भूत भविष्य भासच नुसते विश्व नवे क्षणोक्षणी
जमती उठती मैफिली इथे विरती वाऱ्यावरती गाणी
आरंभातच बीज अंताचे गूढ अटळ ही दैववाणी
दुःख क्षणाचे हर्ष क्षणाचा मी तर अळवावरचे पाणी
Sunday, December 3, 2023
आम्ही
Wednesday, July 13, 2016
सूर्यावरचे वारे
Monday, July 11, 2016
Freedom For Sale
Monday, June 27, 2016
फुकटे आणि विंचू
बऱ्याच वेळाने प्रेक्षागार गार झाल्यावर एलनबाईंना तोंड उघडायची संधी मिळाली आणि मग पहिल्या प्रश्नाचा उलगडा झाला. आजचा एपिसोड मदर्स-डे-स्पेशल एपिसोड होता म्हणून भावी फादर लोकांनी केलेले उद्योग उरी बाळगणाऱ्या भावी मदर महिलांना आमंत्रित केलं होतं. काय ती कल्पकता! पण यावरून एलनबाईंचे सगळे एपिसोड बायकांसाठीच व बायकांपुढेच असतात हे लक्षात आलं. तरीही उत्सुकतेपोटी मी काही चॅनल बदलला नाही. "Curiosity killed the cat" अशी म्हण का पडली आहे तेही यथावकाश कळलेच.
खरं म्हणजे एपिसोड मदर-डे साठी आहे की फादर-डे साठी आहे ते मला तितकंसं नीट कळलं नव्हतं; कारण पाहुणा म्हणून एका गुळगुळीत दिसणाऱ्या मस्तकेतरकेशहीन अमेरिकन मेट्रोसेक्शुअल माणसाला बोलवलं होतं. हा माणूसही सेलिब्रिटी असावा; कारण तो येताच किंकाळ्या-चित्कारांचा एक माफक रिप्ले झाला. पोटात दुसऱ्या कोणाचातरी पराक्रम मिरवत महिला त्या चिकण्याकडे बघून चेकाळत होत्या.
पाहुण्याने बसून घेतल्यावर त्याच्या बायकोचं व कुटुंबाचं कौतुक सुरू केलं. पार्श्वभूमीवर त्याच्या बायकोचे व त्याच्या मुलीचे एकत्र फोटो दाखवत सेलिब्रिटी ममतेचे हृद्य प्रदर्शन चालू होते. फुल्टू बायकांचा आड्यन्स म्हटल्यावर पाहुण्याने आया-बायांच्या स्तुतीचे मजल्यावर मजले बांधायला सुरूवात केली. आधी स्वत:च्या बायकोला कसं नेहमीच गिफ्ट आवडतं आणि मदर्स-डेचं गिफ्ट मात्र तो कसं स्पेशल आणतो वगैरे फेकाफेक केल्यावर आणि त्याला प्रेक्षक महिलांचा माफक टाळ्या-चित्कारांचा प्रतिसाद मिळाल्यावर त्याची मुळातच क्षुल्लक असलेली भीड चेपली. मग पुढ्यात बसलेल्या शेकडाभर गर्भधारी भामांना खूश करण्यासाठी गड्याची गाडी गरोदरपणाकडे वळली. पोटात नऊ महिने गर्भ बाळगणे हा अतिशय अचाट असा पराक्रम असून फक्त स्त्रियांनाच ते शक्य आहे आणि कोणताही पुरूष नऊ महिने असा गर्भ पोटात बाळगू शकणार नाही असे माहितीपूर्ण व सखोल अभ्यासाअंती तयार केलेले मत त्याने गुलजारपणे त्या बायांच्यापुढे टाकले आणि प्रचंड टाळ्या-चित्कारांच्या गजरात बायांनी ते उचलून उड्या मारायला सुरूवात केली. "पुरुष असे पोटात गर्भ धारण करत असते तर त्यांना स्त्री नसते का म्हटले? आणि जे करायला ज्या अवयवांची निर्मिती झाली आहे, ते त्या अवयवांनी केले तरी त्याला अचाट पराक्रम म्हणायचा येडचॅपपणा करायचा असेल तर करा; पण ज्यांना तो अवयवच नाही त्या पुरुषांना कशाला कमी समजले पाहिजे? की अमेरिकेत सेक्स करताना पुरुषाचं वीर्य बाईच्या गर्भात जाणार की बाईचं अंडं पुरुषाच्या गर्भात जाणार असे पर्याय उपलब्ध आहेत; आणि तरी पुरूष घाबरून स्त्रीलाच गरोदर व्हायला भाग पाडतात असं काही आहे?" अशा अर्थाचे विचार त्याचं मत ऐकून कोणाच्या मनात येण्याची किंचितशी शक्यता आहे असे मला वाटून गेले; पण पटकन मी माझ्या मनाला आवर घालून असंवेदनशील पुरुष होण्यापासून स्वत:ला वाचवले. पुरुष असंवेदनशील, स्त्रियांपेक्षा कमी भावनाशील व प्रसंगी भावनाशून्य, गबाळे, बालिश वगैरे असतात व स्त्रियांपेक्षा बहुतेक सर्व बाबतीत कमी असतात हे मान्य असणे ही आता सभ्य पुरूष म्हणून गणले जाण्याची प्रमुख अट बनत चालली असल्याने व मलाही सभ्य पुरुष म्हणवून घ्यायची हौस असल्याने मीसुद्धा सराव म्हणून टाळ्या वाजवून त्या नरकेशारिचे कौतुक केले व चित्कारण्याचाही प्रयत्न केला; पण कुत्र्याच्या रडण्यासारखा आवाज घशातून येऊ लागल्याने तो प्रकार आवरता घेतला आणि पुढचा कार्यक्रम पाहू लागलो.
स्वत:च्या बायकोचे व जनरल सगळ्या स्त्रियांचे आमुखछिन्दन कौतुक करून झाल्यावर तो नरनोत्कच व एलनबाई अखेर उठले व तिथेच ठेवलेल्या तीन मोठाल्या खोक्यांकडे गेले. त्या खोक्यात असलेली उत्पादने प्रेक्षकवर्गाला फुकट मिळणार आहेत असे सांगून दोघांनी मिळून एकेका खोक्यातून एकेक वस्तू काढून दाखवायला सुरुवात केली. पहिल्या खोक्यातून आपल्या बाळाला जाऊ तिथे सुरक्षित व स्वत:च्या ताब्यात बंदिस्त ठेवण्यासाठी पोर्टेबल, फायबर प्लॅस्टिकचा व नायलॉनची जाळी असलेला हौदा कम पिंजरा निघाला. त्याच्या मध्यबिंदूला असलेल्या कडीला धरून उचलला की तो आपोआप फोल्ड होतो हे त्या चिकण्याने प्रात्यक्षिकासह दाखवले. बायकांनी चित्कारायला सुरुवात केली होती. दुसऱ्या खोक्यातून मामारू नावाची एक आपोआप झोळीसारखी हलणारी, आईस्क्रीमच्या कपासारखी दिसणारी लहान बाळांसाठीची एक खुर्ची निघाली. आपल्या स्मार्टफोनवरून हवा तितका झोका कमी-जास्त करता येतो हे सांगून मुलं सांभाळताना फोन हातातून खाली ठेवायची गरज नाही हे त्या गुलछबू पाहुण्याने दाखवून देताच चित्कारांचा आवाज दुपटीने वाढला. तिसऱ्या खोक्यातून कोणत्यातरी रिसॉर्टने प्रायोजित केलेले अमुक दिवस तमुक रात्रींचे प्याकेज निघाल्यावर, कार्यक्रमाच्या सुरुवातीचा कल्ला म्हणजे कुजबुज वाटावी इतका कल्लोळ झाला. मला टीव्हीचा आवाज कमी करावा लागला. काही महिला आता हाताने पटापट-पटापट टाळ्या वाजवताना दिसत होत्या, काही जागीच थयथयाट केल्यासारख्या नाचू लागल्या होत्या, काही आपल्या शेजारणींना मिठ्या मारत होत्या, काही पोटच्या गोळ्यासकट उड्या मारत होत्या, काही आफ्टरशेव्ह लोशन लावल्यासारखं दोन्ही गाल हातांच्या तळव्यांमध्ये धरून किंचाळत होत्या आणि काहींना भावना अनावर होऊन त्या आपले आनंदाश्रू पापण्यांचा मस्कारा खराब होऊ न देता टिपत होत्या.
फुकट काही मिळाल्याचा आनंद होणे आजकाल स्वाभाविकच आहे. एलनबाईंच्या लोकप्रियतेचे कारण अगदी नीट कळले. कोणाला काहीतरी फुकटात देऊन स्वत:ची लोकप्रियता वाढवणे हा साधा सरळ उद्योग त्या करतात. त्या वस्तूंची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना धंदा वाढवायचा असतो म्हणून जाहिरातीसाठी ते अशा शेकड्याने वस्तू फुकट देतात. कंपनीच्या श्रीमंत मालकांना अशा वस्तू वाटल्याने पुढे फायदा होईलच ह्याची खात्री नसते; त्यांना फायदा झाला तरी तो कंपन्यांच्या कष्टाळू कर्मचाऱ्यांपर्यंत झिरपेल ह्याची खात्री नसते; तरीही अशा वस्तू फुकट वाटण्याबद्दल कंपनीचे कर्मचारी ब्रसुद्धा काढत नाहीत. "आमच्या कष्टातून निर्माण झालेल्या वस्तू फुकटात का देता?" असे विचारत नाहीत. सुखवस्तु लोकांच्या क्रयशक्तीतून होऊ शकणाऱ्या आपल्या श्रीमंत मालकाच्या संभाव्य फायद्याचा ते विचार करतात. त्याच मालकाच्या वर्गातल्या दुसऱ्या एखाद्या श्रीमंताने सत्ता मिळवायला, ती चिरकाल टिकवण्यासाठी सामाजिक स्वास्थ्य राखायला, गरीबांच्या मतदानशक्तीचा वापर करून घ्यायला बेकार व बेघरांना निव्वळ जिवंत राहण्याइतकी मदत फुकट केली तरी हेच लोक रेबीड कुत्र्यांसारखे तोंडाला फेस येईपर्यंत भुंकायला लागतात. अशा लोकांकडे पाहिलं की कळतं की नझीम हिकमत "बंधो, तू विंचवासारखा आहेस" हे कोणाला उद्देशून म्हणतो ते.
