Monday, June 27, 2016

फुकटे आणि विंचू

एलन डिजेनेरेस नामक अमेरिकन बाईंच्या टॉक-शोचा एक एपिसोड रविवारी थोडासा पाहण्याचे नशिबात लिहिले होते. मांजरासारखे डोळे असलेल्या या बाई त्यांच्या प्रेक्षकांमध्ये भलत्याच लोकप्रिय असाव्यात याचा अंदाज कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आला. लाईव्ह ऑडियन्समध्ये ९९% महिला होत्या आणि त्याही सगळ्या पाच-सहा महिन्याच्या पोटुशा. एलनबाईंनी प्रवेश केल्याक्षणी ह्या सगळ्या महिलांनी जो काय कल्ला चालू केला की ज्याचं नाव ते. एक मिनिट झालं; दोन मिनिटं झाली; पण त्यांच्या किंकाळ्या काही कमी व्हायलाच तयार नाहीत. बहुतेक सगळ्या महिला उठून उभ्या राहून तारस्वरात चित्कारत होत्या आणि काही तर जागीच उड्याही मारत होत्या. एक तर प्रेक्षकांमध्ये सगळ्या गरोदर महिला कशा हे मला कळेना आणि वर त्या एलनबाईंवर त्यांचा इतका जीव का हाही प्रश्न निर्माण झाला.

बऱ्याच वेळाने प्रेक्षागार गार झाल्यावर एलनबाईंना तोंड उघडायची संधी मिळाली आणि मग पहिल्या प्रश्नाचा उलगडा झाला. आजचा एपिसोड मदर्स-डे-स्पेशल एपिसोड होता म्हणून भावी फादर लोकांनी केलेले उद्योग उरी बाळगणाऱ्या भावी मदर महिलांना आमंत्रित केलं होतं. काय ती कल्पकता! पण यावरून एलनबाईंचे सगळे एपिसोड बायकांसाठीच व बायकांपुढेच असतात हे लक्षात आलं. तरीही उत्सुकतेपोटी मी काही चॅनल बदलला नाही. "Curiosity killed the cat" अशी म्हण का पडली आहे तेही यथावकाश कळलेच.

खरं म्हणजे एपिसोड मदर-डे साठी आहे की फादर-डे साठी आहे ते मला तितकंसं नीट कळलं नव्हतं; कारण पाहुणा म्हणून एका गुळगुळीत दिसणाऱ्या मस्तकेतरकेशहीन अमेरिकन मेट्रोसेक्शुअल माणसाला बोलवलं होतं. हा माणूसही सेलिब्रिटी असावा; कारण तो येताच किंकाळ्या-चित्कारांचा एक माफक रिप्ले झाला. पोटात दुसऱ्या कोणाचातरी पराक्रम मिरवत महिला त्या चिकण्याकडे बघून चेकाळत होत्या. 

पाहुण्याने बसून घेतल्यावर त्याच्या बायकोचं व कुटुंबाचं कौतुक सुरू केलं. पार्श्वभूमीवर त्याच्या बायकोचे व त्याच्या मुलीचे एकत्र फोटो दाखवत सेलिब्रिटी ममतेचे हृद्य प्रदर्शन चालू होते. फुल्टू बायकांचा आड्यन्स म्हटल्यावर पाहुण्याने आया-बायांच्या स्तुतीचे मजल्यावर मजले बांधायला सुरूवात केली. आधी स्वत:च्या बायकोला कसं नेहमीच गिफ्ट आवडतं आणि मदर्स-डेचं गिफ्ट मात्र तो कसं स्पेशल आणतो वगैरे फेकाफेक केल्यावर आणि त्याला प्रेक्षक महिलांचा माफक टाळ्या-चित्कारांचा प्रतिसाद मिळाल्यावर त्याची मुळातच क्षुल्लक असलेली भीड चेपली. मग पुढ्यात बसलेल्या शेकडाभर गर्भधारी भामांना खूश करण्यासाठी गड्याची गाडी गरोदरपणाकडे वळली. पोटात नऊ महिने गर्भ बाळगणे हा अतिशय अचाट असा पराक्रम असून फक्त स्त्रियांनाच ते शक्य आहे आणि कोणताही पुरूष नऊ महिने असा गर्भ पोटात बाळगू शकणार नाही असे माहितीपूर्ण व सखोल अभ्यासाअंती तयार केलेले मत त्याने गुलजारपणे त्या बायांच्यापुढे टाकले आणि प्रचंड टाळ्या-चित्कारांच्या गजरात बायांनी ते उचलून उड्या मारायला सुरूवात केली. "पुरुष असे पोटात गर्भ धारण करत असते तर त्यांना स्त्री नसते का म्हटले? आणि जे करायला ज्या अवयवांची निर्मिती झाली आहे, ते त्या अवयवांनी केले तरी त्याला अचाट पराक्रम म्हणायचा येडचॅपपणा करायचा असेल तर करा; पण ज्यांना तो अवयवच नाही त्या पुरुषांना कशाला कमी समजले पाहिजे? की अमेरिकेत सेक्स करताना पुरुषाचं वीर्य बाईच्या गर्भात जाणार की बाईचं अंडं पुरुषाच्या गर्भात जाणार असे पर्याय उपलब्ध आहेत; आणि तरी पुरूष घाबरून स्त्रीलाच गरोदर व्हायला भाग पाडतात असं काही आहे?" अशा अर्थाचे विचार त्याचं मत ऐकून कोणाच्या मनात येण्याची किंचितशी शक्यता आहे असे मला वाटून गेले; पण पटकन मी माझ्या मनाला आवर घालून असंवेदनशील पुरुष होण्यापासून स्वत:ला वाचवले. पुरुष असंवेदनशील, स्त्रियांपेक्षा कमी भावनाशील व प्रसंगी भावनाशून्य, गबाळे, बालिश वगैरे असतात व स्त्रियांपेक्षा बहुतेक सर्व बाबतीत कमी असतात हे मान्य असणे ही आता सभ्य पुरूष म्हणून गणले जाण्याची प्रमुख अट बनत चालली असल्याने व मलाही सभ्य पुरुष म्हणवून घ्यायची हौस असल्याने मीसुद्धा सराव म्हणून टाळ्या वाजवून त्या नरकेशारिचे कौतुक केले व चित्कारण्याचाही प्रयत्न केला; पण कुत्र्याच्या रडण्यासारखा आवाज घशातून येऊ लागल्याने तो प्रकार आवरता घेतला आणि पुढचा कार्यक्रम पाहू लागलो. 

स्वत:च्या बायकोचे व जनरल सगळ्या स्त्रियांचे आमुखछिन्दन कौतुक करून झाल्यावर तो नरनोत्कच व एलनबाई अखेर उठले व तिथेच ठेवलेल्या तीन मोठाल्या खोक्यांकडे गेले. त्या खोक्यात असलेली उत्पादने प्रेक्षकवर्गाला फुकट मिळणार आहेत असे सांगून दोघांनी मिळून एकेका खोक्यातून एकेक वस्तू काढून दाखवायला सुरुवात केली. पहिल्या खोक्यातून आपल्या बाळाला जाऊ तिथे सुरक्षित व स्वत:च्या ताब्यात बंदिस्त ठेवण्यासाठी पोर्टेबल, फायबर प्लॅस्टिकचा व नायलॉनची जाळी असलेला हौदा कम पिंजरा निघाला. त्याच्या मध्यबिंदूला असलेल्या कडीला धरून उचलला की तो आपोआप फोल्ड होतो हे त्या चिकण्याने प्रात्यक्षिकासह दाखवले. बायकांनी चित्कारायला सुरुवात केली होती. दुसऱ्या खोक्यातून मामारू नावाची एक आपोआप झोळीसारखी हलणारी, आईस्क्रीमच्या कपासारखी दिसणारी लहान बाळांसाठीची एक खुर्ची निघाली. आपल्या स्मार्टफोनवरून हवा तितका झोका कमी-जास्त करता येतो हे सांगून मुलं सांभाळताना फोन हातातून खाली ठेवायची गरज नाही हे त्या गुलछबू पाहुण्याने दाखवून देताच चित्कारांचा आवाज दुपटीने वाढला. तिसऱ्या खोक्यातून कोणत्यातरी रिसॉर्टने प्रायोजित केलेले अमुक दिवस तमुक रात्रींचे प्याकेज निघाल्यावर, कार्यक्रमाच्या सुरुवातीचा कल्ला म्हणजे कुजबुज वाटावी इतका कल्लोळ झाला. मला टीव्हीचा आवाज कमी करावा लागला. काही महिला आता हाताने पटापट-पटापट टाळ्या वाजवताना दिसत होत्या, काही जागीच थयथयाट केल्यासारख्या नाचू लागल्या होत्या, काही आपल्या शेजारणींना मिठ्या मारत होत्या, काही पोटच्या गोळ्यासकट उड्या मारत होत्या, काही आफ्टरशेव्ह लोशन लावल्यासारखं दोन्ही गाल हातांच्या तळव्यांमध्ये धरून किंचाळत होत्या आणि काहींना भावना अनावर होऊन त्या आपले आनंदाश्रू पापण्यांचा मस्कारा खराब होऊ न देता टिपत होत्या.

फुकट काही मिळाल्याचा आनंद होणे आजकाल स्वाभाविकच आहे. एलनबाईंच्या लोकप्रियतेचे कारण अगदी नीट कळले. कोणाला काहीतरी फुकटात देऊन स्वत:ची लोकप्रियता वाढवणे हा साधा सरळ उद्योग त्या करतात. त्या वस्तूंची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना धंदा वाढवायचा असतो म्हणून जाहिरातीसाठी ते अशा शेकड्याने वस्तू फुकट देतात. कंपनीच्या श्रीमंत मालकांना अशा वस्तू वाटल्याने पुढे फायदा होईलच ह्याची खात्री नसते; त्यांना फायदा झाला तरी तो कंपन्यांच्या कष्टाळू कर्मचाऱ्यांपर्यंत झिरपेल ह्याची खात्री नसते; तरीही अशा वस्तू फुकट वाटण्याबद्दल कंपनीचे कर्मचारी ब्रसुद्धा काढत नाहीत. "आमच्या कष्टातून निर्माण झालेल्या वस्तू फुकटात का देता?" असे विचारत नाहीत. सुखवस्तु लोकांच्या क्रयशक्तीतून होऊ शकणाऱ्या आपल्या श्रीमंत मालकाच्या संभाव्य फायद्याचा ते विचार करतात. त्याच  मालकाच्या वर्गातल्या दुसऱ्या एखाद्या श्रीमंताने सत्ता मिळवायला, ती चिरकाल टिकवण्यासाठी सामाजिक स्वास्थ्य राखायला, गरीबांच्या मतदानशक्तीचा वापर करून घ्यायला बेकार व बेघरांना निव्वळ जिवंत राहण्याइतकी मदत फुकट केली तरी हेच लोक रेबीड कुत्र्यांसारखे तोंडाला फेस येईपर्यंत भुंकायला लागतात. अशा लोकांकडे पाहिलं की कळतं की नझीम हिकमत "बंधो, तू विंचवासारखा आहेस" हे कोणाला उद्देशून म्हणतो ते. 

साला हे असले विचार येतात विनोदी तमाशे पाहताना आणि मग सगळी मजा विद्रट होऊन जाते. विषण्ण मनाने मी टिव्ही बंद करतो. 


No comments:

Post a Comment