Friday, September 7, 2012

जुलूस

सहावी संज्ञा, Intuition किंवा आतला आवाज या प्रकाराला काही शास्त्रीय आधार आहे की नाही, कोण जाणे? आजकाल तंत्रज्ञानाने इतकी मोठी झेप घेतलेली आहे आणि ते इतक्या प्रकारे, इतक्या वेळा मनावर आदळले जाते की कधीकधी स्वत:चा आतला आवाज खोटा वाटायला लागतो. इतकी भरभराट होत असतानाही चुकचुकणारी माणसं नैराश्याची बळी वाटायला लागतात, काहीतरी जुन्याच्या आठवणींनी उसासणार्‍यांना सरसकट वायफळ नॉस्टॅल्जियाचे रोगी समजले जाते आणि इतक्या मोठमोठ्या गोष्टी बोलणार्‍यांसमोर साध्या-साध्या शंका विचारण्याची लाज वाटू लागते.


मुळात माझ्यासारख्याच अनेक लोकांना स्वतंत्र विचार करण्याचं शिक्षण मिळालेलंच नाहीय. वर्गात मागच्या बेंचवर बसून खिडकीतून बाहेर बघणार्‍या मुलांना, ठराविक पद्धतीने निबंध न लिहिणार्‍या मुलांना, ठराविक साच्यातली उत्तरे न लिहिणार्‍या मुलांना वाया गेलेली मुले समजणार्‍या शिक्षणफॅक्टरीतून कशीबशी सर्टिफिकेटं मिळवलेल्या लोकांना स्वतःच्या शंकांच्या योग्यतेबद्दलही शंकाच असतात.

एकीकडे "आराम हराम है" किंवा "Work for all (and more of it)." सारख्या वाक्यांचा येता जाता पवित्र मंत्रासारखी जप करणार्‍या, 'कार्यमग्न' लोकांना पुजणार्‍या आणि काम न करणार्‍यांना ऐतखाऊ म्हणून हिणवणार्‍या व्यवस्थेचे पाईक कामाचे तास कमी करायला का झटतील हे काही केल्या कळत नाही किंबहुना कोणीही स्वतःचा वेळ मोकळा अनुत्पादक का ठेवेल हे "माणसाच्या उपभोगाकांक्षा अमर्याद असतात आणि स्रोत अतिशय मर्यादित" असे ठासून सांगणार्‍या या व्यवस्थेला कसे कळेल हेच समजत नाही (म्हणूनच कामात बदल म्हणजेच आराम वगैरे वगैरे). समृद्धी, शिक्षण वगैरे आल्यावर लोकसंख्या स्थिर होईल असे म्ह्णताना प्रगतीच्या गेल्या साठ वर्षांमध्येच लोकसंख्या दुपटीहून अधिक का वाढली हे कळत नाही आणि आदिमानवाची लोकसंख्या मात्र कोणत्याही समृद्धीविना पन्नास लाखाच्या आसपास कशी स्थिर राहिली हे कळत नाही.

पण सुदैवाने अशा शंकांना आपल्या विचारांनी आधार देणारी माणसे जगात आहेत.

माणसाला आपण स्वत:साठी निर्माण केली आहे असे वाटणार्‍या पण प्रत्यक्षात माणसांपासून बनलेल्या असूनही स्वतंत्रपणे उत्क्रांत झालेल्या आणि कोणत्याही एका माणसाच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या धर्म, सरकारादि यंत्रणांसारखीच "मार्केट" ही एक यंत्रणा उत्क्रांत झालेली आहे आणि माणूस म्हणजे तिच्या प्रभावाखाली तिच्यासाठीच फुकटात काम (Shadow Work) करणारा Homo Economicus झालेला आहे. मोठमोठ्या कंपन्यांची जगातल्या अगदी थोड्या लोकांच्या फायद्यासाठी काम करणारी ही बाजारू यंत्रणा प्रगतीचे ढोल इतक्या मोठ्या आवाजात वाजवत आहे की काय खरं आणि काय खोटं हे न बघताच माणसं त्या तालावर नाचू लागतात. माणसाच्या कोणत्याही गरजेचे संस्थानीकरण हे या यंत्रणेचे वैशिष्ट्य आहे. इवान इलिच या विचारवंताने माणसाच्या गरजांच्या संस्थानिकरणातून झालेला विपर्यास आपल्या Needs या लेखात मांडला आहे. उदाहरणार्थ शिक्षण या शब्दाचा अर्थ शिकणे असा न राहता पदवी मिळवणे, मार्क्स मिळवणे असा झाला आहे. शिकण्याच्या क्रियेपेक्षा बाजारातून मिळणार्‍या सेवेवर माणसाचे अवलंबित्व निर्माण झाले आहे. शाळेबाहेरच्या खर्‍याखुर्‍या शिकण्याला शिक्षण म्हणायची मान्यताच नाही. माणसाच्या शिकण्याच्या गरजेचे संस्थानिकरण करून बाजाराने बहुसंख्य लोकांची ती गरज भागणे दुरापास्त केले आहे. रुसो म्हणतो,"The noblest work in education is to make a reasoning man, and we expect to train a young child by making him reason! This is beginning at the end; this is making an instrument of a result. If children understood how to reason they would not need to be educated.". पण इथे खरेच शिकायचे कोणाला आहे? आम्हाला तर शिक्षण घेतल्याचा कागद हवा आहे म्हणजे बाजारात आमची किंमत वाढेल आणि मग बाजार उदार मनाने आम्हाला घर, गाडी, टीव्ही वगैरे देऊन आमच्या "गरजा" पूर्ण करेल. ज्यांनी असे शिक्षण घेतले आहे अशा आम्हा लोकांना हे सगळं मिळतं, सुबत्ता मिळते, जगात काय चाललंय याची माहिती मिळते पण आपण खातो ते नक्की कुठून येतं त्याचं ज्ञान मिळत नाही. आपण खातो त्यात नक्की किती पेस्टिसाईड्स आहेत ते कळत नाही. उत्पादकाने लावलेल्या "Organic" लेबलवर विश्वास ठेवण्याशिवाय आम्हाला गत्यंतर नाही. समजा नाहीच ते घ्यायचं म्हटलं तर दुसरं काय खायचं त्याचं ज्ञान नाही. आम्ही फक्त बाजाराच्या जगङ्व्याळ यंत्रात एखाद्या स्क्रूप्रमाणे एखादे अतिविशिष्ट काम करत बसतो ज्याचा संबंध आम्हाला आमच्या रोजच्या जगण्याशी लावता येत नाही. आमच्या अतिप्रचंड लोकशाही यंत्रणेतले आम्ही एक नगण्य भाग आहोत ज्यांना आशेशिवाय काहीही करता येत नाही. हळूहळू ही काही न करण्याची आम्हाला सवय लागलेली आहे आणि आमची हवा, आमचं पाणी आणि आमच्या अन्नाचं बाजारीकरण होतानाही आम्ही पाहात राहतो. आम्ही मानसिकरित्या षंढ केले गेलो आहोत. इतके की बाजाराने पवित्र ठरवलेल्या वस्तुंना आम्ही नाही म्हणू शकत नाही, त्यांच्यापुढे आम्ही आनंदाने मान झुकवतो. "Holy Cow" म्हणणार्‍या आमच्या पूर्वजांना आम्ही वेड्यात काढून "Holy Car!" म्हणतो. "गाय हमारी माता है
" म्हणणार्‍यांच्या वंशातले आम्ही आता कारसेवा करतो. कारसाठी आम्ही जमिनीवर डांबर ओतून आखीव-रेखीव रस्ते बनवतो. कोणत्याही दिशेने चालू लागण्याचे आमचे स्वातंत्र्य घालवून ठराविक मार्गाने जायचे नियम पैसे देऊन विकत घेतो आणि त्या पैशांसाठी जास्तीचे कामही करतो. सर्वसाधारण अमेरिकन माणूस कार असूनही त्याच्या आदिम पूर्वजाइतका चालतोच फक्त लॉबी, पार्किंग आणि कॉरिडॉर्समध्ये. इलिच म्हणतो "The model American puts in 1600 hours to get 7500 miles: less than five miles per hour. In countries deprived of a transportation industry, people manage to do the same, walking wherever they want to go, and they allocate only 3 to 8 percent of their society's time budget to traffic instead of 28 percent".

"हेल्थ" या आणखी एका संस्थानिकृत अतिप्रिय गरजेचाही आम्ही या अतिपूज्य कारसाठी त्याग करतो. कॅन्सरच्या नावाने गळे काढणारे आम्ही कारच्या नळीतून बाहेर पडणारे कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड आणि हायड्रोजन सायनाईडसारखे घातक कर्कजनक वायू मुकाट आमच्या फुप्फुसात भरून घेतो.

रस्त्यावर भारतात एक लाखाच्यावर बळी घेणार्‍या या कारसाठी सरकारने लाल गालिचा अंथरला आहे. किरकोळविक्री क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात काचकूच करणार्‍या सरकारने कारनिर्मिती क्षेत्रात आपले दरवाजे सताड उघडे ठेवले आहेत आणि वीस वर्षांत जगातले ऑटोमोबाईल हब व्हायचे स्वप्न बाळगले आहे. त्यासाठी मोठमोठे रस्ते बांधणे, त्यासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी हडपणे जोमात चालू आहे.

त्याचवेळी या कारसाठी इंधन कमी पडणार हे पाहून नवनव्या इंधनाच्या शोधात मार्केट आहे आणि मार्केटच्या सुपीक डोक्यातून "जैवइंधनाचे" एक नरभक्षक पिल्लू बाहेर पडले आहे. २०५० पर्यंत जगाच्या ऊर्जेच्या २५% ऊर्जा जैवइंधनातून मिळेल असा अंदाज आहे. अर्थातच त्यासाठी आधीच कमी असलेली जमीन द्यावी लागणार. लाखो वर्षे जुनी जंगले तोडून तिथे पामची किंवा जट्रोफाची लागवड करावी लागणार (मलेशिया आणि इंडोनेशियाने यात भारतापेक्षा जास्त प्रगती केली आहे).माणसांना खायला नसेल मिळत पण इंधनासाठी ऊस आणि मका उपलब्ध करून द्यावा लागणार. मग अन्नधान्याच्या किंमती वाढताहेत तर वाढू द्या.

UN च्या फूड अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशनने (FAO) भूक कमी करण्याची काही ध्येये ठरवली होती. अगदी आकडेवारीनिशी. पण २००६ नंतर अन्न-धान्याच्या किंमती इतक्या वाढल्या की जगातल्या दीर्घकालीन उपाशी लोकांची संख्या कमी होण्याऐवजी वाढायला लागली आणि २००९ मध्ये एक अब्जापेक्षा जास्त होईल असा अंदाज निघाला. मग FAO ने एक युक्ती केली. ध्येय ठरवण्यासाठी आकडेवारी वापरायचेच सोडून दिले. म्हणजे उपाशी लोकांची संख्या अमुक इतकी कमी करू असे न म्हणता फक्त "आम्ही उपाशी लोकांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करू" असेच ध्येय ठरवले गेले.

जगातल्या वरच्या १० टक्क्यातल्या लोकांना पोषणमूल्यांनी भरपूर असा बहुढंगी आहार मिळतो, पण हे भाग्य सगळ्यांच्या नशिबी नाही. FAO च्या त्याच अहवालातला हा परिच्छेद पाहा:

"Biodiversity, another essential resource for agriculture and food production, is threatened by urbanization, deforestation, pollution and the conversion of wetlands. As a result of agricultural modernization, changes in diets and population density, humankind increasingly depends on a reduced amount of agricultural biological diversity for its food supplies. The gene pool in plant and animal genetic resources and in the natural ecosystems which breeders need as options for future selection is diminishing rapidly. A dozen species of animals provide 90 percent of the animal protein consumed globally and just four crop species provide half of plant-based calories in the human diet."

प्रदूषणाने वातावरणावर परिणाम होतो म्हणून मार्केटने एक युक्ती काढली आहे. वातावरणाचं खाजगीकरण! म्हणजे वातावरणाचे हक्क आजवर ज्यांनी प्रदूषण केले आहे त्याच लोकांना वाटून द्यायचे. मग त्यातले काही लोक थोडंसं प्रदूषण कमी करतील आणि वाचलेला आपला "कोटा" इतरांना विकतील म्हणजे ते प्रदूषण करायला मोकळे. "कार्बन ट्रेडींग" या आपल्या पुस्तकात लॅरी लोहमानने पृथ्वीवरच्या सगळ्या जीवांच्या मालकीचं आणि हक्काचं वातावरण या मार्केट इकॉनॉमिने प्रदूषणकर्त्यांना कसं परस्पर आंदण दिलं आहे याचा खुलासा केला आहे.

२०५० पर्यंत ९ अब्ज होणारी लोकसंख्या, तिला पोसण्यासाठी ७०% जास्तीच्या अन्नाची गरज असताना इतर कामांसाठी वापरली जाणारी जमीन, अन्न-धान्यांच्या बियाणांची कमी कमी होत जाणारी उत्पादनक्षमता, जेनेटिक्सच्या माध्यमातून कंपन्यांचा त्यावर नियंत्रण आणण्याचा कावा, पाण्याचे वाढते दुर्भिक्ष्य, मरू घातलेले समुद्र, वाढती विषमता असं सगळं असूनही जणू काहीच प्रश्न नाही असा आव आणून लोकांची दिशाभूल करण्याचं काम ही मार्केट इकॉनॉमी करते.

त्या बाजाराच्या चमचमाटापुढे हतबल होऊन माणूस पुढ्यात आलेल्या गोष्टींचा उपभोग घेत राहतो, नवे नवे तंत्रज्ञान, नवे फोन, नवे संगणक, नवे टीव्ही येतच राहतात आणि अखेर मार्केटच माणसाचा उपभोग घेऊ लागते.

असा आपल्या प्रत्येक गरजेचा गुलाम झालेला माणूस त्या गरजा पूर्ण होत नसतानाही त्याच्या आभासासाठी रात्रंदिवस खपत राहतो. आयुष्यातला एक तृतीयांश भाग काम करण्यात आणि एक तृतीयांश भाग झोपेत काढल्यावर उरलेल्या वेळात माणूस आपण सुखी आहोत असे स्वतःला ओरडून ओरडून सांगत राहतो पण मार्केटच्या प्रगतीच्या जुलूसात त्याचा आवाज त्याला स्वत:लाही ऐकू येत नाही.

१. Fekri Hassan, Demographic Archaeology (New York: Academic Press, 1981). Cited in "My Name Is Chellis And I Am In Recovery From Western Civilization"
२. Vandana Shiva, "Soil Not Oil" (Southpress)

Wednesday, August 8, 2012

धडा

काळं आकाश करडं होताना शंभूने हॉटेलाची फळकुटं उघडली आणि इतकावेळ दाराच्या फटीतून हळूहळू झिरपणारी गार हवा शाळा सुटलेल्या पोरांच्या लोंढ्यासारखी उघड्या दारातून भस्सकन आत आली. गोणपाटावर मुटकुळं करून पडलेल्या पिंट्याने डोळे न उघडताच अंगावरची सोलापुरी चादर डोक्यावरून ओढून घेतली आणि तिच्या ओशट वासात आपल्यापुरता उबदार अंधार निर्माण करायचा प्रयत्न केला. मिठाया झाकून ठेवलेल्या 'डिस्प्ले'च्या काचेच्या कपाटावर कुलूप ठेवत शंभू आत आला. खालच्या बाजूला असलेल्या हनुमान नगर झोपडपट्टीत त्याची खोली होती आणि रोज सकाळी यावेळी येऊन हॉटेल उघडायचा त्याचा शिरस्ता होता.


"उठे...", तोंडातल्या काळ्या दंतमंजनाची खारटतुरट लाळ खालच्या ओठाने सावरत मागच्या मोरीकडे जाताना तो गुरगुरला. पिंट्याने हालचाल केली नाही.

मोरीत जाऊन नळाखाली खळखळून चुळा भरून अंगातल्या हिरव्या बनियनला तोंड पुसत शंभू परत आला आणि पिंट्याच्या जवळ येऊन त्याने दोन्ही हात वर ताणून एकदा जोरदार आळस दिला.

मग पायाने त्याने पिंट्याच्या मुटकुळ्याला ढोसलं,"उठे पिंट्या भाड्या, आत्ता गिर्‍हाईक यायला लागंल बघ. उठ नायतर पानी वतीन."

बोलल्याप्रमाणे करायला तो कमी करत नाही हे अनुभवाने माहित असल्याने पिंट्याने एकदा जोरदार चुळबूळ केली आणि मग उठून झोपाळलेल्या डोळ्यांनी कुबड काढून बसून राहिला.

शंभूने दोनपैकी एक गॅसस्टो पेटवला आणि त्यावर मोठं पातेलं ठेवून चहाच्या तयारीला लागला. स्टो पेटलेला पाहून नाईलाजाने पिंट्याने आपल्या लुकड्या पायांवरची चादर बाजूला केली आणि उठून उभा राहिला. शंभूसारखाच हात वर नेऊन आळस देत तो मोरीकडे गेला आणि दोन मिनीटातच तोंड धुवून शर्टाच्या बाहीला पुसत पुसत बाहेर आला. पेटत्या स्टोच्या नुसत्या आवाजानेच त्याच्या पोटात भूक उसळायला लागली होती. पटापट त्याने चादरीची घडी घातली, गोणपाट उचलून ठेवले, दाराच्या बाजूला एका कोपर्‍यात ठेवलेला खराटा घेऊन तो बाहेर आला. खराखरा अंगण झाडून घेतल्यावर मोरीतून एक बादलीभर पाणी बाहेर नेलं आणि मगाने अंगणात सगळीकडे सारखं शिंपडलं. मग परत आत येऊन आत रचून ठेवलेली प्लॅस्टिकची टेबलं आणि खुर्च्या एकेक करून बाहेर नेऊन मांडून ठेवली आणि कपाटापाशी पडलेल्या कळकट फडक्याने एकदा खसाखसा पुसून काढली. एवढं होईपर्यंत चहाचा सुगंध आसमंतात दरवळायला लागला आणि पोटातली भूक पुन्हा उसळायला लागली. पण पिंट्या आत आला नाही. एक डोळा शंभूकडे ठेवून त्याचं काम चालूच होतं. कपाटातल्या मिठायांची ताटं झाकणारे वर्तमानपत्रांचे कागद त्याने अलगद काढले आणि घडी घालून कपाट आणि भिंतीच्या मधल्या सापटीत सारले. हातातल्या फडक्याने तो ते कपाट हळूहळू पुसू लागला तेव्हा शंभू हातात एक चहाचा ग्लास घेऊन बाहेर आला. रस्त्याच्या कडेला उभा राहून त्याने उगवत्या सूर्याच्या दिशेने एकदा ग्लासासकट हात जोडल्यासारखं केलं, उजव्या हाताने अलगद गालांवर एकेक चापटी मारून घेतली आणि मग तो ग्लासभर चहा जमिनीवर ओतून दिला.

"चल रे, च्या घे", आत जाताजाता तो पिंट्याला म्हणाला आणि पिंट्याने हातातलं फडकं जागीच खाली टाकलं.

त्यांचा चहापाव खाऊन होईपर्यंत कोवळी उन्हं हॉटेलच्या दारात आली होती आणि रस्ता जागा झाला होता. हॉटेलसमोरच्या शाळेचं भलंमोठं लोखंडी गेट उघडलं होतं आणि पांढरे-निळे कपडे घातलेला मुलगा मागच्या सीटवर घेऊन एक स्कूटर फर्र्कन गेटमधून आत गेली. पिंट्याचा दिवस चालू झाला.

लवकरच रस्ता स्कूटर आणि मोटारींनी भरून गेला. त्या गाड्यांच्या भोंग्यांचा आवाज, मुलांचा आरडाओरडा, आईच्या किंवा बाबाच्या सूचना, टाटा-बायबाय या सगळ्या आवाजांनी रस्ता दुमदुमून गेला. पण पिंट्याला तिकडे लक्ष द्यायला आता वेळ नव्हता. शंभूने बटाटेवड्यांचा पहिला घाणा तेलात सोडला. आजूबाजूची दुकानं उघडू लागली. हनुमान नगरातले लोक कामावर निघाले. उघडलेल्या दुकानांमधून सटासट चहाच्या ऑर्डरी येऊ लागल्या. कामावर जाणारे लोक जाण्यापूर्वी चायखारी किंवा वडापाव खायला येऊन थांबू लागले. वायरीच्या बास्केटमध्ये चहाचे ग्लास घेऊन पिंट्या इकडून तिकडे पळू लागला. टेबलाशी बसलेल्या लोकांच्या प्लेटा नेऊन देऊ लागला, रिकाम्या प्लेटा आणि ग्लासेस आत नेऊन मोरीतल्या बादलीत टाकू लागला, संपले की विसळून आणू लागला, गिर्‍हाईक उठून गेलं की लगेच फडकं मारू लागला. गरम वड्यांचा वास त्याच्या नाकापर्यंत गेला तरी त्याच्या मेंदूला त्याची दखल घ्यायची फुरसत नव्हती. शाळेत आता "याकुन देन्दु" का कायशीशी प्रार्थना सुरु झाली होती; ते शब्द त्याच्या कानावर पडत होते पण ते नक्की काय म्हणतात ते ऐकायला तो थांबू शकत नव्हता.

तीन चार तास असेच उडून गेले. सकाळचा चहा घेणारे येऊन गेले, नाष्ट्याला वडापाव खाणारे येऊन गेले, मध्येच उगीचच मिसळपाव खाणारे येऊन गेले, सकाळची शाळाही सुटली, सकाळची जाणारी लहान पोरं आणि दुपारची येणारी मोठी पोरं असा दुप्पट कोलाहल करून रस्ता आता थोडा निपचित झाला, काचेच्या कपाटावर ताटात ठेवलेले वडे गारढोण झाले. पिंट्याला आता भुकेची जाणीव झाली पण तो हॉटेलच्या उंबर्‍यावर, शाळेच्या खिडक्यांतून दिसणारी पोरं पाहात , गुपचूप बसून राहिला. पाच-दहा मिनीटांतच शंभूने दोन्ही स्टो बंद केले आणि पिंट्याचा चेहरा उजळला.

बकाबका खाऊन झाल्यावर शंभू थोडा लवंडला आणि कोनाड्यातल्या गोट्या घेऊन पिंट्या हळूच बाहेर सटकला. त्याची ही रोजची तासभराची मधली सुट्टी घालवायला नेहमीप्रमाणे हळूच शाळेच्या गेटमधून आत गेला. शाळेच्या पोर्चच्या पायरीवर जाऊन बसायला त्याला फार आवडे. हनुमान नगरातला सदामामाच तिथे शिपाई होता, तो पिंट्याला तिथे बसू देई, खेळू देई; पण कोणी मास्तर-बाई आलंच चुकून तर तेवढ्यापुरतं हुसकल्यासारखं करी. पोर्चमध्ये या वेळेला कोणी नसे. दुपारची मोठ्या पोरांची शाळा भरलेली असे. काही वर्गातून मुलांचा गाणं म्हणतानाचा आवाज येई, काही वर्गातून पोरा-पोरींचा हसण्या-खिदळण्याचा आवाज येई किंवा कधीकधी कुठलाच मोठा आवाज नसला तरी मधमाशांच्या पोळ्यासारखी नुसतीच गुणगुण ऐकू येई. पिंट्याला ते आवडे. त्याला त्याची गावाकडची शाळा आठवत असे, त्याचे तिथले मित्र आठवत असत.



नेहमीप्रमाणे दुडकत आणि खिशात गोट्या खुळखुळवत पिंट्या पोर्चच्या पायरीवर येऊन बसला पण आत पाहिले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. पोर्चमध्ये भिंतीशी ठेवलेला बाक नेहमीप्रमाणे रिकामा नसून आज त्यावर एक गोबर्‍या गालाचा मुलगा दप्तर पाठीला लावून आणि वॉटरबॅग शेजारी ठेवून पाय हलवत बसला होता. पिंट्याने त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्यानेही पिंट्याकडे पाहिले. पिंट्याने हळूच खिशातून गोट्या काढल्या आणि त्यातली एक त्या मुलाला दिसेल अशी ठेवली आणि मग थोडं मागे सरकला. दुसरी गोटी उजव्या हाताचा अंगठा टेकवून मधल्या बोटाने ताणून सोडली आणि टक् आवाज करून पहिली गोटी बरोब्बर उडवली. मग स्वत:वरच खूश होऊन हसत त्याने त्या मुलाकडे पाहिले. त्या मुलाच्या डोळ्यात उत्सुकता उमटली होती आणि तोंडावर हसू. झटकन तो मुलगा उठला आणि वॉटरबॅग घेऊन पिंट्याच्या दिशेने आला.

"हे काय आहे? मी पण खेळू?", उकीडवा बसत त्याने विचारले.

"गोट्या.", होकारार्थी मान हलवत पिंट्याने सांगितले.

मग त्या मुलानेही फतकल मारली आणि दोघं थोडावेळ खेळत राहिले.

"व्हॉट्स युवर नेम?", त्या मुलाने मध्येच विचारले

"आं?"

"तुझं नाव काय आहे?"

"पिंट्या. तुझं?"

"आर्यन. मी सेकण्डमध्ये आहे. तू?".

"मी? मी शाळेत नाय जात. म्हनजे गावाकडं जायचो, तिसरीत. पन इकडं आल्यापासून नाय जात."

"मग तुझे ममा-पपा तुला रागावत नाहीत?"

"नाय. मी शंबूकाकाच्या हाटेलात काम करतो. माझे आई-बा तिकडं गावाकडं असत्यात."

"तू कशाला इकडे आलास मग?"

पिंट्या दोन मिनीटे शांत बसला.

"ही माजी खरी आई नाय. ही दुसरी आई हाय. लई त्रास द्यायची. मारायची. म्हनून मी पळून आलो इकडं. शंबूकाका इतं भेटला मला. ते त्याचं हाटेल हाये समोर."

पिंट्याने हात लांबवून दाखवलं. आर्यनने एकदा त्या दिशेकडे पाहून मान डोलावली आणि पुन्हा खेळण्यात लक्ष घातले.

"मला देतोस दोन गोट्या?", थोड्या वेळाने आर्यनने अचानक विचारले.

"च्यक.", त्याच्याकडे न पाहताच पिंट्याने गोट्या आवरल्या आणि खिशात टाकल्या.

"तुला शाळेत नाय जायचं?", पिंट्याने उलट विचारलं.

"शाळा सुटली. मी ममाची वाट पाहतोय. आज व्हॅनवाले अंकल येणार नव्हते ना म्हणून पपाने सोडलं सकाळी.", आर्यन म्हणाला आणि आईच्या आठवणीने त्याने एकवार रस्त्याकडे पाहिले.

दोन मिनीटे शांततेत गेली. आर्यन शाळेच्या गेटमधून रस्त्याकडे पाहात राहिला आणि पिंट्या शाळेतून येणारे आवाज ऐकत राहिला. तितक्यात "ममा" असा एकच शब्द उच्चारून आर्यन लगबगीने उठला आणि वॉटरबॅग घेऊन पोर्चच्या पायर्‍या उतरू लागला. पिंट्याने पाहिलं तर शाळेच्या गेटमधून लाल मोटार आत येत होती. गेटच्या बाजूच्या भिंतीशी गाडी थांबली आणि त्यातून आर्यनची आई उतरली. आर्यन तिच्याकडे आणि ती आर्यनकडे झपाझप चालू लागले. डोळ्यावर गॉगल, मोरपंखी रंगाचा कुर्ता, निळी जिनची पँट घातलेली त्याची आई. पिंट्या पाहातच होता.

"किती भारी दिस्ती त्याची आई!", पिंट्याच्या मनात विचार आला, "एकदम पिच्चरमधल्या आईसारखी."

आर्यन आणि त्याची आई भेटले. आर्यनची आई खाली वाकून त्याच्याशी काहीतरी बोलू लागली, त्याचा चेहरा कुरवाळू लागली. बोलता बोलता ती खाली बसली आणि आर्यनने तिला मिठी मारली. मग ती उभी राहिली आणि आर्यन तिचा हात धरून दोघे गाडीकडे चालू लागली. पिंट्या डोळ्याची पापणी न लववता पाहात होता.

अचानक त्याला काय वाटलं कोण जाणे, त्याने आर्यनला मोठ्याने हाक मारली आणि त्यांच्या दिशेने पळत सुटला. त्याची हाक ऐकून आर्यन आणि त्याची आई थांबले आणि वळून पाहू लागले.

त्यांच्यासमोर जाऊन पिंट्या थांबला आणि त्याने खिशातून चारही गोट्या काढून आर्यन समोर धरल्या.

"धर. घे तुला.", कसल्यातरी आनंदाने तोंडभर हसत पिंट्या म्हणाला.

आर्यनने गोट्यांकडे पाहिले पण गोट्या न घेता मान वर करून आईकडे पाहिले. त्याच्या नजरेबरोबर पिंट्याचीही नजर त्याच्या आईच्या चेहर्‍यावर खिळली. गॉगलच्या काचेआडून ती आपल्याकडे बघते आहे हे पाहून पिंट्या थोडासा लाजला.

"नो बेटा. त्याच्या नको घेऊस. मी तुला नवीन आणीन, ओके?", पिंट्याकडे पाहात ती लालचुटूक ओठांतून आर्यनला म्हणाली. पिंट्याचे डोळे परत आर्यनवर खिळले. मघाशी मोगर्‍यासारखं फुललेलं पिंट्याचं हसू आता थोडंसं कागदी फुलांसारखं निर्जीव होऊ लागलं होतं. आर्यनने नको म्हणून मान हलवली आणि तो आणि त्याची आई पुन्हा गाडीकडे चालू लागले. पिंट्या हात तसाच पुढे धरून आणि चेहर्‍यावर ओशाळपणे ओसरणारं हसू घेऊन दोघांना जाताना पाहात राहिला. गाडीचं दार उघडून ती दोघे आत बसल्यावर पिंट्याची नजर खाली झुकली. हातातल्या गोट्यांकडे तो पाहू लागला. त्यांचे लाल,निळे बिलोरी रंग बघता बघता त्याला त्याची वाढलेली काळी नखं दिसू लागली, डाग पडलेला तळहात दिसू लागला, त्याच्या मागचा हडकुळा हात दिसू लागला, अंगातला मळकट शर्ट, त्याच्याखालची फाटकी विरलेली चड्डी आणि तिच्यातून बाहेर आलेले हडकुळे आणि सडा घालताना शिंतोडे उडलेले पाय दिसू लागले. त्याने पुन्हा एकदा मान वर करून पाहिलं तेव्हा ती लालचुटूक गाडी शाळेच्या गेटबाहेर पडत होती.

पिंट्याला काहीतरी समजल्यासारखं वाटलं. गोट्यांसकट हात खिशात घालून, मान खाली घालून तो शाळेकडे न बघता जड पावलांनी हॉटेलकडे चालू लागला.

Monday, February 6, 2012

जन्मठेप

फिनाईलच्या त्या अभद्र वासातून बाहेर पडून तो त्या हॉस्पिटलच्या सदैव आ वासलेल्या पोर्चमध्ये आला तेव्हा शहराच्या चिरपरिचित दुर्गंधीने त्याला पुन्हा वेटोळे घातले. आतून काचेच्या खिडकीतून दिसणारी झळाळती कलती दुपार बाहेर आल्यावर त्याला नासलेल्या आंब्यासारखी वाटू लागली. एका झुळझुळणार्‍या संध्याकाळी गाव सोडून साचलेल्या गाळासारख्या दमट सकाळी त्याने या शहरात पाय ठेवला तेव्हाही त्याला त्या दुर्गंधीने असेच मख्खपणे वेटोळे घातले होते. ते लाजिरवाणे दिवस आठवले की त्याला अगदी कसेनुसे होई आणि मानेला झटका देऊन तो तोंडाने काहीतरी असम्बद्ध बोले.
कधीकाळी रूपवान असलेल्या जख्ख वेश्येसारखे त्याचे गाव होते. तालुक्याचे गाव. पूर्वी कोणातरी सम्राटाने वसवलेले व्यापाराचे केंद्र. पावसाळ्यात डोक्यावर ढग बांधणार्‍या हिरव्यागार डोंगरांनी वेढलेले. पाचूच्या दागिन्यातून दिसणार्‍या फोडासारखे गाव. काप जाऊन उरलेल्या भोकांमध्ये राहणार्‍या दलालांचे गाव. त्या गावातल्या रस्त्यांवर सुखवस्तुंच्या घरातल्या सांडपाण्याच्या नद्या वाहत असत आणि त्यातून श्रीमंतांच्या गाड्या गेल्या की गाळाचे शिंतोडे पायी चालणार्‍या गरीबांवर उडत. अशा रस्त्यावर वाहणार्‍या अनेक ओघळांपैकी कोणत्यातरी एका ओघळाच्या उगमापाशी त्याची आई धुणं-भांडी करत बसलेली असायची आणि एखादा ओघळ मोठ्या गटारीला जिथे मिळतो तिथे त्याचा बाप दारू पिऊन पडलेला आढळायचा.
या सगळ्यांपासून दूर डोंगरउतारावर बोरे,चिंचा,पेरू,करवंदे खात आणि सशांच्या मागे हुंदडत सळसळणारे त्याचे बालपण एकदिवस त्याच्या आईने महात्मा विद्यालयाच्या दावणीला बांधले. डोक्याला रोज तेल लावून येणारी गोरीगोबरी मुले, सकाळीसकाळी केलेल्या पुजेत लावलेल्या अगरबत्तीचा गंध वागवणारे मास्तर, मागच्या बाकड्यांवर जमा झालेली त्याच्यासारखीच काही चुकार मेंढरे आणि इतिहास-भूगोलाची सरकारी छापील पुस्तके यांच्या संगतीत त्याचे दिवस रसहीन होऊ लागले. ज्यांच्या घरी त्याची आई काम करायची अशा मुलांच्या नजरा चुकवत, आया-मावश्यांनी लिहून दिलेल्या त्यांच्या निबंधांचे मास्तरांनी केलेले कौतुक ऐकत आणि कोपर्‍यातल्या जागेत बसून दूर दिसणारे डोंगर बघत त्याने शाळेची आणि कॉलेजची शिक्षा संपवली. डोंगरउतारावरच्या सुखाचा त्याग करून कॉलेज कँटीनमधल्या टवाळक्यांचा आनंद मिळवला. कबर्‍या रंगाचे गोबरे ससे सोडून डिग्रीचा कांचनमृग मिळवला. त्याची अडाणी आई धन्य-धन्य झाली. भिजल्या डोळ्यांनी कामाच्या ठिकाणी मूठमूठ पेढे वाटून आली. त्याला कुठंतरी चिकटवण्यासाठी साहेब लोकांना गळ घालून आली. तोही पेपरातल्या जाहिराती वाचून कामधंदा शोधायला भटकू लागला. सरकारी नोकरीच्या लोभस ढेपेला परंपरागत चिकटलेल्या आणि आरक्षणातून चिकटलेल्या मुंगळ्यांपैकी एक होण्याचाही त्याने प्रयत्न केला. सरकारी खात्यांच्या आणि बँकांच्या कसल्या कसल्या परीक्षा देऊ लागला. शिक्षा संपली तरी त्याची परीक्षा संपली नाही. वस्तीतल्या चौकात टवाळक्या करणार्‍या घोळक्यातल्या निरर्थकपणे उगवणार्‍या दिवसांच्या सिगारेटी वळून कोडगेपणाचा धूर सोडणार्‍या लोकांचा त्याला हळूहळू हेवा वाटू लागला. त्याचा बाप अधिकृतपणे मेला आणि आई आपला उद्धार होत नाही हे पाहून खचली. त्याला शिव्या-शाप देऊ लागली. शेवटी जसे सांडपाण्याचे सगळे ओघळ मोठ्या गटारीला जाऊन मिळावे तसे सगळ्या लाचार अस्तित्वांचे लोंढे जाऊन मिळणार्‍या या शहरात तो आला.
ते आठवून तोंडात जमा झालेला कडवटपणा त्याने थुंकून टाकला आणि सिगारेट काढायला खिसे चाचपू लागला. पँटच्या उजव्या रिकाम्या खिशावर हात ठेवताच त्याच्या पोटात एकदम धस्स झालं, पण पुढच्याच क्षणाला त्या खिशातली जपून आणलेल्या नोटांची गड्डी आत हॉस्पिटलच्या कॅशियरकडे देऊन आलो आहोत हे त्याला आठवले. त्याचा धसका नाहीसा झाला पण कपाळावरच्या आठ्यांमध्ये आणखी एकीची भर पडली. चार दिवसांपुर्वीच झालेला पगार जवळजवळ संपला होता आणि अजून आख्खा महिना आ वासून पुढे उभा होता. जिकडून मिळेल तिकडून उधार-उसनवारी करून, कर्जे काढून झाले होते आणि पुढची वीस वर्षे ही कर्जे फेडण्यात जाणार हे त्याला कळून चुकले होते. आणखी पैसे मिळण्याचे मार्ग संपले होते आणि पैशाअभावी आता हे उपचारांचे नाटक थांबवावेच लागणार होते.
चुपचाप त्याने खिशातून सिगारेट काढून पेटवली आणि एक झुरका घेऊन खाली मान घालून जमिनीकडे धूर सोडू लागला.
शहरात आला तेव्हा पांडुरंग राशिनकराच्या खोलीवर उतरला होता. उतरला त्याच दिवशी पांडुने त्याला तो काम करत असलेल्या छोट्याशा कारखान्यात नेले. जाताना स्टेशनवर रूळ ओलांडताना अचानक वाजलेल्या लोकलच्या भोंग्याने तो कितीतरी दचकला आणि पांडू आपले गुटखा खाऊन लाल झालेले दात दाखवत खदखदून हसला होता.
"हे तुझं दुसरं घर", लोकलकडे बोट दाखवून पांडू म्हणाला,"दिवसातले चार-पाच तास तुला यातच काढायचेत."
तेव्हा समोरून लोकलकडे पाहताना मोठ्ठं ठसठशीत गोल कुंकु लावणार्‍या त्याच्या आईसारखीच वाटली होती ती त्याला. जिना चढून, तिकीट काढून प्लॅटफॉर्मवर उतरला तेव्हा कुठे त्याला त्या चेहर्‍याच्यामागे लपवलेले लांबचलांब पिंजरे दिसले. तरीही त्याला ती आईसारखीच वाटली, काहीतरी करायला भाग पाडणारी.
त्या दिवशी पांडुच्या मार्गदर्शनाखाली धक्काबुक्की करत तो गर्दीत शिरला आणि मग आत जाऊन दोघे एकमेकाला जवळजवळ चिकटून उभे राहिले. त्या गर्दीतच पांडुने त्याला त्या शहराबद्दल, तिथल्या श्रीमंतीबद्दल, समुद्रकिनार्‍यांबद्दल, तिथे चालणार्‍या धंद्यांबद्दल, शहरावरची सत्ता वाटून घेणार्‍या राजकारण्यांबद्दल, गुन्हेगारांबद्दल आणि कचकड्याच्या दुनियेतल्या सिनेकलाकारांबद्दल सुरस कथा सांगितल्या तेव्हा तो थरारून गेला होता. अगणित शक्यता असलेल्या या शहरात कदाचित काहीतरी चमत्कार घडेल असे त्याला वाटले. काहीतरी घडून आपले आयुष्य बदलेल असे त्याला वाटले. काहीतरी म्हणजे काय हे मात्र त्याला ठरवता आले नव्हते.
