भूत भविष्य भासच नुसते विश्व नवे क्षणोक्षणी
जमती उठती मैफिली इथे विरती वाऱ्यावरती गाणी
आरंभातच बीज अंताचे गूढ अटळ ही दैववाणी
दुःख क्षणाचे हर्ष क्षणाचा मी तर अळवावरचे पाणी
Monday, July 11, 2016
Freedom For Sale
Monday, June 27, 2016
फुकटे आणि विंचू
बऱ्याच वेळाने प्रेक्षागार गार झाल्यावर एलनबाईंना तोंड उघडायची संधी मिळाली आणि मग पहिल्या प्रश्नाचा उलगडा झाला. आजचा एपिसोड मदर्स-डे-स्पेशल एपिसोड होता म्हणून भावी फादर लोकांनी केलेले उद्योग उरी बाळगणाऱ्या भावी मदर महिलांना आमंत्रित केलं होतं. काय ती कल्पकता! पण यावरून एलनबाईंचे सगळे एपिसोड बायकांसाठीच व बायकांपुढेच असतात हे लक्षात आलं. तरीही उत्सुकतेपोटी मी काही चॅनल बदलला नाही. "Curiosity killed the cat" अशी म्हण का पडली आहे तेही यथावकाश कळलेच.
खरं म्हणजे एपिसोड मदर-डे साठी आहे की फादर-डे साठी आहे ते मला तितकंसं नीट कळलं नव्हतं; कारण पाहुणा म्हणून एका गुळगुळीत दिसणाऱ्या मस्तकेतरकेशहीन अमेरिकन मेट्रोसेक्शुअल माणसाला बोलवलं होतं. हा माणूसही सेलिब्रिटी असावा; कारण तो येताच किंकाळ्या-चित्कारांचा एक माफक रिप्ले झाला. पोटात दुसऱ्या कोणाचातरी पराक्रम मिरवत महिला त्या चिकण्याकडे बघून चेकाळत होत्या.
पाहुण्याने बसून घेतल्यावर त्याच्या बायकोचं व कुटुंबाचं कौतुक सुरू केलं. पार्श्वभूमीवर त्याच्या बायकोचे व त्याच्या मुलीचे एकत्र फोटो दाखवत सेलिब्रिटी ममतेचे हृद्य प्रदर्शन चालू होते. फुल्टू बायकांचा आड्यन्स म्हटल्यावर पाहुण्याने आया-बायांच्या स्तुतीचे मजल्यावर मजले बांधायला सुरूवात केली. आधी स्वत:च्या बायकोला कसं नेहमीच गिफ्ट आवडतं आणि मदर्स-डेचं गिफ्ट मात्र तो कसं स्पेशल आणतो वगैरे फेकाफेक केल्यावर आणि त्याला प्रेक्षक महिलांचा माफक टाळ्या-चित्कारांचा प्रतिसाद मिळाल्यावर त्याची मुळातच क्षुल्लक असलेली भीड चेपली. मग पुढ्यात बसलेल्या शेकडाभर गर्भधारी भामांना खूश करण्यासाठी गड्याची गाडी गरोदरपणाकडे वळली. पोटात नऊ महिने गर्भ बाळगणे हा अतिशय अचाट असा पराक्रम असून फक्त स्त्रियांनाच ते शक्य आहे आणि कोणताही पुरूष नऊ महिने असा गर्भ पोटात बाळगू शकणार नाही असे माहितीपूर्ण व सखोल अभ्यासाअंती तयार केलेले मत त्याने गुलजारपणे त्या बायांच्यापुढे टाकले आणि प्रचंड टाळ्या-चित्कारांच्या गजरात बायांनी ते उचलून उड्या मारायला सुरूवात केली. "पुरुष असे पोटात गर्भ धारण करत असते तर त्यांना स्त्री नसते का म्हटले? आणि जे करायला ज्या अवयवांची निर्मिती झाली आहे, ते त्या अवयवांनी केले तरी त्याला अचाट पराक्रम म्हणायचा येडचॅपपणा करायचा असेल तर करा; पण ज्यांना तो अवयवच नाही त्या पुरुषांना कशाला कमी समजले पाहिजे? की अमेरिकेत सेक्स करताना पुरुषाचं वीर्य बाईच्या गर्भात जाणार की बाईचं अंडं पुरुषाच्या गर्भात जाणार असे पर्याय उपलब्ध आहेत; आणि तरी पुरूष घाबरून स्त्रीलाच गरोदर व्हायला भाग पाडतात असं काही आहे?" अशा अर्थाचे विचार त्याचं मत ऐकून कोणाच्या मनात येण्याची किंचितशी शक्यता आहे असे मला वाटून गेले; पण पटकन मी माझ्या मनाला आवर घालून असंवेदनशील पुरुष होण्यापासून स्वत:ला वाचवले. पुरुष असंवेदनशील, स्त्रियांपेक्षा कमी भावनाशील व प्रसंगी भावनाशून्य, गबाळे, बालिश वगैरे असतात व स्त्रियांपेक्षा बहुतेक सर्व बाबतीत कमी असतात हे मान्य असणे ही आता सभ्य पुरूष म्हणून गणले जाण्याची प्रमुख अट बनत चालली असल्याने व मलाही सभ्य पुरुष म्हणवून घ्यायची हौस असल्याने मीसुद्धा सराव म्हणून टाळ्या वाजवून त्या नरकेशारिचे कौतुक केले व चित्कारण्याचाही प्रयत्न केला; पण कुत्र्याच्या रडण्यासारखा आवाज घशातून येऊ लागल्याने तो प्रकार आवरता घेतला आणि पुढचा कार्यक्रम पाहू लागलो.
स्वत:च्या बायकोचे व जनरल सगळ्या स्त्रियांचे आमुखछिन्दन कौतुक करून झाल्यावर तो नरनोत्कच व एलनबाई अखेर उठले व तिथेच ठेवलेल्या तीन मोठाल्या खोक्यांकडे गेले. त्या खोक्यात असलेली उत्पादने प्रेक्षकवर्गाला फुकट मिळणार आहेत असे सांगून दोघांनी मिळून एकेका खोक्यातून एकेक वस्तू काढून दाखवायला सुरुवात केली. पहिल्या खोक्यातून आपल्या बाळाला जाऊ तिथे सुरक्षित व स्वत:च्या ताब्यात बंदिस्त ठेवण्यासाठी पोर्टेबल, फायबर प्लॅस्टिकचा व नायलॉनची जाळी असलेला हौदा कम पिंजरा निघाला. त्याच्या मध्यबिंदूला असलेल्या कडीला धरून उचलला की तो आपोआप फोल्ड होतो हे त्या चिकण्याने प्रात्यक्षिकासह दाखवले. बायकांनी चित्कारायला सुरुवात केली होती. दुसऱ्या खोक्यातून मामारू नावाची एक आपोआप झोळीसारखी हलणारी, आईस्क्रीमच्या कपासारखी दिसणारी लहान बाळांसाठीची एक खुर्ची निघाली. आपल्या स्मार्टफोनवरून हवा तितका झोका कमी-जास्त करता येतो हे सांगून मुलं सांभाळताना फोन हातातून खाली ठेवायची गरज नाही हे त्या गुलछबू पाहुण्याने दाखवून देताच चित्कारांचा आवाज दुपटीने वाढला. तिसऱ्या खोक्यातून कोणत्यातरी रिसॉर्टने प्रायोजित केलेले अमुक दिवस तमुक रात्रींचे प्याकेज निघाल्यावर, कार्यक्रमाच्या सुरुवातीचा कल्ला म्हणजे कुजबुज वाटावी इतका कल्लोळ झाला. मला टीव्हीचा आवाज कमी करावा लागला. काही महिला आता हाताने पटापट-पटापट टाळ्या वाजवताना दिसत होत्या, काही जागीच थयथयाट केल्यासारख्या नाचू लागल्या होत्या, काही आपल्या शेजारणींना मिठ्या मारत होत्या, काही पोटच्या गोळ्यासकट उड्या मारत होत्या, काही आफ्टरशेव्ह लोशन लावल्यासारखं दोन्ही गाल हातांच्या तळव्यांमध्ये धरून किंचाळत होत्या आणि काहींना भावना अनावर होऊन त्या आपले आनंदाश्रू पापण्यांचा मस्कारा खराब होऊ न देता टिपत होत्या.
फुकट काही मिळाल्याचा आनंद होणे आजकाल स्वाभाविकच आहे. एलनबाईंच्या लोकप्रियतेचे कारण अगदी नीट कळले. कोणाला काहीतरी फुकटात देऊन स्वत:ची लोकप्रियता वाढवणे हा साधा सरळ उद्योग त्या करतात. त्या वस्तूंची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना धंदा वाढवायचा असतो म्हणून जाहिरातीसाठी ते अशा शेकड्याने वस्तू फुकट देतात. कंपनीच्या श्रीमंत मालकांना अशा वस्तू वाटल्याने पुढे फायदा होईलच ह्याची खात्री नसते; त्यांना फायदा झाला तरी तो कंपन्यांच्या कष्टाळू कर्मचाऱ्यांपर्यंत झिरपेल ह्याची खात्री नसते; तरीही अशा वस्तू फुकट वाटण्याबद्दल कंपनीचे कर्मचारी ब्रसुद्धा काढत नाहीत. "आमच्या कष्टातून निर्माण झालेल्या वस्तू फुकटात का देता?" असे विचारत नाहीत. सुखवस्तु लोकांच्या क्रयशक्तीतून होऊ शकणाऱ्या आपल्या श्रीमंत मालकाच्या संभाव्य फायद्याचा ते विचार करतात. त्याच मालकाच्या वर्गातल्या दुसऱ्या एखाद्या श्रीमंताने सत्ता मिळवायला, ती चिरकाल टिकवण्यासाठी सामाजिक स्वास्थ्य राखायला, गरीबांच्या मतदानशक्तीचा वापर करून घ्यायला बेकार व बेघरांना निव्वळ जिवंत राहण्याइतकी मदत फुकट केली तरी हेच लोक रेबीड कुत्र्यांसारखे तोंडाला फेस येईपर्यंत भुंकायला लागतात. अशा लोकांकडे पाहिलं की कळतं की नझीम हिकमत "बंधो, तू विंचवासारखा आहेस" हे कोणाला उद्देशून म्हणतो ते.
साला हे असले विचार येतात विनोदी तमाशे पाहताना आणि मग सगळी मजा विद्रट होऊन जाते. विषण्ण मनाने मी टिव्ही बंद करतो.
Sunday, November 8, 2015
मुमुक्षु
सगळ्यात सामसूम न्यूरल पथावरच्या
सगळ्यात शेवटच्या न्यूरल नोडच्या
सगळ्यात शेवटच्या मजल्यावर
मुमुक्षु राहतो.
