Thursday, December 23, 2010

माझे छळवादी.

ऑफिसमधली ऐन कामाची वेळ. मी अगदी कॉम्पुटरच्या स्क्रीनमध्ये घुसून कामात एकाग्र झालेलो. बाकीचेही लोक कामात गर्क. अगदी पिनड्रॉप नाही तरी ऑफिसमध्ये बऱ्यापैकी शांतता. अशा या कर्मसमाधीत एकतान झालेलो असताना अचानक कानावर समाधीतून ओढून काढणारा आणि दुर्लक्ष न करता येण्याजोगा आवाज येतो "फुर्र फुर्र" किंवा "मच्याक मच्याक मच्याक..". मी डोळे बंद करतो, दात आवळतो आणि सर्वांगातून जाणारी संतापाची सणक कमी व्हायची वाट पाहतो. खोल श्वास घेउन डोकं थोडं शांत झाल्यावर मी वळून पाहतो. अपेक्षेप्रमाणे माझा एखादा कॉफी पिणारा किंवा सॅन्डविच खाणारा किंवा डब्यातला भात खाणारा देशबांधवच त्या आवाजाचा स्त्रोत असतो. मी वळून पहिले म्हणजे काहीतरी गडबड आहे ही शंका त्याला यावी ही माझी अपेक्षा फोल ठरवत तो मला एका गोग्गोड स्माईल देतो. मी मलूलपणे हसून त्याने तोंड आणखी उघडून विश्वरूप दर्शन द्यायच्या आत पुन्हा स्क्रीनकडे पाहू लागतो. त्यानंतर त्याचं खाणं-पिणं होईपर्यंत माझं लक्ष कामात लागत नाही आणि बहुतेकवेळा मी पाणी प्यायला म्हणून उठून जातो.


कामाच्या दिवशी सकाळी साडेसातला मी ट्रेन पकडतो तेव्हा बरीच गर्दी असते पण त्यात माझे देशबांधव फारसे दिसत नाहीत. पण जर कधी उशीर झाला तर ट्रेनमध्ये देशबांधवांची संख्या बरीच दिसते. देशबांधव चेहरेपट्टीवरून तर ओळखू येतातच पण आणखी एक व्यवच्छेदक लक्षण आहे. ते म्हणजे पाठीवर अडकवलेली सॅक. व्यवस्थित फॉर्मल किंवा सेमीफॉर्मल कपडे घातल्यावरही सॅक पाठीला कशाला हवी हे मला कळत नाही. इतर लोक छानपैकी स्टायलिश ऑफिसबॅग्ज वापरत असताना आपण अगदी लुई व्हीटन नाही तरी एखादी साधी पण चांगली दिसणारी बॅग वापरावी असं का वाटत नाही कोण जाणे. असो ज्याची त्याची आवड. त्याचा त्रास नाही. त्रास संध्याकाळी होतो. संध्याकाळी घरी जाताना गर्दीच्या वेळी हे सॅकधारी बरेच दिसतात आणि सॅक पाठीवरून न काढता गर्दीत घुसतात आणि मग गर्दीत जसे जसे लोक चढतील उतरतील तसे तसे त्यांना जागा करून देताना इकडे तिकडे हलतात आणि आपल्या सॅकने मागे उभ्या असलेल्या माणसाच्या छातीला, पोटाला किंवा जमलंच तर तोंडालाही छानपैकी मसाज करतात. जेवणाचे डबे भरलेल्या या सॅक्सनी अशा बऱ्याच डब्यांचा वास अंगात जीरवलेला असतो आणि मग मागे उभ्या असलेल्या माणसाला तो 'सु'गंधी मसाज सहन करण्यावाचून पर्याय उरत नाही.


हे झालं कामाच्या दिवशीचं. सुट्टीच्या दिवशी देशबांधव सहकुटुंब बाहेर पडतात आणि या कुटुंबांचं व्यवच्छेदक लक्षण म्हणजे त्यांच्याबरोबर असलेली बाबागाडी आणि त्यात एक बाबा किंवा बाबी.
परदेशात नोकरी करायला शक्यतो तरुण जोडपीच येतात पण तरुण असूनही मूलबाळ अजून न झालेल्यांचं प्रमाण दहात एक असावं. पंचवीस-सव्वीस वयाच्या जोडप्याला एक-दोन वर्षांचं एक आणि तीस-बत्तीस वयाच्या जोडप्याकडे ४-५ चं एक आणि १-२ चं एक असं साधारण चित्र असते. छान सुखी कुटुंबे. असं एखादं कुटुंब ट्रेनमध्ये शिरतं, त्यांच्याकडे असलेल्या बाळाकडे पाहून जागा करून दिली जाते. बाळाची आई आणि बाळ बसते तो पर्यंत ठीक पण ५०-६० वर्षांच्या व्यक्तींनी दिलेली जागा घेउन बाळाचा तिशी-पस्तीशीतला बापसुद्धा बसून घेतो. लांब उभं राहून मी आपला बघतो.


चित्रपटाच्या तिकीटाची रांग असो की बसच्या तिकीटाची माझ्या मागे जर एखादा देशबांधव येउन उभा राहिला तर माझा थरकाप होतो. बऱ्याच लोकांना सुरक्षित अंतर म्हणजे काय ते कळत नाही. मागून मग सतत त्यांचा वैतागवाणा स्पर्श सहन करत रांगेत एका पायावरून दुसऱ्या पायावर भार टाकत उभे राहणे नशिबी येते. दोन-तीन वेळा धक्के देउन, प्रसंगी सांगूनही पुन्हा पाच-दहा मिनिटातच अक्षरश: ये रे माझ्या मागल्या.


तसा मी माणूसघाणा नाही आणि लोकांचं निरीक्षण करून त्यांना नावं ठेवणे मला आवडत नाही. पण कधीकधी काहीकाही गोष्टी अगदीच सहन होता नाहीत. विशेषत: आपले देशबांधव असं वागताना पाहून वाईट वाटते. आपण आपल्या संस्कृतीचे इतके गोडवे गातो मग हे साधे संस्कार का नसावेत लोकांवर? दुसऱ्यांबद्दल जराही संवेदना नसावी?
या असल्या वागण्याने एक समाज म्हणून, एक देश म्हणून आणि एक संस्कृती म्हणून आपण काय चित्र उभे करतो जगासमोर? हे आणि असलेच निष्फळ, निरर्थक आणि फालतू विचार मनात येउन मी आपला उगीच माझाच छळ करत बसतो.

1 comment:

  1. ट्रेनच्या दारापाशी उभे राहून उतारूंना प्रथम उतरू देऊन मग स्वत: प्रवेश करण्याची प्रथा व शिष्टाचार या देशात आहे हे माहित असून सुद्धा आणि दिसत असून सुद्धा पळत येऊन सरळ आत घुसण्याचा प्रकारही पहिला आहे मी.

    ReplyDelete