पांडुच्या मुकादमाने त्याला लगेच कामावर ठेवायची तयारी दाखवली आणि ज्यावर चर्चा करणे शक्य नाही अशा आवाजात पगाराचा आकडा आणि सुट्टीचे दिवस वगैरे ऐकवले. पांडुच्याच हाताखाली त्याला सोपवून मुकादम निघून गेला आणि पांडुने त्याची एका यंत्राशी गाठ घालून दिली. त्यादिवसानंतर आठवड्यातले सहा दिवस आठ तास त्या यंत्राशी कसे वागायचे ते पांडुने त्याला समजावून सांगितले आणि त्याची नोकरी सुरु झाली.
काही दिवस मजेत गेले. तो आणि पांडू बरोबरच कामावर जायचे आणि काम संपल्यावर एकत्रच फिरायचे. पांडू त्याला श्रीमंत वस्त्यांमधून घेऊन जायचा आणि काहीतरी सुरस ऐकीव गोष्टी सांगत तिथल्या टोलेजंग इमारतींकडे, बंगल्यांकडे, रस्त्यावरून जाणार्‍या गाड्यांकडे आणि गाड्यांमधल्या बायांकडे आशाळभूतपणे पाहायचा. किंवा समुद्रकिनारी जाऊन ते वेळ काढायचे आणि पांडू तिथे आलेल्या जोडप्यांचे प्रणयचाळे पाहून चेकाळायचा, अचकटविचकट बोलून हसायचा, करमणूक करून घ्यायचा. किंवा दोघे चित्रपट पाहायला जायचे आणि संपल्यावर पांडू त्या नटीबद्दल, चित्रपटातल्या प्रसंगांबद्दल भरभरून काहीतरी बोलत राहायचा. किंवा मग त्याला खोलीवर पाठवून स्वत: हिडीस रंगरंगोटीखाली त्याहूनही हिडीस असे दु:ख लपवणार्‍या कुठल्याशा गल्लीत अदृष्य व्हायचा. त्याला हे सगळं नवं होतं आणि तो उत्सुकतेने सगळं पाहात होता. पगारातला काही भाग तो घरी पाठवत असल्याने आईही खूश असायची.
पण हळूहळू सगळं त्याच्या मनात साचत जाऊ लागलं. रोज सकाळी तीच वस्ती, तीच दमट साचलेली हवा. स्टेशनवरची तीच गर्दी आणि पिंजरा घेऊन येणारी आणि कधीकधी भोंगा वाजवून खिजवणारी तीच लोकल. पांडुची तीच वाह्यात बडबड आणि तेच फालतू विनोद. त्या शहराचा वखवखलेपणा आणि तुस्तपणा पाहून तो उबगून गेला.
काही दिवसांनी पांडूचं लग्न झालं आणि त्याने वेगळी खोली घेतली. त्यांचं बरोबर जाणं बंद झालं आणि तो एकटा जाऊ लागला. पांडुची उबग आणणारी बडबड बंद झाली या आनंदात काही दिवस गेले. तो आता गर्दीत धक्के खात खात पुस्तके वाचू लागला. लोकांच्या सुखदु:खाच्या गोष्टी, कोणा महान नेत्याचे चरित्र आणि कोणा नाटककाराची कुरुपता उघडी पाडणारी नाटकं असं रस्त्याच्या कडेला मिळेल ते वाचू लागला. दोन स्टेशनांच्या मध्ये आकाश दिसेल असे आणि ताजी हवा वाहेल असे मोकळे मैदान असावे आणि त्यातून फारशी न खडखडता लोकल जावी तसे आयुष्य चालले होते. पण आईच्या त्या पत्रातून आलेले ते घातक वळण त्याला दिसले नाही. भूक लागलेल्या माणसाने जंगलातले लालजर्द फळ आधाशासारखे खावे तसे सगळे झाले. जगाच्या रीतिरिवाजाप्रमाणे तो मार्गाला लागला. गृहस्थ झाला. आईच्या इच्छापूर्तीची आणि स्वतःच्या वासनापूर्तीची धुंदी हळूहळू उतरली तोपर्यंत आईने डोळे मिटले. तिचे शेवटचे सगळे सोपस्कार आटपून तो आला तेव्हा त्याचे सगळे मागचे धागे तुटलेले होते. तो आता फक्त या शहराचा आणि त्याच्या बायकोचा होता.
त्याने दुसरी सिगारेट काढून पेटवली आणि अस्वस्थपणे भकाभक दोन झुरके मारले.
त्याची बायको आई होणार हे ऐकल्यावर त्याला त्याच्या मनात आहेत हेच माहित नसलेले कोणतेतरी सुखतंतू मोहरले होते. पण काही काळच. त्यानंतर लोकलच्या गर्दीत तो अवघडून उभा असताना एक दिवस अंधारात इंगळी डसावी तसा त्याला त्या वाक्याचा अर्थ कळला. त्याची बायको आई होणार होती म्हणजे त्याचे मूल तो होणार होते. त्यादिवशी त्याने डोळे उघडून दाही दिशांना पाहिले. लोकलच्या त्या घामट गर्दीत विझलेल्या डोळ्यांनी आणि बधीर झालेल्या मनांनी उभी असलेली सगळी माणसं त्यानं नीट पाहिली. खुरटलेल्या दाढीचा आणि खप्पड चेहर्‍याचा कोणी, काळाकभिन्न आणि सुरकुत्या पडलेला कोणी किंवा खिडकीशी जागा मिळाली यातच खूप खूश असलेला कोणी अशी ही सगळी माणसं कधीतरी मुठी चोखत हसणारी तान्ही बाळं असतील असे त्याला वाटले. त्या जीवांना आपल्या जाळीदार पोटात घेऊन पळणारी ती लोकल त्याला त्याक्षणी पक्ष्यांची पिले खाणार्‍या नागिणीसारखी वाटली होती. त्याचे लहान मूल या जगात येईल तेव्हा हीच नागिण त्यालाही पोटात घेणार होती. हे असे काही होऊ देणार नाही हा निश्चय त्याने तेव्हाच केला होता. रक्ताचं पाणी करून कष्ट करू पण आपल्या मुलाला चांगले आयुष्य देऊ असे त्याने तेव्हाच ठरवले. नोकरी करून साईड बिझिनेस करू, दोघेही अविश्रांत काम करू आणि या जगाच्या उतरंडीच्या वरच्या पायर्‍यांवर मुलाला घेऊन जाऊ हे त्याने ठरवून टाकले. आपल्या मुलासाठी या विक्राळ समाजव्यवस्थेने ठोठावलेली सश्रम जन्मठेप जगायला त्याने आपल्या मनाची तयारी केली.
त्याची दुसरीही सिगारेट संपली आणि त्याने ती खाली टाकून आपल्या हजारोवेळा शिवलेल्या चपलेखाली पार चप्पट होईपर्यंत चिरडली. हॉस्पिटलच्या दाराकडे त्याने वळून पाहिले. एमआरआय रूमबाहेर पोराला घेऊन बाकड्यावर वाट पाहत बसलेली बायको त्याच्या डोळ्यासमोर आली. आल्या प्रसंगाला चिवटपणे सामोरी जाणारी. आयुष्याकडून दुसरी कसली अपेक्षा करायची असते हेच माहित नसणारी. बाहेर जगात दिसणारा झगमगाट, चमचमाट आपल्यासाठी नाहीच हे सहजपणे मान्य करणारी आणि त्या जगाचे नियम पाळून दोन वेळचे जेवण मिळावे म्हणून त्या झगमगाटासाठी आपले रक्त आटवणारी.
मूल मतिमंद आहे हे सुद्धा तिने किती शांतपणे स्वीकारले! त्याला मात्र सुंदर वेष्टन असलेले भेटवस्तुचे खोके उघडावे आणि आत काळाकभिन्न जहरिला साप असावा तसा झटका बसला होता.
का? का? का? त्याने हजारवेळा स्वतःला विचारले असेल. त्याला उत्तर नाही मिळाले. बायकोच्या कुपोषित शरीराकडे तो पाहायचा तेव्हा त्याचे डोळे भरून यायचे. तिचे बालपण कसे गेले होते कोण जाणे? कोणी तिच्या वाटेचे अन्न हिरावले होते? कोणी तिला आणि अशा अनेक मुलांना अर्धपोटी जगण्याची शिक्षा फर्मावली होती? कोणी?
