रूम नंबर ५०७ च्या खिडकीतून समोर दूरवर पसरलेला निळाशार समुद्र दिसत होता आणि खाली पाहिले तर टप्प्याटप्प्याने समुद्रकिनार्यापर्यंत उतरत गेलेल्या रिसॉर्टच्या इमारतींची गुलाबी कौलारू छपरे झाडांच्या हिरव्या गर्दीतून डोकावत होती. थोडे झुकून मान तिरकी करून पाहिले तर पोहण्याच्या तलावावर सकाळपासून लागलेली लोकांची झुंबडही दिसली असती; पण खिडकीत बसलेल्या त्या तरुणीचे तिकडे लक्ष नव्हते. आपल्या अक्षत गोर्या हाताच्या उत्तम निगा राखलेल्या लांबट नखांना रंग लावण्यात ती गुंगून गेली होती. डाव्या हाताच्या करंगळीच्या नखाला ती रंग लावत असताना खोलीतल्या शिसवी पलंगावरच्या मऊ बिछान्यात पडलेला तिचा मोबाईल कुठलेसे इंग्रजी गाणे किंचाळू लागला. अचानक फोन वाजला तरी ज्यांची पापणीही लवत नाही अशा लोकांपैकी ती असावी; तिला आयुष्यात पहिल्यांदा ऐकू यायला लागले तेव्हापासून सतत तो फोन वाजत असावा इतकी ती निवांत बसून राहिली. फोन तसाच वाजत असतानाच तिने हातातल्या छोट्याशा ब्रशने करंगळीच्या नखाची चंद्रकोर निगुतीने उठावदार केली. डाव्या हाताच्या तर्जनीच्या आणि अंगठ्याच्या दुसर्या पेरांमध्ये रंगाची बाटली नाजूकपणे धरून तिने उजव्या हाताने झाकण लावले आणि मांडीवरचे बिकिनीतल्या बाईचे चित्र असलेले कुठलेसे चमकदार मासिक उजव्या हातात घेऊन ती अखेर उठली.अंगातल्या पांढर्याशुभ्र रेशमी तलम गाऊनला रंग लागू नये म्हणून डावा हात अंगापासून दूर धरून ती पलंगाकडे गेली; हातातले मासिक बिछान्यावर टाकले व आता तिसर्यांदा तेच गाणे किंचाळू लागलेला फोन उचलून ती पलंगावर बसली.
"हलो ममा", आपल्या कुरळ्या केलेल्या केसांना एक नाजूक झटका देऊन फोन कानाला लावत ती म्हणाली.
"अनाहिताऽऽ, आर यू ऑलराईट?", पलीकडून आवाज आला आणि तिने भुवया किंचित आक्रसून फोन कानापासून थोडा दूर नेला.
"येस ममा, आय अॅम ऑलराईट. तू कशी आहेस?", ती म्हणाली.
"तुझ्या काळजीने जीव जायची वेळ आली आहे. व्हाय डिडन्ट यू कॉल मी?"
"आय ट्राईड. काल आणि परवा रात्रीसुद्धा मी फोन करायचा ट्राय केला. पण इथे नेटवर्क..."
"आर यू ऑलराईट, अनाहिता?"
तिने फोनचे कानापासूनचे अंतर आणखी थोडे वाढवले, "आय अॅम फाईन. पण इथे भयंकर गरम आहे. गोव्यातला हा सगळ्यात हॉटेस्ट डे आहे गेल्या..."
"पण तू मला कॉल का नाही केलंस? मला काळजीने अगदी.."
"ओरडू नकोस ममा, मला नाईस न् क्लिअर ऐकू येतंय.", ती म्हणाली," आणि मी तुला काल रात्री दोनदा ट्राय केला. एकदा आमचं..."
"मला वाटलंच तू काल रात्री फोन करशील. आय टोल्ड युवर फादर; पण नाही! त्याला कालच...आर यू ऑलराईट, अनाहिता? मला खरं खरं सांग."
"मी ओके आहे. सारखं सारखं तेच तेच विचारू नकोस."
"कधी पोचलात तुम्ही तिथे?"
"अम्म्म..फोर थर्टीला पोचलो त्या दिवशी."
"ड्राईव्ह कोणी केलं?"
"त्यानेच केलं", ती म्हणाली आणि लगेच डाव्या हाताने थांबवल्याची खूण करत तिने पुस्ती जोडली," उगाच घाबरू नकोस. ही ड्रोव्ह नाईसली."
"त्याने ड्राईव्ह केलं? अनाहिता, तू मला प्रॉमिस केलं होतंस.."
"ममा.., मी तुला सांगितलं ना त्याने नाईसली ड्राईव्ह केलं म्हणून? ऑल द वे एकदाही एटीच्यावर नेली नाही त्याने."
"आणि लास्ट टाईम झाडांकडे बघत बघत गोंधळ करून ठेवला त्याने ते?"
"आय टोल्ड यू ना ममा, ही ड्रोव्ह नाईसली. मी त्याला व्हाईट लाईनच्या जवळ राहायला सांगितलं अॅन्ड ही न्यू व्हॉट आय मेन्ट आणि त्याने तसंच केलं. तो तर झाडांकडे बघतही नव्हता. बाय द वे, पपाने त्याची कार फिक्स करून घेतली की नाही?"
"अजून नाही. फॉर्टी केचं एस्टीमेट दिलंय फक्त तिचं..."
"ममा, शुभंकरने पपाला सांगितलंय की हीऽल पे फॉर दॅट. उगाच तू जास्त.."
"ओके, ते बघू नंतर. तो गाडीत कसा वागला?"
"नीट वागला", ती म्हणाली.
"तो तुला अजूनही त्याच भयंकर नावाने हाक मारतो का गं?"
"नाही गं", ती किंचित हसून म्हणाली,"आता नवीन नाव ठेवलंय त्याने."
"काय ते?"
"ओफ्ओ", ती सारवासरव केल्यासारखी म्हणाली,"काय फरक पडतो ममा?"
"अनाहिता, आय वॉन्ट टू नो. तुझ्या पपाला..."
"ओके ओके. तो मला मिस भावना पोकळे म्हणतो.", ती म्हणाली आणि गंमत वाटल्यासारखी खुदकन हसली.
"धिस इजन्ट फनी अनाहिता, हे अजिबात फनी नाहीय. हॉरिबल आहे. अॅक्चुअली मला कळत नाही कसं..."
"ऐक ममा," मध्येच तोडत ती म्हणाली,"त्याने मला ते पंजाबी पोएम्सचं बुक दिलं होतं आठवतंय का? मी ते कुठे ठेवलंय बरं? मला आठवतच नाहीय."
"आहे ते घरी."
"आर यू शुअर?"
"येस. डेफिनेटली. मी ते ठेवलंय तुझ्या पपाच्या बुकशेल्फमध्ये. का बरं? त्याला हवंय का?"
"नाही. ही वॉज आस्किंग अबाऊट इट. कशा वाटल्या पोएम्स वगैरे."
"अगं पण त्या पंजाबी आहेत!"
"हो, पण त्याने काही फरक पडत नाही असं तो म्हणतो. त्याच्या मते कोण्या ग्रेट आर्टिस्ट बाईच्या पोएम्स आहेत त्या.", ती नुकत्याच रंगवलेल्या नखांकडे बारकाईने पाहात म्हणाली, "मी ट्रान्सलेशन बाय करायला हवं होतं किंवा पंजाबी लर्न करायला पाहिजे असं तो म्हणाला."
"ऑफुल! असं कसं म्हणू शकतो तो? अनाहिता, आता मी काय सांगतेय ते नीट ऐक."
"मी ऐकतेय ममा."
"तुझा पपा काल डॉक्टर बर्व्यांशी बोलला आणि त्यांना हे सगळं सांगितलं; अॅट लिस्ट सगळं सांगितलं असं पपा म्हणतो. ते खिडकीपाशी उभा राहून तो बडबडत होता ते आणि तुझ्या आजीला मरणाच्या प्लॅन्सबद्दल विचारत होता ते,
आणि शर्मिलाने फेसबुकवर टाकलेल्या युरपच्या फोटोंवर काय कमेन्ट्स टाकल्या ते, सगळं सांगितलं."
"मग? काय म्हणाले ते?"
"काय म्हणणार? त्यांनाही डेफिनेटली विचित्रच वाटलं त्याचं वागणं. शिवाय त्याच्या आयपीएसच्या पोस्टिंगबद्दल, त्याच्यावरच्या इनक्वायरीबद्दल वगैरे सांगितलं तेव्हा तर ते म्हणाले की देअर इज डेफिनेटली अ चान्स दॅट हि माईट लूज हिज कन्ट्रोल. युवर पपा अॅन्ड आय वेअर सो अपसेट! पपा वॉन्टेड यू टू कम होम इमिजिएटली."
"ममा मी परत येणार नाहीय लगेच. किती दिवसांनी मी व्हेकेशनवर आलीये."
"अनु, तू पुन्हा एकदा याचा सिरियसली विचार करावा असं आम्हाला दोघांना वाटतं. इन फॅक्ट त्याचं पोस्टिंग त्या झारखंड-बिरखंडसारख्या नॅक्सलाईट भागात झालं तेव्हाच तू त्याच्यासाठी वेट करायला नको होतं. आता तर तो टेन्टेड आहे. पपा म्हणत होता तू एकटीच कुठेतरी जाऊन स्वतःच्या लाईफचा शांतपणे विचार करावा म्हणून. लाईक क्रूजवर किंवा शर्मिलाकडे स्टेट्समध्ये..."
"ममा इतकं काही सिरियस नाहीय. तू काळजी करू नको. काल इथे मला एक डॉक्टर भेटले गेम्सरूममध्ये. डॉकटर झकेरिया म्हणून आहेत. बरेच फेमस आहेत म्हणे. शुभंकर क्लबमध्ये काराओकेवर गाणं म्हणत होता ते त्यांनी ऐकलं आणि तो आजारी आहे का असं मला विचारत होते."
"हो? असं का विचारलं त्यांनी? "
"जस्ट तो जरा पेल दिसतो म्हणून विचारलं असेल. त्यांची बायको विचारत होती की ते करमरकर ग्रूप ऑफ इंडस्ट्रीजचा शुभंकरशी काही संबंध आहे का म्हणून...
अॅन्ड गेस व्हॉट! शी वॉज विअरिंग दॅट ड्रेस. द वन वी सॉ इन सिंगापोर अॅन्ड तू म्हणाली होतीस की तो घालायला एकदम टायनी...."
"तो ग्रीन?"
"येस्स तोच घातला होता तिने आणि एकदम थंडर थाईज अॅन्ड बंपर हिप्स!"
"हॉरिबल! काही लोकांना खरंच अजिबात सेन्स नसतो. आणखी काय म्हणाले ते? डॉक्टर."
"विशेष काही नाही. मी बोलेन त्यांच्याशी नंतर इन डिटेल्स. ही हॅज टू नो ऑल द बॅकग्राऊंड टू डायग्नोज. ना?"
"ह्म्म. ओके. तुझी रूम कशी आहे?"
"ठीक ठीक आहे. गेल्यावेळी मिळाली तशी कॉर्नरची नाही मिळाली. सगळा पूलवरचा नॉईज येतो इकडे. अॅन्ड इट्स टूऽऽ क्राऊडेड धिस टाईम. आणि क्राऊडपण डिसेन्ट नाही अजिबात. गोंधळ, गडबड, मोठ्याने बोलणे. एकदम गावठी."
"हम्म्म. आजकाल सगळीकडे असंच आहे. काही नवीन शॉपिंग केलं का गोव्यात?"
"अजून नाही. ऊन इतकं आहे की मी बाहेर जात नाही फारशी. इट्स रिअली स्कॉर्चिंग."
"मी तुझ्या बॅगमध्ये ब्रॉन्झचं सन्स्क्रीन टाकलं आहे ना! ते मिळालं ना तुला?"
"ते वापरते मी पण तरीही नाही जात बाहेर."
"अनाहिता, मी तुला शेवटचं विचारते.. आर यू ऑलराईट?"
"ममा, प्लीज. किती वेळा सांगू मी ओके आहे? आय अॅम फाईन."
"तो कुठे आहे?"
"बाहेर गेलाय. बीचवर असेल वाचत."
"बीचवर? एकटाच? तो नीट वागतो का तिथे?"
"ममा तू तर त्याच्याबद्दल अशी बोलतेस की अॅज इफ त्याला वेड लागलंय."
"मी असं म्हटलेलं नाही."
"पण त्याचा अर्थ तसाच होतो. तो काहीही करत नाही, शांतपणे बुक वाचत असतो. शिवाय गेल्या दोन रात्री तो क्लबमध्ये काराओकेवर गाणीही म्हणतोय."
"पण तरीही, तो जर काही विचित्र बोलला, वागला तर लगेच मला कॉल कर. डू यू अंडरस्टँड व्हॉट आय अॅम सेईंग?"
"ममा, मला शुभंकरची भीती वाटत नाही."
"अनाहिता, मला प्रॉमिस कर."
"ओके ममा, आय प्रॉमिस.", तिने भुवया उंचावून छताकडे पाहात म्हटलं, "बाय ममा. मी नंतर फोन करीन. गिव्ह माय लव्ह टू पपा."
तिने फोन बंद करून एक सुस्कारा सोडला.
*************************************
"शुभं करकर मरकर!", सायली पोहण्याच्या तलावापाशी एका हवा भरलेल्या मोठ्या रबरी चेंडूवर बसून खिदळत म्हणत होती,"शुभं करकर मरकर!"
"सायली, स्टॉप सेईंग दॅट. इट्स सो इरिटेटिंग. आणि नीट स्थिर बसून राहा बरं.", तिची आई सायलीच्या छोट्याशा खांद्यांना व हातांना सनस्क्रीन लोशन लावत म्हणाली. सायलीने पिवळा दोन भागांचा पोहण्याचा पोशाख घातला होता पण त्यातल्या एका भागाची तिला अजून नऊ-दहावर्षेतरी गरज नव्हती.
"तशी ती अगदी साधी कॉटनची साडी होती", शेजारच्या आरामखुर्चीवर बसलेली स्त्री सायलीकडे कधी एकदा ही जातेय अशा अधीरपणे पाहात सायलीच्या आईला म्हणाली,"पण द वे शी हॅड टाईड इट...आय विश आय न्यू. खूप क्यूट दिसत होती."
"हो, खूपच नाईस होती", सायलीची आई म्हणाली,"ओके सायली, नाऊ गो अॅन्ड प्ले इन चिल्ड्रन्स पूल. आम्हाला बोलू दे जरा."
सुटका होताच सायली लहान मुलांच्या तलावाच्या दिशेने पळाली. तलावाकडे जाणार्या पायर्या ती पळतच उतरली आणि तशीच पळत तलावापाशी न थांबता तलावाला एक वळसा घालून खाली समुद्रकिनार्याकडे जाणार्या पायर्या धडधडा उतरू लागली. पायर्या संपून किनार्यावरच्या भुसभुशीत वाळूत पाय पडताच तिने थांबून एकदा डावी-उजवीकडे पाहिले आणि मग डावीकडे वळून वाळूत पाय रुतवत सावकाश चालू लागली. थोडे अंतर गेल्यावर अचानक ती पुन्हा पळत सुटली आणि झाडांच्या रांगेतल्या एका झाडाच्या सावलीत आरामखुर्ची टाकून बसलेल्या तरुणाच्या खुर्चीजवळ जाऊन थांबली. समोर उघडे पुस्तक धरून बसलेल्या त्या तरुणाची नजर मात्र पुस्तकाच्या वरून समुद्रात खोलवर कुठेतरी विरघळली होती.
"आर यू गोईंग इन द सी, शुभं करकर मरकर?"
तो तरूण दचकून भानावर आला आणि आपसूकच त्याने अंगावर घातलेला रोब उजव्या हाताने छातीवर हलकेच आवळून धरला.
