Thursday, December 30, 2010

कागद

आज लवकरच ती कामाला लागली. पोराला काखोटीला मारून आणि नायलॉनचं मळकट पोतं घेऊन ती नेहमीप्रमाणे त्या रस्त्यावर आली तेव्हा सगळीकडे कागदांचा खच पडला होता. काल संध्याकाळी तिथून गेलेल्या भव्य मोर्चात उधळलेल्या हँडबिलांनी इतरवेळी सुबक नेटका वाटणारा तो रस्ता आता मातीत खेळून आलेल्या वांड पोरासारखा दिसत होता. पोराला रोजच्यासारखं नंदूच्या टपरीच्या वळचणीला ठेवून ती भराभरा कागद गोळा करायला लागली. नेहमीपेक्षा निम्म्या वेळातच तिचं पोतं कागदांनी गच्च भरून गेलं आणि रस्ताही बऱ्यापैकी मूळ स्वरुपात आला. सगळे कागद आता संपले होते तरी ती शोधकपणे थोडा वेळ इकडे तिकडे पाहत हिंडत राहिली. बऱ्याच ठिकाणी मोर्चातल्या लोकांच्या सुटलेल्या धडक्या तुटक्या चपला आणि कंगवे वगैरे सटर फटर वस्तू पडलेल्या होत्या. ती उगिचच त्या वस्तुना पायाने एका बाजूला लोटत राहिली आणि मिळतील तेवढे तुरळक कागद गोळा करत राहिली. तास-दीड तासाने हळू हळू रस्ता जागू लागला आणि वाहनांची वर्दळ थोडी थोडी सुरू झाली. मग ती जायला वळली आणि तेवढ्यात धुळीत पडलेलं कोणाचं तरी पैशांचं पाकीट तिला दिसलं. तिचे डोळे लकाकले. आजचा दिवस तिच्यासाठी फारच चांगला निघाला होता. कोणी पाहत नाही असं पाहून तिने झटकन पाकीट उचललं आणि मग ती मागे वळून न पाहता पोतं घेऊन नंदूच्या टपरीकडे आली.
पोतं भिंतीला टेकवून ठेवलं आणि भिंतीकडेच तोंड करून तिने गुपचूप पदराआड पाकीट उघडलं. आत दहाच्या चार पाच आणि पन्नासची एक नोट होती. एवढे पैसे पाहून तर ती घबाड मिळाल्यासारखी हरखून गेली. पटकन ते पैसे तिने कनवटीला लावले आणि पाकीट दिलं पोराला खेळायला. तिने समाधानाने एक खोलवर श्वास घेतला. रोज तिला त्रास देणारा गरम बटाटेवड्याचा आणि मिसळीचा वास आज तिने आनंदाने छाती भरून घेतला. कित्येक दिवसांनी तिला आज नुस्त्या वासावर समाधान न मानता प्रत्यक्ष चव चाखायला मिळणार होती आणि तीही पोटभर खाऊन.
ती टपरीजवळ गेली आणि पाच-सहा रुपये खर्चून तिने गरमागरम वडे, पाव आणि मिसळीचा झणझणीत रस्सा घेतला. तिथेच पडलेला कालचा शिळा पेपर तिने उचलला आणि पुनः पोत्याजवळ येऊन बसली. थोडी भिंतीला आणि थोडी कागदाच्या पोत्याला असं थाटात रेलून बसून तिने पेपर खाली अंथरला आणि त्यावर खाद्यपदार्थ ठेवले. तिने मिसळ पावाचा एक घास घेतला आणि डोळे मिटून त्या चवीचा तवंग सर्वांगावर पसरताना पाहत राहिली. तिने डोळे उघडून पाहिलं तेव्हा पोरगं पाकीटात सापडलेल्या लॉटरीच्या तिकीटाशी खेळत होतं. शंभर रुपयांच्या नोटेपेक्षाही मोठं आणि रंगीबेरंगी तिकीट निरखून पाहण्यात ते गुंगून गेलं होतं. तिने त्याला हाक मारली तेव्हा त्याची तंद्री भंगली आणि आई काहीतरी खायला बोलावतेय हे पाहून हातातलं तिकीट टाकून ते आईकडे पळालं. त्याला तिने एक घास भरवला आणि दोघं एकमेकांकडे पाहून समाधानाने हसली. अंथरलेल्या पेपरमध्ये नुकत्याच टाकून दिलेल्या तिकीटाचा नंबर छापून आला आहे हे त्यांच्या गावीही नव्हतं.