प्रगतीचा आणि कल्याणाचा डिंडिम वाजवणार्‍या या व्यवस्थेत कोण त्याच्या मतिमंद मुलाला सुखी आयुष्य देणार होते? आणि का म्हणून? कोणी सगळी सूत्रं हातात घेतली आणि ठरवले की दुर्बळांनी मरावे हे वाईट आहे आणि त्यांनी हालाखीचे आयुष्य काढावे हे चांगले आहे? कोणी?
दोन वर्षापुर्वी टिपेस गेलेली त्याची तगमग सुप्त ज्वालामुखीच्या तप्त लाव्हासारखी त्याच्या मनाच्या तळातून पुन्हा वर उसळली. कपाळावरच्या आठ्या घट्ट करत तो आत गेला तेव्हा बायको एमआरआय रूममधून बाहेर येत होती. रिपोर्ट घेऊन दोघे डॉक्टरच्या खोलीत गेले. पडद्यावर फोटो लावून डॉक्टरने पाहिले. मग वळून औषधे लिहून देऊ लागला.
"मी औषधे बदलून देतो. ही औषधे घेऊन पाहू या काही फरक पडतोय का ते.", डॉक्टर म्हणाला.
त्याने मान हलवली. दोन वर्षे दर महिन्याला अर्धा पगार आणून हॉस्पिटलच्या घशात ओतूनही हाती काहीच लागलं नव्हतं आणि डॉक्टर अजून पोकळ आशावादाच्या गोळ्या खिलवत होता. त्याच्या डोक्यातून सणक गेली. खूप ताडताड बोलावं वाटलं पण वर्षानुवर्षांच्या सवयीने शब्द गळ्यातच विरले. डॉक्टरच्या हातावरचे मोठ्ठे चकाकते घड्याळ, खिशातला लांब-रुंद मोबाईल, खिडकीच्या बाहेर उभी असलेली त्याची चकचकीत गाडी फक्त पाहात राहिला.
औषधांची यादी घेऊन निमूटपणे ते निघाले. स्टेशनवर जाताना बायकोकडून त्याने पोराला घेतले नाही. तो पुढे आणि बायको मागे चालू लागले. गर्दीतून चालताना पावला-पावलाला त्याच्या डोक्यात सणक जात होती. कचरा, धूळ आणि लोकांनी भरलेलं ते शहर त्याच्याभोवती फेर धरून नाचतंय असं त्याला वाटू लागलं.
स्टेशनावर जाऊन उभे राहतात न राहतात तोच कुठूनतरी वास लागल्या सारखी लोकल त्याच्या पुढ्यात येऊन उभी राहिली. रोजच्या आठतासांची समिधा घालून आलेल्या लोकांना गिळून ती ओसंडत होती. एखाद्या टपोर्‍या मांसल अळीने मुंगी गिळावी तसा तो त्या लोकलमध्ये ओढला गेला. त्याच्यासारख्या कित्येक लोकांनी तो क्षणार्धात वेढला गेला. आठही बाजूंनी माणसं येऊन त्याला चिकटली आणि लोकल नवीन शिकार शोधायला निघाल्यासारखी दबा धरून हळूहळू निघाली.
तो एका पायावरून दुसर्‍या पायावर वजन टाकत उभा राहिला. तोंडाच्या अगदी जवळ तोंड आणून उभे असलेल्यांच्या निर्जीव नजरा टाळून दाराच्या दिसणार्‍या कोपर्‍यातून बाहेर पाहू लागला. फोडासारख्या तरारलेल्या इमारतींच्या पार्श्वभूमीवर केसांसारखा दिसणारा विजेच्या तारांचा गुंता, त्यात अडकलेले निर्जीव झालेले निरागस दुर्दैवी समाधानाचे पतंग, वखवखलेल्या या शहराने ज्याची दृष्टी आपल्या अखंड आणि प्रचंड गोंगाटाखाली चिरडली असं एखादं जळालेलं वाघूळ, असंख्य माणसांच्या अमर्याद गरजांसाठीचे भोगसामान वाहण्यासाठी निर्माण झालेल्या प्लॅस्टीकच्या पिशव्या, आपल्या खुराड्याच्या जाळीच्या छिद्राला खिडकी समजून तिच्यात वाळत घातलेल्या आणि पिऊन ओकणार्‍या गाड्यांच्या धुराने वर ढकललेल्या केविलवाण्या हवेने उडून पडलेल्या शर्टांपासून ब्रा पर्यंत काहीही दिसेल ते.
दोन स्टेशनांच्या मध्ये त्याला वास आला घाण, कारखान्यांच्या किंवा माणसांच्या विष्ठेचा. चकाकणार्‍या मेटॅलिक कलरच्या टंच गाड्यांची किंवा स्लीवलेस ब्लाऊजवर चार बोटं रुंदीचा पदर घेऊन मिक्सरपासून दागिन्यांपर्यंत काहीही मिरवणार्‍या टंच मॉडेल गृहिणींची किंवा माजाने सुजलेल्या चेहर्‍यामुळे बारीक झालेल्या डोळ्यांतून टंच सत्तासुंदरीचा हव्यास गळणार्‍या राजकारण्यांची होर्डिंग्ज मध्येच दिसून त्याच्या डोळ्यांवर आघात करू लागली. अजस्त्र कारखान्यांच्या अनावर प्रसवशक्तीतून पैदा झालेल्या वस्तूंची तुम्हाला किती गरज आहे ते सांगणारी होर्डिंग्ज, राक्षसी भोगातच सुख आहे याची जाहिरात करणारी होर्डिंग्ज, आपल्या अमानवी प्रचारशक्तीनं माणसाचा हवा तसा चौकोनी ठोकळा बनवणारी होर्डिंग्ज, गिळगिळीत आणि गुळगुळीत जगण्याशिवाय गत्यंतर नाही हे सांगणारी होर्डिंग्ज, जगण्यापेक्षा जिवंत राहण्यालाच आयुष्य म्हणणारी होर्डिंग्ज.
प्रत्येक वळणावर विरुद्ध दिशेला घेऊन जाणार्‍या, फुटेस्तवर खाल्लेल्यांना हाताने भरवणार्‍या, जिवंतपणाचं अवास्तव स्तोम माजवून कोट्यवधी लोकांचं जगणं हराम करणार्‍या सगळ्या या नरभक्षक व्यवस्थेचा त्याला भयंकर तिटकारा आला. घशात बोटं घालून सगळे नियम, सगळे संकेत, सगळी जगरहाटी मळमळणार्‍या पोटातून तिथेच ओकून टाकावी किंवा पुलावरून लोकल जाताना कचर्‍याची भरलेली पिशवी फेकतात तसं स्वतःला खालच्या गाळात फेकून द्यावं असं त्याला वाटलं. पण आठही बाजूंनी गर्दीत दाबला गेलेला असताना बोट हलवण्याचंही स्वातंत्र्य आत्ता नाही या विचाराने, पिसाळलेल्या कुत्र्याच्या मागच्या पायांवरून गाडी जावी तशी त्याची क्षुब्धता लुळीपांगळी झाली. डोळ्यात तरळलेलं पाणी पापण्यांनीच टिपायला त्याने डोळे मिटले आणि...
डोक्यावर घणाचा घाव घातल्यासारखा आवाज करत तो स्फोट झाला. त्याचे डोळे आणि तोंड खाडकन उघडले. कानाच्या पडद्यावर आदळून सर्वभक्षक त्सुनामीसारख्या त्या आवाजाच्या लाटा त्याच्या यूस्टेशियन नळ्यांतून रोरावत तोंडात आल्या आणि जीभ, घसा, टाळू, मेंदू सगळं सुन्न होऊन गेले. लोकांनी गच्च भरलेली ती लोकल झिडपिडत रुळांवरून घसरून थांबली. अंगाचा अवयवही हलवायला जागा नसलेल्या त्या एकसंध चरबीच्या गोळ्यासारख्या गर्दीत माणसं धडपडली नाहीत, फक्त एकमेकांवर रेलून दाबली गेली. डब्ब्याच्या भिंतीपाशी उभ्या काही किरकोळ जीवांनी गुदमरून जगण्याचे नाटक संपवले. बाकीचे लवकरात लवकर पायांवर सरळ उभं राहून बाहेर पडण्यासाठी वळवळू लागले. उघड्या दारातून धडाधड उड्या मारायला लागले. "बाँब बॉम्ब," असा जप केल्यासारखा आवाज चारीबाजूनी घुमला. जखमेतून रक्त वाहावं तशा बाहेर वाहणार्‍या गर्दीबरोबर तोही बाहेर वाहत आला. स्फोटाच्या आवाजाने त्याच्या कानात अजूनही चुंई वाजत होतं. बाहेर पडल्यावर त्याला दिसले माणसांचे अवयव, फाटलेली शरीरं, रक्ताची डबकी, जखमी लोकांचे चित्कार आणि बघ्यांचा कोलाहल. रक्ताच्या दर्शनाने काही भोवळ येऊन पडलेले, काही लोक त्या प्रेतांमध्ये आपणही आहोत की काय अशी शंका असल्यासारखी उभी असलेले तर काही स्वतःच्या जिवंतपणावर मनोमन खूश होत तुटक्या फाटक्या शरीरांना मरणापेक्षाही भयंकर असे जीवन द्यायच्या खटपटीला लागलेले.
