Tuesday, August 1, 2023

बनचुकने का

ते काय आहे, की माणसाने पुस्तकी गोष्टी जास्त मनावर घेऊ नयेत. म्हणजे उत्तमतेचा ध्यास वगैरे. काही तरी करायचं म्हणजे ते अप्रतिम असलं पाहिजे, मनातल्या अस्वस्थतेचं, आजूबाजूच्या परिस्थितीचं, वर्तमान-भूत-भविष्याचं किंवा मानवी भावभावनांचं त्यात यथायोग्य प्रतिबिंब पडलेलं असलं पाहिजे, झडझडून टाकील असा (हिंदीत झंझोड के रखने वाला) किंवा निखळ-बिखळ असा काही तरी अनुभव प्रभावीपणे व्यक्त झाला पाहिजे वगैरे असल्या विचारांची जळमटं डोक्यात भरून आपण आपल्याच अभिव्यक्तीवर निहलानींपेक्षा अवाजवी आणि अनावश्यक सेन्सॉरशिप लावून घेतो. आजूबाजूला पैशाला पासरीभर लेखक, कवी, नट, दिग्दर्शक, चित्रपटकार असले म्हणून त्यांच्यापेक्षा वेगळं आणि हटके केलंच पाहिजे असं काही नाही. उत्तम वगैरे तर काही संबंधच नाही. उत्तम दर्जा हा पूर्णतः सापेक्षी प्रकार आहे. कोणत्या कंपूसमोर सादर करतो त्यावर त्याचं यश ठरतं. बरं आजकाल शंभर टाळक्यांनी पाहिलं आणि त्यातल्या पन्नास लोकांनी टाळ्या वाजवल्या तरी लगेच यशस्वी झालं म्हणायची सोय आहे. एका "संस्कृतीसंवर्धन" करणार्‍या संस्थेत नुकताच एक एकांकिका पाहायचा योग आला. एकांकिका म्हणजे खो-खो किंवा बास्केटबॉलची मॅच आहे असा माहोल कलाकारांच्या कुटुंबीयांनी तयार करून प्रत्येक प्रवेशाच्या शेवटी जी काही टाळ्यांची लड लावून दिली की बस. कोण्या मराठी न समजणार्‍या माणसाला आणून तिथं बसवलं असतं तर त्याला वाटलं असतं की काही तरी ऑल-टाईम क्लासिक कलाकृती पाहतोय. असं आयपीएल लेव्हलला सगळं आलं की मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करणार्‍या, सतत मार्केट, ग्रोथ, व्हिजिबिलिटी वगैरे बोलणार्‍या लोकांना ते ओळखीचं आणि नैसर्गिकच वाटतं. नाटक किया है तो मार्केटिंग, लॉबीईंग भी तो करना पडेगाइच ना. शिवाय अशा "संस्कृतीसंवर्धक" संस्थांच्या पदाधिकार्‍यांना "करून दाखवलं" यातच आणि मिळालेल्या चतकोर पॉवरचा तुकडा चघळण्यातच रस, त्यामुळे वैचारिक सोडता बाकी सगळंच चालून जातं. संस्कृतीसंवर्धन झालं पाहिजे. कोणती संस्कृती ते विचारायचं नाही. संस्कृती ही अशी प्रवाही असते, बरं!  

त्या आधी एका नाटकाचं (अ‍ॅक्चुअली लघुनाट्याचं किंवा स्फुटनाट्याचं म्हणा. किंवा नाटुकलीचं म्हणा अगदीच "हे" असाल तर) रेकॉर्डिंग पाहायला मिळालं. म्हणजे हे स्फुटनाट्य पूर्वी चांगलं तिकीट-बिकीट लावून स्टेजवर वगैरे केलेलं एका स्फुटनाट्यमालिकेचा भाग म्हणून. नशिब माझं मी तिकीट-बिकीट काढून पाहायला गेलो नाही. दहा मिनिटाच्या या स्फुटनाट्यात नाटककाराने भारतीय (बहुतेक एनाराय) भविष्यातली विज्ञानकथा साकारलेली. ज्याच्याकडे मुलं लक्ष देत नाहीयेत असा म्हातारा बाप आणि त्याला सांभाळायला ठेवलेली यंत्रबाई. म्हातारा पोरांना बघायला आसुसलेला आणि एकटेपणाने कावलेला. सणासुदीला की वाढदिवसालाही पोरगा येत नाही वगैरे असं काही तरी होतं आणि म्हातारा भयंकर चिडतो. चिडलेल्या अवस्थेतच यंत्रबाई काय करू विचारते तर हा कावून म्हणतो, "जीव घे माझा!". झालं यंत्रबाई लगेच "आर यू शुअर" वगैरे न विचारता त्याला मारून मोकळी!! मी हतबुद्ध झालो. म्हटलं, अरे, चौथी-पाचवीतल्या वयात विज्ञानकथा वाचायचो तेव्हापासून असिमॉव्ह चे तीन नियम वगैरे आम्हाला माहित आहेत रे! पण प्रेक्षकांमधल्या एकानेही आक्षेप घेतला नाही की हुर्यो उडवली नाही. एकदम सेफ गेम. आणि हा नाटककार बंगालीबाबा त्याच्या वर्तुळात "दा" वगैरे बरं का! काय मस्त रिझर्वेशन आहे बघा! ह्या लोकांचा कंपू असतो वाहवा करायला आणि फक्त तेच महत्त्वाचं. त्यामुळे उत्तमतेचा ध्यास वगैरेपेक्षा आपला कंपू आड्यन्स शोधा आणि त्यांच्यासाठी त्यांना पाहिजे ते करा, टाळ्यांची हौस असेल तर. नसेल तर स्वान्तसुखाय वगैरे आहेच.  

