Saturday, February 10, 2024

लग्न

अंजू रंगारगल्लीच्या कोपर्‍यावरून कार्यालयाकडे जायला वळली, तेव्हा संध्याकाळचे सात वाजले होते. मे महिना असल्यामुळे अजून अंधार पडला नव्हता. त्याच कोपर्‍यावर बाबुरावचे हॉटेल होते. हॉटेलातल्या रेडिओवर नवीनच लोकप्रिय झालेले 'देखा ना हाय रे, सोचा ना हाय रे' हे गाणे वाजत होते. दारातच बसलेला आचारी मोठ्या कढईत बटाटवडे तळत होता. नुकत्याच तळून काढलेल्या वड्यांचा खमंग वास अंजूच्या नाकात शिरला आणि पोटातल्या भुकेची तिला जाणीव झाली. दुपारपासून कार्यालय ते घर आणि घर ते कार्यालय, अशा तिच्या आणि मंजूच्या सतराशेसाठ फेर्‍या झाल्या असतील. दुपारी घरून कार्यालयात येताना सगळ्यांनीच भरपूर सामान पिशव्यांमध्ये भरभरून आणले होते, तरीही सारखे काही ना काही राहिल्याचे लक्षात यायचे, आणि मग अंजूला किंवा मंजूला किंवा दोघींनाही घराकडे पिटाळून ते मागवले जायचे. आताही हळदीची वेळ होत आली, तेव्हा आईच्या लक्षात आले की चोळखणांच्या गठ्ठ्यांपैकी एक गठ्ठा घरीच राहिला आणि अंजूला जावे लागले. पायीच हेलपाटे मारून तिची पाऊले आणि चप्पल धुळीने माखली होती. बहिणीचे लग्न आहे म्हणून नवे कपडे घालावे, मेंदी-बिंदी लावावी, छान नटावे-सजावे या जाणिवेचा टिपूसही तिच्या किंवा तिच्या भावंडांच्या मेंदूत सापडला नसता. आई-बापांनी सांगितलेल्या कामाला नाही म्हणण्याची तेव्हा पद्धत नव्हती आणि तसे म्हटल्यास भयंकर परिणामांना सामोरे जायची वेळ येत असे. शिवाय झटकन मोपेडवर बसून भुर्रकन इकडून तिकडे जाण्याचीही सोय नव्हती. अर्थात घरातल्या कडक शिस्तीखाली चेमटलेल्या अंजू-मंजूच्या साध्या-सरळ मनांना, नाही म्हणण्याचा किंवा वाहनाची सोय करवून घ्यायचा विचार शिवलाही नव्हता. अंजू तर अकरावीत असूनही इतकी बाळबोध होती की दोन-तीन वर्षात तिचीही बोहल्यावर चढायची वेळ येणार आहे हासुद्धा विचार तिच्या डोक्यात आला नाही. गाण्याच्या तालावर चालण्याचा वेग वाढवत अंजू कार्यालयात पोचली. 
ट्रक भरून आलेल्या वर्‍हाडातल्या लोकांचा चहा वगैरे घेऊन झाला होता. कार्यालयात टाकलेल्या मळकट गाद्यांवर बसून, किंवा कार्यालयाबाहेर तीन-तीन चार-चारच्या गटांनी उभे राहून, तंबाखू मळत माणसे निवांत गप्पा छाटत होती. कार्यालयाच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत मोठमोठ्या चुलाण्यांवर, मोठमोठ्या कढयांमध्ये दुर्गाबाई आचारिणीची माणसे निर्विकारपणे अन्न शिजवत होती. नवरीमुलीच्या व नवरामुलाच्या घरचे मात्र तणावाखाली लगबग करत होते. लवकरात लवकर हळद लावणे वगैरे प्रकार आटोपणे गरजेचे होते. आत्ता निवांतपणे गप्पा छाटणारी वर्‍हाडी मंडळी, जेवणाला थोडा जरी उशीर झाला, तरी आयुष्यभर त्याबद्दल काव-काव करणार हे सगळ्यांनाच माहित होते. मुलीच्या आई-वडिलांच्या, म्हणजे जयंतराव-मीराबाईंच्या चेहर्‍यांवर तर खूपच ताण दिसत होता. हातघाईच्या लढाईत शत्रूपक्षाच्या शे-दोनशे भालाईतांनी खिडीत गाठलेल्या मावळ्यांसारखे दोघेही चौफेर लढत होते. आल्याबरोबर अंजूने ते खणांचे पुडके मीराबाईंच्या हातात दिले. त्यांनीही ते कोणतीही प्रतिक्रिया न देता झटकन घेतले व लगबगीने पुढच्या कामाला लागल्या. अंजू मग एका बाजूला तिचे चुलत काका-काकू वगैरे मंडळी ज्या खोलीत होती, तिथे जाऊन उभी राहिली. जयंतराव म्हणजे जमदग्नीचा अवतार हे माहित असल्याने, हास्य-विनोद किंवा चेष्टा-मस्करी अगदीच वर्ज्य होती. बाहेर मुलाकडच्या मंडळींमध्ये थोडा-फार हास्यविनोद चालू होता आणि मुलाच्या आईचे मोठ्याने बोलणे ऐकू येत होते. इकडे मात्र तणावपूर्ण शांतता होती. जयंतराव म्हणतील तसेच करायचे असा नियम असल्याने स्वतःहून काही करणे, प्रसंगाचा ताबा घेणे वगैरे त्यांच्या मुलींनाच काय, मीराबाईंनाही शक्य नव्हते. अशी सगळी लगबग चालू असताना मध्येच मीराबाई काहीतरी घ्यायला खोलीत आल्या. त्यांच्या मागोमाग जयंतराव खोलीत आले. त्यांची काही तरी बोलाचाली झाली आणि अचानक जयंतरावांनी सगळ्यांदेखत फाडकन् मीराबाईंच्या श्रीमुखात भडकावली. खोलीत क्षणभरात सुन्न शांतता पसरली. प्रचंड अपमानित झालेल्या मीराबाई अत्यंत दुखावलेल्या, उद्विग्न चेहर्‍याने दोन क्षण जयंतरावांकडे बघत नुसत्या उभ्या राहिल्या आणि मग महत्प्रयासाने आवंढ्याबरोबर अपमान गिळताना त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. हे पाहणार्‍या अंजूच्या आत खोलवर काही तरी तुटले. आपल्या आई-वडिलांची नेहमीची भांडणे पाहताना तिला आतून ठिसूळ आणि भुसभुशीत झाल्याची भावना व्हायची. सगळ्यांसमोर आईचा झालेला अपमान पाहून त्याच तीव्र भावनेने तिच्या पोटात खड्डा पडला. डबडबलेल्या डोळ्यांनीच तिने मीराबाई व जयंतरावांना खोलीबाहेर जाताना पाहिले.  "मानलं बुवा दादाला! असा वचक पाहिजे!", असं तिच्या चुलत काकांपैकी कोणीतरी म्हणाले आणि तिला जोरात ओरडावेसे वाटले; पण आवाज उमटण्यासाठी आवश्यक ती हालचालच तिच्या घशाच्या स्नायूंनी केली नाही. 
        
   * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *                                                                    

        जयंतराव एका सरकारी कचेरीत उच्च दर्जाचे कारकून होते. त्यांचे वडील फार श्रीमंत होते म्हणे; पण जयंतरावांच्या बालपणीच त्यांचे वडील वारले, आणि भावकीने सगळ्या ऐश्वर्याचे लचके तोडले. न कळत्या वयातच झालेल्या भयाण दारिद्र्याच्या हल्ल्यात जयंतरावांच्या मेंदूतील विलास, विनोद, वात्सल्य, आणि स्वधारणा ही ठाणी उध्वस्त झाली होती. वडिलोपार्जित संपत्तीचा कवडीचाही फायदा न होता केवळ उरल्या-सुरल्या अवशेषांसाठीचे कोर्टकज्जेच वाट्याला आल्याने, "काय साली कटकट आहे!" हे त्यांचे जीवनासंबंधीचे बोधवाक्य झाले होते. भयंकर कडवटपणा, भयंकर कंजूषपणा, भयंकर रागीटपणा, आणि "लोक काय म्हणतील" याची भयंकर भीती, अशा भयंकर गोष्टींनी ते भयंकर ग्रस्त असायचे. काबाडकष्ट करून जीवन जगावे लागल्याने त्यांना सतत सन्यास घेऊन हिमालयात जावेसे वाटे. तरीही, स्वतःला हवे ते करण्याचे मानसिक सामर्थ्य नसल्याने, "खास लोकाग्रहास्तव" ते लग्न वगैरेही करून मोकळे झाले. मीराबाईंना ते सतत "मी हिमालयात निघून जाईन" अशा धमक्या देत असायचे. एकवीस वर्षे धमक्या देता देता रंजू-अंजू-मंजू अशा तीन मुली आणि संजू नावाचा एक मुलगा झाला तरी त्यांच्या धमक्या थांबल्या नव्हत्या. मुलगा झाल्यावर आणखी अपत्ये जन्माला येणे मात्र चमत्कारिकरित्या थांबले. 
जयंतरावांच्या कडवटपणाचा, कंजूषपणाचा, आणि रागीटपणाचा त्रास फक्त त्यांच्यावर अवलंबून असणार्‍या लोकांनाच सहन करावा लागे. दर महिन्याला जयंतराव देत असलेल्या तीनशे रुपयांत घर चालवताना बिचार्‍या मीराबाईंचा जीव मेटाकुटीला येई. स्वतः शिकवण्या करून त्यांना जास्तीचा पैसा उभा करावा लागे. सहा माणसांचे दोन वेळचे स्वयंपाक-पाणी, धुणी-भांडी, घराची साफसफाई व त्यानंतर शिकवण्या घेणे, यामुळे मीराबाई अत्यंतिक व्यग्र असत. अगदीच असह्य झाले की त्यांचे व जयंतरावांचे कडाक्याचे भांडण होई आणि "मी हिमालयात निघून जाईन" या धमकीनंतर मीराबाईंच्या असहाय्य अश्रुपातात सहसा ते संपे. मीराबाईंच्या परिस्थितीत गेली एकवीस वर्षे फरक पडला नव्हता आणि पुढची अठ्ठावीस युगे काही फरक पडण्याची शक्यताही नव्हती. 