रेप्टिलियन पाताळ अन् लीम्बिक धरतीवर
अनिर्बंध सत्ता चालते ज्याची आणि
निओकॉर्टेक्समध्ये ज्याचे फिरतात दूत
न्यूरल रस्त्यांवर हवे तसे ट्रॅफिक वळवत
तो त्रैलोक्याधीश डीएनेश्वर.
ईश्वराचे एजंट सतत नजर ठेवतात
पाठलाग करतात केमिकल बंदुका घेऊन
हल्ला करतात अचानक दिसेल तिथे
अतिप्रबळ साम्राज्याचा एकटाच हा शत्रू.
मुमुक्षु. ईश्वरपुत्र सैतान.
डमरू डीएनेश्वर वाजवतो कधी गगनभेदी
दैवी प्रयोजनाची रासायनिक कारंजी उसळतात
डोपॅमाईनचे चषकच्या चषक फेसाळतात
नव्या त्रैलोक्याची कुदळ मारली जाते पुन:पुन्हा
रडतो मुमुक्षु पोटात गुडघे घेऊन
बलवान नव्या मुमुक्षुच्या जन्माची प्रार्थना करतो.
मुमुक्षु. ईश्वरपुत्र सैतान.
कविता
आणि रचतो ते एक-एकावरती
शब्द नव्हेत जणू दगड-गोटेच
रत्न पडलेले कोंदण खोटेच.
हा नको, तो चांगला बसतोय
कमी वापरलेला, धारदार दिसतोय.
शब्दांचे तोलून मापून वजन
चिकाटीने करतो ओळींचे "सृजन".
कवितेचे देतो मग त्यांना नाव
आळवून वाचतो आणून आव.
पण....
तिच्या प्रथमदर्शनाची काळजातली कळ
माझ्या कवितेत काही उमटत नाही
पहिल्या पावसातला मातीचा वास
शब्दांच्या चिमटीत सिमटत नाही.
मला पाहून झुकलेल्या पापणीआडची
शब्दांत रंगत खुणवत नाही
निरोपाच्या क्षणातली कालवाकालव
शब्दांमधून जाणवत नाही.
ऐकणारे वाजवतात माफक टाळ्या
आणि होऊन बसतो मी एकटा उदास
निघालोय मी घेऊन पांगुळगाडा
अन् कविता म्हणजे फार दूरचा प्रवास.
मंत्र
सांगतो. गेल्या रविवारची गोष्ट. सकाळचे नऊ-सव्वानऊ झालेले. मी असा नेहमीप्रमाणे शूचिर्भूत होऊन; माझा मलमलीचा शुभ्र झब्बा-पायजमा घालून अभ्यासिकेत लिहीत बसलो होतो. हो; रविवारी सकाळी नऊ ते अकरा ही माझी लेखनसाधनेची वेळ असते. त्या वेळात व्यत्यय आणलेला मला मुळीच खपत नाही. म्हणजे, इतरवेळीही मी लिहितो; पण ते फुटकळ. वर्तमानपत्रातले लेख म्हणा, सदरं म्हणा किंवा साप्ताहिक-मासिक राशिभविष्य म्हणा. रविवारी मात्र माझं स्वतःचं खास लेखन. आता गेल्या वर्षीच माझं "राशी आणि रत्ने" प्रकाशित झालं. वाचकांच्या नुसत्या उड्या पडल्यात त्यावर! एका वर्षात तीन हजारांची आवृत्ती संपली सुद्धा! आता पाच हजाराची नवी आवृत्ती बाजारात येतेय. प्रकाशक म्हणताहेत अजून लिहा; वाचक म्हणताहेत अजून लिहा; म्हणून आता दुसरं पुस्तक लिहायला घेतलंय "राशी आणि त्यांचे स्वभाव"! मोठा मनोरंजक विषय आहे आणि मी लिहितोयसुद्धा अगदी मन लावून! मला लिहितानाच इतकी मजा येतेय तर वाचकांना किती मजा येईल याची कल्पनाच करवत नाहीय. हे पुस्तक तर आधीच्या पुस्तकापेक्षाही जास्त लोकप्रिय होणार यात मला तरी संशय वाटत नाही. बघा, तुमची प्रत राखून ठेवायची असेल तर सांगा मला; काय?
हां, तर असा मी माझ्या लेखनसमाधीत बुडुन लिहीत बसलो होतो. मेषेच्या दणकेबाज धडकेबद्दल लिहू, की कर्केच्या मुळुमुळु रडूबाईबद्दल लिहू; मिथुनेच्या चतुर फटाकडीबद्दल लिहू, की वृषभेच्या विलासी मदनिकेबद्दल लिहू; वृश्चिकेच्या सणसणीत डंखाबद्दल लिहू, की तुळेच्या संतुलित कलात्मकतेवर लिहू असं मला अगदी झालं होतं. मस्त खुसखुशीत नर्मविनोदी शैलीत एकेक स्वभाववैशिष्ट्य उदाहरणासहित लिहिण्यात मी मश्गुल असताना मुक्ता "बाबा, बाबा" करत अभ्यासिकेत आली. समाधी भंगल्याने साहजिकच मी वैतागलो.
"मुक्ता! तुला मी हजारवेळा सांगितलं असेल की माझ्या लेखनात व्यत्यय आलेला मला चालत नाही म्हणून!", असं मी तिच्यावर करवादलो.