Sunday, December 26, 2010

अ ख्रिसमस मिरॅकल

सुजीत, मनिषा आणि अर्णवला बाय करून अनंतराव घरात आले. बाहेरच्या बर्फाळ हवेतून घराच्या हीटर लावून उबदार ठेवलेल्या पोटात आल्यावर त्यांना जरा बरं वाटलं. किचनमध्ये जाऊन त्यांनी हॉट चॉकोलेट ओतून घेतले आणि पुढच्या खोलीत येऊन गुबगुबीत सोफ्यावर अलगद बसले. दोन दिवस एवढ्या मोठ्या बंगल्यात आता एकट्यानेच राहायचं या विचाराने त्यांच्या मनावर गरम दुधावर साय जमा होते तसा एक उदासवाणा तवंग जमा झाला. त्यांना वत्सलाबाईंची आठवण झाली. तशी ती इतरवेळीही दिवसातून पन्नासवेळा होतच असे. वत्सलाबाई जाऊन आता वर्ष होत आलं असलं तरी इकडे आल्यापासून त्यांची आठवण खूपच यायला लागली होती. भारतात असताना वत्सलाबाई नसल्याचं इतकं वाईट वाटत होतं की नाही हे त्यांनी आठवायचा प्रयत्न केला पण त्यांना नक्की ठरवता आले नाही. त्यांना भारतातल्या आपल्या घराची तीव्रतेने आठवण झाली आणि पोटातून आतून कोणीतरी चिमटा काढल्यासारखं पिळवटलं गेलं. "उणीपुरी तीस वर्षं काढली असतील त्या घरात. मनिषाचं बालपणही त्याच घरात गेलं. तिला येत असेल का त्या घराची आठवण? वाटत तर नाही. इतकी मस्त रमली आहे या देशात. आपण मात्र सहा महिन्यात कंटाळलो. सकाळी सगळी आपापल्या कामाला गेली की दिवस खायला उठतो. वाचून वाचून तरी किती वाचणार? ना कोणी मित्र ना कोणी सोबती. संध्याकाळी फिरायला जाऊन गप्पा मारत बसावं असंही कोणी नाही. सकाळ संध्याकाळ आपलं घर, नाहीतर लायब्ररी किंवा मग एकट्यानेच फिरणे. शनिवार रविवार घर भरलेले असते खरे पण मनिषा-सुजीत-अर्णव त्यांच्या त्यांच्या व्यापांमध्ये मग्न असतात, मुद्दामहून कोण येऊन बोलत बसणार? वत्सला असती तर थोडी सोबत तरी झाली असती. दोघं एकमेकाना धरून राहिलो असतो. ती गेल्यावरही तिकडे एकटा रहिलो असतो खरं म्हणजे पण पोरीने ऐकलं नाही. अजून हातपाय धडधाकट आहेत तरी किती काळजी.आता असं एकट्याचं जिणं आलं नशीबी जावयाच्या दारात. तसा तो चांगला आहे पण आपण तरी किती लुडबूड करणार? सगळीकडे आपल्याला घेऊन जाणं कसं शक्य आहे? म्हणूनच म्हटलं या वेळी तुम्ही तिघेच जा."मनातल्या विचारांपासून सुटका म्हणून अनंतरावांनी उगाचच टीव्ही लावला आणि हॉट चॉकोलेट संपेपर्यंत निरर्थकपणे त्याच्याकडे पाहत बसले. मग टीव्ही बंद केला आणि रिकामा कप किचन सिंकमध्ये विसळून पुन्हा बाहेरच्या खोलीत आले. पुन्हा सोफ्यासमोर उभे राहून आता पुढे काय करावे या विचारात आपल्या थोड्याशा सुरकुतलेल्या गालावरचे दाढीचे खुंट उगाचच खाजवत उभे राहिले. आत्ता कुठे दहा वाजत आलेत आणि आख्खा दिवस समोर आ वासून पडला आहे. त्यात परत हिवाळा असल्याने चारपाच वाजताच अंधार पडणार. या कडाक्याच्या थंडीत बाहेर जायची इच्छासुद्धा होत नाही. लायब्ररीत जावे की घरीच वाचत बसावे यावर काही वेळ विचार केल्यावर त्यांनी शेवटी घरीच बसायचे ठरवले. मग उगीचच आळोखेपिळोखे देत ते स्टडीमध्ये आले आणि बुकशेल्फ समोर उभे राहून वाचायला एखादे छानसे पुस्तक शोधू लागले. बरीचशी पुस्तके एक-दोनदा वाचून झाली होती. कोणतेही पुस्तक पाहिले की त्यांना त्यात कायकाय आहे ते आठवायचे आणि मग नको ते पुन्हा वाचायला असा विचार करून पुढे जायचे असा खेळ बराच वेळ झाल्यावर त्यांनी एक त्यातल्या त्यात हलकेफुलके असे पुस्तक निवडले आणि ते घेऊन खोलीत जाऊन बेडवर पडून वाचू लागले. एका हातात पुस्तक धरून दुसर्‍या हाताने दुलई गळ्यापर्यंत ओढून घेत ते लगेचच पुस्तक वाचण्यात गुंगुन गेले.