जयंतरावांचे बालपण ब्राह्मणी प्रभावाखाली गेल्याने त्यांचे धार्मिक आचरण ब्राह्मणांच्या वरताण होते. गळ्यात जानवे घालणे आणि रोज सोवळ्यात पूजाअर्चा करणे हा त्यांचा नित्यनेम होता. जयंतरावांची बुद्धिमत्ता आणि वाचनही अफाट होते. रोज इंग्रजी पेपर इत्यंभूत वाचल्याने त्यांना जागतिक प्रवाहांची बरीच माहिती होती. इंग्रजीवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. त्याशिवाय इतर अवांतर वाचनही भरपूर असल्याने त्यांच्या चेहर्‍यावर विद्वत्तेचे तेज दिसायचे. विद्वान ब्राह्मण म्हणून ते कोणत्याही रमण्यात खपून गेले असते. व्यावहारिक आयुष्यात मात्र स्वतःच्या मुलींना डॉक्टरकीचं शिक्षण देणार्‍या ब्राह्मण परिचितांपेक्षा, "मुलींना शिकवून काय कलेक्टर करायचंय का?" असे म्हणणार्‍या बहुजन मित्राचा प्रभाव त्यांच्यावर जास्त होता. "मुलगी हे परक्याचे धन असते, मुलींची लग्ने लवकरात लवकर लावून त्यांना वाटेला लावले पाहिजे" अशी सामूहिक धारणा त्यांच्या डोक्यातून पुसून टाकू शकेल, असे पुस्तक या जगात निर्माण होऊ शकले नव्हते. उलट, एका मागोमाग एक अशा तीन मुली झाल्यावर त्यांच्या लग्नाच्या खर्चाची सोय करावी लागणार म्हणून जयंतरावांचा कंजूषपणा भौमितिक भाजणीने वाढत गेला होता. पुस्तकांत वाचलेले पुरोगामी विचार आपण व्यावहारिक आयुष्यात आचरणात आणायला हवे असा पापी विचार जयंतरावांच्या शुद्ध कर्मठ मनाला कधीही शिवला नाही. अर्थातच, मुली खपवण्याचा विचार हा तसा सार्वत्रिकच होता. तीन-चार-पाच मुली आणि मग धाकटा मुलगा हे चित्र घरोघरी होते. खुद्द मीराबाईंचे वडील शाळामास्तर होते. त्यांची तीन मुलग्यांबरोबरची ही एकुलती एक मुलगी होती. तरीही त्यांनी मुलीच्या भविष्यापेक्षा "आज कोरड्या भेळीसोबत गोडीशेव खावी की बालुशाही?" या समस्येचा विचार आयुष्यात सगळ्यात जास्त केला असेल. "जयतंरावांना सरकारी नोकरी आहे" हे एकमेव कारण मीराबाईंची धोंड जयंतरावांच्या गळ्यात बांधण्यासाठी पुरेसे होते. घरोघरी मातीच्याच चुली. ठराविक वयाच्या वर मुलगी अविवाहित आणि बापाच्या घरीच राहिली, तर नक्कीच पोटुशी राहणार आणि मग सगळा समाज मोर्चा काढून आपल्या तोंडात शेण घालायला घरी येणार या भीतीने मुलींचे बाप चळाचळा कापत. दिसेल त्या कसायाकडे गाय सोपवणे समाजमान्य होते; पण त्यामुळे कमीतकमी इतर घरांमध्ये मुलींना शिकण्याचा ताण तरी नव्हता. बर्‍याच घरांमध्ये नापासगड्ड्या मुली लग्न व्हायची वाट पाहात सुखेनैव नट्टापट्टा करून, कोणत्यातरी फिल्मी नायिकेची नक्कल करून मुलांना आकर्षित करण्याच्या उद्योगात मग्न होत्या. जयंतरावांच्या घरात मात्र, "साधे राहायचे, नट्टापट्टा करायचा नाही, अभ्यास करून पहिला नंबर आणायचा" वगैरे बराच ताप मुलींना होता. 
थोरली रंजू अंगापिंडाने थोराड होती. पहिले मूल म्हणून झालेले थोडेफार लाड तिच्या अंगोपांगी दिसत असत. रंजूचे स्वतःवर अपरंपार प्रेम होते. स्वतःला तोशीस पडू नये म्हणून ती सदासर्वकाळ जागरुक असायची. त्यामुळे अगदी आपल्या भावंडांसाठीही राबणे तिला मंजूर नसे. धाकट्या अंजू-मंजूंपैकी एकीला हाताशी धरून दुसरीशी कामावरून भांडणे करणे, यात तिचा फावला वेळ चांगला जात असे. चौदा-पंधरा वर्षांची झाली नाही तोच ती उफाड्याची दिसू लागली होती. "तिला जरा कमी खायला घालत जा" अशा सूचना जयंतरावांनी मीराबाईंना केल्या; पण एकदा वाढलेले अंग कमी कसे करणार? ती सतरा-अठराची होते न होते तोच, "मुलगी बघायला येऊ का?" असे लोक विचारू लागले.