"ओह, हॅलो सायली!", पुस्तक ठेवून उजव्या कुशीवर वळत आणि इतकावेळ उन्हाकडे पाहात असलेले डोळे सावलीला जुळवून घेत तिच्या चेहर्याकडे अंदाजाने रोखून पाहात तो म्हणाला.
"आर यू गोईंग इन द सी?"
"मी तुझीच वाट पाहात होतो.", तो म्हणाला, " काय चाललंय?"
"व्हॉट?"
"काय चाललंय? व्हॉट्स द प्लॅन?"
"माझा बाबा येणारे आज एरोप्लेनने", सायली पायाने वाळू उडवत म्हणाली.
"अंगावर वाळू नको उडवूस", त्याने झटकन पण अलगदपणे तिच्या पायावर घोट्यापाशी हात ठेवला, "हो यायलाच पाहिजे तुझा बाबा आता. बघ ना मला आता त्याची तासातासाला आठवण येतेय."
"अनाहिता आंटी कुठे आहे?"
"अनाहिता आंटी?", तो वाळू झटकत म्हणाला, "सांगणं अवघड आहे. हजारो ठिकाणं आहेत आणि ती कुठंही असू शकते. खाली ब्युटीपार्लरमध्ये असेल किंवा स्पामध्ये मसाज घेत असेल किंवा रूममध्ये नखं रंगवत बसली असेल."
त्याने उजव्या कुशीवर वळत उजव्या हाताची उशी करून त्यावर डोके टेकवले आणि डाव्या हाताने तिला आपल्या जवळ ओढले.
"दुसरं काही तरी विचार ना.", तो म्हणाला, "किती छान स्वीमसूट आहे तुझा गं? मला या जगात सगळ्यात जास्त काही आवडत असेल तर ते म्हणजे ब्लू स्वीमसूट."
सायलीने ओठ घट्ट एकमेकांवर आवळत भुवया आक्रसून त्याच्याकडे रोखून पाहिले आणि मग खाली आपले आधीच पुढे आलेले पोट आणखी पुढे काढून त्याकडे पाहिले.
"हा ब्ल्यू आहे का?", दोन्ही हात सगळी बोटे जुळवून स्वीमसूटकडे रोखत ती म्हणाली, "हा यलो आहे यलोऽऽ"
"हो का? जरा जवळ ये बरं"
ती एक पाऊल आणखी जवळ आली.
"अरे खरंच की! तू म्हणतेस तेच बरोबर आहे! काय यडाय राव मी!"
"तू सीमधे जाणार आहेस का?", त्याच्या शेजारी बसत सायलीने पुन्हा विचारले.
"माझं अजून ठरलं नाहीय; मी त्याच्यावर गहन विचार करतोय. पण तू किती छान दिसतेयस, मला तुझ्याबद्द्ल आणखी काहीतरी सांग ना.", त्याने तिचा छोटासा हात आपल्या हातात घेतला.
"आलिशा सेड की काल सिंगिंग करताना तू तिला तुझ्या शेजारी बसू दिलं म्हणून", सायली कपाळावर आठ्या पाडून नाक आक्रसत म्हणाली.
"आलिशा असं म्हणाली?"
सायलीने जोरजोरात मान हलवली.
"हं", तिचा हात सोडून पुन्हा पाठीवर वळत तो म्हणाला,"तुला तर माहितीच आहे की हे सगळं कसं असतं, सायली! काल मी तिथं बसून गाणी म्हणत होतो आणि तू तिथे नव्हतीस. तेवढ्यात आलिशा आली आणि बसली माझ्या शेजारी. आता तिला काय ढकलून द्यायचं?"
"हो"
"हा हा हा, नाही बाईसाहेब. मी नाही ढकलू शकत तिला. पण मी एक युक्ती केली. माहितीये का काय?"
"काय?"
"मी असा विचार केला की तूच माझ्या शेजारी बसली आहेस."
रेलून बसलेली सायली ताबडतोब उठून ताठ बसली, "लेट्स गो इन द सी.", ती उत्साहाने म्हणाली.