त्याही आधी एकदा काही ओळखीच्या लोकांबरोबर दारू पीत बसलो असताना एकाने कोणातरी नटाची संघर्षपूर्ण जीवनकहाणी सांगितली. ती ऐकताना मला वाटलं की किती अनुभवसंपन्न आयुष्य असेल त्याचं. ज्याबद्दल लिहावं अशा शेकडो घटना घडल्या असतील त्याच्या आयुष्यात. आणि माझ्या सुखवस्तु, सेफ, नोकरदार आयुष्यात अशा फार काही घटना घडत नाहीत आणि अशा अनुभवांअभावी काही सॉल्लिड असं लिहिता येत नाही. आपलं भावविश्व किती संकुचित आहे असं जाणवून, "काय करतोय यार आपण" असं मी म्हणून गेलो. लगेचच एक जण म्हणाला, "स्पीक फॉर युवरसेल्फ" आणि मी चमकलोच. म्हणजे हा काय मास्टरपीस वगैरे करून मोकळा झाला आहे का काय असं वाटलं मला. आणि न्यूनगंडच आला एकदम आणि अपमानितही वाटलं. नाही, म्हणजे मी ही "संस्कृतीसंवर्धन" संस्थेत हौस म्हणून नट वगैरे व्हायचा वगैरे प्रयत्न केला होता. तिथेच एक-दोनदा सूत्रसंचालन करणे किंवा निवेदन लिहून देणे किंवा एक-दोन मराठी स्टँड-अप करणे, कथा लिहीणे वगैरे असे प्रकार केले; पण म्हणून आपण फार भारी करतोय काही असं काय वाटलं नाही कधीच. किंवा नेटवर्किंग करून इकडे तिकडे शिरकाव करून घ्यावा आणि काहीबाही करावे असं केलं असतं तरी काही तरी लै भारी करतोय असं वाटायला आयुष्य गेलं असतं बहुतेक. पण नीट विचार केल्यावर आत्ता कुठं कळालं की अ‍ॅबसोल्यूट भारी असं काय नसतंच. सगळा मार्केटिंग आणि लॉबीईंगचा खेळ आहे. कानेटकर महान नाटककार आणि चारुता सागर वगैरे नावं फार कोणाला माहितही नाहीत असंच जग असतं. शिवाय क्वालिटी वगैरे टेन्शन नाय घ्यायचं; केलं हे महत्त्वाचं, काय केलं ते नाही. त्या एकांकिकेतल्या कलाकारांनी किंवा त्या विज्ञानकथाकाराने केलं आणि ते आता दिग्दर्शक, कलाकार वगैरे झाले. बनचुके. 

मध्यंतरी एका फिल्मसाठी लिहून दिलेल्या हिंदी गाण्याला चाल लावताना त्यातले "जो, वो, ये" वगैरे शब्द संगीतकाराने काढले / हलवले आणि तसं करताना शेवटच्या कडव्यातला महत्त्वाचा शब्द मात्र चुकवून ठेवला. तरीही कोणालाही पत्ता लागला नाही किंवा असं वाटलं नाही की हा शब्द असा असता तर जास्त छान वाटलं असतं. ओळखीच्या लोकांनी कौतुक केलं. संगीतकार मात्र स्वतः ज्याची वाट लावली त्या गाण्याचा गीतकार म्हणून स्वतःचंही नाव घुसडून गाणं स्पॉटिफायवर टाकून मोकळा झाला.    

म्हणून म्हणतो उगीच स्वतःचं दर्जा नियंत्रण वगैरे करत बसायचं नाही. ज्यादा सोचने का नही. बनचुकने का!