Saturday, November 10, 2018

रापा नुईचे मोआई

समुद्रकिनाऱ्याजवळच्या बागेत बांधलेल्या लाकडी मंडपात बैठक सुरू झाली, तेव्हा सूर्य मावळतीकडे झुकला होता. समुद्रकिनारी रांगेत उभे असलेले टोळीप्रमुखाच्या पूर्वजांचे भव्य पुतळे सोनेरी प्रकाशात चमकत होते. त्या पुतळ्यांकडे अभिमानाने पाहून वंदन करून प्रमुखाने बोलायला सुरुवात केली, “आपल्या सगळ्यांना हे विदीतच असेल की ‘त्यांनी’ बेटावरचा सगळ्यात मोठा पुतळा उभारला गेल्या महिन्यात आणि मुद्दाम आपल्या समोरून मोठी मिरवणूक काढली होती. हा आपल्या पूर्वजांचा अपमान आहे आणि तो आम्ही कदापिही सहन करणार नाही”.
बैठकीत जमलेल्या तरुण मंडळींनी टाळ्यांचा कडकडाट केला. प्रमुखाने “राजगुरू” म्हणवणाऱ्या पुजाऱ्याकडे पाहिले. त्याने समाधानाने मान डोलावली.
“ह्या अपमानाचा व अन्यायाचा बदला म्हणून आमचे पूज्य पिताश्री स्वर्गवासी राजेसाहेबांचा त्यापेक्षाही उंच पुतळा बनवण्याचा निर्णय एकमताने घेण्यासाठी आज आपण इथे जमलो आहोत.”
पुन्हा एकदा टाळ्या-शिट्ट्या-चित्कारांचा कल्लोळ झाला. मंत्रीमंडळातल्या दोन वृद्ध मंत्र्यांनी एकमेकांकडे मूकपणे पाहिलं.
“आपल्या समृद्ध परंपरेप्रमाणे ह्यावर आता चर्चा होऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल. प्रथमत: ह्या प्रस्तावाविरोधात मत असणाऱ्यांनी बाजू मांडावी.”
मंडपात शांतात पसरली. मागं उभे असलेले लोक माना वर करून चवड्यांवर उभे राहून कोण उभं राहतंय ते पाहू लागले. म्हाताऱ्या मंत्र्यांपैकी एकजण हळूहळू उभा राहिला.
“आपल्या पूर्वजांचा आदरसत्कार करणे ही तर फारच मोठी पुण्याची गोष्ट आहे ह्यात वाद नाही”, घसा खाकरून तो म्हणाला,”परंतु परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. आपल्या बेटावर आता झाडं फार कमी उरलीत. ती झाडं पुतळ्यासाठी तोडण्यापेक्षा वर्ष-दोन वर्षं ती वाढवण्यावर लक्ष देऊ या आणि मग पुतळा बांधता येईल. झाडं कमी उरल्याने आपल्या तरूण मंडळींना होड्याही बांधणे महाग पडतंय. मासेमारीत घट झालीय. त्यात पाऊस कमी झाल्याने दुष्काळ पडताहेत. मुबलक असणाऱ्या गोगलगाई जवळजवळ दिसेनाशा झाल्यात. उंदरांनी उच्छाद मांडला आहे. त्याकडे तातडीने लक्ष द्यावे असे मला वाटते.”, इतकं बोलून तो खाली बसला.
श्रोत्यांमध्ये एकदोन माना अनुमोदनासाठी डोलल्या न डोलल्या, तोच टोळीप्रमुखाच्या जवळच्या काही लोकांनी आरडाओरडा सुरू केला. “हा काय आपल्याला दुर्बळ आणि गरीब समजतो काय? अरे, आपल्या शूरवीर पूर्वजांनी ह्या अफाट सागराशी झुंज देत छोट्या होडक्यातून प्रवास करत हे बेट गाठले; आणि आपण ह्या किरकोळ संकटांना घाबरून त्यांचा अपमान होऊ द्यायचा? हा माणूस ‘त्यांच्यासमोर’ आपली मान खालीच घातलेली राहावी म्हणून प्रयत्न करतोय. हा टोळीद्रोही आहे. ह्याला हाकलून ‘त्यांच्यात’ पाठवून द्या.”
हे ऐकून श्रोत्यांमधल्या गरम रक्ताच्या तरूण लोकांनीही आरडाओरडा सुरू केला. शेवटी प्रमुखाने हात वर करून सगळ्यांना शांत केलं.
“आरडाओरडा करणे आपल्या परंपरेला शोभत नाही. शांतपणे प्रत्येकाने आपले मत मांडावे. अजून कोणाला ह्या निर्णयाच्या विरोधात बोलायचंय?”
पुनरेकवार मंडपात शांतता पसरली. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. बराच वेळ झाला तरी कोणी पुढं आलं नाही. मग प्रमुखाने पुतळ्याच्या बाजूने बोलणाऱ्यांना आमंत्रण दिलं. राजगुरू तत्परतेने पुढं आले. आपल्या ओजस्वी आवाजात त्यांनी पुनरेकदा पूर्वजांची महती गायली, पुतळा उभारल्याने पूर्वजांना स्वर्गात किती आनंद होईल ते सांगितलं, पुतळा उभारण्याने किती हातांना काम मिळेल ते सांगितलं, पुतळा उभारल्याने टोळीची शान पूर्ण बेटावर सगळ्यात जास्त असेल हे सांगितलं. त्यांचं भाषण संपलं तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटाने व पूर्वजांच्या जयजयकाराने आसमंत दुमदुमून गेला. त्यानंतरही प्रमुखाच्या पुढेमागे फिरणाऱ्यांची अंधार पडून जाईपर्यंत भाषणे झाली; पण निकाल केव्हाच लागला होता.
बैठक संपून लोक आनंदाने पांगले तेव्हा मंडपात दोन-तीन मशाली तशाच फडफडत होत्या आणि दूरवरच्या टेकडीवरची शेवटची दहा-बारा पामची झाडं वाऱ्यावर मूकपणे झुलत होती.

Moai, Rapa Nui National Park, Easter Island (Photo: www.travelnation.fr)
No comments:

Post a Comment