साला हे असले विचार येतात विनोदी तमाशे पाहताना आणि मग सगळी मजा विद्रट होऊन जाते. विषण्ण मनाने मी टिव्ही बंद करतो.
Saturday, February 1, 2014
सोयीस्कर गांधीवाद
-Derrick Jensen (Endgame)
The world has enough for everyone's need, but not enough for everyone's greed
-M.K.Gandhi
The hottest places in hell are reserved for those who, in a time of moral crisis, remain neutral.
-Dante Alighieri
We have met the enemy and he is us.
-Pogo
आम्हाला बापूजींबद्दल अतीव आदर आणि अभिमान आहे. गांधीजींचे विचार आज जगभरात मान्यताप्राप्त झाले आहेत. मोठमोठ्या महासत्तांचे नेते आज त्यांच्या भाषणात गांधीजींचे नाव आदराने घेतात. विश्वशांती आणि अहिंसा म्हटले की पहिले नाव आठवते ते गांधीजींचेच. आम्ही गांधीजींच्या विचारांचे अभ्यासक, पाईक आणि प्रचारक आहोत आणि इतरांनी ते विचार अंगिकारले पाहिजेत असा आमचा आग्रह असतो.
आम्ही - जगातल्या सांपत्तिकदृष्ट्या वरच्या वीस-पंचवीस टक्क्यांतले लोक. आम्ही - त्या वीस-पंचवीस टक्क्यांतल्या वीस-पंचवीस टक्के लोकांसाठी काम करणारे लोक. आम्ही - मालकीहक्काची व त्यातून निर्माण होणार्या उतरंडीची (मराठी: हायरार्कि) प्राणपणाने जपणूक करणारे लोक. आम्ही - जगातल्या ऐंशी टक्के संपत्तीची मालकी बाळगून असणारे लोक. आम्ही - जगातल्या गाड्यांपैकी, इंधनापैकी व स्रोतांपैकी मोठा भाग स्वतःसाठी वाढत्या प्रमाणावर वापरणारे लोक. आम्ही - पर्यावरणावरच्या अनिष्ट परिणामांचा व स्रोतांच्या टंचाईचा अभ्यास करू शकणारे शिकलेले लोक. आम्ही - त्या अभ्यासाच्या अनुमानानुसार योग्य ती धोरणे ठरवू शकणारे लोक. आम्ही - आमच्या उपभोगातून उडालेल्या खरकट्यावर खालच्या लोकांनी जगावं अशी अपेक्षा करणारे लोक. आम्ही - हे सगळं आपण आहोत हेही न कळणारे लोक. आम्ही - ते कळूनही सामूहिकरित्या काहीही करु न शकणारे लोक. आम्ही - कामाच्या ठिकाणी रिसोर्स आणि त्याच्या बाहेर कन्झ्युमर असणारे लोक.
असे आम्ही गांधीजींच्या विचारांचे पाईक असलो तरी त्यातले कोणते विचार पाळायचे आणि कोणते टाळायचे ते आम्हाला आपोआप समजते. उदाहरणार्थ नुकताच लोकसत्तात आलेला हा लेख पाहा. वाढती लोकसंख्या, घटते स्रोत आणि बिघडते पर्यावरण ही संकटत्रयी ढळढळीत समोर दिसत आहे, येत्या दशकभरातच त्याची झळ लागायला सुरुवात होणार आहे हेही कळते आहे. अशा परिस्थितीत आपल्यापुढे काय पर्याय आहेत हेही माहित आहे. ते अंमलात आणण्याचे सगळे मार्ग, साधने आणि वेळ हाताशी आहे. पण काय करणार? ते पर्यायी विचार आम्हाला पटत नाहीत ना! स्वयंपूर्ण खेडे किंवा स्वयंपूर्ण माणूस अशी कल्पनाही आम्हाला अव्यवहार्य वाटते. त्या उलट सगळा बाजार आहे आणि प्रत्येकजण काही ना काही विकत असतो हे तत्त्वज्ञान आम्हाला सहज आणि नैसर्गिक वाटते. जिच्या मांडीवर आम्ही जन्मलो ती आमची इंडस्ट्रियल इकॉनॉमी आम्हाला आमच्या आईपेक्षा जास्त प्रिय आहे आणि ती टिकवण्यासाठी सर्वसमावेशक विकास वगैरे पोपटपंची करायला आमचे गांधीप्रेम आडवे येत नाही, किंबहुना त्याची मदतच होते.
गांधींच्या आम्हाला आवडणार्या विचारांपैकी सगळ्यात प्रमुख विचार म्हणजे अहिंसा! गांधीजींच्या अहिंसेला घाबरून इंग्रज हा देश सोडून पळून गेले असे आम्ही लहान मुलांना व भोळ्या-भाबड्यांना सांगतो. गांधींचे हे विचार दूरदूरच्या कानाकोपर्यांपर्यंत, तिथे राहणार्या आदिवासींपर्यंत पोचतील याची काळजी घेतो. एका गालावर मारली तर दुसरा पुढे करावा हे त्यांनी शिकणे गरजेचे आहे कारण नंतर आम्ही त्यांच्या जमिनींवर धरणे आणि खाणी बांधायला जाणार तेव्हा त्यांनी विरोध न करता उलट दिलेली नुकसानभरपाई घेऊन आनंदाने अत्यंत कमी पगारावर तिथेच नोकरी करण्यात उपकार मानणे आमच्या सर्वसमावेशक विकासासाठी महत्त्वाचे आहे. कोणी त्याला हिंसक विरोध करु लागला की आमचा सात्त्विक संताप होतो आणि आपले अहिंसक सैन्य आपल्या अहिंसक बंदुका घेऊन तिथे पाठवून त्या लोकांना चांगला प्रेमाने धडा शिकवावा असे आम्ही पोटतिडीकीने बोलतो. त्यांची हजारो वर्षे टिकलेली जीवनव्यवस्था बदलून पुढची दोनशे वर्षेतरी टिकेल की नाही याची शाश्वती नसलेली जीवनव्यवस्था त्यांच्यावर लादण्याचे पुण्यकर्म केल्याची त्यांना योग्य ती जाणीव नसल्याच्या भावनेने खंतावतो.
गांधीजींचा दुसरा आवडणारा विचार म्हणजे प्रतिकात्मक कृती. आमच्या इंडस्ट्रियल यंत्रातला आम्ही एक नगण्य भाग असल्याने ठराविक परिघातच फिरण्याचे आमच्यावर बंधन असते त्यामुळे प्रत्यक्षात फरक पडेल असे काही करण्याएवढा आमच्याकडे वेळही नसतो आणि तेवढी शक्तीही नसते. त्यामुळे गांधीजींच्या चरख्यासारखी प्रतिकात्मक कृती आम्हाला अत्यंत सोयीस्कर वाटते. एखाद्या वीकेंडला जाऊन पीडितांच्याबरोबर एखादा दिवस काढणे, त्यांच्या बरोबर गाणी म्हणणे, मेणबत्त्या लावणे, घोषणा देणे इत्यादी प्रकार करून ज्या व्यवस्थेला आम्हीच आधार दिला आहे तिचाच प्रतिकात्मक निषेध करणे त्यामुळे किती सहज जमते.
गांधीजींचा तिसरा आवडणारा विचार म्हणजे अध्यात्मिक बैठक. ही बैठक एकदा जमली की आजूबाजूच्या कोणत्याही प्रकारच्या दुर्घटना माणसाच्या मनाची शांती ढळवू शकत नाहीत. गाडीच्या काचेतून फक्त सुरम्य गोष्टीच दिसण्याची व्यवस्था होते आणि ज्ञानसाधनेतही आपल्याला हवे तेच आणि व्यावहारिकदृष्ट्या फायद्याचेच ज्ञान डोक्यात जायचीही व्यवस्था होते. काही लोक याला ज्ञानियांची तटस्थता म्हणतात काही लोक याला स्वतःची सोबत म्हणतात. काही खवचट लोक याला भावनाशून्यताही म्हणतात. या बैठकीसाठी मग आपल्या परिघातल्या परिघात दुसर्यांना त्रास होतील असे बदल करून आपले माहात्म्य सिद्ध करता येते. म्हणजे उदाहरणार्थ, मी वेगन आहे किंवा मी कांदा-लसूण खात नाही असे जाहीर करून जिकडे जाऊ तिकडच्या लोकांची पंचाईत करून त्यांना न्यूनगंड देता येतो. मी रात्री फक्त फलाहारच घेतो असे म्हणून लाखो लिटर इंधन जाळून, लाखो जीवांच्या जिवावर उठलेल्या रस्त्यावरून आणलेली फळे आनंदाने स्वतःच्या अध्यात्मिक तेजात निथळत मिटक्या मारत खाता येतात.
गांधीजींच्या ब्रह्मचर्य आणि अल्पसंतुष्टता या विचारांना पूर्णपणे दुर्लक्षित करुनही आम्ही पूर्ण गांधीवादी असू शकतो. गांधीवाद सगळा अंमलात आणणे आवश्यक नाही. किंबहुना अंशत:ही अंमलात आणणे आवश्यक नाही. तो अंमलात आणतो असा आव आणला तरी पुरे आहे. खरेतर त्याचीही गरज नाही. गांधी महान होते आणि त्यांचे महान विचार मला पूर्णपणे मान्य आहेत असे फक्त म्हणणे पुरेसे आहे. असा हा सोपा, सैलसर आणि सोयीस्कर असा गांधीवाद आम्हाला अत्यंत प्रिय असणार यात काय संशय?
Saturday, June 15, 2013
लढवय्या शेतकरी
"अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूळ गरजा आहेत" हे घासून गुळगुळीत, बुळबुळीत झालेलं वाक्य; पण प्रगतीचं घोडं अजून पहिल्याच पायरीवर अडलेलं आहे. अर्थातच, पुढचं वळण घेतलं की आलंच नंदनवन आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण तिथे लवकरच पोचू हा विश्वास अटळ आणि अढळ आहेच. माणूस सर्वसुखी होण्यात अनेक नैसर्गिक अडचणींचा मोठा अडथळा आहे आणि त्यासाठी माणसाला अनेक पातळीवर युद्ध करावे लागते. त्यापैकीच एक आहे वॉर ऑन हंगर.
