Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Saturday, March 23, 2024

जलपर्णी

तळं मरतंय म्हणून तू रडू नकोस नलिनी
पाहा कशी आनंदाने लहरतेय ही जलपर्णी
याच तळ्याच्या प्राणवायूवर ही फोफावली
अन् तळ्याच्या मढ्यावरही असेल ताजीतवानी

तुझा मात्र होणारच होता वंशविच्छेद
पण असू नये तुला त्याचा काही खेद
There will be too much filth
To give someone a new birth
And deep down we both know
The नीच will inherit the earth.

Sunday, January 13, 2019

परमेश्वराचा अवतार

“परमेश्वराचा अवतार आहे
आमचा महान नेता”,
असं म्हणतात ते
तेव्हा मला कौतुक वाटतं
किती अचूक ओळखतात त्याचं!
कारण,
ज्याचे निर्जीव डोळे लवत नाहीत
स्वत:च्या मंदिरात होणारे
आठ वर्षांच्या मुलीवरचे अत्याचार पाहून.
दानयाचनेसाठी पुढे केलेला हात
सरकत नाही मागे तिच्या किंकाळ्या ऐकून;
अपवित्र वाटत नाही ज्याला
तिच्या रक्ताचे शिंतोडे पाहून;
पण भंगते ब्रह्मचर्य ज्याचे
सॅनिटरी नॅपकिनमध्ये 
शोषल्या जाणाऱ्या रक्ताच्या शंकेने,
असा त्यांचा परमेश्वर आहे!

Tuesday, September 27, 2016

सुरळीत

"अबे तुमचं चारचौघांसारखं काही होणार नाही
आन् तुमच्याच्यानं क्रांतीवांतीपण होणार नाही."
ज्योतिषी बोलला खाजवत उघडी केसाळ मांडी,
"तुमच्या बुधावर आलीय शनिची वाकडी दांडी.
कुबेराच्या खजिन्यातले तुम्ही एक छदाम.
अमेरिकेच्या ताब्यातले तुम्ही साले सद्दाम.
गव्हाच्या गोदामातले तुम्ही एक गहू.
तुमच्या रविचा चखणा करतो तुमचाच राहू.
टनभराचा पाय छातीवर घेऊन मुंडी हलवता कशाले?
स्वताची बेंबी सोडून भलतीकडं तुम्ही बघता कशाले?
सगळे ज्या सुरळीतून जातात तिच्यातूनच जावा.
आपलं झालं चांगलं म्हणून गप निवांत ऱ्हावा.
देतो गुरुमंत्र तो म्हणा म्हणजे काय काळजी नाही
म्हणा 'परिस्थिती इतकीही काही वाईट नाही'.
विचार लई करु नै इतकं ध्यानात असू द्या एक
हं निघा आता पण आधी काढा रुपय एकशेएक."

Sunday, November 8, 2015

मुमुक्षु

निओकॉर्टेक्सच्या सीमावर्ती भागात
सगळ्यात सामसूम न्यूरल पथावरच्या
सगळ्यात शेवटच्या न्यूरल नोडच्या
सगळ्यात शेवटच्या मजल्यावर
मुमुक्षु राहतो.

रेप्टिलियन पाताळ अन् लीम्बिक धरतीवर
अनिर्बंध सत्ता चालते ज्याची आणि
निओकॉर्टेक्समध्ये ज्याचे फिरतात दूत
न्यूरल रस्त्यांवर हवे तसे ट्रॅफिक वळवत
तो त्रैलोक्याधीश डीएनेश्वर.

ईश्वराचे एजंट सतत नजर ठेवतात
पाठलाग करतात केमिकल बंदुका घेऊन
हल्ला करतात अचानक दिसेल तिथे
अतिप्रबळ साम्राज्याचा एकटाच हा शत्रू.
मुमुक्षु. ईश्वरपुत्र सैतान.

डमरू डीएनेश्वर वाजवतो कधी गगनभेदी
दैवी प्रयोजनाची रासायनिक कारंजी उसळतात
डोपॅमाईनचे चषकच्या चषक फेसाळतात
नव्या त्रैलोक्याची कुदळ मारली जाते पुन:पुन्हा
रडतो मुमुक्षु पोटात गुडघे घेऊन

बलवान नव्या मुमुक्षुच्या जन्माची प्रार्थना करतो.
मुमुक्षु. ईश्वरपुत्र सैतान.

कविता

मी करतो शब्दांच्या कसरती
आणि रचतो ते एक-एकावरती
शब्द नव्हेत जणू दगड-गोटेच
रत्न पडलेले कोंदण खोटेच.
हा नको, तो चांगला बसतोय
कमी वापरलेला, धारदार दिसतोय.
शब्दांचे तोलून मापून वजन
चिकाटीने करतो ओळींचे "सृजन".
कवितेचे देतो मग त्यांना नाव
आळवून वाचतो आणून आव.
पण....

तिच्या प्रथमदर्शनाची काळजातली कळ
माझ्या कवितेत काही उमटत नाही
पहिल्या पावसातला मातीचा वास
शब्दांच्या चिमटीत सिमटत नाही.
मला पाहून झुकलेल्या पापणीआडची
शब्दांत रंगत खुणवत नाही
निरोपाच्या क्षणातली कालवाकालव
शब्दांमधून जाणवत नाही.
ऐकणारे वाजवतात माफक टाळ्या
आणि होऊन बसतो मी एकटा उदास
निघालोय मी घेऊन पांगुळगाडा
अन् कविता म्हणजे फार दूरचा प्रवास.

Sunday, May 17, 2015

संघर्ष

गर्द वनराईतला तो वड खुरटलेला कुढतो मनात,
"रात्रीपासून सकाळपर्यंतच्या प्रवासात
कधीकधी गर्तेत प्रशांत सागराच्या 
सूर्य अडकून बसतो माझ्या वाटेचा.
न सरणाऱ्या रात्रीत मुळा-पारंब्यातला जोरच जातो
आणि मुळांखालचा खडक अभेद्य वाटू लागतो."
आठवतो तो मग ते पांथस्थ वनराईत आलेले
खुरटेपणावर त्याच्या आणि कुत्सित हसलेले.
फांद्या एकमेकींवर घासतो आणि वाट पाहतो,
कधी एक ठिणगी पडेल आणि ईर्ष्या त्याची धडधडून पेटेल.
जाळेल त्यालाही ती आतून त्याची त्यालाही कल्पना आहे
पण रात्र सरेपर्यंत जाळण्यासारखी तेवढीच एक गोष्ट उरली आहे.

Saturday, December 14, 2013

फुकुशिमानो तोत्तोचान

वसंताच्या लख्ख दुपारी चेरीचं फूल फुलावं
तसं  उमटतं तिच्या गोबर्‍या गालावर हसू
फुकुशिमानो तोत्तोचानवा खावाक् सुगोय देसु

तोत्तोचानच्या घरामागे खूप खूप सूर्यफुलं राहतात
रोज सकाळी सगळी सूर्याकडे एकटक पाहतात
फुलांवरच्या माश्यामात्र दिसत नाहीत आता
आणि दबून बसलीय शेतांमधे भेदरटशी शांतता

ओतोओसानचा चेहरा तिला नीटसा आठवत नाही
रविवारशिवाय कधी त्यांची भेटच झाली नाही
कोण जाणे कसला त्यांना एवढा त्रास होता
पण एक दिवस ओतोओसानगा जिसात्सु शिता

ओकाआसानच्या हसण्यातली उदासी लपत नाही
काय होणार पुढे तिला विचार करवत नाही
गाईंच्या अंगावर पडले ठिपके तिला बघवले नाही
एका देठावर फुलं दोन तोत्तोने सांगितलेच नाही

ओजिइसान रोजचा वेळ शांतपणे घालवतात
ऐंशी वय झालं तरी मजेत सायकल चालवतात
तोत्तोचानला आवडतात ते मनापासून जरी
न सांगताच थोडं आयुष्य तिचं घेतलंय तरी




tottochan

sunflower


शब्दार्थः
फुकुशिमानो तोत्तोचानवा खावाक् सुगोय देसु: फुकुशिमाची तोत्तो गोंडस व सुंदर आहे.
ओतोओसान: वडील
ओकाआसान: आई
ओजिइसान: आजोबा
जिसात्सु शिता: आत्महत्या केली.