नेहमीच्या सवयीने शेजारचे रामभाऊ त्यांच्या खांद्याला सारखा स्पर्श करीत अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाबद्दल आणि भारताच्या बोटचेपेपणाबद्दल तावातावाने बोलत होते आणि अनंतराव नेहमीप्रमाणे मान डोलावून हो हो म्हणत होते; तितक्यात वरून वत्सलाबाईंची हाक ऐकू आली. अनंतरावांनी वर पाहिले तर वत्सलाबाई गॅलरीतून वाकून काहीतरी ओरडून सांगत होत्या. बहुतेक कोपर्‍यावरच्या दुकानातून काहीतरी आणायला सांगत असाव्यात. त्यांच्या हातात पिशवी दिसत होती. त्यांनी ती पिशवी खाली फेकली. पिशवी खाली पडून खराब होऊ नये म्हणून अनंतराव ताडकन उठले आणि पिशवी झेलायला तरातरा जाऊ लागले. अचानक त्यांचा पाय कशात तरी अडकला आणि फटकन त्यांच्या तोंडावर काहीतरी पडले.... दचकून अनंतरावांनी डोळे उघडले, तोंडावर पडलेले पुस्तक बाजूला करत त्यांनी आपण नक्की कुठे आहोत त्याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. कुठे आहोत ते कळल्यावर पुन्हा ते एकटेपणाचे आणि निराशेचे काळे पांघरूण त्यांच्या मनावर ओढले गेले आणि स्वप्नात नुकतेच पाहिलेले मस्त प्रखर ऊन, आपले घर आणि वत्सलाबाईंना आठवत ते चेहर्‍यावर बावळट भाव घेऊन पडून राहिले. थोडावेळ तसेच पडून राहिल्यावर त्यांनी घड्याळात पाहिले. फक्त एक-दीड तासच गेला होता. या वेगाने जर वेळ जात असेल तर दोन दिवसात वेड लागेल असे त्यांना वाटले. सुजीत-मनिषाचा आग्रह मोडून उगाचच घरी एकटा राहिलो असे त्यांना वाटू लागले. त्यांच्या प्रायव्हसीची, एन्जॉयमेन्टची काळजी करून फुकाचा मोठेपणा घेतल्याबद्दल त्यांना आता थोडासा पश्चात्ताप होऊ लागला. गेलो असतो बाहेर त्यांच्याबरोबर तर वेळ तरी मजेत गेला असता असे त्यांना वाटले. दोन-तीन मिनिटे त्याच वाक्यावर विचार करत बसल्यावर त्यांच्या डोक्यात काही तरी चमकले. बाहेर जायचं तर सुजीत-मनिषाबरोबरच जायला पाहिजे असं थोडीच आहे? आपलं आपणही जाऊ शकतोच की.शिवाय ख्रिसमस म्हणून दुकानं इतकी गजबजली आहेत, काय हरकत आहे एक चक्कर मारून यायला? एका माफक धाडसाच्या थ्रीलींग कल्पनेने त्यांचा चेहरा एकदम उजळला. हातापायात एकदम जोर आल्यासारखं त्यांना वाटलं आणि ते ताडकन उठले. उत्तेजितपणे हातावर हात चोळत बाथरूममध्ये गेले.अर्ध्या तासातच मस्तपैकी गुळगुळीत दाढी करून, गरम पाण्याने आंघोळ करून, पोलो टी शर्ट, चिनोज, पायात स्पोर्ट शूज,अंगात नुकतेच मनिषाने घेतलेले जर्कीन आणि डोक्यावर काळी कानटोपी घालून ते पुढच्या खोलीत सोफ्यावर बसलेले होते. उत्साहाने आणि उत्तेजनेने त्यांचा एक पाय तडतड उडत होता आणि ते लॅपटॉपवर शहरात जाण्याचे आणि येण्याचे बस रूट्स वगैरे शोधण्यात मग्न झाले होते. सगळी माहिती काढून झाल्यावर, पाकीटात पुरेसे पैसे आहेत याची खात्री झाल्यावर आणि मनिषाने दिलेल्या घराबाहेर जातानाच्या सूचनांची उजळणी करून झाल्यावर ते अखेर बाहेर पडले. बाहेर कडाक्याची थंडी असूनही बर्फ मात्र अजून पडले नव्हते. दोन्ही हात खिशात घालून अनंतराव बसस्टॉपकडे चालू लागले. उपनगरात फिरण्याची त्यांना चांगलीच सवय झाली होती पण आज पहिल्यांदाच ते एकट्याने पन्नास मैलांवरच्या मुख्य शहरात जात होते. बसस्टॉपवर जाऊन खिशातून कागद काढून बसस्टॉपच्या नंबरची खात्री करेपर्यंत बस आलीसुद्धा. काहीही विचार करायचा अवसर न मिळता काही क्षणातच अनंतराव बसच्या दारात उभे होते. पाकीटातून चिल्लर काढून तिकीटाच्या खोक्यात टाकताना आपल्या स्वभावाच्या विपरीत, उगाचच ते ड्रायव्हरकडे पाहून प्रसन्नपणे हसले. ड्रायव्हरनेदेखील हसून उगाचच "काय कसं काय?" वगैरे विचारून आपुलकी दाखवली. तोंडावर ते हसू तसंच ठेवत अनंतराव इतर प्रवाशांकडे बघत बघत एका सीटवर जाऊन बसले आणि खिडकीतून बाहेर एखाद्या लहान मुलाच्या उत्सुकतेने पाहू लागले. बस मार्गस्थ झाल्यावर आजूबाजूला दिसणारी मनिषाच्या घरासारखी घरे, रस्ते, झाडे आणि नंतर हळू हळू दिसू लागलेल्या उंच इमारती पाहत पाहत पाऊण-एक तास निघून गेला. शहरातल्या त्या भव्य चौकात बस आली तेव्हा ते लगबगीने उतरले. सगळीकडे माणसांची लगबगीने ये जा चालू होती. रस्ते वाहनांनी भरून गेले होते आणि हवेत गारठा असूनही चांगले लख्ख ऊन