वर्ल्ड बँक, युनो आणि जगातली तमाम सरकारे यांना गरिबांची भलती काळजी लागून राहिलेली असते. सध्या जी८ देशांची "हंगर समिट" चालू आहे, त्यात २.७ अब्ज पाऊंड्स खर्च करून दरवर्षी कुपोषणाने मरणार्या लाखो मुलांना वाचवण्याची प्रतिज्ञा करण्यात आली आहे. जगाची लोकसंख्या आज सात अब्ज आहे आणि त्यातले एक अब्ज लोक उपाशी आहेत. त्यातले २७% भारतात आहेत. पण त्याचवेळी भारत अन्नधान्याचा निर्यातदारही आहे. एकूणच जगात आजच्या घडीला दहा-अकरा अब्ज लोकांना पुरेल इतके अन्न निर्माण होते. (जगाची लोकसंख्या दहा अब्जावर स्थिर होईल असा अंदाज आहे.)
जगात निर्माण होणार्या अन्नापैकी ४०-५०% अन्न वाया जाते. हे वाया जाणारे अन्न काही शेतात वाया जात नाही. ते वाया जाईल याची काळजी घेतात आपली एफिशियंट मार्केट्स. उदाहरणार्थ, धान्यापासून इंधन तयार करणे, दारू तयार करणे किंवा गेलाबाजार कत्तलखान्यातल्या गुरांना ते खाऊ घालणे जास्त फायदेशीर असल्याने ज्यांच्याकडून काहीही आर्थिक लाभ नाही अशा लोकांना अन्न देण्यात काय हशील?
समजा अगदी निर्यात करता आले नाही, इंधनासाठी वापरता आले नाही, दारूसाठी वापरता आले नाही तरी ते फुकटात वाटण्याचा जास्तीचा खर्च कोण करणार? त्यापेक्षा ते तसेच पडून सडून गेलेले बरे.
पण मग लक्षावधी लोक भुकेले असताना आणि टनावारी अन्न वाया जात असताना करता येण्यासारखा सोपा-सुटसुटीत उपाय काय असावा बरं?
करेक्ट!
आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आणखी अन्न निर्माण करणे!
इतके अन्न-धान्य निर्माण झाले पाहिजे की पडून सडून जाणार्या अन्नाची विल्हेवाट लावण्याचा खर्च ते फुकटात वाटण्यापेक्षा जास्त झाला पाहिजे असे अगदी सोप्पे गणित आहे; पण हे गणित प्रत्यक्ष यायला आधुनिक तंत्रज्ञानात पारंगत अशा काही विशेष शेतकर्यांची मदत घेणे भाग आहे. आपल्या मदतीची इतकी गरज आहे हे पाहून आणि "वॉर ऑन हंगर"मधला फायदा पाहून मॉन्सॅन्टो, बेयर, सिन्जेन्टा सारखे अनेक नवे शेतकरी आता झपाट्याने या क्षेत्रात उगवून फोफावले आहेत.
आता वॉर म्हटले की रक्तपात, हिंसा आणि मृत्यू हे ठरलेलेच. भुकेविरुद्धच्या युद्धात अन्नधान्याचे उत्पादन कमी होण्यास कारणीभूत असलेल्या (आणि नसलेल्याही) कीडिंचा, तणाचा आणि इतर जीवजंतूंचा नाश होणार हे ओघानेच आले आणि हा असा नाश करण्याचा जोरदार अनुभव ही या शेतकर्यांची जमेची बाजू आहे.
डीडीटी ते राऊंडअप
अगदी दुसर्या महायुद्धापासून ते छोट्या-मोठ्या युद्धांपर्यंत अमेरिकन सरकारला मदत करणार्या मॉन्सॅन्टोने १९४४ साली अशाच एका वॉर ऑन मलेरियामध्ये डीडीटीचा शोध लावला. अगदी काळजीपूर्वक त्याचे टेस्टिंग करून त्यापासून काहीही धोका नाही आणि फक्त डास, पिकांवरची कीड व मलेरियाचे जंतूच मरतील ही खात्री केल्याचे दावे करून त्यांनी ते विकायला आणले. लवकरच आपण रोगमुक्त होणार म्हणून समस्त जगाने आनंदाने त्याचा मुबलक वापर सुरु केला. १९७२साली रेचेल कार्सन यांच्या 'सायलेंट स्प्रिंग' या पुस्तकानंतर केवळ लोकाग्रहास्तव त्यावर अमेरिकेत बंदी आणण्यात आली आणि ते युद्ध थांबवावे लागले. पण इतरत्र त्याचा वापर बराच काळ चालू राहिला.
अर्थात त्यापूर्वीच मॉन्सॅन्टोने दुसरी महत्त्वपूर्ण जबाबदारी शिरावर घेतली होती. व्हिएतनामच्या युद्धात व्हिएतनामी सैनिक लपून गनिमी कावा करतात म्हणून तिथली दाट वृक्षराजी नष्ट करण्यासाठी एजंट ऑरेंज आणि त्या सैनिकांना अन्नपुरवठा करणारी त्यांची पीके नष्ट करण्यासाठी एजंट ब्लू अशी दोन अमोघ रासायनिक अस्त्रे मॉन्सॅन्टोने निर्माण केली. ती फवारल्यानंतर जवळजवळ सत्तर-ऐंशी लाख व्हिएतनामी लोकांना उपासमार टाळण्यासाठी स्थलांतर करावे लागले. एजंट ऑरेंजच्या आणि त्यात मिसळल्या गेलेल्या डायॉक्सिनच्या विषारीपणामुळे पिढ्याच्या पिढ्या बरबाद झाल्या. मॉन्सॅन्टोचा दबदबा वाढतच होता.
विसाव्या शतकाच्या शेवटी आपल्या रासायनिक ज्ञानाचा उपयोग या कंपन्यांनी शेतकर्यांच्या फायद्यासाठी करायला सुरुवात केली. उदाहरणार्थ जीनटेक नावाच्या कंपनीने बोव्हाईन सोमॅटोट्रॉपिन नावाचा एक हार्मोन कृत्रिमरीत्या तयार करायचे प्रयत्न चालवले होते. मॉन्सॅन्टोने या कंपनीशी हात मिळवणी केली आणि तीस कोटी डॉलर्स खर्चून रिकॉम्बिनन्ट डीएनए वापरून एकदाचा हा हार्मोन तयार केला. डीडीटीप्रमाणेच याच्याही काटेकोर तपासण्या करण्यास मॉन्सॅन्टो विसरली नव्हती. त्यांनी या हार्मोनच्या काटेकोर फील्ड ट्रायल्स घेतल्यावरच ते बाजारात आणले. त्यांनीच केलेल्या या तपासण्यांमध्ये थोडा जरी धोका आढळला असता तरी त्यांनी तीस कोटी डॉलर्सवर हसत-हसत पाणी सोडले असते यात काय संशय? हा हार्मोन गायींच्या दूध निर्मितीसाठी कारणीभूत असतो, त्यामुळे बाहेरून हा हार्मोन टोचल्यावर गायींचे दुग्धोत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढते आणि शेतकर्यांचा अमाप फायदा होतो. सध्या हा हार्मोन भारतासह अनेक देशांमध्ये वापरला जातो.
असे असूनही काही लोकांनी याविरुद्ध ओरड सुरु केली. अतिदुग्धोत्पादनाने गायींच्या सडा-आचळांमध्ये जंतूसंसर्ग होऊन पू होतो आणि असा पू दुधात मिसळला जाऊ शकतो असा प्रचार काही लोकांनी चालू केला. मॉन्सॅन्टोच्या चाचण्यांमध्ये, असा पू दुधात जाऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेतली जाते असे नमूद केलेले असूनही काही लोकांनी त्यावर विश्वास दाखवला नाही. शिवाय या जंतुसंसर्गावर औषध म्हणून वापरली जाणारी प्रतिजैविकेही दुधात मिसळतात असाही आरोप केला.
काही डेअरीचालकांनी आमच्या दुधात असा हार्मोन नसतो असे लेबल त्यांच्या दूधपिशव्यांवर लावायला सुरुवात केली. पण नैसर्गिक हार्मोन आणि मॉन्सॅन्टोच्या हार्मोनमध्ये काहीही फरक नाही असा दावा करून मॉन्सॅन्टोने त्यांच्यावर खटले ठोकले आणि ती लेबल्स बाद ठरवली. काही लोकांनी असा हार्मोन टोचणे गायींच्या आरोग्याला धोकादायक आहे असा आरोप केला. इन्शुलिन माणसाच्या शरीरातले नैसर्गिक द्रव्य असले तरी ते बाहेरून टोचत राहिल्यास माणूस आजारी पडेल तसेच गायींचेही आहे असे त्यांचे म्हणणे होते.
त्याच दरम्यान जेन अॅक्रे आणि स्टीव्ह विल्सन या फॉक्स टीव्हीसाठी काम करणार्या पत्रकारांच्या जोडगोळीने मॉन्सॅन्टोच्या चाचण्यांच्या कागदपत्रांचा अभ्यास करून व मॉन्सॅन्टोच्या संशोधकांच्या मुलाखती घेऊन या बोव्हाईन ग्रोथ हार्मोनवर एक चार भागांची मालिका बनवली.
या मालिकेत या हार्मोनचा गायींच्या व माणसांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतात असे सांगणारे अनेक दावे होते आणि मॉन्सॅन्टोच्या दाव्यांचे खंडन होते. जेफ्री स्मिथ या "Seeds Of Deception" पुस्तकाच्या लेखकाने लिहिलेल्या या लेखात त्याबद्दल विस्तृत माहिती आहे.
मॉन्सॅन्टो हे फॉक्स टीव्हीचे मोठे गिर्हाईक असल्याने त्यांनी फॉक्स टीव्हीने खाल्ल्या मीठाला जागून या मालिकेत काही बदल करावे असे सुचवले; पण या पत्रकारांनी ते ऐकले नाही. फॉक्स टीव्हीला नाईलाजाने त्यांना नोकरीवरून काढावे लागले, तर त्यांनी कोर्टात धाव घेतली. कोर्टाने सुरुवातीला पत्रकारांची बाजू घेतली पण मॉन्सॅन्टोने अपील केल्यावर कोर्टाच्या लक्षात आले की एखाद्या बातमीत टीव्ही चॅनलने फेरफार करू नयेत असा फक्त संकेत आहे, कायदा नाही. अशा रीतीने मॉन्सॅन्टोने आणखी एक लढाई जिंकली.
जैवतंत्रज्ञानातल्या या सुरुवातीच्या यशानंतर मॉन्सॅन्टोने जनुकांतरित (जेनेटिकली मॉडिफाईड) पीके निर्माण करायला सुरुवात केली. बेयर कंपनीने निर्माण केलेले बीटी तंत्रज्ञान वापरून बीटी मका, बीटी वांगे, बीटी कापूस अशा अनेक कीटकनाशक क्षमता असलेल्या वनस्पती त्यांनी निर्माण केल्या. अमेरिकेत उगवणार्या मक्यापैकी आता बराचसा मका जनुकांतरित मका आहे. भारतातही बीटी कापूस शेतकरीप्रिय झाला आहे आणि अनेक शेतकर्यांचा बीटी कापसाने बराच फायदा झाला आहे.
बीटी तंत्रज्ञाने वनस्पतींमध्येच कीडनाशक प्रथिने टाकल्याने कीटकनाशकांचा खर्च वाचतो, शिवाय कीटकनाशक फवारावे न लागल्याने जमिनीत व पाण्यात प्रदूषण होत नाही. असा दुहेरी फायदा होत असला तरी त्याविरुद्धही काही लोकांनी ओरड सुरु केलीच. या जनुकांतरित पिकांची पूर्ण चाचणी घेतली गेलेली नाही असा काहींचा आक्षेप होता. मध्यंतरी एका शास्त्रज्ञाने जनुकांतरित अन्न खाऊन उंदरांमध्ये गंभीर आजार निर्माण होतात असा निष्कर्ष काढणारे संशोधन प्रसिद्ध केले. सुदैवाने त्या संशोधनातल्या महत्त्वाच्या त्रुटी लगेच लक्षात आल्याने त्या शास्त्रज्ञाला लगेच कामावरून काढून टाकण्यात आले आणि मॉन्सॅन्टोला लढायची वेळ आली नाही.
मॉन्सॅन्टोने कीटकनाशक वनस्पतींप्रमाणेच तणनाशकरोधी वनस्पतीही निर्माण केल्या आहेत. शेतात शेतकर्याला हव्या असणार्या पिकांबरोबरच नको असलेले तण आणि मातीतले इतर जीवजंतू त्या पिकांशी स्पर्धा करत असतात. या स्पर्धकांमुळे पिकांची वाढ हवी तशी होत नाही आणि शेतकर्याला कमी उत्पादन मिळते. या स्पर्धकांचा समूळ नायनाट करण्यासाठी त्यांच्यावर जहरी तणनाशक औषध फवारणे आवश्यक असते. परंतु, असे जहरी औषध फवारल्यास सामान्य पिकांनाही त्याचा त्रास होतो. म्हणून मॉन्सॅन्टोने संशोधन करून एक जहरी तणनाशक आणि त्या तणनाशकाच्या फवार्यातही जिवंत राहील असे पीक अशी जोडगोळी तयार केली. त्या तणनाशकाला अतिशय समर्पक असे नाव देण्यात आले: राऊंडअप. आणि अशा पिकांना राऊंडअपरेडी पीक असे म्हटले जाऊ लागले. राऊंडअपरेडी सोयाबीन आणि करडई ही दोन धान्ये बघता बघता लोकप्रिय झाली आहेत. या राऊंडअपविरोधातही काही लोकांनी लगेच ओरडा सुरु केला. काहींच्या मते ते इतके जहरी आहे की राऊंडअपरेडी पीके सोडल्यात मातीत उगवणार्या कोणत्याही वनस्पतीसह सूक्ष्मजंतूंनाही ते नष्ट करते आणि यात पिकांना पोषक अशा जीवजंतूंचाही समावेश होतो.काहींच्या मते या राऊंडअपरेडी पिकांची मातीतून खनिजे शोषण्याची शक्ती कमी असते त्यामुळे त्यांचे पोषणमूल्य नेहमीच्या पिकांपेक्षा फारच कमी असते.
बर्याच लोकांचा तर मुळात जनुकांतरित पिकांनाच विरोध आहे आणि त्यांना असे अन्न खायचे नसते. म्हणून अनेक देशांमध्ये अशा अन्नाच्या पिशव्यांवर ते जनुकांतरित असल्याचा इशारा छापणे बंधनकारक केले आहे. याविरुद्ध मॉन्सॅन्टोची लढाई चालू आहे. अमेरिकेतही अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पण मॉन्सॅन्टोने एफडीएकडे असे प्रतिज्ञापत्र दिले आहे की जनुकांतरित पीकांमध्ये आणि सामान्य पारंपारिक पीकांमध्ये काहीही फरक नाही त्यामुळे अशा अन्नधान्यावर वेगळा इशारा छापायची गरज नाही. कोणत्याही कंपनीला आपल्या उत्पादनावर स्वतःचे नाव छापून स्वतःची जाहिरात करायचीच असते; पण याबाबतीत आपल्या उत्पादनांवर स्वत:चे नाव न छापण्याचा उदारतावाद वाखाणण्यासारखा आहे. अर्थात स्वत:चे व्यावसायिक हितसंबंध सांभाळण्यासाठी मॉन्सॅन्टोला पेटंट ऑफिसात मात्र नाईलाजाने जनुकांतरित पीके सामान्य पीकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत आणि ती मॉन्सॅन्टोच्या परवानगीशिवाय कोणालाही वापरता येणार नाहीत असे ठामपणे सांगावे लागतेच.
इतकेच नाही, तर चोरून जनुकांतरित पीके वापरणार्या भामट्या शेतकर्यांविरुद्ध सतत लढावेही लागते. हे शेतकरी वार्याने जनुकांतरित बियाणे आमच्या शेतात आली असा बहाणा करतात. अशा अनेक शेतकर्यांना मॉन्सॅन्टोने कोर्टात खेचून धडा शिकवला आहे, शिवाय वार्याने जनुकांतरित बियाणे येऊन रुजू नये म्हणून आपापल्या शेतांमध्ये कडेचा काही भाग बफर म्हणून पडीक ठेवण्याचा सज्जड दमही भरला आहे. मॉन्सॅन्टोच्या दुर्दैवाने पर्सी श्माइसर नामक एका कॅनेडियन शेतकर्याने अनेक वर्षे चिवट लढा देऊन मॉन्सॅन्टोविरुद्धचा खटला जिंकला; पण मॉन्सॅन्टोची लढाई संपलेली नाही.
शेतकर्यांना पूर्वापार तयार झालेल्या धान्यातून बियाणं वाचवून ठेवायची, वेगवेगळे संकर करायची खोड आहे आणि भारतासारख्या देशात असल्या उद्योगांमधून प्रत्येक धान्याच्या अक्षरश: शेकडो जाती तयार करून ठेवल्या आहेत. ही सवय मॉन्सॅन्टोच्या व्यवसायास अतिशय मारक आहे. उद्या कोणी मॉन्सॅन्टोची जनुकांतरित बीजे घेतली आणि त्यातून भरघोस पीक घेऊन नंतर त्यातलीच बीजं वापरून फुकटात स्वत:चा फायदा करून घेतला तर मॉन्सॅन्टोचे दिवाळे वाजेल. म्हणून मॉन्सॅन्टोने टर्मिनेटर टेक्नॉलॉजी नावाचे अतिशय चतुर तंत्रज्ञान निर्माण केले आहे. हे तंत्रज्ञान वापरून तयार केलेली पीके एका पिढीनंतर स्वतःला नष्ट करतात म्हणजे फुकटात वर्षानुवर्षे बीजे वापरणे किंवा त्यांचा दुसर्यांशी संकर करून पेटंट नसलेल्या प्रजाती निर्माण करणे शक्यच होणार नाही.
आता स्वत:चा व्यवसाय सांभाळण्यासाठी हे आवश्यक असतानाही काही लोक जैवविविधता धोक्यात येईल म्हणून त्याविरुद्ध बोंबाबोंब करू लागले आहेत.
मॉन्सॅन्टोच्या अशा प्रत्येक कृतीला विरोध करणे हा काही स्वतःला मानवतावादी आणि पर्यावरणवादी म्हणवणार्या लोकांचा धंदाच झाला आहे. ज्या देशांमध्ये राज्यकर्त्यांनी जनुकांतरित पिकांना पाठिंबा दिला आहे त्या देशातले ते राज्यकर्ते व उच्चभ्रू लोक स्वतः मात्र
जनुकांतरित अन्न खात नाहीत; किंबहुना खुद्द मॉन्सॅन्टोच्या कॅन्टीनमध्ये त्यांच्या कर्मचार्यांना जनुकांतरित अन्न न दिले जाण्याची ग्वाही दिली जाते असा प्रचार करण्यापर्यंत या लोकांची मजल गेली आहे.
मध्यंतरी अमेरिकेत शेतकर्यांच्या हिताचे एक विधेयक पास करण्यात आले. या कायद्यानुसार (Farmers Assurance Act) एखाद्या शेतकर्याच्या उत्पादनाविरुद्ध एखाद्याने कोर्टात तक्रार केली आणि ती ग्राह्य मानून कोर्टाने त्या उत्पादनावर बंदी आणली तरी त्या शेतकर्याचे हित पाहून सरकारला ती बंदी अंमलात न आणण्याची मुभा दिली आहे. या कायद्यामुळे उठसूट कोणीही मॉन्सॅन्टोच्या जनुकांतरित पीकांविरुद्ध तक्रार केली आणि कोर्टाने त्यावर बंदी घातली तरी मॉन्सॅन्टोचे नुकसान होण्यापासून संरक्षण होणार आहे.
अर्थातच या कायद्यामुळे मॉन्सॅन्टोच्या हितशत्रूंना पोटशूळ उठला आणि त्यांनी या कायद्याला Monsanto Protction Act असे नाव देऊन त्याविरुद्ध जोरदार आघाडी उघडली आहे.
जगातून भूक कायमची नष्ट करण्यासाठी या सर्वांविरुद्ध मॉन्सॅन्टोची अथक लढाई चालू आहे.
भारत आणि मॉन्सॅन्टो
भारतात मॉन्सॅन्टोचा चंचुप्रवेश आधीच झालेला आहे आणि भारतीय शेतकर्यांनी बीटी कॉटनच्या वापराने स्वत:च्या समृद्धीत वाढही करून घेतलेली आहे. अर्थात भारतातही मॉन्सॅन्टोचे हितशत्रू आहेतच. या हितशत्रूंमुळे जनुकांतरित अन्नधान्याला अजून भारतात परवानगी मिळू शकलेली नाही.
वंदना शिवांसारखे पर्यावरणवादी मॉन्सॅन्टोचे कट्टर विरोधक आहेत. मॉन्सॅन्टोने काही वर्षांपूर्वी कारगिल (Cargill) नामक बियाण्यांची कंपनी विकत घेतली. या कंपनीच्या राजस्थानमधील अधिकार्याने राजस्थानातल्या एका कृषी विद्यापीठाने शोधलेले
एक बियाणे चोरले असा आरोप वंदना शिवा यांनी आपल्या "Soil not Oil" या पुस्तकात उघडपणे केला आहे. शिवाय विदर्भात होणार्या शेतकर्यांच्या आत्महत्यांचा संबंध बीटी कॉटनशी जोडण्याचाही प्रयत्न केला गेला आहे.
भारतात जनुकांतरित अन्नधान्यांच्या वापराला परवानगी मिळावी म्हणून मॉन्सॅन्टोच्या प्रयत्नांना वारंवार खीळ बसली आहे. बीटी वांग्याच्या वापरावर कोर्टाने बंदी आणली आहे.
२०१२ मध्ये बासुदेब आचार्य यांच्या अध्यक्षतेखाली एक संसदीय समिती स्थापन करून भारतात जनुकांतरित ध्यान्यांना परवानगी देण्याबाबत विचार करण्यात आला. या समितीने बराच अभ्यास करून शेवटी एकमुखाने जनुकांतरित धान्याला भारतात परवानगी देऊ नये असा निष्कर्ष काढला.
या समितीच्या अहवालात लिहिलेला हा उतारा पाहा:
During their extensive interactions with farmers in the course of their Study Visits, the Committee have found there have been no significant socio-economic benefits to the farmers because of introduction of Bt. cotton. On the contrary, being a capital intensive agriculture practice, investments of the farmers have increased manifolds thus, exposing them to far greater risks due to massive indebtedness, which a vast majority of them can ill afford. Resultantly, after the euphoria of a few initial years, Bt. cotton cultivation has only added to the
miseries of the small and marginal farmers who constitute more than 70% of the tillers in India.
भविष्यात भुकेचा प्रश्न सोडवणारी सस्टेनेबल शेती देण्याचा दावा करणार्या मॉन्सॅन्टोला हा एक मोठा धक्का होता. पण मॉन्सॅन्टोने आशा सोडलेली नाही.
नुकतीच भारताचे कृषीमंत्री श्री. शरद पवार व भारताचे पंतप्रधान श्री. मनमोहनसिंग यांनी जनुकांतरित धान्यांच्या क्षेत्रचाचण्यांसाठी अनुकुलता दर्शवली आहे. शिवाय भारताच्या मनुष्यबळ खात्याचे मंत्री श्री. शशी थरूर यांनी जैवतंत्रज्ञानक्षेत्रात कितीतरी रोजगार निर्माण होतील अशा स्वरुपाचे वक्तव्य केले आहे. दूरदृष्टीसाठी प्रसिद्ध असलेले स्वामिनॉमिक्सवाले स्वामीनाथन यांनीही जनुकांतरित पिकांची भलामण केली आहे.
लढवय्या मॉन्सॅन्टोच्या लढाईला यश येईल का हा प्रश्न नसून कधी हा प्रश्न उरला आहे.
Friday, September 7, 2012
जुलूस
मुळात माझ्यासारख्याच अनेक लोकांना स्वतंत्र विचार करण्याचं शिक्षण मिळालेलंच नाहीय. वर्गात मागच्या बेंचवर बसून खिडकीतून बाहेर बघणार्या मुलांना, ठराविक पद्धतीने निबंध न लिहिणार्या मुलांना, ठराविक साच्यातली उत्तरे न लिहिणार्या मुलांना वाया गेलेली मुले समजणार्या शिक्षणफॅक्टरीतून कशीबशी सर्टिफिकेटं मिळवलेल्या लोकांना स्वतःच्या शंकांच्या योग्यतेबद्दलही शंकाच असतात.
एकीकडे "आराम हराम है" किंवा "Work for all (and more of it)." सारख्या वाक्यांचा येता जाता पवित्र मंत्रासारखी जप करणार्या, 'कार्यमग्न' लोकांना पुजणार्या आणि काम न करणार्यांना ऐतखाऊ म्हणून हिणवणार्या व्यवस्थेचे पाईक कामाचे तास कमी करायला का झटतील हे काही केल्या कळत नाही किंबहुना कोणीही स्वतःचा वेळ मोकळा अनुत्पादक का ठेवेल हे "माणसाच्या उपभोगाकांक्षा अमर्याद असतात आणि स्रोत अतिशय मर्यादित" असे ठासून सांगणार्या या व्यवस्थेला कसे कळेल हेच समजत नाही (म्हणूनच कामात बदल म्हणजेच आराम वगैरे वगैरे). समृद्धी, शिक्षण वगैरे आल्यावर लोकसंख्या स्थिर होईल असे म्ह्णताना प्रगतीच्या गेल्या साठ वर्षांमध्येच लोकसंख्या दुपटीहून अधिक का वाढली हे कळत नाही आणि आदिमानवाची लोकसंख्या मात्र कोणत्याही समृद्धीविना पन्नास लाखाच्या आसपास कशी स्थिर राहिली हे कळत नाही१.
पण सुदैवाने अशा शंकांना आपल्या विचारांनी आधार देणारी माणसे जगात आहेत.
माणसाला आपण स्वत:साठी निर्माण केली आहे असे वाटणार्या पण प्रत्यक्षात माणसांपासून बनलेल्या असूनही स्वतंत्रपणे उत्क्रांत झालेल्या आणि कोणत्याही एका माणसाच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या धर्म, सरकारादि यंत्रणांसारखीच "मार्केट" ही एक यंत्रणा उत्क्रांत झालेली आहे आणि माणूस म्हणजे तिच्या प्रभावाखाली तिच्यासाठीच फुकटात काम (Shadow Work) करणारा Homo Economicus झालेला आहे. मोठमोठ्या कंपन्यांची जगातल्या अगदी थोड्या लोकांच्या फायद्यासाठी काम करणारी ही बाजारू यंत्रणा प्रगतीचे ढोल इतक्या मोठ्या आवाजात वाजवत आहे की काय खरं आणि काय खोटं हे न बघताच माणसं त्या तालावर नाचू लागतात. माणसाच्या कोणत्याही गरजेचे संस्थानीकरण हे या यंत्रणेचे वैशिष्ट्य आहे. इवान इलिच या विचारवंताने माणसाच्या गरजांच्या संस्थानिकरणातून झालेला विपर्यास आपल्या Needs या लेखात मांडला आहे. उदाहरणार्थ शिक्षण या शब्दाचा अर्थ शिकणे असा न राहता पदवी मिळवणे, मार्क्स मिळवणे असा झाला आहे. शिकण्याच्या क्रियेपेक्षा बाजारातून मिळणार्या सेवेवर माणसाचे अवलंबित्व निर्माण झाले आहे. शाळेबाहेरच्या खर्याखुर्या शिकण्याला शिक्षण म्हणायची मान्यताच नाही. माणसाच्या शिकण्याच्या गरजेचे संस्थानिकरण करून बाजाराने बहुसंख्य लोकांची ती गरज भागणे दुरापास्त केले आहे. रुसो म्हणतो,"The noblest work in education is to make a reasoning man, and we expect to train a young child by making him reason! This is beginning at the end; this is making an instrument of a result. If children understood how to reason they would not need to be educated.". पण इथे खरेच शिकायचे कोणाला आहे? आम्हाला तर शिक्षण घेतल्याचा कागद हवा आहे म्हणजे बाजारात आमची किंमत वाढेल आणि मग बाजार उदार मनाने आम्हाला घर, गाडी, टीव्ही वगैरे देऊन आमच्या "गरजा" पूर्ण करेल. ज्यांनी असे शिक्षण घेतले आहे अशा आम्हा लोकांना हे सगळं मिळतं, सुबत्ता मिळते, जगात काय चाललंय याची माहिती मिळते पण आपण खातो ते नक्की कुठून येतं त्याचं ज्ञान मिळत नाही. आपण खातो त्यात नक्की किती पेस्टिसाईड्स आहेत ते कळत नाही. उत्पादकाने लावलेल्या "Organic" लेबलवर विश्वास ठेवण्याशिवाय आम्हाला गत्यंतर नाही. समजा नाहीच ते घ्यायचं म्हटलं तर दुसरं काय खायचं त्याचं ज्ञान नाही. आम्ही फक्त बाजाराच्या जगङ्व्याळ यंत्रात एखाद्या स्क्रूप्रमाणे एखादे अतिविशिष्ट काम करत बसतो ज्याचा संबंध आम्हाला आमच्या रोजच्या जगण्याशी लावता येत नाही. आमच्या अतिप्रचंड लोकशाही यंत्रणेतले आम्ही एक नगण्य भाग आहोत ज्यांना आशेशिवाय काहीही करता येत नाही. हळूहळू ही काही न करण्याची आम्हाला सवय लागलेली आहे आणि आमची हवा, आमचं पाणी आणि आमच्या अन्नाचं बाजारीकरण होतानाही आम्ही पाहात राहतो. आम्ही मानसिकरित्या षंढ केले गेलो आहोत. इतके की बाजाराने पवित्र ठरवलेल्या वस्तुंना आम्ही नाही म्हणू शकत नाही, त्यांच्यापुढे आम्ही आनंदाने मान झुकवतो. "Holy Cow" म्हणणार्या आमच्या पूर्वजांना आम्ही वेड्यात काढून "Holy Car!" म्हणतो. "गाय हमारी माता है
" म्हणणार्यांच्या वंशातले आम्ही आता कारसेवा करतो. कारसाठी आम्ही जमिनीवर डांबर ओतून आखीव-रेखीव रस्ते बनवतो. कोणत्याही दिशेने चालू लागण्याचे आमचे स्वातंत्र्य घालवून ठराविक मार्गाने जायचे नियम पैसे देऊन विकत घेतो आणि त्या पैशांसाठी जास्तीचे कामही करतो. सर्वसाधारण अमेरिकन माणूस कार असूनही त्याच्या आदिम पूर्वजाइतका चालतोच फक्त लॉबी, पार्किंग आणि कॉरिडॉर्समध्ये. इलिच म्हणतो "The model American puts in 1600 hours to get 7500 miles: less than five miles per hour. In countries deprived of a transportation industry, people manage to do the same, walking wherever they want to go, and they allocate only 3 to 8 percent of their society's time budget to traffic instead of 28 percent".
"हेल्थ" या आणखी एका संस्थानिकृत अतिप्रिय गरजेचाही आम्ही या अतिपूज्य कारसाठी त्याग करतो. कॅन्सरच्या नावाने गळे काढणारे आम्ही कारच्या नळीतून बाहेर पडणारे कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड आणि हायड्रोजन सायनाईडसारखे घातक कर्कजनक वायू मुकाट आमच्या फुप्फुसात भरून घेतो.
रस्त्यावर भारतात एक लाखाच्यावर बळी घेणार्या या कारसाठी सरकारने लाल गालिचा अंथरला आहे. किरकोळविक्री क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात काचकूच करणार्या सरकारने कारनिर्मिती क्षेत्रात आपले दरवाजे सताड उघडे ठेवले आहेत आणि वीस वर्षांत जगातले ऑटोमोबाईल हब व्हायचे स्वप्न बाळगले आहे. त्यासाठी मोठमोठे रस्ते बांधणे, त्यासाठी शेतकर्यांच्या जमिनी हडपणे जोमात चालू आहे२.
त्याचवेळी या कारसाठी इंधन कमी पडणार हे पाहून नवनव्या इंधनाच्या शोधात मार्केट आहे आणि मार्केटच्या सुपीक डोक्यातून "जैवइंधनाचे" एक नरभक्षक पिल्लू बाहेर पडले आहे. २०५० पर्यंत जगाच्या ऊर्जेच्या २५% ऊर्जा जैवइंधनातून मिळेल असा अंदाज आहे. अर्थातच त्यासाठी आधीच कमी असलेली जमीन द्यावी लागणार. लाखो वर्षे जुनी जंगले तोडून तिथे पामची किंवा जट्रोफाची लागवड करावी लागणार (मलेशिया आणि इंडोनेशियाने यात भारतापेक्षा जास्त प्रगती केली आहे).माणसांना खायला नसेल मिळत पण इंधनासाठी ऊस आणि मका उपलब्ध करून द्यावा लागणार. मग अन्नधान्याच्या किंमती वाढताहेत तर वाढू द्या.
UN च्या फूड अॅन्ड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशनने (FAO) भूक कमी करण्याची काही ध्येये ठरवली होती. अगदी आकडेवारीनिशी. पण २००६ नंतर अन्न-धान्याच्या किंमती इतक्या वाढल्या की जगातल्या दीर्घकालीन उपाशी लोकांची संख्या कमी होण्याऐवजी वाढायला लागली आणि २००९ मध्ये एक अब्जापेक्षा जास्त होईल असा अंदाज निघाला. मग FAO ने एक युक्ती केली. ध्येय ठरवण्यासाठी आकडेवारी वापरायचेच सोडून दिले. म्हणजे उपाशी लोकांची संख्या अमुक इतकी कमी करू असे न म्हणता फक्त "आम्ही उपाशी लोकांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करू" असेच ध्येय ठरवले गेले.
जगातल्या वरच्या १० टक्क्यातल्या लोकांना पोषणमूल्यांनी भरपूर असा बहुढंगी आहार मिळतो, पण हे भाग्य सगळ्यांच्या नशिबी नाही. FAO च्या त्याच अहवालातला हा परिच्छेद पाहा:
"Biodiversity, another essential resource for agriculture and food production, is threatened by urbanization, deforestation, pollution and the conversion of wetlands. As a result of agricultural modernization, changes in diets and population density, humankind increasingly depends on a reduced amount of agricultural biological diversity for its food supplies. The gene pool in plant and animal genetic resources and in the natural ecosystems which breeders need as options for future selection is diminishing rapidly. A dozen species of animals provide 90 percent of the animal protein consumed globally and just four crop species provide half of plant-based calories in the human diet."
प्रदूषणाने वातावरणावर परिणाम होतो म्हणून मार्केटने एक युक्ती काढली आहे. वातावरणाचं खाजगीकरण! म्हणजे वातावरणाचे हक्क आजवर ज्यांनी प्रदूषण केले आहे त्याच लोकांना वाटून द्यायचे. मग त्यातले काही लोक थोडंसं प्रदूषण कमी करतील आणि वाचलेला आपला "कोटा" इतरांना विकतील म्हणजे ते प्रदूषण करायला मोकळे. "कार्बन ट्रेडींग" या आपल्या पुस्तकात लॅरी लोहमानने पृथ्वीवरच्या सगळ्या जीवांच्या मालकीचं आणि हक्काचं वातावरण या मार्केट इकॉनॉमिने प्रदूषणकर्त्यांना कसं परस्पर आंदण दिलं आहे याचा खुलासा केला आहे.
२०५० पर्यंत ९ अब्ज होणारी लोकसंख्या, तिला पोसण्यासाठी ७०% जास्तीच्या अन्नाची गरज असताना इतर कामांसाठी वापरली जाणारी जमीन, अन्न-धान्यांच्या बियाणांची कमी कमी होत जाणारी उत्पादनक्षमता, जेनेटिक्सच्या माध्यमातून कंपन्यांचा त्यावर नियंत्रण आणण्याचा कावा, पाण्याचे वाढते दुर्भिक्ष्य, मरू घातलेले समुद्र, वाढती विषमता असं सगळं असूनही जणू काहीच प्रश्न नाही असा आव आणून लोकांची दिशाभूल करण्याचं काम ही मार्केट इकॉनॉमी करते.
त्या बाजाराच्या चमचमाटापुढे हतबल होऊन माणूस पुढ्यात आलेल्या गोष्टींचा उपभोग घेत राहतो, नवे नवे तंत्रज्ञान, नवे फोन, नवे संगणक, नवे टीव्ही येतच राहतात आणि अखेर मार्केटच माणसाचा उपभोग घेऊ लागते.
असा आपल्या प्रत्येक गरजेचा गुलाम झालेला माणूस त्या गरजा पूर्ण होत नसतानाही त्याच्या आभासासाठी रात्रंदिवस खपत राहतो. आयुष्यातला एक तृतीयांश भाग काम करण्यात आणि एक तृतीयांश भाग झोपेत काढल्यावर उरलेल्या वेळात माणूस आपण सुखी आहोत असे स्वतःला ओरडून ओरडून सांगत राहतो पण मार्केटच्या प्रगतीच्या जुलूसात त्याचा आवाज त्याला स्वत:लाही ऐकू येत नाही.
१. Fekri Hassan, Demographic Archaeology (New York: Academic Press, 1981). Cited in "My Name Is Chellis And I Am In Recovery From Western Civilization"
२. Vandana Shiva, "Soil Not Oil" (Southpress)
Tuesday, December 20, 2011
भविष्याला आपली गरज आहे का?
पृथ्वी वाचवायची गरज असो वा नसो, मानवाने स्वतःला वाचवण्याची गरज आहे यावर बर्याच लोकांचे आजकाल एकमत झालेले दिसते. मानवजात नष्ट व्हायचा धोका आहे वगैरे बरेच शास्त्रज्ञही मासिकांमध्ये खळबळजनक विधाने करत असतात (खळबळ होत नाही ही गोष्ट वेगळी). पर्यावरणवाद्यांचा आणि तंत्रभीतांचा (Luddites) तर हा एक आवडीचा विषय आहे. गेल्या दोन-अडीचशे वर्षांत औद्योगिकीकरणामुळे झालेला पर्यावरणाचा र्हास, तपमानवाढ, लोकसंख्येचा विस्फोट, अन्न-पाण्याचे दुर्भिक्ष्य, आण्विक युद्धे आणि अगदी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात बदल, सौर वादळे इत्यादीपर्यंत अनेक कारणे दिली जातात. यातली सौर वादळे, उल्कापात वगैरे नैसर्गिक कारणे सोडली तर बाकीची सगळी मानवनिर्मित आहेत असे म्हटले जाते आणि हा तंत्रज्ञानाने साधलेल्या प्रगतीवर मोठा आरोप आहे. एकीकडे तंत्रज्ञानातील नवनवीन शोधांमुळे मानवी आयुष्य खूपच सुखकर झाले आहे, प्रदीर्घ झाले आहे असे विविध आकडेवारीने सांगितले जात असताना दुसरीकडे अमुक एक टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, अमुक इतके लोक उपाशी आहेत, अमुक अब्ज लोकांना स्वच्छ पाणी मिळत नाही अशीही आकडेवारी कानावर येत असते. एकीकडे सगळ्यांना शिक्षण, कामधंदा वगैरे देऊन सगळ्या जगातल्या लोकांचे जीवनमान सारखे करण्याची धडपड आणि दुसरीकडे मानवाच्या स्वच्छंद नैसर्गिक जीवनावर घाला येत असल्याची बोंब. एकीकडे लोकसंख्या भयानक वाढतेय आणि लोकांना उपाशी मरावं लागेल असा आकांत तर दुसरीकडे लोकसंख्येच्या वाढीचे आलेख काढून ती कशी स्थिर होईल हे सिद्ध करण्याची धडपड. हे सगळं पाहून नक्की काय चाललंय हे कळेनासं होतं.
माझा स्वतःचा स्वभाव अत्यंत आळशी असल्याने तंत्रज्ञानामुळे आयुष्य सुकर झाले आणि प्रचंड प्रमाणावर श्रमबचत झाली वगैरे गप्पांवर विश्वास नाही. उलट जितकी तंत्रज्ञानात प्रगती होईल तितकी भोगस्पर्धा आणि त्यामुळे कामाचे तास वाढलेलेच दिसतात. तरीही होताहोईतो तटस्थ राहून मी उत्तरे शोधण्याचा माझ्या परीने प्रयत्न केला.
वर्तमानात खरोखर आपण म्हणतो तसा नैसर्गिक साधनसंपत्तीचा भरमसाठ वापर होतोय की नाही आणि खरंच नैसर्गिक स्त्रोत संपत आले आहेत का हे शोधताना मला Global Footprint Network बद्दल माहिती मिळाली. ही संघटना पर्यावरणाचं अकाऊंटिंग करून मानवी उपभोगाचा नैसर्गिक स्त्रोतांवर कितपत परिणाम होतो याची आकडेवारी काढते. सप्टेंबर २०११ मध्ये त्यांनी "Earth Overshoot Day" 'साजरा' केला. म्हणजे २०११ या एका वर्षात जितकी साधनसंपत्ती तयार झाली असती ती सप्टेंबर महिन्यातच वापरली गेली हे जाहीर केलं. त्यांच्या ब्लॉगवर तो लेख वाचता येईल.आता हे पाहून कोणालाही अशी शंका येईल की माणसाच्या उद्योगांचा निसर्गावर परिणाम होतोय हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले की काय? तशी ती मलाही आली आहे, पण अजून तसे म्हणण्यासाठी कोणाकडून मान्यता मिळायला पाहिजे ते मला महित नाही. त्यांच्या संस्थळावर त्यांनी लोकसंख्येचे अंदाज दिले आहेत. विशेष काहीही घडले नाही आणि जसे चालले आहे तसेच चालत राहिले तर २०५० साली लोकसंख्या ९ अब्ज असेल असा अंदाज त्यांनी बांधला आहे.