ती म्हणाली,"बाबा, तुम्हाला भेटायला कोणीतरी आजी आल्यात."
मी म्हटलं", तुला मी सांगितलंय ना, की या वेळात कोणी न सांगता-सवरता आलं तर सरळ कटवायचं म्हणून?"
"हो, पण ह्या खूप म्हातार्या आजी आहेत हो.", ती हेका न सोडता म्हणाली.
"म्हातारी असो की तान्हं बाळ, आपण भीड पडू देता कामा नये. किती वेळा सांगायचं? भीड ही भिकेची बहीण आहे. जा. नंतर यायला सांग त्यांना."
"पुढच्या वेळेसपासून मी नक्की सांगेन; पण आजच्या दिवस चला ना बाबा, प्लीज. प्लीज. खूप म्हातार्या आजी आहेत हो त्या." ती माझा हात धरुन ओढायलाच लागली.
माझा मग नाईलाजच झाला. आता नववीतल्या मुलीला बोलून-बोलून तरी किती बोलणार? त्रासिक चेहर्याने मी दिवाणखान्यात येऊन पाहतो तर दिवाणावर माई बसलेली. आमची गल्ली मुख्य पेठेला लागते त्या वळणावर दोन घरं सोडून एक मोठा वाडा आहे. तो माईचा वाडा. दहा-एक हजार चौरस फुटांचा तरी असेल. पण आता सगळा पडून गेलाय आणि पुढचा दरवाजा आणि त्याला लागून असलेल्या एक-दोन खोल्या कशाबशा तगून राहिलेल्या. त्या पडक्या वाड्यात ही एकटी राहायची नव्वद-पंच्याण्णवची म्हातारी. सगळं अंग सुरकुतलेलं, तोंडाचं पूर्ण बोळकं झालेलं, कमरेतून वाकून अंगाचं धनुष्य झालेलं, हातापायाच्या काड्या झालेल्या अन् त्यामुळे अंगावरच्या धुवट पातळाचा आणि चोळीचा बोंगा झालेला, एकेकाळचे घारे डोळे आता पिवळट झालेले आणि डाव्या डोळ्यात पांढरा अपारदर्शक मोतीबिंदू झालेला. अशा या माईला आमच्या दिवाणखान्यात पाहून मला आश्चर्यच वाटले. माझा रोजचा येण्या-जाण्याचा रस्ता तिच्या वाड्यावरून जातो; पण तिला मी कित्येक वर्षांत पाहिले नव्हते. तिला ओळखतील असे आमच्या गल्लीत फारच कमी लोक उरले असतील. इतरवेळी अजिबात बाहेर न दिसणारी ही म्हातारी एकदम घरीच उगवली म्हटल्यावर मी अचंबित होऊन माझा त्रासिकपणा विसरलो.
"काय माई? काय चाललंय? कसं काय येणं केलंत आज?", तिला कमीच ऐकू येत असणार असं गृहीत धरून मी जरा मोठ्यानेच विचारलं.
म्हातारी बोळक्यानेच रुंद हसली; म्हणाली, "माझं म्हातारीचं मेलीचं काय चालणार?", दात नसल्यामुळे बोलताना हवा सुटून तिचे उच्चार गमतीशीर वाटत होते, "आला दिवस ढकलते झालं. सकाळी उठल्यावर आपण अजून जिवंतच आहोत हे कळून आताशा वाईट वाटतं बघ.", असं म्हणून म्हातारी हॅ हॅ हॅ करून हसली. तिच्या आक्रसलेल्या पापण्या आणि थकलेल्या बुबुळांमध्ये थोडासा मिश्कीलपणा चमकून गेला.
"तुझं मात्र कौतुक आहे हो!", म्हातारी पुढे बोलायला लागली,"लोक फार नाव घेतात तुझं. फार मान आहे तुला समाजात. वाडा पाडून दुमजली इमारत बांधलीस, दारात गाडी आणलीस. आजीचे पांग फेडलेस रे बाळा. तुझी आजी आणि मी साधारण एकाच वेळी लग्न होऊन इकडे राहायला आलो. हिच्याएवढीच असेन मी तेव्हा", मुक्ताकडे हात करून ती म्हणाली.
"अहो काय माई मागच्या गोष्टी घेऊन बसलात?", मी उतावळेपाणाने म्हणालो, "आज कशी काय वाट वाकडी केलीत ते सांगा".
"माझं एक काम होतं रे तुझ्याकडं", माई थोड्याशा अजिजीच्या सुरात म्हणाली, "माझी अवस्था तर तू बघतोच आहेस. पिकलं पान कधी गळून पडेल त्याचा भरवसा नाही. पण जीवही सहजासहजी जात नाही बघ. माझा जीव माझ्या शंकरमध्ये अडकलाय रे.", तिचे डोळे एकदम पाण्याने चमचम करु लागले आणि खालचा जबडा काहीवेळ नुसताच वरखाली हालत राहिला.
"चाळीस वर्षे झाली त्याला घर सोडून.", माई खोलवरून कापरा आवाज ओढून आणत म्हणाली. ती पुन्हा भूतकाळात शिरतेय हे पाहून मी सुस्कारा सोडला आणि मुक्ताकडे एक तिरपा कटाक्ष टाकला. मुक्ताचंही तोंड रडवेलं झालं होतं. या बायकांना रडायला काहीही कारण लागत नाही. एक रडायला लागली की लगेच दुसरी तिच्याबरोबर रडायला लागते.
"बरोबर आहे माई;", ती पुढे काय बोलतेय ते न ऐकता मी आवाजाची एक पट्टी वाढवून म्हणालो, " पण त्याचं आता आपण काय करणार?". आता हिचा मुलगा वयाच्या पंचविसाव्या वर्षी नाटक कंपनीच्या नादाने घर सोडून गेला. चाळीस वर्षांत त्याची ना चिठी ना चपाटी. अशा मुलाचं रडगाणं माझ्याकडे गाऊन काय होणार होतं?
"तसं नाही रे.", ती परत अजिजीने म्हणाली, "आता तू एवढा प्रसिद्ध शास्त्री-पंडित झाला आहेस; सगळी शास्त्रं-पुराणं तुला मुखोद्गत आहेत. लोकांसाठी तू काय-काय उपायही करून देतोस. माझे डोळे मिटायच्या आधी शंकरची भेट होईल असा काही उपाय तुझ्याकडे असेल तर बघावा म्हणून मी आले रे बाळा."
आता हे खरं आहे की या क्षेत्रात माझा थोडाफार अभ्यास आहे. त्यात लहानपणापासून पाठांतराची सवय असल्यामुळे माझी स्मरणशक्ती अगदी तल्लख आणि उच्चार अतिशय सुस्पष्ट आहेत. शिवाय बँकेत नोकरी करत असलो तरी आमचा परंपरागत पौरोहित्याचा व्यवसाय मी जपला आहे. ज्योतिषाविद्येचा अभ्यास असल्याने पत्रिका बनवणे, जुळवणे आणि काही दोष असल्यास शांतीहोमादि उपाय सुचवणे व ते व्यवस्थितरित्या पार पाडून देणे वगैरे वगैरे मी करत असतो. त्यामुळे मला लोक मानतात आणि अगदी दूर-दूरहून माझा सल्ला घ्यायला येतात. आता या माईसाठीही धर्मशास्त्रात सांगितलेला एखादा उपाय मी शोधून देऊ शकलो असतो; पण मला त्यात काही राम दिसेना. आधीच म्हातारीच्या सगळ्या गोवर्या स्मशानात गेलेल्या. असा एखादा उपाय शोधायचे कष्ट घ्या; तिला तो समजावून सांगा आणि एवढं करून तो उपाय करणे तिला परवडणार नसेल तर? शिवाय दक्षिणा देण्याइतके द्रव्य तिच्याकडे असणे दुरापस्तच असणार असा मी अंदाज केला. आमचे पिताश्री म्हणायचे की कोणासाठीही काहीही फुकटात करु नये, माणसाला किंमत राहात नाही; म्हणून मी तिला झटकून टाकायला हवं होतं; पण सरळ-सरळ नाही म्हटलं तर म्हातारी उगाच चिवटपणा करेल, रडारड करेल आणि आणखी वेळ खाईल म्हणून मी तिला काहीतरी थातूर-मातूर उपाय सांगायचं ठरवलं.
"माई तुम्हाला वाचता येतं का?", मी तिला विचारलं.
"हो; येतं की. चवथीपर्यंत शिकलेली आहे मी आणि उजव्या डोळ्याने दिसतं मला अजून!", माई उत्साहाने म्हणाली.
मुक्ताला मी कागद-पेन आणायला पाठवलं आणि माईला म्हणालो, "एक उपाय सांगतो तो लक्षपूर्वक ऐका. दिवेलागणीला एक चमचा घ्यायचा आणि मी देईन तो मंत्र अकरावेळा म्हणून तो अभिमंत्रित करायचा. मग तो चमचा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या कोयंड्यात अडकवून द्यायचा. कितीही वर्षे दूर गेलेला माणूस हमखास घरी येतो; काय समजलं?"
"दिवेलागणीला एक चमचा घ्यायचा; अकरावेळा मंत्र म्हणून दाराच्या बाहेरच्या कोयंड्याला अडकवून द्यायचा.", माई थोडक्यात म्हणाली.
"बरोबर", मी म्हणालो. तितक्यात मुक्ता कागद-पेन घेऊन आली. मी कागदावर मनानेच रचून एक मंत्र लिहीला.
यथा उत्क्षिप्तो पाषाणः पुनरायाति पृथिवीम् |
बाष्परुपभूतं तोयं पुनरायाति सागरम् |
यथा भास्वतो भास्करः पुनरायाति उदयाचलम् |
तथा सुदूरं गतो जीवः पुनरायाहि स्वगृहम् ||
|| ॐ शुभं भवतु ||
लिहून झाल्यावर कागद मी माईकडे दिला आणि तिला वाचायला सांगितलं. तिने मंत्र अडखळत-अडखळत वाचला.मी अर्थ सांगितला, "ज्याप्रमाणे वर फेकलेला दगड पुन्हा पृथ्वीकडे येतो; ज्याप्रमाणे वाफ झालेले पाणी शेवटी पुन्हा सागराला येऊन मिळते; ज्याप्रमाणे तेजस्वी असा सूर्य पश्चिमेकडे जाऊन पुन्हा पूर्वेकडे येतो; त्याचप्रमाणे घरापासून खूप दूर गेलेल्या हे जीवा तू स्वगृही परत ये असा त्याचा अर्थ आहे."माईने आनंदाने डोलत मान हलवली व कागदाची घडी दोन्ही हातांच्यामध्ये धरून हात जोडून कपाळाला लावत भक्तिभावाने नमस्कार केला.
"फार उपकार झाले रे बाळा", माई पुन्हा भावनावश होत म्हणाली, "तुझे उपकार तर मी फेडू शकणार नाही; पण दक्षिणा किती द्यायची तेवढं तरी सांग."
"आता तुमच्याकडून काय घ्यायचं माई?", मी हसत म्हणालो, "स्वखुशीने जे द्यायचं ते द्या."
माईने कमरेची चंची काढली आणि त्यातून अकरा रुपये काढून मला दिले. एक खडीसाखरेचा खडा काढून मुक्ताच्या हातावर ठेवला. मुक्ताला काय वाटलं कोण जाणे? तिने वाकून माईला नमस्कार केला.
"चिरंजीव हो.", माई भरल्या गळ्याने म्हणाली आणि मुक्ताच्या दोन्ही गालांवरून हात फिरवून तिने स्वतःच्या कानशीलावर कडाकडा बोटे मोडली.
"मोठी गोड आहे पोरगी!", बोळ्क्याने हसत मान डोलावत ती म्हणाली आणि मग पदराने डोळे पुसत पुसत निघून गेली.
मी पुन्हा अभ्यासिकेकडे वळलो तर मुक्ता म्हणाली, "बाबा तुमचा मंत्र काम करेल ना हो?"
"म्हणजे काय?", मी हसत म्हणालो, "अगदी शंभर टक्के. इथून पुढे मी लिहीत असताना तू कोणाला घरात घेतलं नाहीस तर नक्कीच माझा मंत्र फळेल."
"बाबा! चेष्टा नका ना करू! खरं खरं सांगा तुमचा मंत्र काम करेल ना?", मुक्ता परत रडवेली झाली होती आणि आता कोणत्याही क्षणी गंगा-यमुना वाहायला लागतील असं वाटलं म्हणून मी म्हणालो, "हो गं. नक्की काम करेल. अगं उपनिषदातला मंत्र आहे तो!". मी ठोकून दिलं असलं तरी तिचं समाधान झाल्यासारखं वाटलं. ती तरीही विचारात पडलेली दिसत होती पण किमान रडली तरी नाही.उरलेला रविवार विशेष काही न होता गेला. सोमवारही आला आणि गेला. मंगळवारी सकाळी मात्र तो सगळा गोंधळ झाला. नेहमीप्रमाणे बँकेत जायच्या आधी मुक्ताला शाळेत सोडवायला मी निघालो होतो. वळणावर गाडी वळवली तर माईच्या घरासमोर ही गर्दी. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली, "माईच्या घरासमोर गर्दी कसली?", असं म्हणत गाडी बाजूला थांबवली आणि मुक्ताला गाडीतच बसून राहायला सांगून गर्दीत घुसलो. गर्दीतून रस्ता काढत पुढे आलो आणि पाहिले तर एक पोलिस इन्स्पेक्टर, दोन हवालदार आणि दोन पहारी घेतलेले मजूर उभे.
"काय झालं?", मी शेजारी उभ्या असलेल्या माणसाला विचारलं.
"दरवाजा तोडताहेत", तो म्हणाला, "काल दरवाजा उघडला नाही म्हणून दूधवाला दूधपिशव्या दारात ठेऊन गेला. आज येऊन पाहतो तर मांजराने पिशवी फोडून सगळीकडे दूध सांडलेलं. आजही दार उघडेना म्हटल्यावर सगळ्यांनाच संशय आला म्हणून बोलावलंय पोलिसांना. बहुतेक रविवारी रात्रीच गेली वाटतं म्हातारी."
पहारी घेतलेली माणसं दरवाजाकडे निघाली. तेवढ्यात पोलिस इन्स्पेक्टर पुढे झाला आणि दाराच्या कोयंड्यात अडकवलेला चमचा त्याने काढला. मी परत फिरलो आणि गाडीत येऊन बसलो. गाडीत बसून दोन्ही हात जोडून नमस्कार केला.
"काय झालं बाबा?", मुक्ताने विचारलं.
"गेली बिचारी निजधामाला.", मी म्हणालो.
"निजधामाला?", मुक्ताने विचारलं.
"हो.", मी वरती बोट दाखवून म्हणालो, "देवाच्या घरी."
मुक्ता काचेतून गर्दीकडे आणि माईच्या घराकडे पाहात राहिली. मी चटकन गाडी काढली आणि निघालो. मुक्ता खिडकीच्या काचेतून वराचवेळ बाहेर बघत राहिली. काही वेळाने एकदम वळून तिने विचारलं, "बाबा, देवाच्या घराला निजधाम का म्हणतात?"
"निज म्हणजे कायमचं आणि धाम म्हणजे घर", मी तिला सांगू लागलो. इंग्रजी माध्यमात ती शिकत असल्याने मराठी व संस्कृत शब्दांचा अर्थ मीच तिला सांगत असतो, "अगं, देवाचं घर हेच आपलं कायमचं घर असतं. इथं पृथ्वीवर आपण सगळेच तात्पुरते घरापासून दूर आलेलो असतो. प्रत्येकाला कधी ना कधी आपल्या स्वतःच्या कायमच्या घरी जावंच लागतं".
