Saturday, December 14, 2013

फुकुशिमानो तोत्तोचान

वसंताच्या लख्ख दुपारी चेरीचं फूल फुलावं
तसं  उमटतं तिच्या गोबर्‍या गालावर हसू
फुकुशिमानो तोत्तोचानवा खावाक् सुगोय देसु

तोत्तोचानच्या घरामागे खूप खूप सूर्यफुलं राहतात
रोज सकाळी सगळी सूर्याकडे एकटक पाहतात
फुलांवरच्या माश्यामात्र दिसत नाहीत आता
आणि दबून बसलीय शेतांमधे भेदरटशी शांतता

ओतोओसानचा चेहरा तिला नीटसा आठवत नाही
रविवारशिवाय कधी त्यांची भेटच झाली नाही
कोण जाणे कसला त्यांना एवढा त्रास होता
पण एक दिवस ओतोओसानगा जिसात्सु शिता

ओकाआसानच्या हसण्यातली उदासी लपत नाही
काय होणार पुढे तिला विचार करवत नाही
गाईंच्या अंगावर पडले ठिपके तिला बघवले नाही
एका देठावर फुलं दोन तोत्तोने सांगितलेच नाही

ओजिइसान रोजचा वेळ शांतपणे घालवतात
ऐंशी वय झालं तरी मजेत सायकल चालवतात
तोत्तोचानला आवडतात ते मनापासून जरी
न सांगताच थोडं आयुष्य तिचं घेतलंय तरी




tottochan

sunflower


शब्दार्थः
फुकुशिमानो तोत्तोचानवा खावाक् सुगोय देसु: फुकुशिमाची तोत्तो गोंडस व सुंदर आहे.
ओतोओसान: वडील
ओकाआसान: आई
ओजिइसान: आजोबा
जिसात्सु शिता: आत्महत्या केली.

Saturday, September 21, 2013

भस्म्हावर्‍यांचा दिवस

रूम नंबर ५०७ च्या खिडकीतून समोर दूरवर पसरलेला निळाशार समुद्र दिसत होता आणि खाली पाहिले तर टप्प्याटप्प्याने समुद्रकिनार्‍यापर्यंत उतरत गेलेल्या रिसॉर्टच्या इमारतींची गुलाबी कौलारू छपरे झाडांच्या हिरव्या गर्दीतून डोकावत होती. थोडे झुकून मान तिरकी करून पाहिले तर पोहण्याच्या तलावावर सकाळपासून लागलेली लोकांची झुंबडही दिसली असती; पण खिडकीत बसलेल्या त्या तरुणीचे तिकडे लक्ष नव्हते. आपल्या अक्षत गोर्‍या हाताच्या उत्तम निगा राखलेल्या लांबट नखांना रंग लावण्यात ती गुंगून गेली होती. डाव्या हाताच्या करंगळीच्या नखाला ती रंग लावत असताना खोलीतल्या शिसवी पलंगावरच्या मऊ बिछान्यात पडलेला तिचा मोबाईल कुठलेसे इंग्रजी गाणे किंचाळू लागला. अचानक फोन वाजला तरी ज्यांची पापणीही लवत नाही अशा लोकांपैकी ती असावी; तिला आयुष्यात पहिल्यांदा ऐकू यायला लागले तेव्हापासून सतत तो फोन वाजत असावा इतकी ती निवांत बसून राहिली. फोन तसाच वाजत असतानाच तिने हातातल्या छोट्याशा ब्रशने करंगळीच्या नखाची चंद्रकोर निगुतीने उठावदार केली. डाव्या हाताच्या तर्जनीच्या आणि अंगठ्याच्या दुसर्‍या पेरांमध्ये रंगाची बाटली नाजूकपणे धरून तिने उजव्या हाताने झाकण लावले आणि मांडीवरचे बिकिनीतल्या बाईचे चित्र असलेले कुठलेसे चमकदार मासिक उजव्या हातात घेऊन ती अखेर उठली.अंगातल्या पांढर्‍याशुभ्र रेशमी तलम गाऊनला रंग लागू नये म्हणून डावा हात अंगापासून दूर धरून ती पलंगाकडे गेली; हातातले मासिक बिछान्यावर टाकले व आता तिसर्‍यांदा तेच गाणे किंचाळू लागलेला फोन उचलून ती पलंगावर बसली.
"हलो ममा", आपल्या कुरळ्या केलेल्या केसांना एक नाजूक झटका देऊन फोन कानाला लावत ती म्हणाली.
"अनाहिताऽऽ, आर यू ऑलराईट?", पलीकडून आवाज आला आणि तिने भुवया किंचित आक्रसून फोन कानापासून थोडा दूर नेला.
"येस ममा, आय अ‍ॅम ऑलराईट. तू कशी आहेस?", ती म्हणाली.
"तुझ्या काळजीने जीव जायची वेळ आली आहे. व्हाय डिडन्ट यू कॉल मी?"
"आय ट्राईड. काल आणि परवा रात्रीसुद्धा मी फोन करायचा ट्राय केला. पण इथे नेटवर्क..."
"आर यू ऑलराईट, अनाहिता?"
तिने फोनचे कानापासूनचे अंतर आणखी थोडे वाढवले, "आय अ‍ॅम फाईन. पण इथे भयंकर गरम आहे. गोव्यातला हा सगळ्यात हॉटेस्ट डे आहे गेल्या..."
"पण तू मला कॉल का नाही केलंस? मला काळजीने अगदी.."
"ओरडू नकोस ममा, मला नाईस न् क्लिअर ऐकू येतंय.", ती म्हणाली," आणि मी तुला काल रात्री दोनदा ट्राय केला. एकदा आमचं..."
"मला वाटलंच तू काल रात्री फोन करशील. आय टोल्ड युवर फादर; पण नाही! त्याला कालच...आर यू ऑलराईट, अनाहिता? मला खरं खरं सांग."
"मी ओके आहे. सारखं सारखं तेच तेच विचारू नकोस."
"कधी पोचलात तुम्ही तिथे?"
"अम्म्म..फोर थर्टीला पोचलो त्या दिवशी."
"ड्राईव्ह कोणी केलं?"
"त्यानेच केलं", ती म्हणाली आणि लगेच डाव्या हाताने थांबवल्याची खूण करत तिने पुस्ती जोडली," उगाच घाबरू नकोस. ही ड्रोव्ह नाईसली."
"त्याने ड्राईव्ह केलं? अनाहिता, तू मला प्रॉमिस केलं होतंस.."
"ममा.., मी तुला सांगितलं ना त्याने नाईसली ड्राईव्ह केलं म्हणून? ऑल द वे एकदाही एटीच्यावर नेली नाही त्याने."
"आणि लास्ट टाईम झाडांकडे बघत बघत गोंधळ करून ठेवला त्याने ते?"
"आय टोल्ड यू ना ममा, ही ड्रोव्ह नाईसली. मी त्याला व्हाईट लाईनच्या जवळ राहायला सांगितलं अ‍ॅन्ड ही न्यू व्हॉट आय मेन्ट आणि त्याने तसंच केलं. तो तर झाडांकडे बघतही नव्हता. बाय द वे, पपाने त्याची कार फिक्स करून घेतली की नाही?"
"अजून नाही. फॉर्टी केचं एस्टीमेट दिलंय फक्त तिचं..."
"ममा, शुभंकरने पपाला सांगितलंय की हीऽल पे फॉर दॅट. उगाच तू जास्त.."
"ओके, ते बघू नंतर. तो गाडीत कसा वागला?"
"नीट वागला", ती म्हणाली.
"तो तुला अजूनही त्याच भयंकर नावाने हाक मारतो का गं?"
"नाही गं", ती किंचित हसून म्हणाली,"आता नवीन नाव ठेवलंय त्याने."
"काय ते?"
"ओफ्ओ", ती सारवासरव केल्यासारखी म्हणाली,"काय फरक पडतो ममा?"
"अनाहिता, आय वॉन्ट टू नो. तुझ्या पपाला..."
"ओके ओके. तो मला मिस भावना पोकळे म्हणतो.", ती म्हणाली आणि गंमत वाटल्यासारखी खुदकन हसली.
"धिस इजन्ट फनी अनाहिता, हे अजिबात फनी नाहीय. हॉरिबल आहे. अ‍ॅक्चुअली मला कळत नाही कसं..."
"ऐक ममा," मध्येच तोडत ती म्हणाली,"त्याने मला ते पंजाबी पोएम्सचं बुक दिलं होतं आठवतंय का? मी ते कुठे ठेवलंय बरं? मला आठवतच नाहीय."
"आहे ते घरी."
"आर यू शुअर?"
"येस. डेफिनेटली. मी ते ठेवलंय तुझ्या पपाच्या बुकशेल्फमध्ये. का बरं? त्याला हवंय का?"
"नाही. ही वॉज आस्किंग अबाऊट इट. कशा वाटल्या पोएम्स वगैरे."
"अगं पण त्या पंजाबी आहेत!"
"हो, पण त्याने काही फरक पडत नाही असं तो म्हणतो. त्याच्या मते कोण्या ग्रेट आर्टिस्ट बाईच्या पोएम्स आहेत त्या.", ती नुकत्याच रंगवलेल्या नखांकडे बारकाईने पाहात म्हणाली, "मी ट्रान्सलेशन बाय करायला हवं होतं किंवा पंजाबी लर्न करायला पाहिजे असं तो म्हणाला."
"ऑफुल! असं कसं म्हणू शकतो तो? अनाहिता, आता मी काय सांगतेय ते नीट ऐक."
"मी ऐकतेय ममा."
"तुझा पपा काल डॉक्टर बर्व्यांशी बोलला आणि त्यांना हे सगळं सांगितलं; अ‍ॅट लिस्ट सगळं सांगितलं असं पपा म्हणतो. ते खिडकीपाशी उभा राहून तो बडबडत होता ते आणि तुझ्या आजीला मरणाच्या प्लॅन्सबद्दल विचारत होता ते,
आणि शर्मिलाने फेसबुकवर टाकलेल्या युरपच्या फोटोंवर काय कमेन्ट्स टाकल्या ते, सगळं सांगितलं."
"मग? काय म्हणाले ते?"
"काय म्हणणार? त्यांनाही डेफिनेटली विचित्रच वाटलं त्याचं वागणं. शिवाय त्याच्या आयपीएसच्या पोस्टिंगबद्दल, त्याच्यावरच्या इनक्वायरीबद्दल वगैरे सांगितलं तेव्हा तर ते म्हणाले की देअर इज डेफिनेटली अ चान्स दॅट हि माईट लूज हिज कन्ट्रोल. युवर पपा अ‍ॅन्ड आय वेअर सो अपसेट! पपा वॉन्टेड यू टू कम होम इमिजिएटली."
"ममा मी परत येणार नाहीय लगेच. किती दिवसांनी मी व्हेकेशनवर आलीये."
"अनु, तू पुन्हा एकदा याचा सिरियसली विचार करावा असं आम्हाला दोघांना वाटतं. इन फॅक्ट त्याचं पोस्टिंग त्या झारखंड-बिरखंडसारख्या नॅक्सलाईट भागात झालं तेव्हाच तू त्याच्यासाठी वेट करायला नको होतं. आता तर तो टेन्टेड आहे. पपा म्हणत होता तू एकटीच कुठेतरी जाऊन स्वतःच्या लाईफचा शांतपणे विचार करावा म्हणून. लाईक क्रूजवर किंवा शर्मिलाकडे स्टेट्समध्ये..."
"ममा इतकं काही सिरियस नाहीय. तू काळजी करू नको. काल इथे मला एक डॉक्टर भेटले गेम्सरूममध्ये. डॉकटर झकेरिया म्हणून आहेत. बरेच फेमस आहेत म्हणे. शुभंकर क्लबमध्ये काराओकेवर गाणं म्हणत होता ते त्यांनी ऐकलं आणि तो आजारी आहे का असं मला विचारत होते."
"हो? असं का विचारलं त्यांनी? "
"जस्ट तो जरा पेल दिसतो म्हणून विचारलं असेल.  त्यांची बायको विचारत होती की ते करमरकर ग्रूप ऑफ इंडस्ट्रीजचा शुभंकरशी काही संबंध आहे का म्हणून...
अ‍ॅन्ड गेस व्हॉट! शी वॉज विअरिंग दॅट ड्रेस. द वन वी सॉ इन सिंगापोर अ‍ॅन्ड तू म्हणाली होतीस की तो घालायला एकदम टायनी...."
"तो ग्रीन?"
"येस्स तोच घातला होता तिने आणि एकदम थंडर थाईज अ‍ॅन्ड बंपर हिप्स!"
"हॉरिबल! काही लोकांना खरंच अजिबात सेन्स नसतो. आणखी काय म्हणाले ते? डॉक्टर."
"विशेष काही नाही. मी बोलेन त्यांच्याशी नंतर इन डिटेल्स. ही हॅज टू नो ऑल द बॅकग्राऊंड टू डायग्नोज. ना?"
"ह्म्म. ओके. तुझी रूम कशी आहे?"
"ठीक ठीक आहे. गेल्यावेळी मिळाली तशी कॉर्नरची नाही मिळाली. सगळा पूलवरचा नॉईज येतो इकडे. अ‍ॅन्ड इट्स टूऽऽ क्राऊडेड धिस टाईम. आणि क्राऊडपण डिसेन्ट नाही अजिबात. गोंधळ, गडबड, मोठ्याने बोलणे. एकदम गावठी."
"हम्म्म. आजकाल सगळीकडे असंच आहे. काही नवीन शॉपिंग केलं का गोव्यात?"
"अजून नाही. ऊन इतकं आहे की मी बाहेर जात नाही फारशी. इट्स रिअली स्कॉर्चिंग."
"मी तुझ्या बॅगमध्ये ब्रॉन्झचं सन्स्क्रीन टाकलं आहे ना! ते मिळालं ना तुला?"
"ते वापरते मी पण तरीही नाही जात बाहेर."
"अनाहिता, मी तुला शेवटचं विचारते.. आर यू ऑलराईट?"
"ममा, प्लीज. किती वेळा सांगू मी ओके आहे? आय अ‍ॅम फाईन."
"तो कुठे आहे?"
"बाहेर गेलाय. बीचवर असेल वाचत."
"बीचवर? एकटाच? तो नीट वागतो का तिथे?"
"ममा तू तर त्याच्याबद्दल अशी बोलतेस की अ‍ॅज इफ त्याला वेड लागलंय."
"मी असं म्हटलेलं नाही."
"पण त्याचा अर्थ तसाच होतो. तो काहीही करत नाही, शांतपणे बुक वाचत असतो. शिवाय गेल्या दोन रात्री तो क्लबमध्ये काराओकेवर गाणीही म्हणतोय."
"पण तरीही, तो जर काही विचित्र बोलला, वागला तर लगेच मला कॉल कर. डू यू अंडरस्टँड व्हॉट आय अ‍ॅम सेईंग?"
"ममा, मला शुभंकरची भीती वाटत नाही."
"अनाहिता, मला प्रॉमिस कर."
"ओके ममा, आय प्रॉमिस.", तिने भुवया उंचावून छताकडे पाहात म्हटलं, "बाय ममा. मी नंतर फोन करीन. गिव्ह माय लव्ह टू पपा."
तिने फोन बंद करून एक सुस्कारा सोडला.  

                           *************************************

"शुभं करकर मरकर!", सायली पोहण्याच्या तलावापाशी एका हवा भरलेल्या मोठ्या रबरी चेंडूवर बसून खिदळत म्हणत होती,"शुभं करकर मरकर!"
"सायली, स्टॉप सेईंग दॅट. इट्स सो इरिटेटिंग. आणि नीट स्थिर बसून राहा बरं.", तिची आई सायलीच्या छोट्याशा खांद्यांना व हातांना सनस्क्रीन लोशन लावत म्हणाली. सायलीने पिवळा दोन भागांचा पोहण्याचा पोशाख घातला होता पण त्यातल्या एका भागाची तिला अजून नऊ-दहावर्षेतरी गरज नव्हती.
"तशी ती अगदी साधी कॉटनची साडी होती", शेजारच्या आरामखुर्चीवर बसलेली स्त्री सायलीकडे कधी एकदा ही जातेय अशा अधीरपणे पाहात सायलीच्या आईला म्हणाली,"पण द वे शी हॅड टाईड इट...आय विश आय न्यू. खूप क्यूट दिसत होती."
"हो, खूपच नाईस होती", सायलीची आई म्हणाली,"ओके सायली, नाऊ गो अ‍ॅन्ड प्ले इन चिल्ड्रन्स पूल. आम्हाला बोलू दे जरा."
सुटका होताच सायली लहान मुलांच्या तलावाच्या दिशेने पळाली. तलावाकडे जाणार्‍या पायर्‍या ती पळतच उतरली आणि तशीच पळत तलावापाशी न थांबता तलावाला एक वळसा घालून खाली समुद्रकिनार्‍याकडे जाणार्‍या पायर्‍या धडधडा उतरू लागली. पायर्‍या संपून किनार्‍यावरच्या भुसभुशीत वाळूत पाय पडताच तिने थांबून एकदा डावी-उजवीकडे पाहिले आणि मग डावीकडे वळून वाळूत पाय रुतवत सावकाश चालू लागली. थोडे अंतर गेल्यावर अचानक ती पुन्हा पळत सुटली आणि झाडांच्या रांगेतल्या एका झाडाच्या सावलीत आरामखुर्ची टाकून बसलेल्या तरुणाच्या खुर्चीजवळ जाऊन थांबली. समोर उघडे पुस्तक धरून बसलेल्या त्या तरुणाची नजर मात्र पुस्तकाच्या वरून समुद्रात खोलवर कुठेतरी विरघळली होती.
"आर यू गोईंग इन द सी, शुभं करकर मरकर?"
तो तरूण दचकून भानावर आला आणि आपसूकच त्याने अंगावर घातलेला रोब उजव्या हाताने छातीवर हलकेच आवळून धरला.  
"ओह, हॅलो सायली!", पुस्तक ठेवून उजव्या कुशीवर वळत आणि इतकावेळ उन्हाकडे पाहात असलेले डोळे सावलीला जुळवून घेत तिच्या चेहर्‍याकडे अंदाजाने रोखून पाहात तो म्हणाला. 
"आर यू गोईंग इन द सी?" 
"मी तुझीच वाट पाहात होतो.", तो म्हणाला, " काय चाललंय?"
"व्हॉट?"
"काय चाललंय? व्हॉट्स द प्लॅन?"
"माझा बाबा येणारे आज एरोप्लेनने", सायली पायाने वाळू उडवत म्हणाली.
"अंगावर वाळू नको उडवूस", त्याने झटकन पण अलगदपणे तिच्या पायावर घोट्यापाशी हात ठेवला, "हो यायलाच पाहिजे तुझा बाबा आता. बघ ना मला आता त्याची तासातासाला आठवण येतेय."
"अनाहिता आंटी कुठे आहे?"
"अनाहिता आंटी?", तो वाळू झटकत म्हणाला, "सांगणं अवघड आहे. हजारो ठिकाणं आहेत आणि ती कुठंही असू शकते. खाली ब्युटीपार्लरमध्ये असेल किंवा स्पामध्ये मसाज घेत असेल किंवा रूममध्ये नखं रंगवत बसली असेल."
त्याने उजव्या कुशीवर वळत उजव्या हाताची उशी करून त्यावर डोके टेकवले आणि डाव्या हाताने तिला आपल्या जवळ ओढले.
"दुसरं काही तरी विचार ना.", तो म्हणाला, "किती छान स्वीमसूट आहे तुझा गं? मला या जगात सगळ्यात जास्त काही आवडत असेल तर ते म्हणजे ब्लू स्वीमसूट."
सायलीने ओठ घट्ट एकमेकांवर आवळत भुवया आक्रसून त्याच्याकडे रोखून पाहिले आणि मग खाली आपले आधीच पुढे आलेले पोट आणखी पुढे काढून त्याकडे पाहिले.
"हा ब्ल्यू आहे का?", दोन्ही हात सगळी बोटे जुळवून स्वीमसूटकडे रोखत ती म्हणाली, "हा यलो आहे यलोऽऽ"
"हो का? जरा जवळ ये बरं"
ती एक पाऊल आणखी जवळ आली.
"अरे खरंच की! तू म्हणतेस तेच बरोबर आहे! काय यडाय राव मी!"
"तू सीमधे जाणार आहेस का?", त्याच्या शेजारी बसत सायलीने पुन्हा विचारले.
"माझं अजून ठरलं नाहीय; मी त्याच्यावर गहन विचार करतोय. पण तू किती छान दिसतेयस, मला तुझ्याबद्द्ल आणखी काहीतरी सांग ना.", त्याने तिचा छोटासा हात आपल्या हातात घेतला.
"आलिशा सेड की काल सिंगिंग करताना तू तिला तुझ्या शेजारी बसू दिलं म्हणून", सायली कपाळावर आठ्या पाडून नाक आक्रसत म्हणाली.
"आलिशा असं म्हणाली?"
सायलीने जोरजोरात मान हलवली.
"हं", तिचा हात सोडून पुन्हा पाठीवर वळत तो म्हणाला,"तुला तर माहितीच आहे की हे सगळं कसं असतं, सायली! काल मी तिथं बसून गाणी म्हणत होतो आणि तू तिथे नव्हतीस. तेवढ्यात आलिशा आली आणि बसली माझ्या शेजारी. आता तिला काय ढकलून द्यायचं?"
"हो"
"हा हा हा, नाही बाईसाहेब. मी नाही ढकलू शकत तिला. पण मी एक युक्ती केली. माहितीये का काय?"
"काय?"
"मी असा विचार केला की तूच माझ्या शेजारी बसली आहेस."
रेलून बसलेली सायली ताबडतोब उठून ताठ बसली, "लेट्स गो इन द सी.", ती उत्साहाने म्हणाली.
"ओके. ", तो तरूण म्हणाला, "मला वाटतं आता जायला काही हरकत नाही."
"पण नेक्स्ट टाईम ढकलून दे."
"कोणाला?"
"आलिशाला."
"ओह, आलिशा!", तो म्हणाला, "कैसे उनका नाम बारबार जुबान पे आता है, दिल में क्या यादे क्या क्या आरजू खिलाता है."
अचानक तो झटक्यात उठून उभा राहिला आणि त्याने समुद्राकडे गंभीरपणे काही क्षण पाहिलं.
"सायली", तो वळून एकदम म्हणाला, "मला एक गंमत सुचलीये. चल. आपण पाहू एखादा भस्म्हावरा मिळतोय का ते."
"व्हॉट?"
"भस्म्हावरा", तो म्हणाला आणि त्याने अंगावरचा रोब काढून टाकला आणि जवळच पडलेला फ्लोट घेतला. चेहर्‍याच्या मानाने त्याचे अंग काहीच रापलेले नव्हते. 
त्याने उजवा हात लांबवून सायलीचा डावा हात हातात घेतला आणि ती दोघं समुद्राकडे चालू लागली.
"तू आजपर्यंत खूप भस्म्हावरे पाहिले असतील ना सायली?", त्याने तिला विचारले.
तिने मान हलवली.
"नाही? कमाल आहे! कुठे राहतेस तू?" 
"आय डोन्ट नो."
"काय सांगतेस? तुला माहिती असलं पाहिजे. आलिशाला माहितीय ती कुठं राहते ते आणि ती तर फक्त साडेतीन वर्षांची आहे."
सायलीने त्याच्या हातातून हात ओढून काढून घेतला आणि खाली वाकून वाळूतून एक तुटका शिंपला उचलून बारकाईने निरखत बसली. मग एकदम तो खाली टाकून दिला आणि उभं राहात म्हणाली, "बँड्रा वेस्ट, बॉम्बे".
"बॅन्ड्रा वेस्ट बॉम्बे..", तो म्हणाला, "ते मुंबईत वान्द्रे पश्चिमच्या जवळ आहे ते का?"
"मी बॅन्ड्रा वेस्टला राहते", सायली त्रासिकपणे प्रत्येक शब्दावर जोर देऊन म्हणाली आणि पुढे काही पावले वाळूत पळत गेली. पुढे जाऊन तिने आपला डावा पाय मागे उचलला आणि डाव्या हातात धरून उभी राहिली.
"ओहो, असंय होय, आता एकदम नीट कळलं मला."
"तू मोगलीचं कार्टून पाहिलं?", तो जवळ आल्यावर आपला पाय सोडून ती म्हणाली.
"कालच!", तो उत्साहाने म्हणाला,"बघ कशी गंमत आहे, मी ते काल रात्रीच पाहिलं आणि तू मला आज विचारतीयेस! तुला कसं वाटलं ते?"
"ते मोगली वर अ‍ॅटॅक करतात ते हायनाज असतात ना?"
"हो गं. मला वाटलं ते मोगलीला मारतीलच! मी इतकी तरसं कधीच पाहिली नव्हती!"
"हॅ. फक्त सिक्सच तर होते ते!"
"फक्त सहा? तुला सिक्स फक्त वाटतात?"
"तुला पेन्सिल आवडते?", सायलीने विचारले.
"काय? मला काय आवडते?", त्याने गोंधळून विचारले.
"पेन्सिल"
"होऽऽऽ. खूप आवडते. तुला नाही आवडत?"
सायलीने मान डोलावली, "आणि ग्रेप्स?"
"ग्रेप्स..हो. द्राक्षंसुद्धा. द्राक्षं आणि पेन्सिली घेतल्याशिवाय मी कुठेही जात नाही."
"तुला आलिशा आवडते?"
"होऽऽऽऽऽऽ. खूऽऽऽऽप आवडते.", तो हसत म्हणाला," तुला माहितीये मला ती का आवडते? कारण ती रिसॉर्टमध्ये जे कुत्र्याचं पिलू आहे ना, त्याला फुग्याच्या तलवारीने धबाधबा मारत नाही. खूप चांगली आहे ती."
सायली गप्प होऊन चालत राहिली .
"मला पेन्सिल खायला खूप आवडते", बर्‍याचवेळाने शेवटी ती म्हणाली.
"वा! पेन्सिल खायला कोणाला आवडत नाही?", पायावर पाण्याची लाट येताना तो म्हणाला,"ओह, पाणी चक्क गार आहे!"
खांद्यावरचा फ्लोट त्याने पाण्यात टाकला.
"थांब सायली! लगेच चढू नको त्यावर. आपण आणखी थोडं पुढं जाऊ."
दोघे पाण्यात वाळूतून सावकाश चालत आणखी थोडे खोल पाण्यात गेले. मग त्याने तिला अलगद उचलले आणि फ्लोटवर पालथे ठेवले.
"तुमच्याकडे टोपी वगैरे घालायची पद्धत नाही का?", त्याने विचारले.
सायलीने त्याचा हात घट्ट धरला होता,"मला धरून ठेव. सोडू नको!", ती किंचित थरथरत म्हणाली.
"बाईसाहेब, मी माझं काम व्यवस्थित करतो! तुम्ही फक्त एखादा भस्म्हावरा दिसतोय का तिकडे लक्ष द्या!", तो दूरवर पाहात म्हणाला, "आज भस्म्हावर्‍यांचा दिवस आहे."
"मला एकसुद्धा दिसत नाहीये."
"ते असे सहजासहजी दिसत नाहीत. फार विचित्र असतात ते. तुला माहितीये का ते काय करतात ते?"
सायलीने मान हलवली.
"समुद्राच्या तळाशी ना, काही बीळं असतात आणि त्या बीळांमध्ये लाडू असतात. त्या बीळांमधे हे भस्म्हावरे जातात. जाताना ते अगदी साध्या माशासारखे असतात, पण एकदा का आत गेले की अगदी डुकरासारखे बकाबका लाडू खातात.  
एका भस्म्हावर्‍याने तर अठ्ठ्यात्तर लाडू खाल्लेले मी पाहिलंय.", फ्लोट पाण्यात आनखी खोलवर ढकलत तो म्हणाला,"आणि त्यानंतर ते इतके जाडजूड होतात की बीळातच अडकून बसतात. बाहेरच येता येत नाही."
"मग काय होतं त्यांचं?", फ्लोट खोल पाण्यात चाललेला पाहून त्याच्या हातावरची पकड आणखी घट्ट करत सायली म्हणाली.
"काय सांगू सायली तुला, ते मरतात गं!"
"का?", तिने मान वळवून आश्चर्याने विचारले.
"त्यांना भस्म्या रोग होतो. फार भयंकर रोग आहे तो."
"वेव्ह आली, वेव्ह आली", तितक्यात सायली घाबरून म्हणाली.
"नो प्रॉब्लेम. आपण लाटेवरून उडी मारू.", तो म्हणाला.
त्याने एका हाताने तिचे दोन्ही पाय घोट्यापाशी धरून पाण्यात दाबले आणि फ्लोटने लाटेवर अलगद हेलकावा घेतला. सायलीचे डोके एकदा पाण्यात डुबकी मारून आले आणि ती आनंदातिशयाने किंचाळू लागली. 
"मला एक दिसला! मला एक दिसला!", स्थिर झाल्यावर कपाळावरचे ओले केस एका हाताने बाजूला करत ती म्हणाली.
"काय दिसला?"
"भस्म्हावरा!"
"अरे बापरे! मग? होते का त्याच्या तोंडात लाडू?", त्याने डोळे मोठे करून विचारलं.
"हो! सिक्स होते!", तिनेही त्याच्यासारखेच डोळे मोठे करून उत्तर दिले.
त्याच्या डोळ्यात एकदम मृदु हसू जमा झाले. अचानक तो वाकला आणि पाण्यात तरंगणार्‍या तिच्या गुलाबी तळपायाचा त्याने मुका घेतला.
"एयऽऽ", त्या सुकुमार तळपायाची मालकीण मागे वळून ओरडली.
"एयऽऽ तूऽऽ. चला आता. झालं का तुझं खेळून?"
"नाही! अजून खेळायचं."
"सॉरी!", एवढंच म्हणून त्याने फ्लोट किनार्‍याकडे ढकलायला सुरुवात केली. किनार्‍यावर पोचल्या पोचल्या त्याला "बाय!" म्हणून सायली रिसॉर्टच्या दिशेने पळत सुटली. त्याने फ्लोट खांद्यावर अडकवला. आणि वाळूतून सावकाश खुर्चीपर्यंत चालत जाऊन रोब आणि पुस्तक घेतले आणि रिसॉर्टच्या पायर्‍या चढून लॉबीत आला.
खास पोहणार्‍यांसाठी असलेल्या लिफ्टमध्ये तो शिरला तेव्हा त्याच्या मागोमाग तोंडावर सनस्क्रीन लोशन चोपडलेली आणि अंगाभोवती चादरीसारखे कापड गुंडाळलेली एक बाई शिरली आणि खाली बघत उभी राहिली.
"तुम्ही माझ्या पायांकडे बघताय का?", त्याने लिफ्ट सुरु झाल्या झाल्या विचारले.
"अं? एक्सक्यूज मी?", ती भांबावली.
"आय सेड आय सी यू आर लुकिंग अ‍ॅट माय फीट."
"आय बेग यॉर पार्डन! आय हॅपन्ड टू बी लुकिंग अ‍ॅट द फ्लोअर", ती फणकार्‍याने म्हणाली आणि त्याच्या कडे पाठ करून तिने पुढच्या मजल्याचे बटन दाबले.
लिफ्टचे दार उघडताच त्याच्याकडे वळून न बघता ती घाईघाईने बाहेर पडली.
"माझे पाय अगदी सर्वसाधारण आहेत आणि कोणी त्यांच्याकडे टकामका पाहायचे काही एक कारण नाहीय.", दार बंद होता होता तो अर्धवट स्वतःशी म्हणाला.
पाचव्या मजल्यावर पोचल्यावर तो लिफ्ट लॉबीतून चालत ५०७ कडे गेला. दार उघडून आत येताच नेलपेन्टचा आणि चामड्याच्या बॅगांचा मिश्र वास त्याच्या नाकात शिरला. 
बेडवर पहुडलेल्या आणि झोप लागलेल्या त्या तरुणीकडे त्याने क्षणभर थांबून पाहिले आणि हळुवार चालत जाऊन तिथल्या अनेक चामड्याच्या बॅगांपैकी एक बॅग उघडली. बॅगेतले कपडे भसाभसा ओढून काढून सगळ्यात खाली ठेवलेले नऊ एम एम ब्राऊनिंग काढले. त्यातले मॅग्झिन एकदा बाहेर काढून तपासले आणि पुन्हा आत घातले.
अलगद चालत तो बेडवर त्या तरुणीच्या शेजारच्या मोकळ्या जागेत जाऊन बसला. मान वळवून तिच्याकडे पाहिले; पिस्तुल उचलून नेम धरला आणि मग स्वतःच्या उजव्या कानशीलात गोळी झाडली.

(जे. डी. सॅलिंगर यांच्या "A Perfect Day for Banana Fish" या कथेचे स्वैर रुपांतर)

Thursday, August 8, 2013

फॉरबिडन

मानवी देहाला मांस मिळाले त्याच वेळी त्याला वासनेचे बीज मिळाले; पण हा माणूस स्वतःचा इतिहास स्वत: लिहितो आणि सार्‍या पतनाचा दोष इतरांवर ढकलत राहतो; आणि त्यातही त्याचे कपट असे, की या वासनेचा आनंद तर त्याला भोगायचा असतोच, पण तिचा निर्व्याजपणे उपभोग घेण्यात त्याला पराकोटीची शरम वाटते. ज्यांना तो आपल्यापेक्षा फार हीन समजतो, त्या जनावरांत हा स्वच्छ मोकळेपणा असतो. बागेतला पाचोळा आणि रानपाचोळा, जनावराला दोन्ही सारखेच व आक्रमण किंवा अपराध झाला असे ठरलेच, तर शिक्षा भोगायलादेखील त्याची तशीच सहज तयारी असते; पण खाताना मात्र ते मळकट मनाने खात नाही. माणूस मात्र आधाश्याप्रमाणे खातो, पण दर घासाबरोबर एक किडा खाल्ला असे समजत चेहरा नासका करून बसतो. म्हणजे एकीकडे, न खाल्ल्याचे खुळचट पुण्य नाही, तर दुसरीकडे, खाऊन तृप्त झालो असा मांसल आनंद नाही. तो वासना भोगतो तेच ओशाळलेल्या मळकट मनाने, कारण त्याच्या दृष्टीतच हा मलिन ठिपका कायमचा राहून गेला आहे.
- सर्प (जी.ए. कुलकर्णी)

* * * *

सगळं घर नीटनेटकं आवरून ते नुकतेच टेकले होते, तेव्हा डोअरबेल वाजली. माधवने जाऊन दार उघडलं. काळ्या-पिवळ्या चेक्सचा कोपरापर्यंत बाह्या मुडपलेला कॉटनचा शर्ट, निळसर रंगाची जीन्स आणि थोडीशी दाढी वाढलेल्या चेहर्‍यावर त्याचं नेहमीचं मोकळं बालिश हसू घेऊन किरण उभा होता. हातात पिवळ्या गुलाबांचा एक गुच्छ आणि वाईनची बाटली.
"आय वॉज शुअर!", तो रुंद मिश्कील हसत उजवा डोळा मारून म्हणाला, "की आय वुड बी द फर्स्ट टू अराईव्ह. खूपच वेळेवर आलो नसेन अशी आशा आहे."
माधवने हसून त्याला आत यायला सांगितलं आणि त्याच्या मागे दार बंद केलं.
"हाय!" मानसीला तिथे उभी असलेली पाहून तो म्हणाला.
"हाय!" मानसी म्हणाली आणि तिने हात पुढे केला.
फुलांचा गुच्छ त्याने तिच्या हातात दिला, " हे तुझ्यासाठी".
"थँक्स! सुंदर आहेत!"
माधवने बसायला सांगायच्या आधीच तो सोफ्यावर बसला. पाय एकमेकांवर टाकून आणि आपला एक हात सोफ्याच्या पाठीवर लांबवून दुसर्‍या हाताच्या कोपरावर रेलून तो आरामात बसला. अगदी रोजचं येणंजाणं असल्यासारखा. ऑफिसच्या कपड्यांमध्ये थोडा सडपातळ वाटणारा तो या कपड्यांमध्ये चांगला बळकट वाटत होता.
आल्यावर त्याने मानसीच्या हातात दिलेली फुलं ती कॉर्नर टेबलवरच्या व्हेसमध्ये सजवू लागली आणि माधवच्या हातात त्याने दिलेली वाईनची बाटली टीपॉयवर ठेवून माधव त्याच्या समोरच्या सोफ्यात बसला. माधवला वाटलं, पंधरा वर्षांपूर्वी जर त्याला कोणी सांगितलं असतं की हा किरण भोगले तुझ्या घरी फुलं आणि वाईन घेऊन येईल, तर तो वेड लागल्यासारखं हसला असता. पण आज तो ते सगळं घेऊन आला होता आणि समोर बसला होता. माधव वॉज अॅम्युज्ड.
किरणने सावकाशपणे सगळीकडे नजर फिरवली.
"घर छान आहे तुमचं!" दोघांकडे आळीपाळीने पाहात तो त्याच्या घुमल्यासारख्या घोगरट आवाजात म्हणाला.
"थँक्स! गेल्या वर्षीच शिफ्ट झालो इथे." माधव प्रसन्न हसून म्हणाला, "ये ना. दाखवतो तुला घर."
किरण किंचितसा हसला आणि त्याचे सतत हसल्यासारखे दिसणारे पिंगट डोळे मिश्कीलपणे आणखी बारीक झाले. त्याने न सांगताच त्याच्या हसण्याचं कारण माधवला कळलं आणि त्यालाही थोडं हसू आलं, पण आता तो बोलून बसला होता. क्षणभर त्यांनी दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मग त्या टिपिकल रिच्युअलसाठी मनाचा हिय्या केल्यासारखा तो उठला.
रूढीप्रमाणे माधवने त्याला सगळं घर फिरून दाखवलं आणि त्यानेही रूढीप्रमाणे प्रत्येक ठिकाणी "वा वा, छान छान" असे उद्गार काढले. पण त्यात त्या पहिल्या वाक्याइतका सच्चेपणा उरला नव्हता.
"बरेच दिवस झाले तुला घरी बोलवायचं होतं, पण शेवटी आज मुहूर्त लागला." परत जागेवर येऊन बसल्यावर माधवने त्याला म्हटलं.
"बरेच कसले? मलाच इथे येऊन फक्त दीड महिना झालाय."
"हो, पण आपण गेल्या दोन्ही वेळा बाहेरच भेटलो आणि प्रत्येक वेळी ये घरी म्हणायचं आणि बोलवायचंच नाही, हे बरोबर नाही." मानसी पाण्याचा ग्लास घेऊन येता येता म्हणाली.
"यू हॅव अ पॉईंट देअर" पाण्याचा ग्लास घेत तो म्हणाला, "आय अॅम ग्लॅड यू इन्व्हाईटेड मी."
"शिवाय एनी वे आमच्या तीन-चार मित्रपरिवारांचा भेटण्याचा बेत होताच आज, म्हटलं तुलाही ग्रूपमध्ये इनिशिएट करावं." माधव म्हणाला.
"हां, हे एकदम बेस्ट थिंकिंग झालं."
मग माधवने त्याला त्याच्या मित्रांची थोडी माहिती दिली. ते बर्‍याच वेळा करत असणार्‍या अॅक्टिव्हिटीजची माहिती दिली. तो बराच उत्सुक दिसला नवे मित्र जोडायला.
"बाकी तू खूपच बदलला आहेस हं!" बाकीचं सटरफटर बोलून थोडी शांतता झाल्यावर माधव शेवटी बोलून गेलाच.
"म्हणजे?"
"म्हणजे...यू हॅव प्रोग्रेस्ड अ लॉट. एस्पेशियली... यू नो, गिव्हन युवर.." हम्बल म्हणायला माधव जरा अडखळला, "...बॅकग्राऊंड..."
"हम्म्म" डोकं किंचित वरखाली हलवत त्याने विचार केला, " आयल टेक दॅट अॅज अ कॉम्प्लिमेंट, पण हॅलो! आय डोन्ट नो तुम्हाला तेव्हा काय वाटायचं, पण मी काही गरीब नव्हतो!"
यावर काय रिअॅक्शन द्यावी, याचा माधव विचार करू लागला, पण तोच पुढे बोलायला लागला,
"म्हणजे माझे आईवडील त्यांच्या लहानपणी नक्कीच गरीब होते आणि म्हणूनच नंतर पैसे मिळूनही ते गरीबच राहिले आणि त्यांनी कधीही मनासारखा पैसा खर्च केला नाही. बट नॉट मी! मी गरीब नव्हतो. आय हॅड अ ग्रेट चाईल्डहूड! खूप श्रीमंती नव्हती, पण खायला प्यायला भरपूर होतं, कपडेलत्ते पुरेसे होते. भरपूर हुंदडायला मिळायचं. माझी आई बरीच प्रेमळ आणि अं.. जरा निष्काळजीसुद्धा होती, त्यामुळे सकाळ-संध्याकाळ मी खेळत असायचो. अभ्यासाचा फार कधी दबाव नव्हताच. पण त्यामुळेच आय थिंक मी एकदम हेल्दी आणि हॅपी गो लकी झालो. सतत मातीत खेळल्यामुळे माझा अगदी अवतार व्हायचा, म्हणून तुम्हा लोकांना तेव्हा वाटलं असेल कदाचित."
माधवला एकदम काहीतरी आठवलं.
"तुला शर्वरी आठवते का रे?"
"ऑफकोर्स आय डू!" क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, "ओह, शर्वरी, शर्वरी, शर्वरी! तिला मी कसा विसरेन? शी वॉज अ फाईन गर्ल."
माधवच्या चेहर्‍यावर आश्चर्य लख्खपणे पसरले आणि मानसीच्या चेहर्‍यावर उत्सुकता उमटून गेली. माधव आश्चर्याने पुढे काहीतरी विचारणार, इतक्यात डोअरबेल वाजली आणि तो विषय तिथेच राहिला.

माधव-मानसीच्या एकेक मित्रवर्याचं सहपरिवार आगमन व्हायला लागलं आणि मग घरात एकच गोंधळ झाला. माधवने प्रत्येकाशी किरणची ओळख करून दिली आणि तोही प्रत्येक वेळी उभा राहून प्रत्येकाशी हात मिळवत होता, बोलत होता.
जवळजवळ सगळे जमल्यावर माधवने घरातली ग्लेन फिडिचची आणि किरणने आणलेली वाईनची बाटली उघडली आणि मैफलीने सूर पकडला. घुटक्या-घुटक्यांनी गप्पा सुरू झाल्या. ग्लास संपता संपता, हसण्याचे फुस्स फवारे किंवा गडगडाटी धबधबे, खेचाखेची, टोप्या उडवणे असे प्रकार फॉर्मात आले. जागतिक राजकारणापासून आपापल्या ऑफिसातल्या आणि सोसायटीतल्या भानगडींपर्यंत सगळे विषय चघळले जात होते, मध्येच हौशी गायकांनी आपले गळे साफ करून घेतले, मानसीला झालेल्या आग्रहावरून तिने तिच्या एक-दोन कविता ऐकवल्या. किरणनेही त्याच्या नेपाळमधल्या आणि युरोपमधल्या ट्रेकींगमधले काही किस्से सांगितले. थोड्या वेळाने सगळ्यांना भुका लागल्यात हे पाहून मानसीने टेबलवर जेवण मांडल्याचे जाहीर केले आणि मग हळूहळू सगळे दोन-तीनच्या गटांमध्ये विभागले जाऊन बोलत बोलत प्लेट्स भरून घेऊ लागले, मुलं-बाळंवाले मुलांना भरवू लागले.
जेवणं झाल्यावर यथावकाश एकेक परिवार निरोप घेऊ लागला आणि माधव प्रत्येकाला लिफ्ट लॉबीपर्यंत सोडायला जाऊन येऊ लागला. किरण आणि मानसी सोफ्यावर बसून गप्पा मारत बसले. शेवटच्या जोडप्याला बाय करून माधव आत आला, तेव्हा मानसीचे शब्द त्याच्या कानावर पडले,
"ओह, दॅट वॉज रिअली ब्यूटिफुल!"
"काय ते?" त्याने उत्सुकतेने विचारलं.
"काही नाही रे, कवितांबद्दल बोलत होतो आम्ही." किरण म्हणाला आणि मग लगेच उठत म्हणाला, "चला, मीसुद्धा निघतो आता."
"थँक यू!" मानसीकडे वळून त्याने आपला उजवा हात हॅन्डशेकसाठी पुढे केला आणि तिने हात दिल्यावर तो हातात घेऊन म्हणाला, " खूप मजा आली आज! थँक्स अगेन फॉर इन्व्हायटिंग मी."
"यू आर मोस्ट वेलकम!" मानसी म्हणाली. बहुधा तिने वाईनचा एक ग्लास जास्त घेतला असावा. तिचे गाल आणि कान लालबुंद झाले होते आणि डोळे काचेरी झाले होते.
तिला बाय म्हणून तो माधवकडे वळला आणि म्हणाला, " चल खाली मला गाडीपर्यंत सोडायला."
खाली जाताना तो लिफ्टमध्ये काही क्षण मान खाली घालून उभा राहिला आणि मग खाली बघतच एकदम म्हणाला, "आय थिंक शी लाईक्ड मी!"
"कोण?", बुचकळ्यात पडून माधवने विचारलं.
"शर्वरी."
"काय?" प्रयत्न करूनही माधवला हसू लपवता येईना.
"हसू नकोस. आय अॅम सिरियस."
"ड्यूड, हसू नको तर काय करू? जिच्याशी तू कधीही बोलला नाहीस आणि जिने पहिल्याच वेळी तुला पाहून 'हा असेल तर मी खेळणार नाही' असं सांगून तुला कटवला होता, तिला तू आवडला होतास असं तू म्हणतोस?"
"होय. तिला मी आवडलो होतो." एकेका शब्दावर जोर देत तो म्हणाला, "बट शी हेटेड इट. शी हेटेड दॅट शी लाईक्ड मी."
"काय बोलतोयस तू? जर तिला तू आवडला असता तर व्हाय वुड शी हेट इट?" लिफ्ट थांबल्यावर दरवाजा उघडून बाहेर येत माधव खोचकपणे म्हणाला, "अॅन्ड व्हाय वुड शी लाईक यू इन द फर्स्ट प्लेस?" त्याला हे भयंकर मनोरंजक वाटू लागलं होतं.
"का म्हणजे?" खिशातून सिगारेटचं पाकीट काढत किरण गंभीरपणे म्हणाला, "मे बी शी फाऊंड मी फिजिकली अॅट्रॅक्टिव्ह."
"फिजिकली?"
"हो. का नाही? आय वॉज अ व्हेरी अॅक्टिव्ह यंग मॅन अॅट दॅट टाईम. आणि कॉलनीतल्या त्या वयाच्या सगळ्या पोरांमध्ये आय वॉज द वन विथ द मोस्ट स्ट्रेट लिम्ब्ज, हे तुला आठवतच असेल."
त्याने पाकीटातून सिगारेट काढून शिलगावली आणि माधवला दुसरी ऑफर केली.
"हं.." त्याची तेव्हाची आकृती आठवायचा प्रयत्न करत माधव म्हणाला, "ते मला मान्य आहे. पण तेव्हा ती फक्त दहावीत होती बाबा आणि तू नववीत."
"म्हणजे सोळा वर्षांची! क्वाईट द राईट टाईम टू फाईंड समवन अॅट्रॅक्टिव्ह. नो? त्याआधी किंवा कधीही आम्ही बोललेलो नसलो तरी एकमेकांना अनेक वेळा पाहिलं नक्कीच होतं."
त्याने दिलेली सिगारेट पेटवता पेटवता माधव विचारात पडला.
"ओके. वादासाठी असं समजलो की तिला तू आवडला होतास, तर त्या सिच्युएशनमध्ये, 'हा असेल तर मी खेळणार नाही' असं ती का म्हणेल? उलट तिने खूश व्हायला पाहिजे होतं की नाही?"
"येस. तिने खूश व्हायला पाहिजे होतं" वरती बघत धूर सोडत तो हसून म्हणाला, " संस्कार, समाज आणि संस्कृती नसती तर ती नक्कीच खूश झाली असती. बट यू नो हाऊ मेनी टॅबूज वुई हॅव अराऊंड दीज थिंग्ज! त्या वयात कोणाला असं काही वाटण्याची परवानगीच नसते. त्यात तिचं दहावीचं वर्ष होतं आणि मी? मी तर वे आऊट ऑफ हर लीग होतो! आय हॅड नो स्टेटस. ना आर्थिक बाबतीत, ना सामाजिक दर्जाच्या बाबतीत. दॅट्स व्हाय आय थिंक शी हेटेड दॅट शी लाईक्ड मी. आणि तिला त्या दोन्ही भावनांचं विश्लेषण करणं जमलं नाही. मलाही तेव्हा ते कळलं नाही. मला त्या दिवशी खूप अपमानित झाल्यासारखं वाटलं अॅन्ड आय डिड नॉट फरगेट दॅट फॉर लाँग टाईम."
थांबून त्याने एक दीर्घ झुरका मारला. माधवनेही काही न बोलता त्याचं अनुकरण केलं.
"जेव्हा आपण असे नियम सिरियसली घेतो आणि त्या नियमांबाहेरचं आपल्याला काही आवडतं ना, तेव्हा आपल्याला स्वत:ची लाज वाटते, घृणा वाटते. त्यामुळे वुई अॅक्च्युअली स्टार्ट हेटिंग द व्हेरी थिंग वुई लाईक्ड!" डोळे बारीक करून कुठेतरी शून्यात पाहात तो बोलू लागला, " खूप काळाने हे मला कळलं आणि मग माझी अपमानाची भावना कमी झाली. माझा अपमान तिने केलाच नाही, अपमान केला असेल तर या नियमांनीच."
माधवला हे खूपच बादरायण वाटायला लागलं होतं आणि आता ते आवरायला पाहिजे होतं. पण तरीही उत्सुकतेपोटी त्याने किरणला डिवचलंच.
"तुला खात्री आहे ते असंच होतं म्हणून?"
"अं?" त्याने माधवकडे एकदा रोखून पाहिलं आणि सिगारेटचा आणखी एक खोल झुरका घेऊन हळूहळू धूर सोडत बराच वेळ गप्प राहिला.
"शंभर टक्के खात्री नाही," थोड्या वेळाने तो हळूच म्हणाला, " कदाचित ती नुसतीच दुष्ट असेल, पण त्याची शक्यता किती आहे?"
"हं.." एवढंच बोलून माधव गप्प राहिला आणि त्याच्या त्या मनोरंजक सेल्फ प्रोटेक्टिव्ह थिअरीचा विचार करत बसला. किरणही कसलातरी विचार करत झुरके घेत राहिला. सिगारेट संपल्यावरही पाचेक मिनिटे ते तसेच उभे राहिले. थोड्या वेळाने एक मोठा सुस्कारा सोडून किरण भानावर आला.
"एनी वे, चल मी निघतो. खूपच मजा आली आज." माधवकडे आपला उजवा हात पंजा लढवल्यासारखा धरून तो म्हणाला.
माधवने त्याच्या हाताला हात भिडवल्यावर त्याने तो बळकटपणे दाबला आणि माधवला किंचित त्याच्याकडे ओढून डाव्या हाताने त्याचा उजवा खांदा दाबला,
"नॉर्मली माझ्यासारख्या सड्याफटिंगाला कोणी असं फॅमिली गॅदरिंगमध्ये बोलवत नाही. बट यू डिड. थँक्स फॉर दॅट!"

त्याला बाय करून माधव वरती घरात आला तेव्हा सगळं आवरून मानसी शॉवर घेत होती. तो बेडवर तक्क्याला टेकून रेलला आणि डोक्यामागे हात धरून विचार करत पडून राहिला. मानसी बाथरूममधून फ्रेश होऊन बाहेर आली आणि येऊन त्याच्या छातीवर डोकं टेकवून पहुडली.
"तू सिगारेट ओढलीयेस?" थोड्या वेळाने तिने वर न बघताच त्याला विचारलं.
"हो, किरणने ऑफर केली खाली." तो म्हणाला, "इंटरेस्टिंग फेलो ही इज. नाही?"
"हं.." एवढंच म्हणून ती त्याच्या टीशर्ट वरून त्याच्या छातीवर बोट फिरवत राहिली. थोड्या वेळाने तिने डोकं उचलून त्याच्याकडे पाहिलं.
"लाईट्स ऑफ करतोस?"
त्याने तिच्याकडे पाहिलं. तिचे डोळे पुन्हा काचेरी दिसत होते आणि खालचा ओठ उमलायला लागला होता. त्याच्या चेहर्‍यावर स्मित उमटलं आणि एक हात तिच्या खांद्यांभोवती टाकत एक हात लांबवून त्याने दिवे बंद केले.
थोड्या वेळाने त्याच्या धपापणार्‍या कुशीत ती क्लांत शरीराने पडून राहिली तेव्हा तो आश्चर्यानंदित झाला होता. "शी वॉज अ डिफरंट वूमन टुडे," त्याला वाटलं. वाईनचा असा परिणाम असेल तर घरात वाईनची एक बाटली नेहमी ठेवायला हरकत नाही, अशी नोंद त्याच्या मेंदूने घेतल्यावर जडावलेले त्याचे डोळे अलगद मिटले.

त्यानंतर दोन-तीन महिन्यांनी एका शुक्रवारी सकाळी ऑफिसला जायच्या आधी चहा घेत तो पेपर वाचत होता. दुसर्‍या दिवशी काही मित्रांबरोबर सहपरिवार एका डे-ट्रीपला जायचा प्लॅन ठरत होता. पेपर वाचता वाचता त्याला काहीतरी सुचलं.
"अरे हो, किरणलाही सांगतो उद्याचं. त्यालाही आवडेल कदाचित जॉईन व्हायला." पेपर बाजूला न करताच तो म्हणाला.
मानसी डायनिंग टेबलवर काहीतरी आवरत होती.
"नको. त्याला नको सांगू." ती तुटकपणे म्हणाली.
"का?" आश्चर्याने पेपरचा कोपरा थोडा दुमडून त्यावरून तिच्याकडे पाहून त्याने विचारलं, " का बरं?"
"काही कारण असं नाही, पण नको." त्याच्याकडे न बघताच मानसी म्हणाली.
"तो एकटा बॅचलर आहे म्हणून?"
"नाही... तसंच काही नाही.. पण नको वाटतं मला." अजूनही ती त्याच्याकडे बघत नव्हती.
"पण का? कारण काय आहे? काही झालं का?"
आता मात्र तिने त्याच्याकडे तीव्र कटाक्ष टाकला. तिच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या.
"काही व्हायला कशाला हवं? मला तो आवडत नाही. बस्स. आणखी कारण कशाला पाहिजे?" ती ताडकन म्हणाली आणि वळून बेडरूमकडे चालू लागली. "उशीर होतोय मला. तुझा डबा भरून ठेवला आहे."
पेपर धरलेले माधवचे दोन्ही हात आपसूक खाली आले आणि पेपर त्याच्या मांडीवर चुरगळला गेला. तिच्या पाठमोर्‍याच आकृतीकडे पाहताना त्याच्या भुवया प्रश्नार्थकपणे आक्रसल्या होत्या आणि चेहर्‍यावर बावचळल्यासारखे भाव आले होते. हिला असं एकाएकी काय झालं, याचा त्याने अर्धाएक मिनिट तीव्रतेने विचार केला आणि नंतर खांदे उडवून, चुरगळलेला पेपर झटकून पुन्हा त्याने त्यात डोके घातले.

Saturday, July 20, 2013

नार्सिससचा स्वप्नदोष

काचेच्या भांड्यातल्या गोल्डफिशसारखा
विहरतो तो स्वच्छंद लिमिटेड अवकाशात 
अन् तापलेल्या सूर्याच्या तोंडावर मिटून कवाडं
प्रतिबिंब पाहतो काचेत अ‍ॅनिमिक प्रकाशात 

बांधलेल्या आखीव मॅग्नेटिक रस्त्यांवर
गुळगुळीत मॅगलेव्हने जाताना भर वेगात
ऑटोपायलटवर टाकलेल्या आयुष्याला 
रस्ता सोडून जायचं येतच नाही मनात

क्षणात रंग बदलणार्‍या बत्तीस बिटी भिंती अन्
आकार बदलत्या नॅनो फर्निचरच्या गराड्यात
कंटाळाच भरून राहिलेला असतो मख्खपणे
त्याच्या वेल इंजिनिअर्ड पिळदार शरीरात

चौघांचं चौकोनी चतुरस्र कायदेशीर कुटुंब
पसरलेलं जगभर ताणून एकेका कोपर्‍यात
स्वतंत्र, स्वतःचा असतो तो संपूर्णपणे
यंत्रांच्या आधाराने या एकविसाव्या शतकात

दचकून उठतो तो रोज गुडघ्यातलं डोकं काढून
स्वप्नातल्या जंगलाच्या मादक वासाने 
अन् डिझायनर लाईफच्या शुभ्र चादरीवरचे
निरर्थकतेचे डाग पाहात बसतो सुन्नपणाने

Saturday, June 15, 2013

लढवय्या शेतकरी

वॉर ऑन हंगर आणि एफिशियंट मार्केट्स
"अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूळ गरजा आहेत" हे घासून गुळगुळीत, बुळबुळीत झालेलं वाक्य; पण प्रगतीचं घोडं अजून पहिल्याच पायरीवर अडलेलं आहे. अर्थातच, पुढचं वळण घेतलं की आलंच नंदनवन आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण तिथे लवकरच पोचू हा विश्वास अटळ आणि अढळ आहेच. माणूस सर्वसुखी होण्यात अनेक नैसर्गिक अडचणींचा मोठा अडथळा आहे आणि त्यासाठी माणसाला अनेक पातळीवर युद्ध करावे लागते. त्यापैकीच एक आहे वॉर ऑन हंगर.
                  वर्ल्ड बँक, युनो आणि जगातली तमाम सरकारे यांना गरिबांची भलती काळजी लागून राहिलेली असते. सध्या जी८ देशांची "हंगर समिट" चालू आहे, त्यात २.७ अब्ज पाऊंड्स खर्च करून दरवर्षी कुपोषणाने मरणार्‍या लाखो मुलांना वाचवण्याची प्रतिज्ञा करण्यात आली आहे. जगाची लोकसंख्या आज सात अब्ज आहे आणि त्यातले एक अब्ज लोक उपाशी आहेत. त्यातले २७% भारतात आहेत. पण त्याचवेळी भारत अन्नधान्याचा निर्यातदारही आहे. एकूणच जगात आजच्या घडीला दहा-अकरा अब्ज लोकांना पुरेल इतके अन्न निर्माण होते. (जगाची लोकसंख्या दहा अब्जावर स्थिर होईल असा अंदाज आहे.)

जगात निर्माण होणार्‍या अन्नापैकी ४०-५०% अन्न वाया जाते. हे वाया जाणारे अन्न काही शेतात वाया जात नाही. ते वाया जाईल याची काळजी घेतात आपली एफिशियंट मार्केट्स. उदाहरणार्थ, धान्यापासून इंधन तयार करणे, दारू तयार करणे किंवा गेलाबाजार कत्तलखान्यातल्या गुरांना ते खाऊ घालणे जास्त फायदेशीर असल्याने ज्यांच्याकडून काहीही आर्थिक लाभ नाही अशा लोकांना अन्न देण्यात काय हशील?
समजा अगदी निर्यात करता आले नाही, इंधनासाठी वापरता आले नाही, दारूसाठी वापरता आले नाही तरी ते फुकटात वाटण्याचा जास्तीचा खर्च कोण करणार? त्यापेक्षा ते तसेच पडून सडून गेलेले बरे.

पण मग लक्षावधी लोक भुकेले असताना आणि टनावारी अन्न वाया जात असताना करता येण्यासारखा सोपा-सुटसुटीत उपाय काय असावा बरं?

करेक्ट!  

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आणखी अन्न निर्माण करणे!

इतके अन्न-धान्य निर्माण झाले पाहिजे की पडून सडून जाणार्‍या अन्नाची विल्हेवाट लावण्याचा खर्च ते फुकटात वाटण्यापेक्षा जास्त झाला पाहिजे असे अगदी सोप्पे गणित आहे; पण हे गणित प्रत्यक्ष यायला आधुनिक तंत्रज्ञानात पारंगत अशा काही विशेष शेतकर्‍यांची मदत घेणे भाग आहे. आपल्या मदतीची इतकी गरज आहे हे पाहून आणि "वॉर ऑन हंगर"मधला फायदा पाहून मॉन्सॅन्टो, बेयर, सिन्जेन्टा सारखे अनेक नवे शेतकरी आता झपाट्याने या क्षेत्रात उगवून फोफावले आहेत.
आता वॉर म्हटले की रक्तपात, हिंसा आणि मृत्यू हे ठरलेलेच. भुकेविरुद्धच्या युद्धात अन्नधान्याचे उत्पादन कमी होण्यास कारणीभूत असलेल्या (आणि नसलेल्याही) कीडिंचा, तणाचा आणि इतर जीवजंतूंचा नाश होणार हे ओघानेच आले आणि हा असा नाश करण्याचा जोरदार अनुभव ही या शेतकर्‍यांची जमेची बाजू आहे.

डीडीटी ते राऊंडअप

अगदी दुसर्‍या महायुद्धापासून ते छोट्या-मोठ्या युद्धांपर्यंत अमेरिकन सरकारला मदत करणार्‍या मॉन्सॅन्टोने १९४४ साली अशाच एका वॉर ऑन मलेरियामध्ये डीडीटीचा शोध लावला. अगदी काळजीपूर्वक त्याचे टेस्टिंग करून त्यापासून काहीही धोका नाही आणि फक्त डास, पिकांवरची कीड व मलेरियाचे जंतूच मरतील ही खात्री केल्याचे दावे करून त्यांनी ते विकायला आणले. लवकरच आपण रोगमुक्त होणार म्हणून समस्त जगाने आनंदाने त्याचा मुबलक वापर सुरु केला. १९७२साली रेचेल कार्सन यांच्या 'सायलेंट स्प्रिंग' या पुस्तकानंतर केवळ लोकाग्रहास्तव त्यावर अमेरिकेत बंदी आणण्यात आली आणि ते युद्ध थांबवावे लागले. पण इतरत्र त्याचा वापर बराच काळ चालू राहिला.
अर्थात त्यापूर्वीच मॉन्सॅन्टोने दुसरी महत्त्वपूर्ण जबाबदारी शिरावर घेतली होती. व्हिएतनामच्या युद्धात व्हिएतनामी सैनिक लपून गनिमी कावा करतात म्हणून तिथली दाट वृक्षराजी नष्ट करण्यासाठी एजंट ऑरेंज आणि त्या सैनिकांना अन्नपुरवठा करणारी त्यांची पीके नष्ट करण्यासाठी एजंट ब्लू अशी दोन अमोघ रासायनिक अस्त्रे मॉन्सॅन्टोने निर्माण केली. ती फवारल्यानंतर जवळजवळ सत्तर-ऐंशी लाख व्हिएतनामी लोकांना उपासमार टाळण्यासाठी स्थलांतर करावे लागले. एजंट ऑरेंजच्या आणि त्यात मिसळल्या गेलेल्या डायॉक्सिनच्या विषारीपणामुळे पिढ्याच्या पिढ्या बरबाद झाल्या. मॉन्सॅन्टोचा दबदबा वाढतच होता.
                         विसाव्या शतकाच्या शेवटी आपल्या रासायनिक ज्ञानाचा उपयोग या कंपन्यांनी शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी करायला सुरुवात केली. उदाहरणार्थ जीनटेक नावाच्या कंपनीने बोव्हाईन सोमॅटोट्रॉपिन नावाचा एक हार्मोन कृत्रिमरीत्या तयार करायचे प्रयत्न चालवले होते. मॉन्सॅन्टोने या कंपनीशी हात मिळवणी केली आणि तीस कोटी डॉलर्स खर्चून रिकॉम्बिनन्ट डीएनए वापरून एकदाचा हा हार्मोन तयार केला. डीडीटीप्रमाणेच याच्याही काटेकोर तपासण्या करण्यास मॉन्सॅन्टो विसरली नव्हती. त्यांनी या हार्मोनच्या काटेकोर फील्ड ट्रायल्स घेतल्यावरच ते बाजारात आणले. त्यांनीच केलेल्या या तपासण्यांमध्ये थोडा जरी धोका आढळला असता तरी त्यांनी तीस कोटी डॉलर्सवर हसत-हसत पाणी सोडले असते यात काय संशय? हा हार्मोन गायींच्या दूध निर्मितीसाठी कारणीभूत असतो, त्यामुळे बाहेरून हा हार्मोन टोचल्यावर गायींचे दुग्धोत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढते आणि शेतकर्‍यांचा अमाप फायदा होतो. सध्या हा हार्मोन भारतासह अनेक देशांमध्ये वापरला जातो.
असे असूनही काही लोकांनी याविरुद्ध ओरड सुरु केली. अतिदुग्धोत्पादनाने गायींच्या सडा-आचळांमध्ये जंतूसंसर्ग होऊन पू होतो आणि असा पू दुधात मिसळला जाऊ शकतो असा प्रचार काही लोकांनी चालू केला. मॉन्सॅन्टोच्या चाचण्यांमध्ये, असा पू दुधात जाऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेतली जाते असे नमूद केलेले असूनही काही लोकांनी त्यावर विश्वास दाखवला नाही. शिवाय या जंतुसंसर्गावर औषध म्हणून वापरली जाणारी प्रतिजैविकेही दुधात मिसळतात असाही आरोप केला.
काही डेअरीचालकांनी  आमच्या दुधात असा हार्मोन नसतो असे लेबल त्यांच्या दूधपिशव्यांवर लावायला सुरुवात केली. पण नैसर्गिक हार्मोन आणि मॉन्सॅन्टोच्या हार्मोनमध्ये काहीही फरक नाही असा दावा करून मॉन्सॅन्टोने त्यांच्यावर खटले ठोकले आणि ती लेबल्स बाद ठरवली. काही लोकांनी असा हार्मोन टोचणे गायींच्या आरोग्याला धोकादायक आहे असा आरोप केला. इन्शुलिन माणसाच्या शरीरातले नैसर्गिक द्रव्य असले तरी ते बाहेरून टोचत राहिल्यास माणूस आजारी पडेल तसेच गायींचेही आहे असे त्यांचे म्हणणे होते.
त्याच दरम्यान  जेन अ‍ॅक्रे आणि स्टीव्ह विल्सन या फॉक्स टीव्हीसाठी काम करणार्‍या पत्रकारांच्या जोडगोळीने मॉन्सॅन्टोच्या चाचण्यांच्या कागदपत्रांचा अभ्यास करून व मॉन्सॅन्टोच्या संशोधकांच्या मुलाखती घेऊन या बोव्हाईन ग्रोथ हार्मोनवर एक चार भागांची मालिका बनवली.
या मालिकेत या हार्मोनचा गायींच्या व माणसांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतात असे सांगणारे अनेक दावे होते आणि मॉन्सॅन्टोच्या दाव्यांचे खंडन होते. जेफ्री स्मिथ या "Seeds Of Deception" पुस्तकाच्या लेखकाने लिहिलेल्या या लेखात  त्याबद्दल विस्तृत माहिती आहे.
मॉन्सॅन्टो हे फॉक्स टीव्हीचे मोठे गिर्‍हाईक असल्याने त्यांनी फॉक्स टीव्हीने खाल्ल्या मीठाला जागून या मालिकेत काही बदल करावे असे सुचवले; पण या पत्रकारांनी ते ऐकले नाही. फॉक्स टीव्हीला नाईलाजाने त्यांना नोकरीवरून काढावे लागले, तर त्यांनी कोर्टात धाव घेतली. कोर्टाने सुरुवातीला पत्रकारांची बाजू घेतली पण मॉन्सॅन्टोने अपील केल्यावर कोर्टाच्या लक्षात आले की एखाद्या बातमीत टीव्ही चॅनलने फेरफार करू नयेत असा फक्त संकेत आहे, कायदा नाही. अशा रीतीने मॉन्सॅन्टोने आणखी एक लढाई जिंकली.

जैवतंत्रज्ञानातल्या या सुरुवातीच्या यशानंतर मॉन्सॅन्टोने जनुकांतरित (जेनेटिकली मॉडिफाईड) पीके निर्माण करायला सुरुवात केली. बेयर कंपनीने निर्माण केलेले बीटी  तंत्रज्ञान वापरून बीटी मका, बीटी वांगे, बीटी कापूस अशा अनेक कीटकनाशक क्षमता असलेल्या वनस्पती त्यांनी निर्माण केल्या. अमेरिकेत उगवणार्‍या मक्यापैकी आता बराचसा मका जनुकांतरित मका आहे. भारतातही बीटी कापूस शेतकरीप्रिय  झाला आहे आणि अनेक शेतकर्‍यांचा बीटी कापसाने बराच फायदा झाला आहे.
बीटी तंत्रज्ञाने वनस्पतींमध्येच कीडनाशक प्रथिने टाकल्याने कीटकनाशकांचा खर्च वाचतो, शिवाय कीटकनाशक फवारावे न लागल्याने जमिनीत व पाण्यात प्रदूषण होत नाही. असा दुहेरी फायदा होत असला तरी त्याविरुद्धही काही लोकांनी ओरड सुरु केलीच. या जनुकांतरित पिकांची पूर्ण चाचणी घेतली गेलेली नाही असा काहींचा आक्षेप होता. मध्यंतरी एका शास्त्रज्ञाने जनुकांतरित अन्न खाऊन उंदरांमध्ये गंभीर आजार निर्माण होतात असा निष्कर्ष काढणारे संशोधन प्रसिद्ध केले. सुदैवाने त्या संशोधनातल्या महत्त्वाच्या त्रुटी लगेच लक्षात आल्याने त्या शास्त्रज्ञाला लगेच कामावरून काढून टाकण्यात आले आणि मॉन्सॅन्टोला लढायची वेळ आली नाही.

