Sunday, December 19, 2010

पूल लाईफ

दमटलेल्या संध्याकाळी थंडगार पाण्यात डुंबायचं सुख काही औरच. संध्याकाळच्या कोवळ्या उन्हात चमकणाऱ्या आणि निळ्या टाईल्समुळे निळ्याशार दिसणाऱ्या पाण्यात संथपणे फेऱ्या मारत असताना शरीर आणि मनाची एक मस्त तंद्री लागते. त्याच तंद्रीत काल पोहत असताना एक गमतीदार विचार मनात आला. दोन तासांच्या त्या पोहण्यात आणि आयुष्यात किती तरी साम्य आहे असं वाटलं. कितीही उकडत असलं तरी कपडे काढून थंडगार पाण्यात उतरताना थोडातरी त्रास होतोच. त्या जन्मवेदना. जन्मल्यावर लहान बाळ रडतं तसं पाण्याची सवय होईपर्यंत तोंड वाकडं करून थोडंसं हा हा हू हू केलं जातंच. मग जरा इकडे तिकडे पाहायचं. आपल्यासोबत पूलमध्ये कोण कोण आहे, कोण कसं आणि कुठून पोहत आहे ते पाहून आपल्याला कुठे आणि कसं पोहायचं ते ठरवायचं आणि मग पोहायला सुरुवात करायची. तरूणपणी जसं चुकत माकत धडपडत शिकतो तसंच आखडलेले स्नायू सैल होईपर्यंत जरा लय चुकायला होते, मध्येच नाका-तोंडात पाणी जातं, मध्येच थांबून थोडा अंदाज घेऊन मग पुन्हा सुरु करावं लागतं किंवा कधी कधी आधारही घ्यावा लागतो. कधी कधी उगाचच आपल्या बरोबर पोहणाऱ्या लोकांशी स्पर्धा केली जाते. कोणी आपल्याला मागे टाकून पुढे जात असेल तर उगाचच जोरात हातपाय मारले जातात. त्यात वेगतर वाढत नाही उगाच दमायला मात्र होतं.
थोड्या वेळाने म्हणजे साधारण चाळीशीच्या आसपास पाण्याचा अंदाज येतो, कुठे कसा प्रवाह आहे ते कळायला लागतं, पाण्याची आणि आपली ओळख झाल्यासारखी वाटते आणि मग कमीत कमी प्रयत्नात आपण सहज पोहू लागतो, पोहण्याची एक मस्त मजा यायला लागते आणि अनंतकाळ असंच पोहत राहावं असं वाटू लागतं. आता पोहोण्याकडे लक्ष न देताही आपण वेगात जात असतो आणि तरीही आजूबाजूला पाहून कोवळे उन, आजूबाजूची झाडं, माणसं यांचं निरीक्षण करू शकतो. पण मग हळू हळू संध्याछाया दाटू लागतात. अंधार पडू लागतो आणि शरीरही दमायला लागतं. पुन्हा पोहण्याची लय चुकू लागते आणि इकडे तिकडे पाहताना मध्येच नाका-तोंडात पाणी जाते. आपल्या आधी आणि बरोबर पूलमध्ये उतरलेले हळू हळू निघून जातात. तरीही हट्टाने आपण काही काळ पोहतच राहतो. पण थोड्यावेळाने अगदीच कंटाळा येतो. मगाशी सुखकारक वाटणारी तंद्री आता कंटाळवाणी वाटू लागते. उन्हं जाउन आता अंधार पडल्याने बाकीचं काही दिसतही नसतं. मग एका क्षणी आपण निर्णय घेतो आणि पूलच्या बाहेर येतो, पूलच्या जगातून निघून जातो.
सो फार सो गुड. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांच्या आयुष्याचं प्रतिबिंब पूलमध्ये सहज मावतं. पण मग विचार येतो की पूल मध्ये पोहणं आयुष्यासारखं आहे हे म्हणणे जेवढे बरोबर आहे तेवढेच आयुष्यच पूल मध्ये पोहोण्यासारखं आहे हे म्हणणे बरोबर नाही का? पद्धतशीरपणे आखलेल्या चाकोऱ्यामधून, ठरलेल्या मार्गांनी, हवे ते आधार घेउन माझं पोहणं चालू असतं. त्यातच काही ठरलेल्या स्पर्धा आणि ठरलेले पाडाव गाठल्याचा ठरलेला आनंद आणि सुखाच्या ठराविक कल्पना. पोहण्याचे सगळे आधार आणि जमा केलेल्या वस्तू प्राणपणाने जपत पोहणं संपेपर्यंत जास्त खोल नसलेल्या पाण्यात येरझाऱ्या घालणे. खुल्या समुद्रात पोहणारे वेगळेच. कधी त्यांना मोती मिळतात तर कधी अकाली जलसमाधी पण जितके पोहतात, धुंदीत पोहतात.

No comments:

Post a Comment