"तुमच्या मंत्रात तेच म्हटलं होतं ना बाबा?", ती एकदम म्हणाली, "त्यामुळेच माईचा जीव....", आणि अचानक ती हमसून हमसून रडायलाच लागली. माझ्या डोक्यातच नव्हतं ते, यामुळे ती काय बोलतेय तेच मला कळेना. थोड्यावेळाने कळल्यावर मी डोक्यावर हात मारून घेतला. झाऽऽलं. तेव्हापासून ते आतापर्यंत सारखा तोच विचार ती करतीये. मधूनच रडते आणि "सांगा ना बाबा; सांगा ना बाबा"चा धोशा लावला आहे. तिला मी हजारवेळा सांगून झालंय की हे मंत्रा-बिंत्राने काहीही झालेलं नाहीय; ती माई म्हातारी झाली होती आणि कधी ना कधी मरणारच होती ते त्याच दिवशी मेली; तो निव्वळ योगायोग होता; आयुष्य म्हणजे नुसता योगायोग असतो; हे मंत्र-पूजा-पाठ केल्याने नियती बदलत नाही वगैरे परोपरीने सांगून पाहिलं पण ही हेकट पोरगी काही ऐकायलाच तयार नाही. वर "मंत्राचा परिणाम नाही तर तुम्ही लोकांना मंत्र का देता?", असं विचारतीये. आता या मूर्ख मुलीला कसं समजावून सांगू? तुम्हीच सांगून पाहा तिला. तुमचं कदाचित ऐकेल ती.
Sunday, May 17, 2015
संघर्ष
Saturday, February 1, 2014
सोयीस्कर गांधीवाद
-Derrick Jensen (Endgame)
The world has enough for everyone's need, but not enough for everyone's greed
-M.K.Gandhi
The hottest places in hell are reserved for those who, in a time of moral crisis, remain neutral.
-Dante Alighieri
We have met the enemy and he is us.
-Pogo
आम्हाला बापूजींबद्दल अतीव आदर आणि अभिमान आहे. गांधीजींचे विचार आज जगभरात मान्यताप्राप्त झाले आहेत. मोठमोठ्या महासत्तांचे नेते आज त्यांच्या भाषणात गांधीजींचे नाव आदराने घेतात. विश्वशांती आणि अहिंसा म्हटले की पहिले नाव आठवते ते गांधीजींचेच. आम्ही गांधीजींच्या विचारांचे अभ्यासक, पाईक आणि प्रचारक आहोत आणि इतरांनी ते विचार अंगिकारले पाहिजेत असा आमचा आग्रह असतो.
आम्ही - जगातल्या सांपत्तिकदृष्ट्या वरच्या वीस-पंचवीस टक्क्यांतले लोक. आम्ही - त्या वीस-पंचवीस टक्क्यांतल्या वीस-पंचवीस टक्के लोकांसाठी काम करणारे लोक. आम्ही - मालकीहक्काची व त्यातून निर्माण होणार्या उतरंडीची (मराठी: हायरार्कि) प्राणपणाने जपणूक करणारे लोक. आम्ही - जगातल्या ऐंशी टक्के संपत्तीची मालकी बाळगून असणारे लोक. आम्ही - जगातल्या गाड्यांपैकी, इंधनापैकी व स्रोतांपैकी मोठा भाग स्वतःसाठी वाढत्या प्रमाणावर वापरणारे लोक. आम्ही - पर्यावरणावरच्या अनिष्ट परिणामांचा व स्रोतांच्या टंचाईचा अभ्यास करू शकणारे शिकलेले लोक. आम्ही - त्या अभ्यासाच्या अनुमानानुसार योग्य ती धोरणे ठरवू शकणारे लोक. आम्ही - आमच्या उपभोगातून उडालेल्या खरकट्यावर खालच्या लोकांनी जगावं अशी अपेक्षा करणारे लोक. आम्ही - हे सगळं आपण आहोत हेही न कळणारे लोक. आम्ही - ते कळूनही सामूहिकरित्या काहीही करु न शकणारे लोक. आम्ही - कामाच्या ठिकाणी रिसोर्स आणि त्याच्या बाहेर कन्झ्युमर असणारे लोक.
असे आम्ही गांधीजींच्या विचारांचे पाईक असलो तरी त्यातले कोणते विचार पाळायचे आणि कोणते टाळायचे ते आम्हाला आपोआप समजते. उदाहरणार्थ नुकताच लोकसत्तात आलेला हा लेख पाहा. वाढती लोकसंख्या, घटते स्रोत आणि बिघडते पर्यावरण ही संकटत्रयी ढळढळीत समोर दिसत आहे, येत्या दशकभरातच त्याची झळ लागायला सुरुवात होणार आहे हेही कळते आहे. अशा परिस्थितीत आपल्यापुढे काय पर्याय आहेत हेही माहित आहे. ते अंमलात आणण्याचे सगळे मार्ग, साधने आणि वेळ हाताशी आहे. पण काय करणार? ते पर्यायी विचार आम्हाला पटत नाहीत ना! स्वयंपूर्ण खेडे किंवा स्वयंपूर्ण माणूस अशी कल्पनाही आम्हाला अव्यवहार्य वाटते. त्या उलट सगळा बाजार आहे आणि प्रत्येकजण काही ना काही विकत असतो हे तत्त्वज्ञान आम्हाला सहज आणि नैसर्गिक वाटते. जिच्या मांडीवर आम्ही जन्मलो ती आमची इंडस्ट्रियल इकॉनॉमी आम्हाला आमच्या आईपेक्षा जास्त प्रिय आहे आणि ती टिकवण्यासाठी सर्वसमावेशक विकास वगैरे पोपटपंची करायला आमचे गांधीप्रेम आडवे येत नाही, किंबहुना त्याची मदतच होते.
