Monday, July 11, 2016

Freedom For Sale

काल माजी न्यायमूर्ती श्री. मार्कण्डेय काट्जूंनी त्यांच्या फेसबुकवरच्या पोस्टमध्ये असा सवाल केला की काश्मीरला स्वातंत्र्य मिळाल्याने काश्मिरींचे राहणीमान उंचावणार आहे का? "स्वातंत्र्य हे साध्य नसून साधन आहे आणि भौतिक प्रगती होणार नसेल तर स्वातंत्र्याला काहीही किंमत नाही" असे ते म्हणाले. त्यावरून मला जॉन काम्प्फनरांच्या "Freedom For Sale" या पुस्तकाची आठवण झाली. काम्प्फनर यांनी त्यांच्या मते सिंगापूरसारखी नियंत्रित किंवा भूल दिलेली लोकशाही जगभरात पसरत चालली असल्याच्या ट्रेंडचा मागोवा घेतला आहे. मुळात काम्प्फनरांना आपण काहीतरी सनसनाटी गोष्ट दाखवून देतोय आणि कितीही सुबत्तेचा स्वातंत्र्यासाठी लोक पूर्वी त्याग करत असा भ्रम झाला आहे. मजबूत चलन, भरपूर पैसा, लॅव्हिश घरं, मोठाल्या गाड्या आणि जगभर प्रवासाची मोकळीक एवढं असल्यावर कोण उगीच हौस म्हणून सरकारला नावं ठेवेल किंवा हवं ते बोलायचं स्वातंत्र्य नसेल तरी काय फरक पडतो?
मुळात माणसाला हवं काय असतं? चांगलंचुंगलं खायला, ल्यायला असलं, घरादाराची सोय असली, पोराबाळांच्या भविष्याची खात्री असली आणि हे सगळं स्वकर्तृत्वाने झालंय याचं समाधान असलं की झालं. बाकीच्या गोष्टींची उठाठेव कशाला? आपण आपलं स्वत:वर लक्ष केंद्रित करावं. आज काय खाल्लं, काय पाहिलं, काय वाचलं, कोणत्या गाडीत बसलो, कोणत्या रिसॉर्टला गेलो वगैरे सुखोपभोगाच्या अगणित गोष्टी असतात बोलायला. झालंच तर मुलाबाळांचं कौतुक, त्यांचे पराक्रम इत्यादी गोष्टी असतातच सांगायला. फालतू स्वातंत्र्याच्या कुचकामी कल्पना धरून फुकट वैचारिकतेचा आव आणण्यात काय हशील?
आपल्यापेक्षा जास्त महत्त्वाकांक्षी व बुद्धिमान लोक सरकार आणि मोठमोठ्या कंपन्या चालवतात. तेही त्यांच्या सुखासाठीच ना? त्यांना का संसार नाहीत? त्यांना का मुलंबाळं नाहीत? शिवाय ते आपलीही काळजी घेत असतील तर फुकट झंझट कशाला? दुसऱ्या कोणावर अन्याय होत असेल तर त्यांचं ते बघून घेतील. तसंही हे जग म्हणजे फ्री-मार्केट आहे. जे हुशार ते जिंकणार. त्यामुळे आपण बरे आणि आपले आयुष्य बरे. शिवाय थोडीफार चॅरिटी करायची सोयही आहेच ना!
हे बहुतेक सगळ्या स्मार्ट लोकांना चांगलं कळतं. त्यामुळे ते वादग्रस्त विषयांच्या वाऱ्यालाही उभे राहत नाहीत. धर्म, राजकारण, सेक्स व आजकाल अर्थकारण हे विषय सार्वजनिकच काय, खाजगी जीवनातूनही शक्यतो हद्दपार केलेले बरे हे बहुतेकांना उमगतं. काम्प्फनरसारख्या लोकांना मात्र याचं उगाचच आश्चर्य वाटतं. 
आता भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचंच घ्या. उगीच मूठभर क्रांतीकारक सोडले तर बहुसंख्य लोकांनी घरंदारं सोडण्याचा प्रकार केला नाही. अगदी सावरकर, भगतसिंगांच्या विचारांनी प्रभावित झालेले लोकही आपल्या प्रेरणास्रोतांना दुहेरी जन्मठेप वा फाशी झाली म्हणून पेटून उठले नाहीत की आपल्या नेत्यासाठी प्राणांचा त्याग केला नाही. उलट त्यांचेच वंशज आज स्वखुशीने परदेशात जाऊन उगाच तोंडदेखलं "ने मजसी ने" वगैरे बळंच कारुण्य आणून म्हणतात. ह्याउलट गांधीजींनी लोकांना बरोबर ओळखलं; म्हणून त्यांना प्रचंड जनाधार मिळाला. फारसं काही न करताही "स्वातंत्र्यसंग्रामात" भाग घ्यायचं समाधान व पुढे आजीवन पेन्शन लोकांना त्यांनी मिळवून दिलं. गांधी सावरकर, भगतसिंगांना "वाट चुकलेले देशभक्त" का म्हणाले आणि ते किती बरोबर आहे ते सूज्ञांना माहितच असते. 
आजकाल कंपन्या म्हणे नोकरी देण्याआधी तुमच्या लिंक्डइन किंवा फेसबुक प्रोफाईलचा धांडोळा घेतात म्हणे; त्यामुळे कॉर्पोरेट कल्चर किंवा कॉर्पोरेशन्स बद्दल काहीही वावगं फार कोणी लिहीत नाही. एवढंच काय साधं निराशावादी किंवा किंचितसंही निगेटिव्ह वाटेल असंसुद्धा फार कोणी लिहित नाही. दुसऱ्याने लिहीलं तर दुर्लक्ष करतात. प्रतिवाद करण्यापुरताही संबंध येऊ देत नाहीत. शेवटी कर्तृत्व आपले असले तरी आपली सगळी मौजमजा, शोशाईन, गाडीबंगला वगैरे सगळं कॉर्पोरेट व सरकारी ओव्हरलॉर्ड लोकांच्या हातात आहे हे आपल्याला माहित असतं. 

No comments:

Post a Comment