Wednesday, June 19, 2019

कृतकृत्य

मनोऱ्याच्या आजूबाजूच्या प्रशस्त आवारात ऐन वसंतात फुललेली फुलं आणि तारुण्याचा उत्सव पाहात विनायकराव आणि सिद्धीकाकू बाकावर बसले होते. मे महिन्यात मायदेशी उन्हाने तलखी व्हायला लागते; पण इथे मात्र अगदी आल्हाददायक वाटत होतं. हवेत गारवा होताच; म्हणून दोघांनीही स्वेटर्स वगैरे घातली होती. सकाळपासून मनोरा व मनोऱ्याच्या आजूबाजूचा परिसर पाहण्यात बरीच पायपीट झाली होती म्हणून दोघेही जरा बाकावर विसावले होते. इतकं चालायची सवय नसल्याने हवा आल्हाददायक असूनही जरा दमल्यासारखंच झालं होतं. भवताली मात्र वसंत ऋतूने बहार आणलेली होती. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवरची असंख्यरंगी फुलं, झाडाझुडपांची चमकती हिरवी पाने, रस्त्याच्या कडेला असणारी सुंदर कॅफेज, चकाकत्या काचेची दुकाने आणि त्या कॅफेंमधून, दुकानांतून पदपथावर ओसंडणारी सुंदर तरूण-तरुणींची गर्दी. इकडे-तिकडे पाहून मानेला रग लागली तरी विनायकराव पाहातच होते. उंच, सडपातळ आणि दणकट दिसणारे युवक आणि त्यांना लगटून चालणाऱ्या तशाच उंच, सडपातळ, नव्या फॅशनच्या फाटक्या-तुटक्या कपड्यांमध्येही कमालीच्या आकर्षक वाटणाऱ्या युवती. विशेषत: गौरवर्णीय युवक-युवतींकडे त्यांचं जास्त लक्ष जात होतं. वर्षानुवर्षांच्या संस्कारांमुळे गौरवर्णीय स्त्री-पुरुष त्यांना अधिक आकर्षक वाटत होते. गुडघ्यांवर आणि मांडीवर फाटलेल्या जीन्स, त्यातून दिसणारे त्यांचे गोरेपान अंग, वर घातलेले पांढरेशुभ्र किंवा धम्मकपिवळे टॉप्स, डोळ्यांवर चढवलेले काळेभोर चष्मे आणि खांद्यावर रुळणारे सोनेरी किंवा काळेभोर केस. तारुण्याला आणि सौंदर्याला नुसतं उधाण आलं होतं चहुकडे. एकमेकांना लगटून, कमरेत हात घालून, भवतालाबद्दल बेफिकीर अशी ती जोडपी तारुण्याचा सोमरस प्यायल्यासारखी धुंदपणे चालत होती. ती धुंदी कमी की काय म्हणून मध्येच थांबून, एकमेकांच्या मानेला बाहुंचा विळखा घालून एकमेकांच्या अधरांमधील मधुरसपान करत होती. ते पाहून विनायकराव उगाचच कानकोंडले होऊन नजर पटकन वळवून भलतीकडे पाहू लागत होते. त्या जोडप्यांचा त्यांना किंचित हेवा वाटला. त्यांच्या तरूणपणी चारचौघात हात धरायची सुद्धा सोय नव्हती; चुंबनं वगैरे तर दूरची गोष्ट. आई-वडिलांनी ठरवलेल्या मुलीशी लग्न केल; त्यामुळे कॉलेजमध्ये असताना एकत्र फिरणे वगैरे राहिलंच खरं. एकत्र फिरणारेही चोरटे स्पर्श करण्यावरच भागवत होते म्हणा!
 मध्येच त्यांनी एकदम जाग आल्यासारखं बायकोकडे पाहिलं. सिद्धीकाकूही इकडे-तिकडे पाहात होत्या. “तिच्या डोक्यात काय विचार चालू असेल?”, असा विचार येऊन उत्सुकता वाटल्याने विनायकरावांनी त्यांना विचारलं, “काय विचार करतेयस?”
“काही नाही, पाहतेय मजा.”, सिद्धीकाकू उत्तरल्या.
“किती छान वातावरण आहे ना? आणि लोक अगदी मस्त मजा करताहेत”, ते म्हणाले, “अगदी मुक्त वातावरण आहे इथे.”
“हो ना!”, इतकंच बोलून सिद्धी काकू गप्प बसल्या. विनायकरावांचा किंचित विरस झाला आणि ते परत इकडे तिकडे पाहू लागले.