"ओके. ", तो तरूण म्हणाला, "मला वाटतं आता जायला काही हरकत नाही."
"पण नेक्स्ट टाईम ढकलून दे."
"कोणाला?"
"आलिशाला."
"ओह, आलिशा!", तो म्हणाला, "कैसे उनका नाम बारबार जुबान पे आता है, दिल में क्या यादे क्या क्या आरजू खिलाता है."
अचानक तो झटक्यात उठून उभा राहिला आणि त्याने समुद्राकडे गंभीरपणे काही क्षण पाहिलं.
"सायली", तो वळून एकदम म्हणाला, "मला एक गंमत सुचलीये. चल. आपण पाहू एखादा भस्म्हावरा मिळतोय का ते."
"व्हॉट?"
"भस्म्हावरा", तो म्हणाला आणि त्याने अंगावरचा रोब काढून टाकला आणि जवळच पडलेला फ्लोट घेतला. चेहर्याच्या मानाने त्याचे अंग काहीच रापलेले नव्हते.
त्याने उजवा हात लांबवून सायलीचा डावा हात हातात घेतला आणि ती दोघं समुद्राकडे चालू लागली.
"तू आजपर्यंत खूप भस्म्हावरे पाहिले असतील ना सायली?", त्याने तिला विचारले.
तिने मान हलवली.
"नाही? कमाल आहे! कुठे राहतेस तू?"
"आय डोन्ट नो."
"काय सांगतेस? तुला माहिती असलं पाहिजे. आलिशाला माहितीय ती कुठं राहते ते आणि ती तर फक्त साडेतीन वर्षांची आहे."
सायलीने त्याच्या हातातून हात ओढून काढून घेतला आणि खाली वाकून वाळूतून एक तुटका शिंपला उचलून बारकाईने निरखत बसली. मग एकदम तो खाली टाकून दिला आणि उभं राहात म्हणाली, "बँड्रा वेस्ट, बॉम्बे".
"बॅन्ड्रा वेस्ट बॉम्बे..", तो म्हणाला, "ते मुंबईत वान्द्रे पश्चिमच्या जवळ आहे ते का?"
"मी बॅन्ड्रा वेस्टला राहते", सायली त्रासिकपणे प्रत्येक शब्दावर जोर देऊन म्हणाली आणि पुढे काही पावले वाळूत पळत गेली. पुढे जाऊन तिने आपला डावा पाय मागे उचलला आणि डाव्या हातात धरून उभी राहिली.
"ओहो, असंय होय, आता एकदम नीट कळलं मला."
"तू मोगलीचं कार्टून पाहिलं?", तो जवळ आल्यावर आपला पाय सोडून ती म्हणाली.
"कालच!", तो उत्साहाने म्हणाला,"बघ कशी गंमत आहे, मी ते काल रात्रीच पाहिलं आणि तू मला आज विचारतीयेस! तुला कसं वाटलं ते?"
"ते मोगली वर अॅटॅक करतात ते हायनाज असतात ना?"
"हो गं. मला वाटलं ते मोगलीला मारतीलच! मी इतकी तरसं कधीच पाहिली नव्हती!"
"हॅ. फक्त सिक्सच तर होते ते!"
"फक्त सहा? तुला सिक्स फक्त वाटतात?"
"तुला पेन्सिल आवडते?", सायलीने विचारले.
"काय? मला काय आवडते?", त्याने गोंधळून विचारले.
"पेन्सिल"
"होऽऽऽ. खूप आवडते. तुला नाही आवडत?"
सायलीने मान डोलावली, "आणि ग्रेप्स?"
"ग्रेप्स..हो. द्राक्षंसुद्धा. द्राक्षं आणि पेन्सिली घेतल्याशिवाय मी कुठेही जात नाही."
"तुला आलिशा आवडते?"
"होऽऽऽऽऽऽ. खूऽऽऽऽप आवडते.", तो हसत म्हणाला," तुला माहितीये मला ती का आवडते? कारण ती रिसॉर्टमध्ये जे कुत्र्याचं पिलू आहे ना, त्याला फुग्याच्या तलवारीने धबाधबा मारत नाही. खूप चांगली आहे ती."
सायली गप्प होऊन चालत राहिली .
"मला पेन्सिल खायला खूप आवडते", बर्याचवेळाने शेवटी ती म्हणाली.
"वा! पेन्सिल खायला कोणाला आवडत नाही?", पायावर पाण्याची लाट येताना तो म्हणाला,"ओह, पाणी चक्क गार आहे!"
खांद्यावरचा फ्लोट त्याने पाण्यात टाकला.
"थांब सायली! लगेच चढू नको त्यावर. आपण आणखी थोडं पुढं जाऊ."
दोघे पाण्यात वाळूतून सावकाश चालत आणखी थोडे खोल पाण्यात गेले. मग त्याने तिला अलगद उचलले आणि फ्लोटवर पालथे ठेवले.
"तुमच्याकडे टोपी वगैरे घालायची पद्धत नाही का?", त्याने विचारले.
सायलीने त्याचा हात घट्ट धरला होता,"मला धरून ठेव. सोडू नको!", ती किंचित थरथरत म्हणाली.
"बाईसाहेब, मी माझं काम व्यवस्थित करतो! तुम्ही फक्त एखादा भस्म्हावरा दिसतोय का तिकडे लक्ष द्या!", तो दूरवर पाहात म्हणाला, "आज भस्म्हावर्यांचा दिवस आहे."
"मला एकसुद्धा दिसत नाहीये."
"ते असे सहजासहजी दिसत नाहीत. फार विचित्र असतात ते. तुला माहितीये का ते काय करतात ते?"
सायलीने मान हलवली.
"समुद्राच्या तळाशी ना, काही बीळं असतात आणि त्या बीळांमध्ये लाडू असतात. त्या बीळांमधे हे भस्म्हावरे जातात. जाताना ते अगदी साध्या माशासारखे असतात, पण एकदा का आत गेले की अगदी डुकरासारखे बकाबका लाडू खातात.
एका भस्म्हावर्याने तर अठ्ठ्यात्तर लाडू खाल्लेले मी पाहिलंय.", फ्लोट पाण्यात आनखी खोलवर ढकलत तो म्हणाला,"आणि त्यानंतर ते इतके जाडजूड होतात की बीळातच अडकून बसतात. बाहेरच येता येत नाही."
"मग काय होतं त्यांचं?", फ्लोट खोल पाण्यात चाललेला पाहून त्याच्या हातावरची पकड आणखी घट्ट करत सायली म्हणाली.
"काय सांगू सायली तुला, ते मरतात गं!"
"का?", तिने मान वळवून आश्चर्याने विचारले.
"त्यांना भस्म्या रोग होतो. फार भयंकर रोग आहे तो."
"वेव्ह आली, वेव्ह आली", तितक्यात सायली घाबरून म्हणाली.
"नो प्रॉब्लेम. आपण लाटेवरून उडी मारू.", तो म्हणाला.
त्याने एका हाताने तिचे दोन्ही पाय घोट्यापाशी धरून पाण्यात दाबले आणि फ्लोटने लाटेवर अलगद हेलकावा घेतला. सायलीचे डोके एकदा पाण्यात डुबकी मारून आले आणि ती आनंदातिशयाने किंचाळू लागली.
"मला एक दिसला! मला एक दिसला!", स्थिर झाल्यावर कपाळावरचे ओले केस एका हाताने बाजूला करत ती म्हणाली.
"काय दिसला?"
"भस्म्हावरा!"
"अरे बापरे! मग? होते का त्याच्या तोंडात लाडू?", त्याने डोळे मोठे करून विचारलं.
"हो! सिक्स होते!", तिनेही त्याच्यासारखेच डोळे मोठे करून उत्तर दिले.
त्याच्या डोळ्यात एकदम मृदु हसू जमा झाले. अचानक तो वाकला आणि पाण्यात तरंगणार्या तिच्या गुलाबी तळपायाचा त्याने मुका घेतला.