त्याचदरम्यान UNO च्या Food and Agriculture Organization (FAO) चा एक अहवाल प्रसिद्ध झाला. त्यातही २०५० साली ९ अब्ज लोकसंख्या असेल असा अंदाज केला गेला आहे. या ९ अब्ज लोकसंख्येसाठी सध्याच्या अन्नधान्य उत्पादनात ७०% वाढ झाली पाहिजे, त्यातच उपलब्ध शेतजमिनीपैकी २५% जमीन निकामी झाली आहे, ८% अर्धवट निकामी आणि १०% सुधारत आहे असे आव्हानात्मक प्रश्न उभे केले आहेत. अर्थातच नव्या तंत्रज्ञानामुळे आणि सुधारित पद्धतींमुळे आपण हे आव्हान पेलू शकू असा विश्वासही व्यक्त केलाच आहे.
मग हे नवे तंत्रज्ञान म्हणजे काय ते शोधणे आले. उत्तर थोडेसे माहितीतलेच होते. पाण्याचा अतिकिफायतशीर वापर आणि जेनेटिक्स. जेनेटिक्समधील वाईड क्रॉसिंग, सेल/टिश्यू/प्रोटोप्लास्ट कल्चर आणि सोमॅटिक सेल हायब्रिडायझेशन अशा तंत्रांची भारदस्त नावं वाचता वाचता जेनेटिक्स, नॅनोटेक्नॉलॉजी आणि रोबोटिक्स या तीन क्षेत्रात प्रचंड वेगाने होत असलेल्या प्रगतीबद्दल कुणकुण लागली. (http://www.blogger.com/=http://www.foresight.org/). Molecular Manufacturing आणि cell computing वगैरे भन्नाट विषय पाहून हतबुद्ध झालो आणि तशाच अवस्थेत Singularity या नवीनच संकल्पनेशी ओळख झाली. सिंग्युलॅरिटी समिटच्या संस्थळावर महिती तंत्रज्ञानातल्या चढत्या भाजणीत होणार्या वाढीबद्दल माहिती देणारी रे कर्झ्विल यांची एक चित्रफीत पाहण्यात आली. रे कर्झ्विल यांच्या मते या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ही सिंग्युलॅरिटी २०२९ सालापर्यंत गाठता येईल. त्यानंतर काय होईल हे सांगणे अवघड असले तरी माणसाने आपल्यापेक्षा कित्येकपटींनी बुद्धिमान असे यंत्र तयार केले असेल एवढे नक्की. असे हे यंत्र स्वतःपेक्षाही जास्त बुद्धिमान यंत्रं तयार करू शकेल आणि 'बुद्धिमत्तेचा स्फोट' होईल. या बुद्धिमत्तेच्या स्फोटापुढे माणसाचे सध्याचे प्रश्न अगदीच किरकोळ असतीलच शिवाय खुद्द माणसाची बुद्धिमत्ताही खूपच किरकोळ असेल. आता यावरही दुसर्याच दिशेने विचार करणारे महाभाग आहेतच. सन मायक्रोसिस्टीम्सचे संस्थापक आणि प्रमुख संशोधक, जावा या प्रोग्रॅमिंग लँग्वेजच्या रचनेचे तपशील लिहीणारे श्री. बिल जॉय यांनी लिहीलेला एक लेख (Why The Future Does Not Need Us) या बाबतीत अतिशय उद्बोधक ठरावा.
हे सगळं पाहून डोकं गरगरायला लागलं आणि "Man moves in mysterious ways his problems to resolve." यातल्या पहिल्या भागाबद्दल खात्री पटली.
पण दुसर्या भागाचं काय? तुम्हाला काय वाटतं? माणसाचे प्रश्न सुटतील? की आणखी वाढतील? वाढणार असतील तर उपाय काय?
Monday, December 19, 2011
सरासरी अंधश्रद्धा
"महाराज, यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला.", महाराजांच्या चेहर्यावर काळजीच्या रेषा. "तरीही गेल्यावर्षीपेक्षा दहा टक्के जास्त धान्योत्पादन झाले. आकडेवारीनुसार सडून वाया गेलेलं धान्य सोडूनही दरडोई सरासरी शंभर शेर धान्य निर्माण झाले. म्हणजे दरडोई दरमहा आठ शेर."
राजा प्रसन्न. कृषीमंत्र्यांना आठ गावं बक्षिस. पुढे अर्थमंत्री. "महाराज, यावर्षी आपल्या राज्याचं एकूण उत्पन्न आठ टक्क्यांनी वाढलं आणि वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊनही दरडोई उत्पन्न पन्नासहजारांवरून साठहजारांवर गेलं."
राजा खूश. अर्थमंत्र्यांना दहा गावं बक्षिस. अशी एकेक माहिती प्रधानमंत्री सांगत गेले. बैठक संपली तेव्हा राजा प्रसन्न होता. राज्यातल्या लोकांना जास्तीचं अन्नधान्य मिळतंय, जास्तीचं उत्पन्न मिळतंय, लोक जास्ती जगताहेत वगैरे गोष्टी ऐकून कोणता राजा प्रसन्न होणार नाही?
महामंत्र्यांना निरोप देऊन त्याने पेंगणार्या विदूषकाकडे मोर्चा वळवला.
"उठ झोपाळा, गोष्ट सांगिशी मला", राजा हसून म्हणाला.
"क्षमा महाराज, तुमच्या राज्यात हे जास्तीचं अन्न खाऊन अशी जास्तीची झोप येते बघा", विदूषक म्हणाला," आणि गोष्ट तुम्हाला तुमचीच सांगतो. फार जुनी नाही, पुढच्या महिन्यातल्या पंधरा तारखेला घडलेली. सांगून झाल्यावर तुम्हाला नक्की आठवेल अशी.
तर, झालं काय महाराज, की जास्तीच्या उत्पन्नाचे आभार म्हणून मी तुम्हाला माझ्या घरी जेवायला बोलावलं. मी स्वतः पाटावर बसलो आणि चौरंगावर तुम्हाला बसवलं. तितक्यात दारी एक गरीब ब्राह्मण अतिथी आला. त्यालाही आत घेतलं आपल्या बाजूला जमिनीवर बसवलं. तुमच्या आवडीच्या जिलब्यांचा बेत केला होता. एकावन्न जिलब्या केल्या होत्या, पण तुम्ही पहिला भात संपवता संपवता त्या बुभुक्षित ब्राह्मणाने पन्नास जिलब्या खाल्ल्या आणि मी एक जिलबी खाल्ली. नाईलाजाने तुम्ही बाकीचं जेवण जेवलात आणि हात धुतलेत. मुखशुद्धी करून थोडा आराम करून तुम्ही जायला निघालात तेव्हा मी नम्रपणे विचारलं 'महाराज, जिलब्या छान झाल्या होत्या नाही?' ते ऐकून तुम्ही रागाने लालबुंद झालात आणि काहीही न बोलता ताडताड निघून गेलात. मला दु:ख तर खूपच वाटले महाराज पण आश्चर्य या गोष्टीचे अधिक वाटले की आपण प्रत्येकी सरासरी सतरा जिलब्या खाऊनही तुम्ही असं का वागलात?"
आता ही गोष्ट ऐकून संख्याशास्त्रज्ञ आणि संख्याशास्त्रांध असे दोन्ही लोक त्यात चुका काढतील किंवा संख्याशास्त्र हे फक्त एक निदर्शक म्हणून वापरले पाहिजे आणि सरासरी शिवाय इतरही मोजमापे (median, mode) आहेत वगैरे सांगतीलच आणि त्यांचं बरोबर आहे यात शंका नाही. पण तरीही याच सरासरीचा आधार घेऊन बरेच मुद्दे सिद्ध केले जातात आणि तेव्हा हा मुद्दा प्रकर्षाने मांडला जात नाही. वरच्या गोष्टीत घेतलेले मुद्देच पाहा ना! गेल्या पन्नास-साठ वर्षात आपण प्रचंड प्रगती केली असे म्हणतो. या प्रगतीचे मापन करणारे निर्देशक बहुतांश संख्यात्मक आहेत आणि त्यातले बरेचसे सरासरीवर आधारित आहेत. शिवाय या निर्देशकांना आधारभूत अशी काही गृहीतके आहेत आणि ती गृहीतके बरोबर धरली तरच त्या निर्देशकांना हवा तो अर्थ प्राप्त होतो.
उदा. दोनशे वर्षांपूर्वी असलेली सरासरी जन्मतः जीवनशक्यता ३१ वर्षां वरून आता ६७ वर्षांवर गेली आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रत्यक्षात अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि हाताच्या बोटावर मोजता येण्यासारख्या देशांमध्ये ती ७५-८० वर्षांच्या पुढे असते, विकसनशील देशांमध्ये ६०च्या आसपास असते आणि मागासलेल्या देशांमध्ये ४०च्या खाली असते (संदर्भ) शिवाय या निर्देशकासाठी गृहीतक असे आहे की जन्माला आलेला जीव दुबळा असो वा सशक्त, तो जगला पाहिजे आणि अनेक अपत्यांपैकी सशक्त ती जगतील आणि दुबळी मरतील हा निसर्गातल्या सामान्य नियम चुकीचा आहे. वस्तुतः अगदी ७५-८० जीवनशक्यता असलेल्या भागातही प्रत्येक माणूस ७५-८० वर्ष जगतो असे नाही. याचाच अर्थ आपण फक्त दुबळेपणा आणि सशक्तपणा यांच्या नैसर्गिक व्याख्या बदलून त्या कमी तीव्र केल्या आहेत आणि याचा परिणाम म्हणजे गेल्या पन्नास-साठ वर्षांत तिप्पट झालेली लोकसंख्या.
तर, ही सरासरी अंधश्रद्धा म्हणजे संख्याशास्त्रीय निर्देशक वापरून, एखाद्या गोष्टीचे फक्त संख्यात्मक मूल्यमापन करून आणि गुणात्मक बाबींकडे पूर्णत: दुर्लक्ष करून त्या गोष्टीबद्दल छातीठोकपणे बोलणे.