गांधींच्या आम्हाला आवडणार्या विचारांपैकी सगळ्यात प्रमुख विचार म्हणजे अहिंसा! गांधीजींच्या अहिंसेला घाबरून इंग्रज हा देश सोडून पळून गेले असे आम्ही लहान मुलांना व भोळ्या-भाबड्यांना सांगतो. गांधींचे हे विचार दूरदूरच्या कानाकोपर्यांपर्यंत, तिथे राहणार्या आदिवासींपर्यंत पोचतील याची काळजी घेतो. एका गालावर मारली तर दुसरा पुढे करावा हे त्यांनी शिकणे गरजेचे आहे कारण नंतर आम्ही त्यांच्या जमिनींवर धरणे आणि खाणी बांधायला जाणार तेव्हा त्यांनी विरोध न करता उलट दिलेली नुकसानभरपाई घेऊन आनंदाने अत्यंत कमी पगारावर तिथेच नोकरी करण्यात उपकार मानणे आमच्या सर्वसमावेशक विकासासाठी महत्त्वाचे आहे. कोणी त्याला हिंसक विरोध करु लागला की आमचा सात्त्विक संताप होतो आणि आपले अहिंसक सैन्य आपल्या अहिंसक बंदुका घेऊन तिथे पाठवून त्या लोकांना चांगला प्रेमाने धडा शिकवावा असे आम्ही पोटतिडीकीने बोलतो. त्यांची हजारो वर्षे टिकलेली जीवनव्यवस्था बदलून पुढची दोनशे वर्षेतरी टिकेल की नाही याची शाश्वती नसलेली जीवनव्यवस्था त्यांच्यावर लादण्याचे पुण्यकर्म केल्याची त्यांना योग्य ती जाणीव नसल्याच्या भावनेने खंतावतो.
गांधीजींचा दुसरा आवडणारा विचार म्हणजे प्रतिकात्मक कृती. आमच्या इंडस्ट्रियल यंत्रातला आम्ही एक नगण्य भाग असल्याने ठराविक परिघातच फिरण्याचे आमच्यावर बंधन असते त्यामुळे प्रत्यक्षात फरक पडेल असे काही करण्याएवढा आमच्याकडे वेळही नसतो आणि तेवढी शक्तीही नसते. त्यामुळे गांधीजींच्या चरख्यासारखी प्रतिकात्मक कृती आम्हाला अत्यंत सोयीस्कर वाटते. एखाद्या वीकेंडला जाऊन पीडितांच्याबरोबर एखादा दिवस काढणे, त्यांच्या बरोबर गाणी म्हणणे, मेणबत्त्या लावणे, घोषणा देणे इत्यादी प्रकार करून ज्या व्यवस्थेला आम्हीच आधार दिला आहे तिचाच प्रतिकात्मक निषेध करणे त्यामुळे किती सहज जमते.
गांधीजींचा तिसरा आवडणारा विचार म्हणजे अध्यात्मिक बैठक. ही बैठक एकदा जमली की आजूबाजूच्या कोणत्याही प्रकारच्या दुर्घटना माणसाच्या मनाची शांती ढळवू शकत नाहीत. गाडीच्या काचेतून फक्त सुरम्य गोष्टीच दिसण्याची व्यवस्था होते आणि ज्ञानसाधनेतही आपल्याला हवे तेच आणि व्यावहारिकदृष्ट्या फायद्याचेच ज्ञान डोक्यात जायचीही व्यवस्था होते. काही लोक याला ज्ञानियांची तटस्थता म्हणतात काही लोक याला स्वतःची सोबत म्हणतात. काही खवचट लोक याला भावनाशून्यताही म्हणतात. या बैठकीसाठी मग आपल्या परिघातल्या परिघात दुसर्यांना त्रास होतील असे बदल करून आपले माहात्म्य सिद्ध करता येते. म्हणजे उदाहरणार्थ, मी वेगन आहे किंवा मी कांदा-लसूण खात नाही असे जाहीर करून जिकडे जाऊ तिकडच्या लोकांची पंचाईत करून त्यांना न्यूनगंड देता येतो. मी रात्री फक्त फलाहारच घेतो असे म्हणून लाखो लिटर इंधन जाळून, लाखो जीवांच्या जिवावर उठलेल्या रस्त्यावरून आणलेली फळे आनंदाने स्वतःच्या अध्यात्मिक तेजात निथळत मिटक्या मारत खाता येतात.
गांधीजींच्या ब्रह्मचर्य आणि अल्पसंतुष्टता या विचारांना पूर्णपणे दुर्लक्षित करुनही आम्ही पूर्ण गांधीवादी असू शकतो. गांधीवाद सगळा अंमलात आणणे आवश्यक नाही. किंबहुना अंशत:ही अंमलात आणणे आवश्यक नाही. तो अंमलात आणतो असा आव आणला तरी पुरे आहे. खरेतर त्याचीही गरज नाही. गांधी महान होते आणि त्यांचे महान विचार मला पूर्णपणे मान्य आहेत असे फक्त म्हणणे पुरेसे आहे. असा हा सोपा, सैलसर आणि सोयीस्कर असा गांधीवाद आम्हाला अत्यंत प्रिय असणार यात काय संशय?