"एयऽऽ", त्या सुकुमार तळपायाची मालकीण मागे वळून ओरडली.
"एयऽऽ तूऽऽ. चला आता. झालं का तुझं खेळून?"
"नाही! अजून खेळायचं."
"सॉरी!", एवढंच म्हणून त्याने फ्लोट किनार्याकडे ढकलायला सुरुवात केली. किनार्यावर पोचल्या पोचल्या त्याला "बाय!" म्हणून सायली रिसॉर्टच्या दिशेने पळत सुटली. त्याने फ्लोट खांद्यावर अडकवला. आणि वाळूतून सावकाश खुर्चीपर्यंत चालत जाऊन रोब आणि पुस्तक घेतले आणि रिसॉर्टच्या पायर्या चढून लॉबीत आला.
खास पोहणार्यांसाठी असलेल्या लिफ्टमध्ये तो शिरला तेव्हा त्याच्या मागोमाग तोंडावर सनस्क्रीन लोशन चोपडलेली आणि अंगाभोवती चादरीसारखे कापड गुंडाळलेली एक बाई शिरली आणि खाली बघत उभी राहिली.
खास पोहणार्यांसाठी असलेल्या लिफ्टमध्ये तो शिरला तेव्हा त्याच्या मागोमाग तोंडावर सनस्क्रीन लोशन चोपडलेली आणि अंगाभोवती चादरीसारखे कापड गुंडाळलेली एक बाई शिरली आणि खाली बघत उभी राहिली.
"तुम्ही माझ्या पायांकडे बघताय का?", त्याने लिफ्ट सुरु झाल्या झाल्या विचारले.
"अं? एक्सक्यूज मी?", ती भांबावली.
"आय सेड आय सी यू आर लुकिंग अॅट माय फीट."
"आय बेग यॉर पार्डन! आय हॅपन्ड टू बी लुकिंग अॅट द फ्लोअर", ती फणकार्याने म्हणाली आणि त्याच्या कडे पाठ करून तिने पुढच्या मजल्याचे बटन दाबले.
लिफ्टचे दार उघडताच त्याच्याकडे वळून न बघता ती घाईघाईने बाहेर पडली.
"माझे पाय अगदी सर्वसाधारण आहेत आणि कोणी त्यांच्याकडे टकामका पाहायचे काही एक कारण नाहीय.", दार बंद होता होता तो अर्धवट स्वतःशी म्हणाला.
पाचव्या मजल्यावर पोचल्यावर तो लिफ्ट लॉबीतून चालत ५०७ कडे गेला. दार उघडून आत येताच नेलपेन्टचा आणि चामड्याच्या बॅगांचा मिश्र वास त्याच्या नाकात शिरला.
बेडवर पहुडलेल्या आणि झोप लागलेल्या त्या तरुणीकडे त्याने क्षणभर थांबून पाहिले आणि हळुवार चालत जाऊन तिथल्या अनेक चामड्याच्या बॅगांपैकी एक बॅग उघडली. बॅगेतले कपडे भसाभसा ओढून काढून सगळ्यात खाली ठेवलेले नऊ एम एम ब्राऊनिंग काढले. त्यातले मॅग्झिन एकदा बाहेर काढून तपासले आणि पुन्हा आत घातले.
अलगद चालत तो बेडवर त्या तरुणीच्या शेजारच्या मोकळ्या जागेत जाऊन बसला. मान वळवून तिच्याकडे पाहिले; पिस्तुल उचलून नेम धरला आणि मग स्वतःच्या उजव्या कानशीलात गोळी झाडली.
अलगद चालत तो बेडवर त्या तरुणीच्या शेजारच्या मोकळ्या जागेत जाऊन बसला. मान वळवून तिच्याकडे पाहिले; पिस्तुल उचलून नेम धरला आणि मग स्वतःच्या उजव्या कानशीलात गोळी झाडली.
(जे. डी. सॅलिंगर यांच्या "A Perfect Day for Banana Fish" या कथेचे स्वैर रुपांतर)
फार सुरेख झाला आहे अनुवाद.
ReplyDelete