बहुधा तंत्रज्ञानातली प्रगती, त्याचा पर्यावरण आणि मानवी जीवनावरचा परिणाम यावर चर्चा होत असताना तंत्रज्ञानाची बाजू घेणार्यांना हे निर्देशक फार उपयोगी पडतात. धडाधड प्रतिपक्षावर संख्या आणि आलेख यांचा मारा केला जातो आणि तंत्रज्ञानामुळे गेल्या पन्नास वर्षांत माणसाचे आयुष्य किती सोपे-सुकर झाले आहे हे पटवून दिले जाते. तेव्हा या निर्देशकांचा वापर करताना असा अविर्भाव आणला जातो की बहुसंख्यांचे कल्याण झालेच आहे आणि थोडेफार उरले आहेत त्यांचे लवकरच होईल. वस्तुस्थिती मात्र त्याच्या उलट आहे.
तंत्रज्ञानाच्या विकासामुळे काही लोकांचे आयुष्य सोपे झाले असले तरी बहुसंख्यांचे आयुष्य कठीणच आहे. बहुतेकांवर आयुष्य लादले गेले आहे आणि बहुतेकांवर ते कसे जगायचे याची पद्धतही लादली गेली आहे. एक हरितक्रांती होऊनही अजूनही एक तृतीयांश लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही. गमतीचा भाग म्हणजे अश्मयुगात माणसाला पुरेसे अन्न मिळत नसे असे (चुकीने) समजले जाते पण सध्याच्या उपाशी लोकांची संख्या अश्मयुगातल्या एकूण लोकसंख्येपेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे (म्हणजे जन्मतःच किंवा बालपणी लवकर मरणारे जास्त दु:खी की उपाशी अवस्थेत खुरडत खुरडत जगून मरणारे जास्त दु:खी हा गुणात्मक वाद आला).
आणखी एक गोष्ट अशी की हे निर्देशक वापरून त्यात होणारी सुधारणा म्हणजे मानवी जीवनाच्या दर्जातल्या सुधारणेची निदर्शक आहे असे सध्या आपण म्हणू शकतो. परंतु जसजशी लोकसंख्या वाढेल तसतसे या निर्देशकांमधली सुधारणा खरोखर मानवी आयुष्याच्या दर्जातली सुधारणा असेलच असे नाही. (वर दिलेल्या दुव्यात विवेचन केलेला आत्महत्यांचा प्रश्न बहुतेकांना रोचक वाटेल. )
ज्याप्रमाणे बहुतेकवेळा शेअरमार्केटच्या निर्देशांकाचा अर्थव्यवस्थेच्या स्थितीशी संबंध असेलच असे नाही त्याचप्रमाणे हे संख्याशास्त्रीय निर्देशांक वस्तुस्थितीचे यथार्थ प्रकटन करतीलच असे नाही. म्हणूनच तंत्रज्ञानातली घोडदौड आणि तिचा पर्यावरण व मानवी जीवनावर होणारा परिणाम यांचा उहापोह करण्याआधी या निर्देशकांचा समाचार घेणे आवश्यक आहे असे मला वाटते.
Thursday, December 30, 2010
कागद
पोतं भिंतीला टेकवून ठेवलं आणि भिंतीकडेच तोंड करून तिने गुपचूप पदराआड पाकीट उघडलं. आत दहाच्या चार पाच आणि पन्नासची एक नोट होती. एवढे पैसे पाहून तर ती घबाड मिळाल्यासारखी हरखून गेली. पटकन ते पैसे तिने कनवटीला लावले आणि पाकीट दिलं पोराला खेळायला. तिने समाधानाने एक खोलवर श्वास घेतला. रोज तिला त्रास देणारा गरम बटाटेवड्याचा आणि मिसळीचा वास आज तिने आनंदाने छाती भरून घेतला. कित्येक दिवसांनी तिला आज नुस्त्या वासावर समाधान न मानता प्रत्यक्ष चव चाखायला मिळणार होती आणि तीही पोटभर खाऊन.
ती टपरीजवळ गेली आणि पाच-सहा रुपये खर्चून तिने गरमागरम वडे, पाव आणि मिसळीचा झणझणीत रस्सा घेतला. तिथेच पडलेला कालचा शिळा पेपर तिने उचलला आणि पुनः पोत्याजवळ येऊन बसली. थोडी भिंतीला आणि थोडी कागदाच्या पोत्याला असं थाटात रेलून बसून तिने पेपर खाली अंथरला आणि त्यावर खाद्यपदार्थ ठेवले. तिने मिसळ पावाचा एक घास घेतला आणि डोळे मिटून त्या चवीचा तवंग सर्वांगावर पसरताना पाहत राहिली. तिने डोळे उघडून पाहिलं तेव्हा पोरगं पाकीटात सापडलेल्या लॉटरीच्या तिकीटाशी खेळत होतं. शंभर रुपयांच्या नोटेपेक्षाही मोठं आणि रंगीबेरंगी तिकीट निरखून पाहण्यात ते गुंगून गेलं होतं. तिने त्याला हाक मारली तेव्हा त्याची तंद्री भंगली आणि आई काहीतरी खायला बोलावतेय हे पाहून हातातलं तिकीट टाकून ते आईकडे पळालं. त्याला तिने एक घास भरवला आणि दोघं एकमेकांकडे पाहून समाधानाने हसली. अंथरलेल्या पेपरमध्ये नुकत्याच टाकून दिलेल्या तिकीटाचा नंबर छापून आला आहे हे त्यांच्या गावीही नव्हतं.
Sunday, December 19, 2010
पूल लाईफ
थोड्या वेळाने म्हणजे साधारण चाळीशीच्या आसपास पाण्याचा अंदाज येतो, कुठे कसा प्रवाह आहे ते कळायला लागतं, पाण्याची आणि आपली ओळख झाल्यासारखी वाटते आणि मग कमीत कमी प्रयत्नात आपण सहज पोहू लागतो, पोहण्याची एक मस्त मजा यायला लागते आणि अनंतकाळ असंच पोहत राहावं असं वाटू लागतं. आता पोहोण्याकडे लक्ष न देताही आपण वेगात जात असतो आणि तरीही आजूबाजूला पाहून कोवळे उन, आजूबाजूची झाडं, माणसं यांचं निरीक्षण करू शकतो. पण मग हळू हळू संध्याछाया दाटू लागतात. अंधार पडू लागतो आणि शरीरही दमायला लागतं. पुन्हा पोहण्याची लय चुकू लागते आणि इकडे तिकडे पाहताना मध्येच नाका-तोंडात पाणी जाते. आपल्या आधी आणि बरोबर पूलमध्ये उतरलेले हळू हळू निघून जातात. तरीही हट्टाने आपण काही काळ पोहतच राहतो. पण थोड्यावेळाने अगदीच कंटाळा येतो. मगाशी सुखकारक वाटणारी तंद्री आता कंटाळवाणी वाटू लागते. उन्हं जाउन आता अंधार पडल्याने बाकीचं काही दिसतही नसतं. मग एका क्षणी आपण निर्णय घेतो आणि पूलच्या बाहेर येतो, पूलच्या जगातून निघून जातो.
सो फार सो गुड. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांच्या आयुष्याचं प्रतिबिंब पूलमध्ये सहज मावतं. पण मग विचार येतो की पूल मध्ये पोहणं आयुष्यासारखं आहे हे म्हणणे जेवढे बरोबर आहे तेवढेच आयुष्यच पूल मध्ये पोहोण्यासारखं आहे हे म्हणणे बरोबर नाही का? पद्धतशीरपणे आखलेल्या चाकोऱ्यामधून, ठरलेल्या मार्गांनी, हवे ते आधार घेउन माझं पोहणं चालू असतं. त्यातच काही ठरलेल्या स्पर्धा आणि ठरलेले पाडाव गाठल्याचा ठरलेला आनंद आणि सुखाच्या ठराविक कल्पना. पोहण्याचे सगळे आधार आणि जमा केलेल्या वस्तू प्राणपणाने जपत पोहणं संपेपर्यंत जास्त खोल नसलेल्या पाण्यात येरझाऱ्या घालणे. खुल्या समुद्रात पोहणारे वेगळेच. कधी त्यांना मोती मिळतात तर कधी अकाली जलसमाधी पण जितके पोहतात, धुंदीत पोहतात.
Saturday, December 18, 2010
संचित
पुढे पुढे सरकत जाणारा काळ हेच त्यावर काय ते औषध. एक रीवाईंड न होउ शकणाऱ्या टेप प्रमाणे आयुष्य पुढे सरकत जाते, नवीन अनुभवांची नवीन गाणी वाजतात, नवे चरे, नव्या डागण्या पडतात. जुन्या जखमांवर काळ खपली टाकत जातो. त्या खपल्या प्रयत्नपूर्वक विसरत, पुन्हा निघू न देण्याची काळजी घेत नव्या अनुभवांना सामोरे जाणे ज्याला जमले तो सुखी.
हे शहाणपण ज्या क्षणी येतं त्या क्षणी कर्मयोग सुरु होतो. मग सुख-दु:खाचं काही नवल वाटत नाही आणि जे आहे जसं आहे तसं स्वीकार करायला आपण शिकतो.
दुसऱ्या व्यक्तीकडून प्रेमभावनेची किंवा ठराविक वागणुकीची अपेक्षा हे दु:खाचं दुसरं मूळ. आधी अपेक्षा करायची आणि ती पूर्ण नाही झाली की होणारं अपेक्षाभंगाचं दु:ख मोठंच, पण मनुष्यस्वभाव इतका विचित्र असतो की एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षा काहीच नसल्या तरी आपल्या भावना त्या व्यक्तीपर्यंत पोचवायची धडपड चालूच असते. भले त्या व्यक्तीला त्या भावना आवडो न आवडो. पण भावना व्यक्त न करताच दाबून टाकणे हा त्यावर उपाय आहे का? नाही. आहेत त्या भावना व्यक्त करणे हे तर सजीवांचे मुख्य लक्षण आहे. भावना व्यक्त केल्याच पाहिजेत पण त्या भावनांना अनुकूल प्रतिक्रिया आली नाही तर ते सहन करण्याचे सामर्थ्य पाहिजे. किंबहुना अनुकूल प्रतिक्रिया येणार नाही हे गृहीत धरूनच आपल्या भावना योग्य पद्धतीने व्यक्त करणे हे ही कुठल्या योगापेक्षा कमी नाही. आपण आपल्या भावनांचा सन्मान राखावा. दुसरे आपल्या भावनांची किंमत त्यांच्या आकलनाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे आणि गरजेप्रमाणे करतच असतात.