रंजू दिसायला देखणी होती, रंगाने उजळ होती; त्यामुळे सर्वांनाच ती आवडत असे. ही एरवी जमेची बाजू असली, तरी रंजूच्या बाबतीत तो एक मोठा प्रॉब्लेमच होता. "आपल्या जातीबाहेरचा मुलगा करायचा नाही" हा नियम तोडण्याची बिशाद जयंतरावांची होणे शक्य नव्हते आणि जातीतल्या जातीत रंजूला साजेसा मुलगा मिळणे अजिबातच सोपे नव्हते. तिला पाहायला यायच्या आधीच ही मुलगी आपल्या आवाक्याबाहेरची आहे हे काही समजदार मुलांना कळत असे. ज्यांना ते कळत नसे ते तिला पाहायला येत; आणि त्यांचे काळे-सावळे, रापलेले चेहरे रंजूच्या पसंतीस येत नाहीत हे तिच्या चेहर्‍यावर उमटलेले पाहून परत जात. एकदा तर पाहायला आलेला एक टक्कल पडलेला दुर्दैवी मुलगा घराबाहेर पडताच रंजूने, "ह्याच्याशी लग्न करण्याऐवजी जीव देईन" अशी बाणेदार धमकीही जयंतराव आणि मीराबाईंना दिली. त्याच दरम्यान, "रंजूला तारुण्यसुलभ भावना आहेत, तिच्या कॉलेजमधला एक परजातीतला तरूण शिक्षक तिला कॉलेजमधून गल्लीच्या कोपर्‍यापर्यंत सोडायला येतो, आणि दोघे चोरून एकदा चित्रपट पाहायलाही गेले होते" या महाभयंकर कुवार्ता मीराबाईंच्या मनावर आदळल्या. त्यांच्या डोळ्यांसमोर धोकादर्शक लाल काजवे चमकू लागले आणि डोक्यात धोकासूचक भोंगे ठणाणा वाजू लागले. ताबडतोब त्या दिवसापासून रंजूचे कॉलेज बंद करण्यात आले, तिच्याभोवती चौक्या बसल्या, व योग्य त्याच माणसाशी विवाह व्हावा म्हणून तिला रोज "रुक्मिणी स्वयंवर" वाचण्याचा आदेश देण्यात आला. रंजूनेही फारशी खळखळ न करता रुक्मिणी स्वयंवराची पारायणे करायला सुरुवात केली. "रुक्मिणी आपल्या प्रियकराला, म्हणजे कृष्णाला, संदेश पाठवून तिचे स्वतःचे अपहरण करायला सांगते" हे त्यात मुख्य कथासूत्र आहे. ते समजून, त्यातून काही संदेश घेण्याइतके त्या वाचनात मन न लावण्याची खबरदारी तिने स्वतःहून घेतली. तिच्या शिक्षक प्रियकरालाही फार काही कृष्ण वगैरे होण्याइतपत रस नसावा, किंवा स्वतःच्या बापाच्या भीतीने त्याने तो रस गिळला असावा. कोणत्याच बाजूने काहीच प्रयत्न, तडफड, फडफड, रडरड न होता वातावरण शांत झाले. चार-पाच महिन्यांनी, "त्या शिक्षकाच्या आईबापांनी त्याचे लग्न लावून दिले" अशी खबर कानी आल्यावर रंजूचे कॉलेजला जाणे पुन्हा एकदा सुरु झाले.
या सगळ्या प्रकारात तीन-चार वर्षे उलटली. तिकडे रंजूने विशी ओलांडली व इकडे जयंतरावांचे प्राण कंठाची मर्यादा ओलांडायला आले. न पाहिलेल्या स्वजातीय उपवर मुलांची संख्याही कमी कमी व्हायला लागली होती. कुठूनच काही मार्ग निघत नव्हता. अशा परिस्थितीतच मीराबाईंचे वडील काही कामानिमित्त पुण्याजवळच्या एका गावात गेले असता त्यांना एक स्थळ सापडले. सखुबाई आणि बगूनाना यांच्या हायस्कूलमध्ये शिक्षक असलेल्या मुलाच्या, मुकुंदाच्या, बोलण्याने (आणि पेशानेही) ते फारच प्रभावित झाले आणि आपली नात त्या घरात जावी अशी इच्छा त्यांना झाली. (ज्यांच्या नात्यात तरुण अविवाहित स्त्रिया आहेत अशा वयस्कर पुरुषांना त्या काळात सतत अशी इच्छा व्हायची.) सखुबाई आणि बगूनानांसमोर त्यांनी रंजूचे यथाशक्ति मार्केटिंग केले. त्याचा परिणाम आश्चर्यकारकरित्या लगेचच अनुकूल झाला. सखुबाई, बगूनाना, त्यांचे दोन्ही मुलगे, आणि त्यांच्या भावकीतले काही लोक अशी मंडळी मुलगी बघायला आली. आली, ते लग्न ठरवायच्या तयारीनेच! इतक्या लोकांना बसण्यासाठी जयंतरावांचे खुराड्यासारखे घर पुरेसे नव्हते; म्हणून मीराबाईंच्या मोठ्या भावाच्या घरी, म्हणजे नारायणरावांकडे बैठक घेण्याचे ठरले. स्वतःच्या दरिद्री स्वभावामुळे असे छोट्या-मोठ्या कामासाठी दुसर्‍याच्या दारात जाणे, व त्याबदल्यात त्यांना आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करु देणे यात जयंतरावांना काहीच वावगे वाटत नसे. पैसे वाचवण्यासाठी त्यांना सगळे मंजूर होते. नारायणराव हे जाड-जाड भुवया असलेले, अहंमन्य आणि सुमार बुद्धीचे भांडखोर व्यक्तिमत्त्व होते. सरकारी खात्यातल्या परीक्षेत बर्‍याचवेळा गटांगळ्या खाऊन अखेर एकदाची ती पास करून ते अधिकारी बनले होते. त्यांची अर्धशिक्षित बायको सुमन गोरीपान होती आणि तिचे डोळे काळेभोर व टपोरे होते. नारायणराव सुमनच्या आकंठ प्रेमात होते. त्यांना दिनकर व सागर नावाचे दोन भाऊ होते. सुमनच्या प्रेमापोटी नारायणराव दिनकर व त्याच्या पत्नीशी सारखे भांडत असत. सागरची पत्नी मात्र सुमनची बहिणच असल्याने ती नारायणरावांच्या रोषापासून मुक्त होती. नारायणराव व सुमनचे पुत्ररत्न म्हणजे रणधीर खरोखरच रत्न होते. अंजूपेक्षा एका वर्षाने मोठा असूनही दोनदा नापास झाल्याने रणधीर आता अंजूच्या मागच्या यत्तेत होता. रणधीर आणि त्याचा समवयीन आणि समानशील मावसभाऊ विजय या दोघांचे मेतकूट होते. दोघेही सारखेच उडाणटप्पू व नापासगड्डे होते. परीक्षेत कॉपी करणे, शाळा बुडवून हॉटेलात, थिएटरमध्ये, किंवा इतरत्र जाऊन वेळ व पैसे खर्च करणे, प्रसंगी जुगार खेळणे व त्यासाठी घरात किंवा इतरत्र चोर्‍यामार्‍या करणे, यासाठी ही दुक्कल नातेवाईकांमध्ये कुप्रसिद्ध झाली होती. नारायणराव कधीमधी लहर आली की किंवा रणधीरच्या शाळेतून आलेल्या "प्रगतीपुस्तकावर" सही करायची वेळ आली की रणधीरला पट्ट्याने फोडून काढत; पण त्याने रणधीर आणखी कोडगा होण्याशिवाय काही साध्य होत नसे. 