तितक्यात एक उंच, सडपातळ, गौरवर्णीय तरूण जोडपं हसत-खिदळत, एकमेकांच्या कवेत सळसळत त्यांच्या शेजारच्या बाकावर येऊन बसलं. तो मुलगा काहीतरी भराभर गमतीदार बोलत असावा; कारण ती मुलगी किणकिणत हसत होती. विनायकराव मान किंचित तिरकी करून त्यांचं निरीक्षण करू लागले. हसता-हसता त्या मुलीचा फोन वाजला. तिने पर्समधून फोन काढला आणि बोलू लागली म्हणून तो मुलगा इकडे-तिकडे पाहू लागला आणि त्याच्या लक्षात आलं की विनायकराव त्याच्याकडेच पाहताहेत. त्या मुलाने हसून मान डोलावली आणि विचारले, “हाय, हाऊ आर यू दुईंग”.  त्याचे उच्चार जरा वेगळे होते.
“आय ॲम फाईन”, विनायकराव पटकन उत्तरले, “नाईस वेदर!”
“येस, ईत्स अ नाईस सनी दे. यू आर तुरिस्त?”
“येस येस. मी ॲन्ड माय वाईफ. वुई केम फ्रॉम इंडिया”
“ओऽऽऽइंदिया, नाईस कंत्री. आय वॉन्त तू गो देर समदे.”
“धिस इज माय वाईफ, सिद्धी”
“हलो, यू केम ऑन ए हनिमून?”
“हाऽहाऽहाऽ”, विनायकराव मोठ्याने हसले, “येस यू कॅन से सेकन्ड हनिमून.”
“नाईस! हाऊ लॉंग हॅव यू बीन मॅरिद?”
“फॉर्टी यिअर्स! वुई गॉट मॅरिड व्हेन आय वॉज ट्वेन्टी फोर!”
“ओह वॉव! फॉर्ती यिअर्स! कॉन्ग्रॅच्युलेशन्स! दॅत्स अमेझिंग! यू मस्त बी इन्सेनली इन लव वित ईच अदर!”
“हूंहूंहूं...थॅंक यू!”, विनायकराव हसून म्हणाले. ते म्हणताना त्यांनी सिद्धीकाकूंच्या दिशेने पाहिले; पण नजरेस नजर देण्याचे मात्र टाळले. त्यांना उगाचच किंचित ओशाळवाणं आणि किंचित अस्वस्थ वाटलं. “इन्सेनली इन लव्ह” वगैरे त्यांना जरा भीतिदायकच वाटलं. आयुष्यात इन्सेनली काहीही केलेलं नसताना तसा आरोप झाल्यासारखे ते कावरेबावरे झाले.
तिथल्या इतर लोकांसारखंच सिद्धीकाकूंना चारचौघात जवळ घ्यावं की काय असं त्यांना वाटून गेलं. अशावेळी वागायचा काय प्रोटोकॉल असतो? काकूंना जवळ घेऊन हलकेच चुंबन वगैरे घ्यावे का? असले काही तरी प्रश्न त्यांच्या मनाला चाटून गेले. काकू मात्र कृतकृत्य समाधानाने हसत होत्या.
“वुई हॅव टू सन्स”, काकू बोलू लागल्या, “माय एल्डर सन वर्क्स हियर. वुई आर व्हिजिटिंग हीम. यंगर सन इज इन इंडिया. पुणे!”
तितक्यात त्या मुलीचं फोनवरचं बोलणं संपलं आणि त्या मुलाने त्यांच्या भाषेत तिला सांगितलं असावं कारण तिनेही तिचे निळे डोळे मोठे करून, “वॉव कॉंग्रॅच्युलेशन्स!” वगैरे म्हटलं.
“थॅंक यू”, विनायकराव पुन्हा म्हणाले.
“दिस इज माय गर्लफ्रेंद, नीना”, तो मुलगा म्हणाला.
विनायकराव आणि सिद्धीकाकूंनी माना डोलावल्या,”आर यू टू प्लॅनिंग टू गेट मॅरिड?”, विनायकरावांनी विचारलं.
“हाहाहा”, ती दोघं हसली आणि त्यांनी एकमेकांकडे पाहिलं, “नॉत यत, बत मे बी इन फ्युचर.”, असं तो मुलगा म्हणाला आणि मग एक अवघडलेली शांतता पसरली.
“वेल, ओके, नाईस मीतींग यू तू!”, उठायची तयारी करत तो मुलगा जरा वेळाने म्हणाला,”हॅव ए वंदरफुल ताईम हियर ॲन्द विश यू मेनी मोर यिअर्स ऑफ हॅपी मॅरेज!”. ती दोघं मग उठून परत हातांचे विळखे घालून एकमेकांना सर्वांगस्पर्श अनुभवत चालू लागली.
त्यांच्याकडे काही क्षण पाहात राहिल्यावर विनायकरावांनी सुस्कारा सोडला. सिद्धीकाकूंकडे वळून म्हणाले,”चलायचं आपणही?”
“हो बाई! चला निघू या! अनन्या येईलच थोड्या वेळात शाळेतून.”
गुडघ्यांवर हात ठेवून काकू उठल्या व चालू लागल्या. त्यांच्यापासून फूटभर अंतर ठेवून विनायकरावही त्यांच्या बरोबरीने चालू लागले. 

1 comment: