फुलपाखरांमागे धावताना, कधी झोक्यावर हिंदोळताना
पावसात भिजून आणि ओल्या मातीत खोपे करताना
दगडधोंडे उचकताना अन् काट्याफुफाट्यात हिंडताना
कळलंच नाही की तो आहे आणि हळूच कानी म्हणतो आहे
"भिऊ नकोस ... पण मी तुझ्या पाठीशी आहे."
नवी नव्हाळी फुटताना, सगळं जग फुलताना
नवी शिखरे चढताना, सागर पालथे घालताना
छातीने पर्वत फोडताना अन् लाथेने पाणी काढताना
दुर्लक्ष केलं उद्दामपणे जरी कळलं तो म्हणतोच आहे
"भिऊ नकोस ... पण मी तुझ्या पाठीशी आहे."
नात्यांचे दोर काचताना अन् मैत्रीच्या काचा तडकताना
जन्माचा हिशेब ठेवताना अन् जमलेल्या कवड्या मोजताना
विषारी डंख झेलताना आणि हिरीरीने दात रोवताना
चुकवली नजर अन् ऐकलं गुमान काय तो म्हणतो आहे
"भिऊ नकोस ... पण मी तुझ्या पाठीशी आहे."
मोतीबिंदू आता साचताना अन् लख्ख सगळं दिसताना
आयुष्याचे तांडव पाहताना अन् सयींचा छळ सोसताना
एकटाच ओझे वाहताना अन् पैलतीराकडे पाहताना
वाट पाहतोय, कधी तो जवळ येऊन म्हणतो आहे
"भिऊ नकोस ... मी तुझ्या पाठीशी आहे."
No comments:
Post a Comment