Saturday, July 20, 2013

नार्सिससचा स्वप्नदोष

काचेच्या भांड्यातल्या गोल्डफिशसारखा
विहरतो तो स्वच्छंद लिमिटेड अवकाशात 
अन् तापलेल्या सूर्याच्या तोंडावर मिटून कवाडं
प्रतिबिंब पाहतो काचेत अ‍ॅनिमिक प्रकाशात 

बांधलेल्या आखीव मॅग्नेटिक रस्त्यांवर
गुळगुळीत मॅगलेव्हने जाताना भर वेगात
ऑटोपायलटवर टाकलेल्या आयुष्याला 
रस्ता सोडून जायचं येतच नाही मनात

क्षणात रंग बदलणार्‍या बत्तीस बिटी भिंती अन्
आकार बदलत्या नॅनो फर्निचरच्या गराड्यात
कंटाळाच भरून राहिलेला असतो मख्खपणे
त्याच्या वेल इंजिनिअर्ड पिळदार शरीरात

चौघांचं चौकोनी चतुरस्र कायदेशीर कुटुंब
पसरलेलं जगभर ताणून एकेका कोपर्‍यात
स्वतंत्र, स्वतःचा असतो तो संपूर्णपणे
यंत्रांच्या आधाराने या एकविसाव्या शतकात

दचकून उठतो तो रोज गुडघ्यातलं डोकं काढून
स्वप्नातल्या जंगलाच्या मादक वासाने 
अन् डिझायनर लाईफच्या शुभ्र चादरीवरचे
निरर्थकतेचे डाग पाहात बसतो सुन्नपणाने

Friday, May 6, 2011

जर तू असता तर

जर तू असता तर
तुला दिसले असते
सुरे घेतलेले हात
कल्ले कापलेलं शरीर
निळ्याशार पाण्यातला लाल ढग
तुला दिसले असते
अजस्त्र शरीरावरचे
निर्जीव भासणारे डोळे
दिसलीही असती त्यात वेदना
पण नसती दिसली दया याचना


जर तू असता तर
तुला दिसले असते
काळे पिवळे पट्टे
आणि त्यावर लाल जखमा
भेदरलेले गोड बछडे
आणि जमिनीवर आपटलेली शेपटी
दिसले असते तुला
थंड भासणारे हिरवे-पिंगट डोळे
क्रोधाचा पेटलेला त्यात वणवा
पण तुझ्या प्रार्थनेची वानवा


जर तू असता तर
तुला दिसले असते
कुर्‍हाडीचे घाव सोसणारे
महाकाय मूक वृ़क्ष
चूड घेतलेल्या हातांनी
पेटवलेले भीषण वणवे
उघडे बोडके डोंगर
त्यावरचे तुझे मंदिर
आणि हातापाया न पडता
समोर कोसळणारी झाडे


जर तू असता तर
तुला दिसले असते
क्षुद्र मुके जीव
मानाने जगणारे
मरण येईपर्यंत
आयुष्याशी झगडणारे
जर तू असता तर
उचलले असतेस तुझे
चक्र, वज्र, त्रिशूळ, तलवार
आणि छाटली असतीस समोरची
झुकलेली मुंडकी लाचार

Tuesday, April 19, 2011

भिऊ नकोस ...

फुलपाखरांमागे धावताना, कधी झोक्यावर हिंदोळताना

पावसात भिजून आणि ओल्या मातीत खोपे करताना
दगडधोंडे उचकताना अन् काट्याफुफाट्यात हिंडताना
कळलंच नाही की तो आहे आणि हळूच कानी म्हणतो आहे
"भिऊ नकोस ... पण मी तुझ्या पाठीशी आहे."