एका कडेला उभा राहून तो बायकोच्या साडीचा रंग आठवायला लागला, पोराच्या झबल्याचा रंग आठवायला लागला. त्याला नक्की आठवले नाही पण दोघांचेही कपडे लालच असावेत असा विचार त्याच्या मनाला चाटून गेला. फुटलेल्या त्या दोन डब्यांच्या समोरून काही अंतरावरून त्याने सावकाश चालत फेरी मारली. दुरूनच काही दिसतंय का पाहिलं, चादरीत उचलून नेल्या जाणार्‍या जखमींकडे डोकावून पाहिलं. त्याला बायको सापडली नाही. दोन्ही डब्यांभोवती दोन-तीन फेर्‍या मारल्यावर तो कंटाळला. मावळलेल्या सूर्याच्या पश्चात साचणारा अंधार आता समोरचं उध्वस्त दृष्य गिळू पाहू लागला, पण शहरातले दिवे पेटून त्याला रोखू लागले. त्या काळवंडणार्‍या दृष्यावर आपल्या तुटपुंज्या प्रकाशाचे डाग पाडून आणखी भयाण छटा आणायचा कसोशीने प्रयत्न करू लागले.
तो रूळांच्या बाजूला असलेल्या टेकाडावर झुडपाशेजारी बसला. तिथं दिव्यांचा प्रकाश पोचत नव्हता. खिशातून सिगारेट काढून शिलगावली. त्या शहराच्या अविनाशी दुर्गंधीपुढे त्या धुराचा वास त्याला हवाहवासा वाटला. रिकाम्यापोटी दोन कडक झुरके मारल्यावर त्याला गरगरलं आणि चहूबाजूंनी दाटलेल्या अंधारात गजबजलेल्या जगात आता आपण अगदी एकटे आहोत अशी भावना त्याच्या आवळलेल्या पोटातून कारंज्यासारखी थुईथुई उडू लागली. एकटा. स्वतंत्र. आतापर्यंत खुरडत खुरडत इथवर ओढत आणलेलं हे आयुष्याचं ओझं फेकून द्यायला किंवा दूर डोंगराच्या कुशीत किंवा समुद्राच्या कडेवर निरीच्छ जगायला किंवा ज्या व्यवस्थेने जगणे अवघड करून ठेवले तिच्यातल्या पळवाटा शोधायला, उन्मुक्तपणे शरीराचे चोचले पुरवायला, मनाच्या इच्छा ओरबाडून का होईना पूर्ण करायला. तो स्वतंत्र झालेला होता. त्याला आनंद वाटला नाही पण मोकळं वाटलं. कॉलेजच्या दिवसात असायचा तसा बिनधास्तपणा त्याच्या झुरक्यात आला. वर बघून आकाशाच्या तोंडावर धूर सोडताना त्याला शांत शांत वाटलं. तो आता कोणालाही काहीही देणं लागत नव्हता. ज्यांनी हा निरर्थक जन्म दिला ते, ज्यांच्याशी इच्छा नसताना आणि प्रयत्न करूनही तुटत नाहीत असे मनाचे नाजूक तंतू जोडले गेले ते सगळे नाहीसे झालेले होते. आता फक्त तो आहे आणि ही समोरची गर्दी. त्या गर्दीतल्या जंतूंशी मनसोक्त खेळ करायला, वापरून घ्यायला, सूड घ्यायला आणि नंतर मन भरलं की त्या बजबजपुरीतून निघून जायला तो मोकळा होता.
त्याने सिगारेट विझवली आणि उभा राहून खिशात हात घालून चालू लागला. गर्दी अजून वाढत चाललेली. आता पोलीस आणि फायरब्रिगेडच्या गाड्या आलेल्या त्याला दिसल्या. जखमींना आणि मेलेल्यांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये नेलं जातंय ते ओरडून सांगितलं जात होतं. बायकोला आणि पोराला हॉस्पिटलात नेलं असेल असं त्याला वाटलं. त्याने खिशातून हात काढले. शांत वाटणारा त्याचा चेहरा सुकलेल्या चिकूसारखा आक्रसला, सैलावलेल्या खांद्यांनी हळूहळू नकळत गोलाई धारण केली आणि त्याचं शरीर पुन्हा खांद्याला पट्टा लावून मागे काहीतरी जड ओढत चालल्यासारखं दिसू लागलं.
तो हॉस्पिटलमध्ये आला. बाहेर पोर्चमध्ये अ‍ॅम्बुलन्स ठणाणा करत येजा करत होत्या, माणसं आकांत करत किंवा मेल्या डोळ्यांनी बघत उभी राहिलेली. तो आत गेला. रांगेने ठेवलेल्या मृतदेहांसमोरून चालत गेला. करपलेले, तुटलेले ते मृतदेह पाहून त्याला किळस आली नाही. वाईटही वाटले नाही. तिथेही त्याला बायकोपोरासदृष काही दिसलं नाही. आजूबाजूला रडणार्‍या, भांबावलेल्या लोकांमधून वाट काढत त्याने आणखी आत जाऊ पाहिले. पण एका पोलीस हवालदाराने त्याला अडवले, पण तितक्यात दुसर्‍या घुसणार्‍या माणसाला अडवायला हवालदाराला दुसरीकडे पाहावे लागले. तो अलगद आत गेला. जिवंतपणाचे रक्षक डॉक्टर आणि नर्स पांढर्‍या कपड्यांमध्ये धावपळ करताना त्याला दिसले. जखमी लोकांना तातडीने मलमपट्टी केली जात होती. इथेही जखमी लोकांना रांगेत ठेवलेलं होतं. सगळे एकजात सारखे दिसत होते, बाहेरच्या रांगेतल्या सारखेच. नाकातून आत-बाहेर करणारी हवा एवढाच काय तो फरक. त्याने वॉर्डभर संथपणे नजर फिरवली. एका कोपर्‍यातून पुढे जाऊन त्याची नजर थांबली आणि पुन्हा वळली. एका स्ट्रेचरवर एक बाई पडलेली त्याला दिसली. उजवा पाय तुटलेली. तिच्या पलीकडे तिच्या पोटातून वर आल्यासारखं दिसणारं एक छोटंसं डोकं. त्याच्या हृदयाने एक ठोका आवळून धरला. घसा कोरडा होऊन आत ओढला गेला. नकळत त्याने स्वतःला तिकडे ढकलले. पाय घासत जवळ पोचतानाच त्याला पोराचे मंगोल डोळे दिसले. फतकल मारून ते मंदपणे स्वतःच्याच हाताशी खेळत होतं. त्याला काहीही जखम झालेली त्याला दिसली नाही. जणू त्याचा मतिमंदपणा त्याचं आयुष्य मरणप्राय करण्यासाठी नियतीला पुरेसा वाटला होता. त्याची नजर बायकोच्या भाजलेल्या हातांवरून फिरली. जखमांनी आणखी विद्रूप झालेल्या चेहर्‍यावरून गेली आणि छातीवर स्थिरावली. तिची छाती वरखाली होतेय की नाही ते त्याला ठरवता आलं नाही. एकटक निरखून पाहताना मात्र त्याला काहीतरी कळत गेलं आणि त्याची नजर पाण्यात विरघळू लागली. त्याच्या पायातली शक्ती निघून गेल्यासारखा तो मटकन खाली बसला आणि स्वतःचे केस मुठीत गच्च धरून ओठ आवळत गदगदून रडू लागला.