पडले होते. अनंतरावांनी एकदा सगळा चौक न्याहाळला. लखलखणार्‍या काचेरी इमारती, मोठे स्वच्छ रस्ते आणि चकाकणार्‍या गाड्या. सगळं निरखून पाहून मग त्यांनी आपला मोर्चा चौकातल्या एका बाजूला असलेल्या मॉलकडे वळवला. पाच-सहा मजली उंच आणि भव्य इमारतीत तो मॉल होता आणि त्या इमारतीवर चहू बाजूंनी दिव्यांच्या माळा सोडलेल्या होत्या. हे रात्री भलतंच सुंदर दिसत असेल असा विचार करत अनंतराव त्या मॉलमध्ये प्रवेशले. बाहेरच्या थंड हवे पेक्षा आत बरेच उबदार होते. दारातच मध्यभागी ठेवलेला मोट्ठा ख्रिसमस ट्री, सगळीकडे केलेली लाल-पिवळ्या रंगातले तारे, झिरमिळ्यांची सजावट, शुभेच्छांचे फलक, सांतासारख्या टोप्या घातलेल्या सुंदर कर्मचारी मुली, मुलांच्या सेक्शनमधला सांताक्लॉज आणि अगणित वस्तूंनी ठासून भरलेला तो मॉल पाहताना ते गुंगुन गेले. खरं तर मनिषा-सुजीतने त्यांना एकदा सगळं शहर फिरवून आणलं होतं पण एकट्याने फिरताना त्यांना ते सगळं जास्तच सुंदर आणि आकर्षक वाटत होतं. मॉलमध्ये फिरत खेळणी, कपडे, खाद्यपदार्थ आणि इतर लहानमोठ्या वस्तू पाहत पाहत दोन-तीन तास कसे गेले ते त्यांना कळालेच नाही. पोटात आता भूक लागली होती पण मॉलमधल्या फास्टफूड जॉईंटमध्ये जाऊन खाणे त्यांना नको वाटले. आता घरीच जाऊन खावे असा विचार करून ते तळमजल्याकडे जाणार्‍या लिफ्टमध्ये घुसले. दुसर्‍या मजल्यावर लिफ्ट थांबली आणि एक डब्बल हाडाची, त्यांच्याएवढीच उंचीची, पन्नाशीची बाई ट्रॉली ढकलत लिफ्टमध्ये शिरली. अनंतरावांकडे पाहून तिने स्मितहास्य केले आणि वळून तळघरात असलेल्या वाहनतळाचे बटन दाबण्याचा प्रयत्न केला पण ट्रॉलीवरून तिला ते जमले नाही. ते पाहून अनंतरावांनी पटकन पुढे होऊन बटन दाबून दिले. तिने पुन्हा एकदा हसून त्यांच्या कडे पाहिले आणि आपले सोनेरी केस मागे उडवत,"थँक यू" म्हणाली. तिच्या हसर्‍या निळ्या डोळ्यांकडे पाहत अनंतरावही हसले आणि कसेबसे "वेलकम" म्हणाले. ती मोबाईल मध्ये काहीतरी पाहू लागली आणि अनंतराव डोळ्यांच्या कोपर्‍यातून तिचे निरीक्षण करू लागले. पांढरे स्वेटर आणि गुलाबी स्कर्ट घातलेली ती स्त्री बरीच खरेदी करून घरी निघालेली दिसत होती. तळमजल्यावर लिफ्ट थांबली तरी अनंतरावांना कळाले नाही. दार उघडून लागले आणि लिफ्ट तळघराकडे गेली. लिफ्टचे दार उघडल्यावर अनंतराव भानावर आले आणि त्यांना चूक कळली. ती स्त्री बाहेर जाण्यासाठी ट्रॉली ढकलू लागली पण ट्रॉली ढिम्म हलेना. अनंतरावांनी पुन्हा तत्परतेनं दरवाजा उघडण्याचे बटन दाबून धरले. थोडी झटापट करूनही ट्रॉली हलत नाही हे पाहून तिने त्यांच्याकडे पाहिले आणि इंग्लिशमध्ये उद्गारली,"काय झालंय काही कळत नाहीय"."थांबा, मी बाहेरून ओढतो", अनंतराव म्हणाले आणि लिफ्टच्या दारात उभे राहून त्यांनी ट्रॉली ओढायला सुरुवात केली. बरीच ताकद लावल्यावर ती ट्रॉली सरकत सरकत लिफ्टच्या बाहेर आली. तिची दोन चाके अडकून बसल्याने फिरत नव्हती."अचानक कशी काय बिघडली कोण जाणे?", ती स्त्री म्हणाली."चाकं अडकलेली दिसताहेत"."तू कृपया मला गाडीपर्यंत सामान न्यायला मदत करू शकशील का? ""हो हो का नाही? द्या मी घेतो काही पिशव्या", असं म्हणून अनंतरावांनी तिने दिलेल्या जड पिशव्या आपल्या हातात घेतल्या आणि तिच्याबरोबर तिच्या गाडीकडे चालू लागल्या."मी मार्था. मार्था वॉटसन", ती म्हणाली."अच्छा. मी अनंत देशपांडे.""भारतातून आलास का?""होय. सहा महिने झाले. इथे मुलीकडे राहतोय.""नशिबवान आहेस.", ती म्हणाली.गाडीपर्यंत आल्यावर तिने गाडीची ट्रंक उघडली आणि त्यात तिच्याकडच्या आणि अनंतरावांकडच्या पिशव्या ठेवल्या."धन्यवाद. तुझी खूपच मदत झाली. तुझी गाडी आहे का की मी तुला कुठे सोडू ?", तिने विचारले."नाही नाही. मी पार त्या तिकडे राहतो", अनंतरावांनी उपनगराचे नाव सांगितले."अरे! मी ही तिकडेच राहते. तिथे नक्की कुठे?"