Saturday, December 18, 2010

संचित

आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडतात ज्यांचा आपल्याला नंतर खूप त्रास होतो. रुखरुख लागून राहते. बऱ्याचशा घटना आपोआप घडतात, बऱ्याच गोष्टी आपण चुकीच्या समजुतीने करतो, बऱ्याच गोष्टी करायच्या राहून जातात, बऱ्याच गोष्टींचं महत्व वेळीच कळत नाही किंवा बऱ्याच गोष्टींचा आपण अट्टाहास करतो. या घटनांच्या तीव्रतेप्रमाणे त्या त्या प्रमाणात मनावर डागण्या पडत जातात. या डागण्या, हे चटके हेच आयुष्याचं संचित. या डागण्या कधीच नाहीश्या होत नाहीत, त्या कधी बऱ्याही होत नाहीत. त्या बऱ्या करण्यासाठी धडपडूही नये. त्या बऱ्या करायला म्हणून आपण काही करू गेलो तर जखम आणखी ताजी तर होतेच वर नव्या डागण्या मिळायचीही शक्यता असते.
पुढे पुढे सरकत जाणारा काळ हेच त्यावर काय ते औषध. एक रीवाईंड न होउ शकणाऱ्या टेप प्रमाणे आयुष्य पुढे सरकत जाते, नवीन अनुभवांची नवीन गाणी वाजतात, नवे चरे, नव्या डागण्या पडतात. जुन्या जखमांवर काळ खपली टाकत जातो. त्या खपल्या प्रयत्नपूर्वक विसरत, पुन्हा निघू न देण्याची काळजी घेत नव्या अनुभवांना सामोरे जाणे ज्याला जमले तो सुखी.
हे शहाणपण ज्या क्षणी येतं त्या क्षणी कर्मयोग सुरु होतो. मग सुख-दु:खाचं काही नवल वाटत नाही आणि जे आहे जसं आहे तसं स्वीकार करायला आपण शिकतो.
दुसऱ्या व्यक्तीकडून प्रेमभावनेची किंवा ठराविक वागणुकीची अपेक्षा हे दु:खाचं दुसरं मूळ. आधी अपेक्षा करायची आणि ती पूर्ण नाही झाली की होणारं अपेक्षाभंगाचं दु:ख मोठंच, पण मनुष्यस्वभाव इतका विचित्र असतो की एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षा काहीच नसल्या तरी आपल्या भावना त्या व्यक्तीपर्यंत पोचवायची धडपड चालूच असते. भले त्या व्यक्तीला त्या भावना आवडो न आवडो. पण भावना व्यक्त न करताच दाबून टाकणे हा त्यावर उपाय आहे का? नाही. आहेत त्या भावना व्यक्त करणे हे तर सजीवांचे मुख्य लक्षण आहे. भावना व्यक्त केल्याच पाहिजेत पण त्या भावनांना अनुकूल प्रतिक्रिया आली नाही तर ते सहन करण्याचे सामर्थ्य पाहिजे. किंबहुना अनुकूल प्रतिक्रिया येणार नाही हे गृहीत धरूनच आपल्या भावना योग्य पद्धतीने व्यक्त करणे हे ही कुठल्या योगापेक्षा कमी नाही. आपण आपल्या भावनांचा सन्मान राखावा. दुसरे आपल्या भावनांची किंमत त्यांच्या आकलनाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे आणि गरजेप्रमाणे करतच असतात.

No comments:

Post a Comment