नवी नव्हाळी फुटताना, सगळं जग फुलताना
नवी शिखरे चढताना, सागर पालथे घालताना
छातीने पर्वत फोडताना अन् लाथेने पाणी काढताना
दुर्लक्ष केलं उद्दामपणे जरी कळलं तो म्हणतोच आहे
"भिऊ नकोस ... पण मी तुझ्या पाठीशी आहे."

नात्यांचे दोर काचताना अन् मैत्रीच्या काचा तडकताना
जन्माचा हिशेब ठेवताना अन् जमलेल्या कवड्या मोजताना
विषारी डंख झेलताना आणि हिरीरीने दात रोवताना
चुकवली नजर अन् ऐकलं गुमान काय तो म्हणतो आहे
"भिऊ नकोस ... पण मी तुझ्या पाठीशी आहे."

मोतीबिंदू आता साचताना अन् लख्ख सगळं दिसताना
आयुष्याचे तांडव पाहताना अन् सयींचा छळ सोसताना
एकटाच ओझे वाहताना अन् पैलतीराकडे पाहताना
वाट पाहतोय, कधी तो जवळ येऊन म्हणतो आहे
"भिऊ नकोस ... मी तुझ्या पाठीशी आहे."

किल्ली

प्रत्येक कुलपाला एक किल्ली असते
कधी बरोबर तर कधी दुरावलेली असते

कुलूप कधी सुबक ठेंगणं असतं
तर कधी कुरूप बेंगणं असतं
कधी कधी अवघड नाठाळ असतं
तर कधी प्रेमळ ओढाळ असतं
कसंही असलं तरी किल्ली बनलेली असते
त्यांची गाठ म्हणे वरतीच मारलेली असते

कुलपावर सगळ्या घराचा राखणभार असतो
पण घरात राहायला किल्लीचाच आधार असतो
कुलूप घरीच राहून घर राखत बसतं
तेव्हा किल्लीला बाहेर उंडारायचं असतं
कितीही भटकली किल्ली तरी शेवटी फिरून घरीच येते
दुसर्‍या दारांवरून गेली तरी आपल्याच कुलपाला लागते

कुलूप किल्लीच्या नात्याची हीच एक गंमत असते
दाराला कुलूप लावले तरच किल्लीला किंमत असते
प्रेमानं दोघं राहिली तर वंगणाची निश्चिंती असते
भांडलीतंडली तर मात्र गंजण्याची निश्चिती असते
म्हणूनच म्हणतो प्रत्येक कुलपाला एक किल्ली असते
तिने कुलपाला आणि कुलपाने तिला जपलेली असते

मोहोर

नियतीच्या सहस्त्र भुजांत अजस्त्र विक्राळ जोर आहे
विधीलिखितावर अटळपणाची उमटलेली मोहोर आहे

टेबलाशी खुर्चीत एकेक खिडकीशी बसला चोर आहे
उपोषणांच्या वांझपणावर उमटलेली मोहोर आहे

आग्रा कधी अमृतसर कधी मोहाली कधी लाहोर आहे
मूक थडग्यांवर अहिंसेची उमटलेली मोहोर आहे

जन्मानंतर तोडली नाळ जणू कापलेला दोर आहे
अंतापर्यंतच्या भटकण्यावर उमटलेली मोहोर आहे

भरल्या पोटी गातो गाणे निरंजन भाव विभोर आहे
झगड्यावरती रोज लाखोंच्या उमटलेली मोहोर आहे

पाऊस माझा

आजीचा जणू देवघरात
मंत्रपाठसे मंद सुरात
ईशस्तवने मंगल गात
कधी जागवी सुप्रभात
पाऊस माझा पाऊस माझा ||१||


रानावनात घुमवी पावा
हवेत धुंद गंध शिडकावा
लपाछपीचा डाव नवा
भटकंतीला साथी हवा
पाऊस माझा पाऊस माझा ||२||


तृषार्त तप्त रसा दुपारी
जल वर्षता होय गोजिरी
इंद्रधनूचा वेल अंबरी
फुलवी खुलवी प्रीत अंतरी
पाऊस माझा पाऊस माझा ||३||


कधी तरी अन् कातरवेळी
डोह मनाचा निर्मम घुसळी
गतकाळाच्या आठवणींनी
भरतो डोळा माझ्या पाणी
पाऊस माझा पाऊस माझा ||४||


प्रभू चरणी एक मागणी
सरणावरती देता अग्नी
धूर निरंजन मेघ व्हावा
आणि भूवर या बरसावा
पाऊस माझा पाऊस माझा ||५||

Tuesday, November 23, 2010

रक्षण

डोळे मिटून मी आत डोकावतो
तेव्हा मला एक वाघुळ दिसतं
तोंड झाकलेल्या विहीरीमध्ये
ते गरागरा फिरत असतं
बाहेरच्या प्रकाशाला अंधार
नि आतल्या अंधाराला प्रकाश समजतं
गोंगाट असल्यावर काही नाही
पण शांतता झिरपलीच तर भेलकांडतं....
सकाळी जेव्हा मी उठतो
मऊ बिछान्यातून दुखर्‍या अंगानं
बाहेर सृष्टी सजत असते
शब्दरहित पण नवनव्या ढंगानं
गवतावर नि:शब्दपणे दवबिंदु ठिबकतात
आणि मूकपणे कळ्या उमलतात
तिकडे मी चक्क दुर्लक्ष करतो
गाड्यांचा पोंगाट ऐकत राहतो....
बसची वाट पाहताना, एका कोपर्‍यात
मला एक मांजर दिसतं
कोवळ्या उन्हात एक पंजा वर करून
स्वतःचंच पोट चाटत असतं
बस यायच्या थोडंसं आधी का कोण जाणे पण ते वळतं
टाटा केल्या सारखा पंजा हवेत ठेवून
बिलोरी डोळ्यांनी माझ्यात खोलवर पाहातं
मी नजर टाळून मोबाईल काढतो
उगाच चाळा म्हणून वेळ पाहतो
कोणी मेल टाकलंय का पाहतो
फेसबुकवर कोणी आहे का पाहतो
तेवढ्यात मग घरघरत बस येते
सगळी माणसांची टरफलं पोटात घेते......
ऑफिसमध्ये कॉम्प्युटरसमोर बसून
मी त्याचीच नक्कल करत असतो
बंद काचेबाहेर तेव्हाही
गुलमोहराचा उत्सव चालूच असतो
मी तिकडे बघतही नाही
यंत्रांमध्येच रमतो
यंत्रंही मला आता जिवंत वाटतात
कारण माझा जिवंतपणाही तसाच असतो.....
संध्याकाळी झाडं पानं मिटून घेतात
आणि पक्षी घरट्यात जाऊन निजतात
तेव्हा मी टीव्ही पाहत बसतो
ग्रीन कार पासून ग्रीन कारखान्यांपर्यंत
आणि ग्रीन सिमेंट पासून ग्रीन टॉयलेट पेपरपर्यंत
सगळ्या जाहिराती पाहत असतो
वाघांना कसं वाचवताहेत त्याची डॉक्युमेंटरी
शार्क्सना कसं वाचवताहेत त्यावर कॉमेंटरी
समुद्रातली कासवं वाचवणार
बर्फातली अस्वलं वाचवणार
सुंदरबनातले वाघ वाचवणार
आफ्रिकेतले सिह वाचवणार
झाडं वाचवणार जंगल वाचवणार
नद्या वाचवणार डोंगर वाचवणार
कोणालाही सोडणार नाही
सगळी पृथ्वीच वाचवणार
असा छानपैकी गोंगाट होतो
आणि मेंदू रिकामा होऊन जातो
मनही अगदी बधीर होऊन जातं
आतलं वाघुळ थकून जातं....
मग मी झोपायला जातो
जडावलेल्या डोळ्यांनी विचार करतो
त्या दवबिंदूंना, त्या कळ्यांना
त्या मांजराला, त्या झाडांना
एवढंच एक साकडं घालतो
"माझ्यासाठी एवढं करणार ना?
सगळं संपण्याआधी तुम्ही मला वाचवणार ना?"