अनंतरावांनी मनिषाने लिहून दिलेला पोस्टल अ‍ॅड्रेस पाठ म्हणून दाखवला. मार्थाच्या डोळ्यात मिस्कील हसू उमटले."अरे वा! काय हा योगायोग! तिथून फक्त दोन ब्लॉक अंतरावर राहते मी. आपण शेजारी आहोत म्हणायचे", ती मनमोकळेपणे हसून म्हणाली, "चल मी सोडते तुला घरी."अनंतराव थोडे संकोचले पण बसची वाट पाहावी लागणार नाही आणि पैसेही वाचतील या विचाराने सुखावलेही. त्या भल्या मोठ्या गाडीत चढून ते मार्थाशेजारी बसले. सफाईदारपणे गाडी बाहेर काढून मार्थाने वेगात रस्त्यावर आणली आणि घराकडे दामटली.गाडीत दोघांच्या गप्पा सुरु झाल्या. अनंतरावांनी आपली कहाणी इत्यंभूत सांगितली,"अबक कंपनीत नोकरीला होतो. दोन वर्षांपुर्वी रिटायर झालो. गेल्या वर्षी बायको गेली, सहा महिन्यांपुर्वी कायमचा मुलीकडे आलो" वगैरे.मार्थानेही आपली कहाणी सांगितली, "एकुलता एक मुलगा आणि त्याची मी घटस्फोटित आई. मुलगा सैन्यात. दोन वर्षांपुर्वी कुठल्याशा देशातल्या मोहिमेत गेलेला. आता मी एकटी. एका लोकल फर्ममध्ये काम करून जगतेय.", वगैरे.मग आवडीनिवडींवर बोलणं झालं. आपण कसे एकटे आहोत, कंटाळलो आहोत याचा पाढा अनंतरावांनी वाचला. त्यावर मार्थाने कम्युनिटीक्लब जॉईन करण्याचे वगैरे सुचवले. एकंदरीत बरीच बडबड करत तो पाऊण-एक तासाचा प्रवास संपला. घरासमोर गाडी थांबली आणि "अच्छा, भेटू पुन्हा", म्हणून अनंतरावांनी दार उघडले. मार्थाने एक-दोन क्षण विचार केला आणि एकदम म्हणाली, "तुला माझ्या घरी यायला आवडेल? नाहीतरी तू एकटाच आहेस आत्ता. काहीतरी पिऊया, गप्पा मारूया."अनंतरावांनी एकदा घराकडे पाहिले आणि जरा विचार केला. त्या सुनसान घरात जायची त्यांची इच्छा झाली नाही. काही न बोलता ते पुन्हा गाडीत चढले आणि दार लावून घेतले. पाच मिनीटांनी ते मार्थाच्या घरात प्रवेशले. घर फार मोठं नव्हतं पण टापटिपीने ठेवलेलं होतं. कोपर्‍यात एक न सजवलेला ख्रिसमस ट्री होता आणि शेजारी टेबलावर काही फोटो. मार्थाचे आणि तिच्या मुलाचे."बीअर घेणार?", मार्थाने विचारले.अनंतराव एकदम गडबडले,"न...नाही,नको""मग काय घेशील? अजून मला एगनॉग करायचाय, नाही तर तोच दिला असता. तू वाईन घेशील?"आताही नाही म्हणणे म्हणजे फारच भोमटपणा वाटेल असे अनंतरावांना वाटले आणि त्यांनी मूकपणे मान हलवूनच होकार दिला. बाहेर आता अंधार दाटू लागला होता. मार्थाने दिवे लावले आणि वाईनचे ग्लास आणि खायला सँडविचेस घेऊन आली.वाईनचे एक-दोन घुटके उपाशीपोटी घेताच अनंतरावांना एकदम तरल वाटू लागलं. ते एकदम सैलावले. इतके की सँडविचमध्ये मांस वगैरे आहे की नाही याची चौकशी न करता बिनधास्त एक उचलून त्यांनी लचका तोडला. त्याची चवही त्यांना अप्रतिम वाटली. मग त्या दोघांच्या अशा काही गप्पा रंगल्या की बस. रात्रीचं जेवणही त्यांनी तिच्याकडेच घेतलं आणि मग त्यानंतरही तास-दोनतास गप्पा ठोकून शेवटी नाईलाजाने घरी जायला निघाले.मार्थाने त्यांना रस्ता समजावून सांगितला आणि दारापर्यंत सोडायला आली. काय बोलावे अनंतरावांना कळेना. खरं तर पुन्हा कधी भेटू या असं त्यांना विचारायचं होतं पण त्यांचा धीर होत नव्हता. नुसतेच स्मितहास्य करत त्यांनी तिच्याकडे पाहिले आणि निरोपादाखल मान हलवून ते जड पावलांनी निघाले. ती दारातच उभी होती. तीन-चार पावले टाकल्यावर आपसूकच त्यांनी पुन्हा वळून तिच्याकडे पाहिले आणि पुन्हा हात हलवून जायला वळले."अनंत", मार्थाचा आवाज आला, "उद्या संध्याकाळी मी ट्री डेकोरेशन पार्टी ठेवली आहे. तुला यायला आवडेल?"एकदम आपल्याला खूप हसू फुटणार असे अनंतरावांना वाटले पण ते दाबत शांतपणे ते वळले आणि आवाज स्थिर ठेवत म्हणाले, "अर्थातच.मी नक्की येईन."दोघेही एकमेकांकडे पाहून हसली आणि अनंतराव वळून चालू लागले. घराघरांवर दिवे लुकलुकत होते आणि हळुवारपणे बर्फ पडायला सुरुवात झाली.

