काचेच्या भांड्यातल्या गोल्डफिशसारखा
विहरतो तो स्वच्छंद लिमिटेड अवकाशात
अन् तापलेल्या सूर्याच्या तोंडावर मिटून कवाडं
प्रतिबिंब पाहतो काचेत अॅनिमिक प्रकाशात
बांधलेल्या आखीव मॅग्नेटिक रस्त्यांवर
गुळगुळीत मॅगलेव्हने जाताना भर वेगात
ऑटोपायलटवर टाकलेल्या आयुष्याला
रस्ता सोडून जायचं येतच नाही मनात
क्षणात रंग बदलणार्या बत्तीस बिटी भिंती अन्
आकार बदलत्या नॅनो फर्निचरच्या गराड्यात
कंटाळाच भरून राहिलेला असतो मख्खपणे
त्याच्या वेल इंजिनिअर्ड पिळदार शरीरात
चौघांचं चौकोनी चतुरस्र कायदेशीर कुटुंब
पसरलेलं जगभर ताणून एकेका कोपर्यात
स्वतंत्र, स्वतःचा असतो तो संपूर्णपणे
यंत्रांच्या आधाराने या एकविसाव्या शतकात
दचकून उठतो तो रोज गुडघ्यातलं डोकं काढून
स्वप्नातल्या जंगलाच्या मादक वासाने
अन् डिझायनर लाईफच्या शुभ्र चादरीवरचे
निरर्थकतेचे डाग पाहात बसतो सुन्नपणाने
No comments:
Post a Comment