बैठकीला येताना मुलाचे आईवडील, म्हणजे सखूबाई आणि बगूनाना, नऊवारी साडी आणि धोतर-कोट-टोपी या प्रचलित वेशातच आले होते. ठसठशीत मोठे रुपयाएवढे गोल कुंकू लावलेली सखूबाई मोठ्या आवाजात, भरपूर, आणि ठाम आत्मविश्वासाने बोलत होती. बगूनाना तिच्यापुढे तसे शांत वाटत होते. मुकुंदाने चुरगळलेला सुती शर्ट आणि सुरकुतलेला पायजमा घातला होता. त्याने देवानंदसारखा केसांचा कोंबडा केलेला होता, आणि त्याच्या चेहर्‍यावरच्या दाढीच्या खुंटांमधून स्वतःबद्दलचा प्रचंड आदर ओसंडून वाहत होता. मुकुंदा नाकीडोळी नीटस होता, रंगाने गव्हाळ आणि अंगापिंडानेही सुदृढ होता; पण मुलगी पाहण्यासाठी जाताना सर्वसाधारण मुलगे जसे ठेवणीतले कपडे घालतात, तसे त्याने घातले नव्हते. दाढी करण्याचीही तसदी घेतली नव्हती. सखूबाईंप्रमाणेच मुकुंदा मोठ्या आवाजात ठामपणे बोलणारा होता. बोलण्यातूनही त्याचा स्वतःबद्दलचा प्रगाढ आदर दिसून येत असे. बैठक तशी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. वरपक्षाने रोख रक्कम हुंड्यात मागितली नाही; त्यामुळे वराला सोन्याची साखळी, अंगठी, मुलीला दागिने, घरात लागणारी भांडीकुंडी, गादी वगैरे सामान आणि लग्नाचा सगळा खर्च या अटींवर लग्न ठरले. त्याला कोणी हुंडा म्हणत नसत. मुहूर्त पाहून सात महिन्यांनी येणार्‍या मे महिन्यात लग्न करण्याचे ठरले. साखरपुडा मात्र लगेचच दुसर्‍यादिवशीच करायचे ठरले. घराजवळच एक मारवाडी लोकांच्या मालकीचे देवीचे मंदिर होते. मीराबाई आणि मुलींनी भराभरा कामे करून साखरपुड्याची तयारी केली आणि दुसर्‍याच दिवशी त्या मंदिरात चाळीस-पन्नास लोकांच्या साक्षीने साखरपुडा संपन्नही झाला. रंजूला मुलगा पसंत आहे की नाही हे विचारले गेले असे कोणीही छातीठोकपणे सांगू शकले नसते इतकेच.
लग्न ठरल्यानंतर लग्नाची तयारी सुरु झाली. रुखवतात भांडी-कुंडी, लोखंडी कॉट-गादी वगैरेंच्या बरोबरीने ठेवण्यासाठी वाळवणं करण्याच्या कामाला मीराबाई लागल्या. त्यात पायली-पायलीचे डाळीचे वडे, कुर्डया, उडदाचे पापड, साबुदाण्याच्या पापड्या वगैरे प्रकार तर होतेच; पण नवविवाहित दांपत्याला शेवया देणे महत्त्वाचे असते असा समज असल्याने घरीच शेवयाही करणे आले. केटरर्स नसल्याने पोते-पोतेभर डाळ-तांदूळ व गहू आणून ते धान्य घरीच निवडून ठेवणे, गहू गिरणीतून दळून आणणे, मसाल्याचे पदार्थ व मिरच्या आणून भाजून, कांडून मसाला व तिखटाची पावडर करून आणणे, अशी पिट्टा पडतील अशी कामे होतीच. गल्लीतल्या शेजारणी व ओळखीपाळखीच्या बाया या कामात मदत करायला सवड मिळतील तशा येऊ लागल्या. घरातले रोजचे काम करून वर हे सगळे काम करण्यात मीराबाई व मुली अत्यंत व्यग्र झाल्या. जयंतरावही पैसे खर्च होताना पाहून रोजरोज चीडचीड करून उठसूट घरातल्यांवर करवादू लागले. रुखवतात इतर वस्तूंबरोबर शोभेच्या वस्तू ठेवायची पद्धत असे. अशा शोभेच्या वस्तू घरीच तयार करायच्या कामाला अंजू-मंजू लागल्या. एकीकडे रंजूला चिडवण्यासाठी "सांगा मुकुंद कोणी हा पाहिला" किंवा "ऊठ मुकुंदा, ऊठ श्रीधरा" वगैरे गाणी म्हणत काजूचे काप आणि उडदडाळ कापडावर चिकटवून केलेली सप्तपदी, लाईफबॉय साबणाचा छोटासा गॅस सिलिंडर व हमाम साबणाची शेगडी, भरतकाम केलेली बेडशीट, लिमलेटच्या गोळ्यांचा छोटासा बंगला, वगैरे सुबक वस्तू त्यांनी बनवल्या. रंजूला मुकुंदाचं नाव घेऊन चिडवले जात असले तरी प्रत्यक्षात मुकुंदाने तिच्याशी