Thursday, December 23, 2010

माझे छळवादी.

ऑफिसमधली ऐन कामाची वेळ. मी अगदी कॉम्पुटरच्या स्क्रीनमध्ये घुसून कामात एकाग्र झालेलो. बाकीचेही लोक कामात गर्क. अगदी पिनड्रॉप नाही तरी ऑफिसमध्ये बऱ्यापैकी शांतता. अशा या कर्मसमाधीत एकतान झालेलो असताना अचानक कानावर समाधीतून ओढून काढणारा आणि दुर्लक्ष न करता येण्याजोगा आवाज येतो "फुर्र फुर्र" किंवा "मच्याक मच्याक मच्याक..". मी डोळे बंद करतो, दात आवळतो आणि सर्वांगातून जाणारी संतापाची सणक कमी व्हायची वाट पाहतो. खोल श्वास घेउन डोकं थोडं शांत झाल्यावर मी वळून पाहतो. अपेक्षेप्रमाणे माझा एखादा कॉफी पिणारा किंवा सॅन्डविच खाणारा किंवा डब्यातला भात खाणारा देशबांधवच त्या आवाजाचा स्त्रोत असतो. मी वळून पहिले म्हणजे काहीतरी गडबड आहे ही शंका त्याला यावी ही माझी अपेक्षा फोल ठरवत तो मला एका गोग्गोड स्माईल देतो. मी मलूलपणे हसून त्याने तोंड आणखी उघडून विश्वरूप दर्शन द्यायच्या आत पुन्हा स्क्रीनकडे पाहू लागतो. त्यानंतर त्याचं खाणं-पिणं होईपर्यंत माझं लक्ष कामात लागत नाही आणि बहुतेकवेळा मी पाणी प्यायला म्हणून उठून जातो.


कामाच्या दिवशी सकाळी साडेसातला मी ट्रेन पकडतो तेव्हा बरीच गर्दी असते पण त्यात माझे देशबांधव फारसे दिसत नाहीत. पण जर कधी उशीर झाला तर ट्रेनमध्ये देशबांधवांची संख्या बरीच दिसते. देशबांधव चेहरेपट्टीवरून तर ओळखू येतातच पण आणखी एक व्यवच्छेदक लक्षण आहे. ते म्हणजे पाठीवर अडकवलेली सॅक. व्यवस्थित फॉर्मल किंवा सेमीफॉर्मल कपडे घातल्यावरही सॅक पाठीला कशाला हवी हे मला कळत नाही. इतर लोक छानपैकी स्टायलिश ऑफिसबॅग्ज वापरत असताना आपण अगदी लुई व्हीटन नाही तरी एखादी साधी पण चांगली दिसणारी बॅग वापरावी असं का वाटत नाही कोण जाणे. असो ज्याची त्याची आवड. त्याचा त्रास नाही. त्रास संध्याकाळी होतो. संध्याकाळी घरी जाताना गर्दीच्या वेळी हे सॅकधारी बरेच दिसतात आणि सॅक पाठीवरून न काढता गर्दीत घुसतात आणि मग गर्दीत जसे जसे लोक चढतील उतरतील तसे तसे त्यांना जागा करून देताना इकडे तिकडे हलतात आणि आपल्या सॅकने मागे उभ्या असलेल्या माणसाच्या छातीला, पोटाला किंवा जमलंच तर तोंडालाही छानपैकी मसाज करतात. जेवणाचे डबे भरलेल्या या सॅक्सनी अशा बऱ्याच डब्यांचा वास अंगात जीरवलेला असतो आणि मग मागे उभ्या असलेल्या माणसाला तो 'सु'गंधी मसाज सहन करण्यावाचून पर्याय उरत नाही.


