Sunday, December 3, 2023

आम्ही

दुबईत हवामान बदलाची परिषद झाली. तिकडे हजेरी लावायला बरेच लोक खाजगी जेट विमानाने गेले असतील. अपेक्षेप्रमाणे २०२३ हे ज्ञात इतिहासातील सगळ्यात उष्ण वर्ष जाहीर केले गेले.
सॅन फ्रान्सिस्कोला असताना ऑफिसमध्ये लंचटाईममध्ये मी जेवत बसलेलो असताना दुसऱ्या टेबलवर बसलेल्या दोघातिघांचं बोलणं माझ्या कानावर पडत होतं. त्यातला एकजण दुसऱ्याला सांगत होता की बऱ्याच लोकांना मिलियन आणि बिलियनमध्ये किती मोठा फरक आहे ते नीटसं माहित नसतं. तो फरक समजावण्यासाठी तो पुढं म्हणाला की एक मिलियन सेकंद मोजायचे ठरले तर त्याला साधारण १२ दिवस लागतील; पण एक बिलियन सेकंद मोजायचे ठरले तर त्याला ३१ वर्षांपेक्षा जास्त काळ लागेल.
ते ऐकताना माझ्या मनात विचार आला की समजावून सांगणारा आणि ऐकणारा दोघेही उच्चशिक्षित आहेत तर मग त्या ऐकणाऱ्याला हे माहित नसेल का? अनेक शिकलेल्या लोकांनाही हे माहित नसेल का?  आणि समजा आपण एका सेकंदाला एक बॅरल ऑईल जाळायचं  ठरवलं तर या दराने एक अब्ज बॅरल्स जाळायला ३१ वर्षे लागतील; पण प्रत्यक्षात मात्र एक अब्ज ऑईल बॅरल्स या जगात १ मिलियन सेकंदांपेक्षा कमी वेळात म्हणजे १२ दिवसांच्या आत जाळली जातात हे किती लोकांना माहित असेल? गेली कित्येक वर्षे सतत दर १०-१२ दिवसांत १ अब्ज बॅरल्स ऑईल जाळले जाते ही अद्भुत गोष्ट किती लोकांना माहित असेल?
मग लक्षात आलं की बहुतेक उच्चशिक्षितांना हे माहित असणारच. शिवाय फक्त एवढंच आपण जाळत नाही, हे ही माहित असणार. ह्याचा काहीतरी परिणाम होणार, हे ही या सगळ्या उच्चशिक्षितांना माहित असणार. त्यामुळेच दरवर्षी तापमानाचे रेकॉर्ड्स मोडले जातात तरी कोणालाच आश्चर्य वाटत नाही. 
दुसरीकडे इतर स्रोतांची टंचाई जाणवायला लागेल असे क्लब ऑफ रोमने भाकित केले होते. तशी ती जाणवायला लागली असेल तरी त्याबद्दलही कोणीच काही उघड बोलत नाही. 
का? 
मी ज्या वर्गात मोडतो (जगातले वरचे ५-१०%) त्यातल्या लोकांकडे पाहिलं, तर मला एकमेकांत rat race करणारे लोक दिसतात. दुसऱ्याकडे कार आहे की नाही, आणि कोणती आहे यावरून judge करणारे, अनावश्यक पर्यटन करून फेसबुकवर मिरवणारे, पैसा पडून आहे आहे म्हणून अनेकानेक घरं घेणारे, दर काही वर्षांनी कार अपग्रेड करणारे, जुन्या कारला मिठ्या मारून रडणारे, आपला मुलगा आपल्यापेक्षा जास्त पैसा कमवणार म्हणून सिंहगर्जना ठोकणारे लोक मला दिसतात. कामाच्या ठिकाणी ज्या लोकांचे नितंबचुंबन आम्ही लोक करतो ते लोक तर आमच्यापेक्षाही वाईट आहेत. जसजसं या उतरंडीत वर जाऊ तसतसं अहंगंडांनी ग्रस्त असलेले, आत्यंतिक यशस्वी, आणि आत्यंतिक आक्रमक लोक दिसायला लागतात.
कदाचित आम्हा सगळ्या लोकांना माहित आहे की कितीही टोकाची आपत्ती आली तरी आमचा किंवा आमच्या संततीचा नंबर सगळ्यात शेवटी लागणार आहे. आमच्याआधी पिळले, छळले, मारले जाणारे अब्जावधी लोक असणार आहेत. कदाचित आमच्यापर्यंत काही झळ पोचणारच नाही. खालच्या ५-१०% किंवा अगदी २५% लोकांचा अक्षरशः उपासमारीने बळी गेला, तरी आम्हाला काय फरक पडणार आहे? उलट मोकळ्या झालेल्या झोपडपट्ट्यांच्या जमिनी वापरायला मिळतील. कोणतेही अनुकूल narrative तयार करणारे लोक कोण आहेत? आम्हीच आहोत. रिपोर्ट्स आणि statistics तयार करणारे लोक कोण आहेत? आम्हीच आहोत. जगाच्या पाठीवरून २५% लोक नष्ट झाले तरी त्याला positive spin देणे किंवा पूर्णतः दुर्लक्षित करणे काही अवघड जाणार नाही.
बरेचसे लोक तर हवामान बदल नावाचा प्रकारच नाकारतात आणि निवांत राहतात. बाकीचे नाकारत नाहीत; पण निवांत राहतात. 
कारण, आमच्या उपभोगाचे परिणाम भलत्याच लोकांना भोगावे लागणार आहेत, आणि त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत या उतरंडीत ते आमच्यासाठी राबत राहतील. त्यासाठी “बलवानांनी जगावे व दुर्बळांमी मरावे हे नैसर्गिकच आहे” असे तत्त्वज्ञान तयार करणारेही आम्हीच. “काय करणार सीस्टिमच अशी आहे” असे म्हणणारे आणि ती सीस्टिम तयार करून टिकवणारेही आम्हीच. त्यातही या लोकांना द्राक्षासारखं पिळून काढायला, "जन्मतःच आम्ही श्रेष्ठ" असं म्हणणारे आमच्यातले वर्चस्ववादी आधीच activate झाले आहेत आणि आम्ही त्यांना मूक साथ देत राहू. खाली दिलेल्या कवितेसारख्या कविता आमच्यावर लिहिण्याशिवाय हे खालचे लोक दुसरं काहीही करू शकणार नाहीयेत.


You're like a scorpion, my brother, 
you live in cowardly darkness 
like a scorpion. 
You're like a sparrow, my brother, 
always in a sparrow's flutter. 
You're like a clam, my brother, 
closed like a clam, content, 
And you're frightening, my brother, 
like the mouth of an extinct volcano. 

Not one, 
not five-- 
unfortunately, you number millions. 
You're like a sheep, my brother: 
when the cloaked drover raises his stick, 
you quickly join the flock 
and run, almost proudly, to the slaughterhouse. 
I mean, you're the strangest creature on earth-- 
even stranger than the fish 
that couldn't see the ocean for the water. 
And the oppression in this world 
is thanks to you. 
And if we're hungry, tired, covered with blood, 
and still being crushed like grapes for our wine, 
the fault is yours-- 
I can hardly bring myself to say it, 
but most of the fault, my dear brother, is yours.

by Nazim Hikmet

Trans. by Randy Blasing and Mutlu Konuk (1993)