संपर्कही साधला नव्हता. एकमेकांना पत्र लिहिणे, भेटणे, फिरायला जाणे, रेस्टॉरंटमध्ये बसून गप्पा मारणे वगैरे लग्नाआधीचा सुंदर रोमँटिक काळ काही रंजूसाठी उजाडत नव्हता. अर्थात असे काही असते हेच तिला माहित नसल्याने त्याबद्दल वाईट वाटणे किंवा संशय येणे असे काही झाले नाही. जयंतराव आणि मीराबाईंसाठी मुलीचे लग्न होतेय हेच एकमेव महत्त्वाचे सत्य असल्याने मुलगा मुलीला पत्र का लिहीत नाही किंवा भेटायला का उत्सुक नाही, पुढे त्या दोघांचे नीट जमेल का, आपली मुलगी सुखी होईल का वगैरे प्रश्न पडायच्या मनस्थितीत ते नव्हते. कपडे खरेदी, बस्ता बांधणे वगैरे कार्यक्रमांमध्ये सामील असलेल्या मामा-मामी व इतर मंडळींना तर त्यात काही रस असण्याचे कारण नव्हते. "माझ्याकडे हा रंग आहे. मला ही साडी नको, ती हवी" वगैरे गोष्टींवरून भांडणे करून जयंतराव आणि मीराबाईंना आणखी त्रस्त करण्यात ते मग्न होते. सोयीस्करपणे घरची आणि सोयीस्करपणे बाहेरची अशी ती मंडळी होती. लग्न ठरलेल्या नात्यातल्या मुला-मुलींना गंडगनेर करणे, त्या निमित्ताने एकत्र येऊन मेजवान्या झोडणे आणि मुला-मुलीच्या सासरच्यांबद्दल कुचाळक्या करणे हाच त्यांच्यासाठी लग्नातला महत्त्वाचा भाग होता. रंजूची मनस्थिती काय होती आणि तिची भावी आयुष्याबद्दलची अपेक्षा किंवा स्वप्ने काय होती हे कोणी तिला विचारले नाही आणि तिनेही कोणाला सांगितली नाहीत.
लग्नाला दोन-तीन महिने राहिलेले असताना एक दिवस मुलाच्या दूरच्या नात्यातला एक भाऊबंद जयंतरावांना भेटायला आला. मुकुंदाच्या चुलत चुलत्यांचा तो मुलगा होता. घरी येऊन इकडच्या-तिकडच्या गप्पा करत चहा घेऊन झाल्यावर निघताना तो जयंतरावांना बाहेर घेऊन गेला. बाहेर आल्यावर "मुकुंदाबद्दल एक गोष्ट तुम्हाला माहित असायला हवी असे मला वाटते.", अशी प्रस्तावना करून त्याने बोलायला सुरुवात केली. गावातल्या एका ब्राह्मण मुलीशी मुकुंदाचे प्रेम-प्रकरण होते, तो दुसर्‍या एका गावी नोकरी करत असताना ती मुलगी तिकडे जाऊन त्याच्याबरोबर काही दिवस राहात होती, त्यांना लग्न करायचे होते, आणि तिच्या घरून विरोध होईल म्हणून पळून जाऊन लग्न करणार होते; पण ऐनवेळी ती मुलगी आलीच नाही. नंतर तिचे लग्न दुसर्‍याच एका मुलाशी झाले. मुकुंदाचा प्रेमभंग झाला, तरी तो अजूनही त्या मुलीच्या प्रेमात आहे. हे लग्न केवळ त्याच्या आई-वडिलांनी दबाव आणला म्हणून तो करतोय इत्यादि स्फोटक गोष्टी तो बोलत होता. जयंतरावांनी एकही शब्द न बोलता ते ऐकून घेतले. "हे नक्की काय प्रकरण आहे? आता या मुलाबद्दल चौकशी करावी का? आणि हे खरं निघाले तर लग्न मोडायचे का? मग लोक काय म्हणतील? मग रंजूचे आणि इतर मुलींचे लग्न कसे होणार? काय साली कटकट आहे!" हे व तत्सम विचार त्यांच्या डोक्यात चालू असावेत बहुतेक. सगळं सांगून पाहुणा कर्तव्यपूर्तीच्या समाधानात निघून गेला. जयंतरावांनी मीराबाईंना लवकरच ते सगळे एकांतात सांगितले. दोघांनी गंभीर चेहर्‍याने बर्‍याच वेळ चर्चा केली. शेवटी, "अशा उपटसुंभावर कसा विश्वास ठेवायचा? दुसर्‍याचे चांगले झालेले पाहवत नसलेले अनेक भाऊबंद असतात ते अशा खोट्या-नाट्या गोष्टी सांगून मोडता घालायचा प्रयत्न करतात. अशी काही भानगड असती तर किती गवगवा झाला असता. शिवाय झाले असेल तसे तरी तो भूतकाळ झाला. आता आपण भविष्याकडे पाहून रंजूच्या भल्यासाठी हे लग्न मोडता कामा नये" अशा निष्कर्षाला ते पोचले.

   * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *                                                                    

       सकाळी वर्‍हाडी मंडळी उठायच्या आधीच जयंतराव-मीराबाई व कुटुंबीय जागे झाले. मुलीकडच्यांनी पटापट आवरून घेतले आणि सगळे कामाला लागले. वर्‍हाडी मंडळींच्या आंघोळी-पांघोळींची, चहा-नाष्ट्याची तयारी, मग लग्न समारंभाची तयारी, येणार्‍या लोकांचे आगत-स्वागत, लग्नापूर्वीचे आणि लागल्यानंतरचे धार्मिक विधी, लोकांचे मानपान, आणि मग जेवणावळी असा कामांचा डोंगर होता. वर्‍हाडी मंडळी जागी झाली तशी जयंतराव, त्यांच्या भावंडांची कुटुंबे, मीराबाई, त्यांच्या भावडांची कुटुंबे आणि अंजू-मंजू-संजू या सगळ्यांची पळापळ सुरु झाली. मुलाकडच्यांच्या आवराआवरीत येणार्‍या अडचणी, त्यांच्या मागण्या, भटजींच्या धार्मिक कर्मकांडासाठीच्या मागण्या, आचारी मंडळींच्या मागण्या हे सगळे पुरवता पुरवता मुलीकडच्यांची फे-फे उडायला लागली. व्यावसायिक कंत्राटाची पद्धत नसल्याने सगळी कामे स्वतः करायची आहेत हे माहित असूनही, त्याचे व्यवस्थित नियोजन करून कोणत्या वेळी कोणता कार्यक्रम होणार, त्यासाठी कोणत्या वस्तू लागतील, त्या आणण्याची जबाबदारी कोणा-कोणाची वगैरे विचार करण्याइतकी उसंत आणि कुवत मुलीकडच्या सगळ्या लोकांना मिळून जमा करता आली नव्हती. त्यातल्या त्यात मीराबाई व मुलींनीच बर्‍याच गोष्टींचा विचार करून त्यासाठीची तयारी करून ठेवली असल्याने सगळ्या वस्तू हजर करण्याची जबाबदारी आपोआप त्यांच्यावरच येऊन पडत होती. सारखं कोणी ना कोणी येऊन मीराबाईंकडे काहीतरी मागत होते आणि कधी मागितलेली वस्तू कार्यालयात आणलेली असे, कधी घरीच राहिलेली असे, तर कधी दुकानात जाऊन विकत आणावी लागे. स्टेजवर भटजींच्या दुकलीचे पूजा-होम वगैरे मांडायचे काम सुरु होते आणि मीराबाई त्यांच्या धार्मिक स्वभावानुसार जातीने त्यांना हवे-नको ते पाहात होत्या. अंजू-मंजू लग्नाच्या हातघाईत दिसेनाशा झाल्या होत्या. पूजेसाठी लागणरे धान्य-सुपार्‍या-फळे- वगैरेंपैकी काहीतरी भटजींना सापडले नाही म्हणून घरून आणायला मीराबाईंनी अंजू-मंजूला गर्दीत शोधायचा प्रयत्न केला; पण त्या त्यांना दिसल्या नाहीत. समोरून चाललेल्या रणधीरला त्यांनी हाक मारून अंजूला शोधून तिला घरी जाऊन ते आणायला सांग असे सांगितले. रणधीर अंजूला शोधत गेला तेव्हा ती रंजूला तयार होण्यात मदत करण्यात व्यग्र होती. रणधीरने तिच्या आईचा निरोप तिला सांगितला तेव्हा तिला कळेना की रंजूला असे मध्येच सोडून कसे जायचे, म्हणून तिने घराची किल्ली काढून रणधीरला दिली आणि त्यालाच घरी जाऊन काय हवे ते आणायला सांगितले. 
यथावकाश एकीकडे वर्‍हाडी मंडळींच्या आंघोळी-पांघोळी व चहा-न्याहारी उरकले, रंजूचे आवरून झाले, भटजींची तयारी पूर्ण झाली, नवरा-नवरी, त्यांचे आईवडील व बाकीची आवश्यक ती मंडळी पूजाविधी करायला लागली, हळू-हळू इतर पाहुणेमंडळी जमा होऊ लागली. म्हणता म्हणता पाचशे-हजार लोकांनी कार्यालय भरून गेले. स्टेजवर कोणा-कोणाचे पाय धुणे, कोणी कोणाला काहीबाही देणे वगैरे प्रकार झाले, आलेल्या लोकांना अक्षता वगैरे वाटल्या गेल्या, आणि अखेर आंतरपाट धरून भटांची दुक्कल उभी राहिली. एका बाजूला मान खाली घालून रंजू आणि तिचे कुटुंबीय उभे होते आणि दुसरीकडे स्थितप्रज्ञ चेहर्‍याचा मुकुंदा आणि त्याचे कुटुंबीय उभे होते. भटजींनी भरपूर आळवून आळवून मंगलाष्टके म्हटली आणि लोकांनी बरोबर समेवर हातातले तांदूळ वधू-वराच्या दिशेने फेकण्याचे कर्तव्य पार पाडले. शेवटी एकदाचे "वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम्।" झाले, बाहेर सनई-नगारावाले दोनजण बोलवले होते, त्यांनी वाजवायला सुरुवात केली, लोकांनी टाळ्या वाजवल्या. वधू-वराला आहेर द्यायला स्टेजच्या बाजूने रांग लागली. तेवढ्या वेळात मुलीकडच्या तरूण मंडळींनी जमिनीवर सतरंजीच्या पट्ट्या टाकून जेवणाच्या पंगती बसवण्याची तयारी सुरु केली. काका-मामा व इतर मंडळींनी वाढपी म्हणून काम करायला बाह्या सरसावल्या. आहेर देऊन लोक स्टेजवर उतरून जेवायला येऊन बसू लागली. बसलेल्या लोकांसमोर क्रमाक्रमाने पत्रावळी, द्रोण, मीठ, भात, वरण, पुरी, बटाट्याची