हे झालं कामाच्या दिवशीचं. सुट्टीच्या दिवशी देशबांधव सहकुटुंब बाहेर पडतात आणि या कुटुंबांचं व्यवच्छेदक लक्षण म्हणजे त्यांच्याबरोबर असलेली बाबागाडी आणि त्यात एक बाबा किंवा बाबी.
परदेशात नोकरी करायला शक्यतो तरुण जोडपीच येतात पण तरुण असूनही मूलबाळ अजून न झालेल्यांचं प्रमाण दहात एक असावं. पंचवीस-सव्वीस वयाच्या जोडप्याला एक-दोन वर्षांचं एक आणि तीस-बत्तीस वयाच्या जोडप्याकडे ४-५ चं एक आणि १-२ चं एक असं साधारण चित्र असते. छान सुखी कुटुंबे. असं एखादं कुटुंब ट्रेनमध्ये शिरतं, त्यांच्याकडे असलेल्या बाळाकडे पाहून जागा करून दिली जाते. बाळाची आई आणि बाळ बसते तो पर्यंत ठीक पण ५०-६० वर्षांच्या व्यक्तींनी दिलेली जागा घेउन बाळाचा तिशी-पस्तीशीतला बापसुद्धा बसून घेतो. लांब उभं राहून मी आपला बघतो.


चित्रपटाच्या तिकीटाची रांग असो की बसच्या तिकीटाची माझ्या मागे जर एखादा देशबांधव येउन उभा राहिला तर माझा थरकाप होतो. बऱ्याच लोकांना सुरक्षित अंतर म्हणजे काय ते कळत नाही. मागून मग सतत त्यांचा वैतागवाणा स्पर्श सहन करत रांगेत एका पायावरून दुसऱ्या पायावर भार टाकत उभे राहणे नशिबी येते. दोन-तीन वेळा धक्के देउन, प्रसंगी सांगूनही पुन्हा पाच-दहा मिनिटातच अक्षरश: ये रे माझ्या मागल्या.


तसा मी माणूसघाणा नाही आणि लोकांचं निरीक्षण करून त्यांना नावं ठेवणे मला आवडत नाही. पण कधीकधी काहीकाही गोष्टी अगदीच सहन होता नाहीत. विशेषत: आपले देशबांधव असं वागताना पाहून वाईट वाटते. आपण आपल्या संस्कृतीचे इतके गोडवे गातो मग हे साधे संस्कार का नसावेत लोकांवर? दुसऱ्यांबद्दल जराही संवेदना नसावी?
या असल्या वागण्याने एक समाज म्हणून, एक देश म्हणून आणि एक संस्कृती म्हणून आपण काय चित्र उभे करतो जगासमोर? हे आणि असलेच निष्फळ, निरर्थक आणि फालतू विचार मनात येउन मी आपला उगीच माझाच छळ करत बसतो.

Sunday, December 19, 2010

पूल लाईफ

दमटलेल्या संध्याकाळी थंडगार पाण्यात डुंबायचं सुख काही औरच. संध्याकाळच्या कोवळ्या उन्हात चमकणाऱ्या आणि निळ्या टाईल्समुळे निळ्याशार दिसणाऱ्या पाण्यात संथपणे फेऱ्या मारत असताना शरीर आणि मनाची एक मस्त तंद्री लागते. त्याच तंद्रीत काल पोहत असताना एक गमतीदार विचार मनात आला. दोन तासांच्या त्या पोहण्यात आणि आयुष्यात किती तरी साम्य आहे असं वाटलं. कितीही उकडत असलं तरी कपडे काढून थंडगार पाण्यात उतरताना थोडातरी त्रास होतोच. त्या जन्मवेदना. जन्मल्यावर लहान बाळ रडतं तसं पाण्याची सवय होईपर्यंत तोंड वाकडं करून थोडंसं हा हा हू हू केलं जातंच. मग जरा इकडे तिकडे पाहायचं. आपल्यासोबत पूलमध्ये कोण कोण आहे, कोण कसं आणि कुठून पोहत आहे ते पाहून आपल्याला कुठे आणि कसं पोहायचं ते ठरवायचं आणि मग पोहायला सुरुवात करायची. तरूणपणी जसं चुकत माकत धडपडत शिकतो तसंच आखडलेले स्नायू सैल होईपर्यंत जरा लय चुकायला होते, मध्येच नाका-तोंडात पाणी जातं, मध्येच थांबून थोडा अंदाज घेऊन मग पुन्हा सुरु करावं लागतं किंवा कधी कधी आधारही घ्यावा लागतो. कधी कधी उगाचच आपल्या बरोबर पोहणाऱ्या लोकांशी स्पर्धा केली जाते. कोणी आपल्याला मागे टाकून पुढे जात असेल तर उगाचच जोरात हातपाय मारले जातात. त्यात वेगतर वाढत नाही उगाच दमायला मात्र होतं.
थोड्या वेळाने म्हणजे साधारण चाळीशीच्या आसपास पाण्याचा अंदाज येतो, कुठे कसा प्रवाह आहे ते कळायला लागतं, पाण्याची आणि आपली ओळख झाल्यासारखी वाटते आणि मग कमीत कमी प्रयत्नात आपण सहज पोहू लागतो, पोहण्याची एक मस्त मजा यायला लागते आणि अनंतकाळ असंच पोहत राहावं असं वाटू लागतं. आता पोहोण्याकडे लक्ष न देताही आपण वेगात जात असतो आणि तरीही आजूबाजूला पाहून कोवळे उन, आजूबाजूची झाडं, माणसं यांचं निरीक्षण करू शकतो. पण मग हळू हळू संध्याछाया दाटू लागतात. अंधार पडू लागतो आणि शरीरही दमायला लागतं. पुन्हा पोहण्याची लय चुकू लागते आणि इकडे तिकडे पाहताना मध्येच नाका-तोंडात पाणी जाते. आपल्या आधी आणि बरोबर पूलमध्ये उतरलेले हळू हळू निघून जातात. तरीही हट्टाने आपण काही काळ पोहतच राहतो. पण थोड्यावेळाने अगदीच कंटाळा येतो. मगाशी सुखकारक वाटणारी तंद्री आता कंटाळवाणी वाटू लागते. उन्हं जाउन आता अंधार पडल्याने बाकीचं काही दिसतही नसतं. मग एका क्षणी आपण निर्णय घेतो आणि पूलच्या बाहेर येतो, पूलच्या जगातून निघून जातो.
सो फार सो गुड. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांच्या आयुष्याचं प्रतिबिंब पूलमध्ये सहज मावतं. पण मग विचार येतो की पूल मध्ये पोहणं आयुष्यासारखं आहे हे म्हणणे जेवढे बरोबर आहे तेवढेच आयुष्यच पूल मध्ये पोहोण्यासारखं आहे हे म्हणणे बरोबर नाही का? पद्धतशीरपणे आखलेल्या चाकोऱ्यामधून, ठरलेल्या मार्गांनी, हवे ते आधार घेउन माझं पोहणं चालू असतं. त्यातच काही ठरलेल्या स्पर्धा आणि ठरलेले पाडाव गाठल्याचा ठरलेला आनंद आणि सुखाच्या ठराविक कल्पना. पोहण्याचे सगळे आधार आणि जमा केलेल्या वस्तू प्राणपणाने जपत पोहणं संपेपर्यंत जास्त खोल नसलेल्या पाण्यात येरझाऱ्या घालणे. खुल्या समुद्रात पोहणारे वेगळेच. कधी त्यांना मोती मिळतात तर कधी अकाली जलसमाधी पण जितके पोहतात, धुंदीत पोहतात.

