Tuesday, April 19, 2011

भिऊ नकोस ...

फुलपाखरांमागे धावताना, कधी झोक्यावर हिंदोळताना

पावसात भिजून आणि ओल्या मातीत खोपे करताना
दगडधोंडे उचकताना अन् काट्याफुफाट्यात हिंडताना
कळलंच नाही की तो आहे आणि हळूच कानी म्हणतो आहे
"भिऊ नकोस ... पण मी तुझ्या पाठीशी आहे."

नवी नव्हाळी फुटताना, सगळं जग फुलताना
नवी शिखरे चढताना, सागर पालथे घालताना
छातीने पर्वत फोडताना अन् लाथेने पाणी काढताना
दुर्लक्ष केलं उद्दामपणे जरी कळलं तो म्हणतोच आहे
"भिऊ नकोस ... पण मी तुझ्या पाठीशी आहे."

नात्यांचे दोर काचताना अन् मैत्रीच्या काचा तडकताना
जन्माचा हिशेब ठेवताना अन् जमलेल्या कवड्या मोजताना
विषारी डंख झेलताना आणि हिरीरीने दात रोवताना
चुकवली नजर अन् ऐकलं गुमान काय तो म्हणतो आहे
"भिऊ नकोस ... पण मी तुझ्या पाठीशी आहे."

मोतीबिंदू आता साचताना अन् लख्ख सगळं दिसताना
आयुष्याचे तांडव पाहताना अन् सयींचा छळ सोसताना
एकटाच ओझे वाहताना अन् पैलतीराकडे पाहताना
वाट पाहतोय, कधी तो जवळ येऊन म्हणतो आहे
"भिऊ नकोस ... मी तुझ्या पाठीशी आहे."

किल्ली

प्रत्येक कुलपाला एक किल्ली असते
कधी बरोबर तर कधी दुरावलेली असते

कुलूप कधी सुबक ठेंगणं असतं
तर कधी कुरूप बेंगणं असतं
कधी कधी अवघड नाठाळ असतं
तर कधी प्रेमळ ओढाळ असतं
कसंही असलं तरी किल्ली बनलेली असते
त्यांची गाठ म्हणे वरतीच मारलेली असते

कुलपावर सगळ्या घराचा राखणभार असतो
पण घरात राहायला किल्लीचाच आधार असतो
कुलूप घरीच राहून घर राखत बसतं
तेव्हा किल्लीला बाहेर उंडारायचं असतं
कितीही भटकली किल्ली तरी शेवटी फिरून घरीच येते
दुसर्‍या दारांवरून गेली तरी आपल्याच कुलपाला लागते

कुलूप किल्लीच्या नात्याची हीच एक गंमत असते
दाराला कुलूप लावले तरच किल्लीला किंमत असते
प्रेमानं दोघं राहिली तर वंगणाची निश्चिंती असते
भांडलीतंडली तर मात्र गंजण्याची निश्चिती असते
म्हणूनच म्हणतो प्रत्येक कुलपाला एक किल्ली असते
तिने कुलपाला आणि कुलपाने तिला जपलेली असते

मोहोर

नियतीच्या सहस्त्र भुजांत अजस्त्र विक्राळ जोर आहे
विधीलिखितावर अटळपणाची उमटलेली मोहोर आहे

टेबलाशी खुर्चीत एकेक खिडकीशी बसला चोर आहे
उपोषणांच्या वांझपणावर उमटलेली मोहोर आहे

आग्रा कधी अमृतसर कधी मोहाली कधी लाहोर आहे
मूक थडग्यांवर अहिंसेची उमटलेली मोहोर आहे

जन्मानंतर तोडली नाळ जणू कापलेला दोर आहे
अंतापर्यंतच्या भटकण्यावर उमटलेली मोहोर आहे

भरल्या पोटी गातो गाणे निरंजन भाव विभोर आहे
झगड्यावरती रोज लाखोंच्या उमटलेली मोहोर आहे

पाऊस माझा

आजीचा जणू देवघरात
मंत्रपाठसे मंद सुरात
ईशस्तवने मंगल गात
कधी जागवी सुप्रभात
पाऊस माझा पाऊस माझा ||१||


रानावनात घुमवी पावा
हवेत धुंद गंध शिडकावा
लपाछपीचा डाव नवा
भटकंतीला साथी हवा
पाऊस माझा पाऊस माझा ||२||


तृषार्त तप्त रसा दुपारी
जल वर्षता होय गोजिरी
इंद्रधनूचा वेल अंबरी
फुलवी खुलवी प्रीत अंतरी
पाऊस माझा पाऊस माझा ||३||


कधी तरी अन् कातरवेळी
डोह मनाचा निर्मम घुसळी
गतकाळाच्या आठवणींनी
भरतो डोळा माझ्या पाणी
पाऊस माझा पाऊस माझा ||४||


प्रभू चरणी एक मागणी
सरणावरती देता अग्नी
धूर निरंजन मेघ व्हावा
आणि भूवर या बरसावा
पाऊस माझा पाऊस माझा ||५||