भाजी, आणि बुंदी येऊ लागली. बरेचसे लोक जेऊन निघून गेल्यावर मग कार्यालयात किंचितसा निवांतपणा आला. मीराबाई-जयंतरावांचे ताणलेले चेहरे किंचितसे सैलावले. मीराबाई चक्क अधूनमधून हसू लागल्या. शेवटची पंगत बसली. मुकुंदा-रंजू शेजारी-शेजारी जेवायला बसले; परंतु एकमेकांशी एकही शब्द अजूनही बोलले नव्हते. लोकाग्रहास्तव नाव घेणे वगैरे, घास भरवणे वगैरे प्र्कार झाले. रंजू स्त्रीसुलभ लज्जेमुळे अवघडून जेवत होती. मुकुंदाला बहुतेक भूक लागली असावी, तो रंजूकडे किंवा इतरत्र लक्ष न देता शांतपणे जेवत होता. पोटात अन्न गेल्याने आता सखूबाई पुन्हा एकदा खुलल्या. उखाण्यांचा त्यांच्याकडे भरपूर साठा होता. जेवणं होऊन मुलीकडची मंडळी आवरा-आवरीला लागल्यावरही त्यांनी अनेकानेक उखाणे घेऊन वर्‍हाडी मंडळींमध्ये चांगलीच खसखस पिकवली. सगळी आवरा-आवर झाल्यावर आणि रुखवतातले सगळे डाग वर्‍हाडी मंडळींच्या ट्रकमध्ये नेऊन ठेवल्यावर समारोपाची वेळ आली. मीराबाई-रंजू-अंजू-मंजूंच्या डोळ्यांमधून लगेचच धारा वाहायला लागल्या. नाही नाही म्हणाले तरी जयंतरावांचेही डोळे पाणावलेच. आज्या-माम्या-मावशा-काकवासुद्धा डोळ्याला पदर लावायला लागल्या. रंजूने एकेकीला मिठी मारून, हमसून हमसून रडत निरोप घेतला. जड पावलांनी रंजू ट्रकच्या कॅबिनमध्ये मुकुंदाशेजारी बसली. बाकी वर्‍हाडी मंडळी ट्रकच्या मागे चढली. ट्रक धुरळा उडवत निघून गेला. आत्यंतिक श्रमाने आणि रडून चेहरे मलूल झालेल्या मीराबाई व मुलींनी घरी जाण्याची तयारी सुरु केली. आजी-आजोबा व मामा मंडळी जवळच असलेल्या नारायण मामाच्या घरी गेले आणि जयंतराव-मीराबाई त्यांच्या मुलांसह घरी परतले. लग्न कसे झाले, काय घडले वगैरेबद्दल बोलण्याचेही त्राण न उरलेली सगळी मुक्याने  घरी आली. आल्यावर लगेचच अंथरुणे घातली गेली आणि सगळ्यांनी शीणलेली अंगे त्यावर टाकून दिली. मध्यरात्री कधीतरी रंजूचा ट्रक सासरी पोचला. प्रवासात मुकुंदा तिच्याशी एकही शब्द बोलला नाही. जयंतरावांची आई पाठराखीण म्हणून तिच्याबरोबर गेली होती. घर 
दीडखणाचे अगदीच छोटे होते. अनोळखी ठिकाणी अनोळखी लोकांच्या गराड्यामध्ये आजीच्या कुशीत सुरक्षितता शोधत रंजूही झोपून गेली. 
सासरच्या पहिल्याच सकाळी रंजू थोडी हालचालीची चाहूल लागताच धडपडून उठली. त्याच दिवशी सत्यनारायण ठेवला होता त्याची तयारी करावी लागणार होती. उठल्यावर तोंड धुवून आल्याआल्या सासूने तिला चहा करायला सांगितले. तिने पटकन सासूला चहा करून दिला. भिंतीला टेकून, अंथरुणावर बसून चहा पिणार्‍या सासूची प्रतिक्रिया निरखत ती शिवणमशीनीला टेकून उभी राहिली. सखुबाई काहीही प्रतिक्रिया न देता शांतपणे चहा पीत राहिल्या. काय करावे ते न कळून रंजू उगाच इकडे-तिकडे पाहू लागली. भिंतीत ठोकलेल्या फळकुटावरच्या पुस्तकावर तिला तिचाच फोटो दिसला. बहुतेक तिच्या वडिलांनी तो पाठवला असणार. असा उघड्यावर नको म्हणून तो तिने उचलला आणि तिच्या पिशवीत ठेवायला ती गेली. फोटो ठेवताना फोटोच्या मागे काहीतरी लिहिले आहे असे तिच्या लक्षात आले. "ओस पडलेले कोसच्या कोस तुला चालावे लागतील, कुठून आणशील हे सामर्थ्य?" असे वाक्य त्यावर कोणीतरी लिहीले होते. मुकुंदा उठला की त्याला त्याबद्दल विचारायचे तिने ठरवले.
सकाळी सवयीने मीराबाई सकाळीच पाणी भरायला उठल्या. मोरीत तोंड धुवून चहा टाकायला स्टोव्ह पेटवण्यापूर्वी शेल्फमधल्या देव्हार्‍यापुढे त्यांनी हात जोडले. मुलीचे लग्न निर्विघ्नपणे पार पाडल्याबद्दल त्यांनी देवाचे मनापासून आभार मानले. डोळे भरून गणेशाच्या मूर्तीकडे बघताना देवघरात ठेवलेली दहा-दहा रुपयांची चांदीची दोन नाणी गायब आहेत हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी अंजूला हाक मारून उठवले  आणि "तू दार उघडं सोडून तर नव्हती गेलीस ना? तुझ्या आणि मंजूशिवाय आणखी कोणी आलं होतं का?" वगैरे प्रश्नांची सरबत्तीच केली. झोपाळलेल्या अंजूने डोळे किलकिले करून सकाळी रंजूला मदत करत होते म्हणून रणधीरला घरी पाठवल्याचे सांगितले आणि ती परत झोपी गेली. मीराबाई पुन्हा देव्हार्‍यासमोर आल्या आणि कडवट चेहरा करून नाण्यांच्या रिकाम्या जागेकडे टक लावून पाहात उभ्या राहिल्या.   

No comments:

Post a Comment