Saturday, December 18, 2010

संचित

आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडतात ज्यांचा आपल्याला नंतर खूप त्रास होतो. रुखरुख लागून राहते. बऱ्याचशा घटना आपोआप घडतात, बऱ्याच गोष्टी आपण चुकीच्या समजुतीने करतो, बऱ्याच गोष्टी करायच्या राहून जातात, बऱ्याच गोष्टींचं महत्व वेळीच कळत नाही किंवा बऱ्याच गोष्टींचा आपण अट्टाहास करतो. या घटनांच्या तीव्रतेप्रमाणे त्या त्या प्रमाणात मनावर डागण्या पडत जातात. या डागण्या, हे चटके हेच आयुष्याचं संचित. या डागण्या कधीच नाहीश्या होत नाहीत, त्या कधी बऱ्याही होत नाहीत. त्या बऱ्या करण्यासाठी धडपडूही नये. त्या बऱ्या करायला म्हणून आपण काही करू गेलो तर जखम आणखी ताजी तर होतेच वर नव्या डागण्या मिळायचीही शक्यता असते.
पुढे पुढे सरकत जाणारा काळ हेच त्यावर काय ते औषध. एक रीवाईंड न होउ शकणाऱ्या टेप प्रमाणे आयुष्य पुढे सरकत जाते, नवीन अनुभवांची नवीन गाणी वाजतात, नवे चरे, नव्या डागण्या पडतात. जुन्या जखमांवर काळ खपली टाकत जातो. त्या खपल्या प्रयत्नपूर्वक विसरत, पुन्हा निघू न देण्याची काळजी घेत नव्या अनुभवांना सामोरे जाणे ज्याला जमले तो सुखी.
हे शहाणपण ज्या क्षणी येतं त्या क्षणी कर्मयोग सुरु होतो. मग सुख-दु:खाचं काही नवल वाटत नाही आणि जे आहे जसं आहे तसं स्वीकार करायला आपण शिकतो.
दुसऱ्या व्यक्तीकडून प्रेमभावनेची किंवा ठराविक वागणुकीची अपेक्षा हे दु:खाचं दुसरं मूळ. आधी अपेक्षा करायची आणि ती पूर्ण नाही झाली की होणारं अपेक्षाभंगाचं दु:ख मोठंच, पण मनुष्यस्वभाव इतका विचित्र असतो की एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षा काहीच नसल्या तरी आपल्या भावना त्या व्यक्तीपर्यंत पोचवायची धडपड चालूच असते. भले त्या व्यक्तीला त्या भावना आवडो न आवडो. पण भावना व्यक्त न करताच दाबून टाकणे हा त्यावर उपाय आहे का? नाही. आहेत त्या भावना व्यक्त करणे हे तर सजीवांचे मुख्य लक्षण आहे. भावना व्यक्त केल्याच पाहिजेत पण त्या भावनांना अनुकूल प्रतिक्रिया आली नाही तर ते सहन करण्याचे सामर्थ्य पाहिजे. किंबहुना अनुकूल प्रतिक्रिया येणार नाही हे गृहीत धरूनच आपल्या भावना योग्य पद्धतीने व्यक्त करणे हे ही कुठल्या योगापेक्षा कमी नाही. आपण आपल्या भावनांचा सन्मान राखावा. दुसरे आपल्या भावनांची किंमत त्यांच्या आकलनाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे आणि गरजेप्रमाणे करतच असतात.