मॉन्सॅन्टोने कीटकनाशक वनस्पतींप्रमाणेच तणनाशकरोधी वनस्पतीही निर्माण केल्या आहेत. शेतात शेतकर्‍याला हव्या असणार्‍या पिकांबरोबरच नको असलेले तण आणि मातीतले इतर जीवजंतू त्या पिकांशी स्पर्धा करत असतात. या स्पर्धकांमुळे पिकांची वाढ हवी तशी होत नाही आणि शेतकर्‍याला कमी उत्पादन मिळते. या स्पर्धकांचा समूळ नायनाट करण्यासाठी त्यांच्यावर जहरी तणनाशक औषध फवारणे आवश्यक असते. परंतु, असे जहरी औषध फवारल्यास सामान्य पिकांनाही त्याचा त्रास होतो. म्हणून मॉन्सॅन्टोने संशोधन करून एक जहरी तणनाशक आणि त्या तणनाशकाच्या फवार्‍यातही जिवंत राहील असे पीक अशी जोडगोळी तयार केली. त्या तणनाशकाला अतिशय समर्पक असे नाव देण्यात आले: राऊंडअप. आणि अशा पिकांना राऊंडअपरेडी पीक असे म्हटले जाऊ लागले. राऊंडअपरेडी सोयाबीन आणि करडई ही दोन धान्ये बघता बघता लोकप्रिय झाली आहेत. या राऊंडअपविरोधातही काही लोकांनी लगेच ओरडा सुरु केला. काहींच्या मते ते इतके जहरी आहे की राऊंडअपरेडी पीके सोडल्यात मातीत उगवणार्‍या कोणत्याही वनस्पतीसह सूक्ष्मजंतूंनाही ते नष्ट करते आणि यात पिकांना पोषक अशा जीवजंतूंचाही समावेश होतो.काहींच्या मते या राऊंडअपरेडी पिकांची मातीतून खनिजे शोषण्याची शक्ती कमी असते त्यामुळे त्यांचे पोषणमूल्य नेहमीच्या पिकांपेक्षा फारच कमी असते.
बर्‍याच लोकांचा तर मुळात जनुकांतरित पिकांनाच विरोध आहे आणि त्यांना असे अन्न खायचे नसते. म्हणून अनेक देशांमध्ये अशा अन्नाच्या पिशव्यांवर ते जनुकांतरित असल्याचा इशारा छापणे बंधनकारक केले आहे. याविरुद्ध मॉन्सॅन्टोची लढाई चालू आहे. अमेरिकेतही अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पण मॉन्सॅन्टोने एफडीएकडे असे प्रतिज्ञापत्र दिले आहे की जनुकांतरित पीकांमध्ये आणि सामान्य पारंपारिक पीकांमध्ये काहीही फरक नाही त्यामुळे अशा अन्नधान्यावर वेगळा इशारा छापायची गरज नाही. कोणत्याही कंपनीला आपल्या उत्पादनावर स्वतःचे नाव छापून स्वतःची जाहिरात करायचीच असते; पण याबाबतीत आपल्या उत्पादनांवर स्वत:चे नाव न छापण्याचा उदारतावाद  वाखाणण्यासारखा आहे. अर्थात स्वत:चे व्यावसायिक हितसंबंध सांभाळण्यासाठी मॉन्सॅन्टोला पेटंट ऑफिसात मात्र नाईलाजाने जनुकांतरित पीके सामान्य पीकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत आणि ती मॉन्सॅन्टोच्या परवानगीशिवाय कोणालाही वापरता येणार नाहीत असे ठामपणे सांगावे लागतेच.
इतकेच नाही, तर चोरून जनुकांतरित पीके वापरणार्‍या भामट्या शेतकर्‍यांविरुद्ध सतत लढावेही लागते. हे शेतकरी वार्‍याने जनुकांतरित बियाणे आमच्या शेतात आली असा बहाणा करतात. अशा अनेक शेतकर्‍यांना मॉन्सॅन्टोने कोर्टात खेचून धडा शिकवला आहे, शिवाय वार्‍याने जनुकांतरित बियाणे येऊन रुजू नये म्हणून आपापल्या शेतांमध्ये कडेचा काही भाग बफर म्हणून पडीक ठेवण्याचा सज्जड दमही भरला आहे. मॉन्सॅन्टोच्या दुर्दैवाने पर्सी श्माइसर नामक एका कॅनेडियन शेतकर्‍याने अनेक वर्षे चिवट लढा देऊन मॉन्सॅन्टोविरुद्धचा खटला जिंकला; पण मॉन्सॅन्टोची लढाई संपलेली नाही.
शेतकर्‍यांना पूर्वापार तयार झालेल्या धान्यातून बियाणं वाचवून ठेवायची, वेगवेगळे संकर करायची खोड आहे आणि भारतासारख्या देशात असल्या उद्योगांमधून प्रत्येक धान्याच्या अक्षरश: शेकडो जाती तयार करून ठेवल्या आहेत. ही सवय मॉन्सॅन्टोच्या व्यवसायास अतिशय मारक आहे. उद्या कोणी मॉन्सॅन्टोची जनुकांतरित बीजे घेतली आणि त्यातून भरघोस पीक घेऊन नंतर त्यातलीच बीजं वापरून फुकटात स्वत:चा फायदा करून घेतला तर मॉन्सॅन्टोचे दिवाळे वाजेल. म्हणून मॉन्सॅन्टोने टर्मिनेटर टेक्नॉलॉजी नावाचे अतिशय चतुर तंत्रज्ञान निर्माण केले आहे. हे तंत्रज्ञान वापरून तयार केलेली पीके एका पिढीनंतर स्वतःला नष्ट करतात म्हणजे फुकटात वर्षानुवर्षे बीजे वापरणे किंवा त्यांचा दुसर्‍यांशी संकर करून पेटंट नसलेल्या प्रजाती निर्माण करणे शक्यच होणार नाही.
आता स्वत:चा व्यवसाय सांभाळण्यासाठी हे आवश्यक असतानाही काही लोक जैवविविधता धोक्यात येईल म्हणून त्याविरुद्ध बोंबाबोंब करू लागले आहेत.
मॉन्सॅन्टोच्या अशा प्रत्येक कृतीला विरोध करणे हा काही स्वतःला मानवतावादी आणि पर्यावरणवादी म्हणवणार्‍या लोकांचा धंदाच झाला आहे. ज्या देशांमध्ये राज्यकर्त्यांनी जनुकांतरित पिकांना पाठिंबा दिला आहे त्या देशातले ते राज्यकर्ते व उच्चभ्रू लोक स्वतः मात्र
जनुकांतरित अन्न खात नाहीत; किंबहुना खुद्द मॉन्सॅन्टोच्या कॅन्टीनमध्ये त्यांच्या कर्मचार्‍यांना जनुकांतरित अन्न न दिले जाण्याची ग्वाही दिली जाते असा प्रचार करण्यापर्यंत या लोकांची मजल गेली आहे.
मध्यंतरी अमेरिकेत शेतकर्‍यांच्या हिताचे एक विधेयक पास करण्यात आले. या कायद्यानुसार (Farmers Assurance Act) एखाद्या  शेतकर्‍याच्या उत्पादनाविरुद्ध एखाद्याने कोर्टात तक्रार केली आणि ती ग्राह्य मानून कोर्टाने त्या उत्पादनावर बंदी आणली तरी त्या शेतकर्‍याचे हित पाहून सरकारला ती बंदी अंमलात न आणण्याची मुभा दिली आहे. या कायद्यामुळे उठसूट कोणीही मॉन्सॅन्टोच्या जनुकांतरित पीकांविरुद्ध तक्रार केली आणि कोर्टाने त्यावर बंदी घातली तरी मॉन्सॅन्टोचे नुकसान होण्यापासून संरक्षण होणार आहे.
अर्थातच या कायद्यामुळे मॉन्सॅन्टोच्या हितशत्रूंना पोटशूळ उठला आणि त्यांनी या कायद्याला Monsanto Protction Act असे नाव देऊन त्याविरुद्ध जोरदार आघाडी उघडली आहे.
जगातून भूक कायमची नष्ट करण्यासाठी या सर्वांविरुद्ध मॉन्सॅन्टोची अथक लढाई चालू आहे.

भारत आणि मॉन्सॅन्टो

भारतात मॉन्सॅन्टोचा चंचुप्रवेश आधीच झालेला आहे आणि भारतीय शेतकर्‍यांनी बीटी कॉटनच्या वापराने स्वत:च्या समृद्धीत वाढही करून घेतलेली आहे. अर्थात भारतातही मॉन्सॅन्टोचे हितशत्रू आहेतच. या हितशत्रूंमुळे जनुकांतरित अन्नधान्याला अजून भारतात परवानगी मिळू शकलेली नाही.
वंदना शिवांसारखे पर्यावरणवादी मॉन्सॅन्टोचे कट्टर विरोधक आहेत. मॉन्सॅन्टोने काही वर्षांपूर्वी कारगिल (Cargill) नामक बियाण्यांची कंपनी विकत घेतली. या कंपनीच्या राजस्थानमधील अधिकार्‍याने राजस्थानातल्या एका कृषी विद्यापीठाने शोधलेले
एक बियाणे चोरले असा आरोप वंदना शिवा यांनी आपल्या "Soil not Oil" या पुस्तकात उघडपणे केला आहे. शिवाय विदर्भात होणार्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा संबंध बीटी कॉटनशी जोडण्याचाही प्रयत्न केला गेला आहे.
भारतात जनुकांतरित अन्नधान्यांच्या वापराला परवानगी मिळावी म्हणून मॉन्सॅन्टोच्या प्रयत्नांना वारंवार खीळ बसली आहे. बीटी वांग्याच्या वापरावर कोर्टाने बंदी आणली आहे.
२०१२ मध्ये बासुदेब आचार्य यांच्या अध्यक्षतेखाली एक संसदीय समिती स्थापन करून भारतात जनुकांतरित ध्यान्यांना परवानगी देण्याबाबत विचार करण्यात आला. या समितीने बराच अभ्यास करून शेवटी एकमुखाने जनुकांतरित धान्याला भारतात परवानगी देऊ नये असा निष्कर्ष काढला.
या समितीच्या अहवालात लिहिलेला हा उतारा पाहा:

During their extensive interactions with farmers in the course of their Study Visits, the Committee have found there have been no significant socio-economic benefits to the farmers because of introduction of Bt. cotton. On the contrary, being a capital intensive agriculture practice, investments of the farmers have increased manifolds thus, exposing them to far greater risks due to massive indebtedness, which a vast majority of them can ill afford. Resultantly, after the euphoria of a few initial years, Bt. cotton cultivation has only added to the
miseries of the small and marginal farmers who constitute more than 70% of the tillers in India.

भविष्यात भुकेचा प्रश्न सोडवणारी सस्टेनेबल शेती देण्याचा दावा करणार्‍या मॉन्सॅन्टोला हा एक मोठा धक्का होता. पण मॉन्सॅन्टोने आशा सोडलेली नाही.

नुकतीच भारताचे कृषीमंत्री श्री. शरद पवार व भारताचे पंतप्रधान श्री. मनमोहनसिंग यांनी जनुकांतरित धान्यांच्या क्षेत्रचाचण्यांसाठी अनुकुलता दर्शवली आहे. शिवाय भारताच्या मनुष्यबळ खात्याचे मंत्री श्री. शशी थरूर यांनी जैवतंत्रज्ञानक्षेत्रात कितीतरी रोजगार निर्माण होतील अशा स्वरुपाचे वक्तव्य केले आहे. दूरदृष्टीसाठी प्रसिद्ध असलेले स्वामिनॉमिक्सवाले स्वामीनाथन यांनीही जनुकांतरित पिकांची भलामण केली आहे.
लढवय्या मॉन्सॅन्टोच्या लढाईला यश येईल का हा प्रश्न नसून कधी हा प्रश्न उरला आहे.