Wednesday, August 8, 2012

धडा

काळं आकाश करडं होताना शंभूने हॉटेलाची फळकुटं उघडली आणि इतकावेळ दाराच्या फटीतून हळूहळू झिरपणारी गार हवा शाळा सुटलेल्या पोरांच्या लोंढ्यासारखी उघड्या दारातून भस्सकन आत आली. गोणपाटावर मुटकुळं करून पडलेल्या पिंट्याने डोळे न उघडताच अंगावरची सोलापुरी चादर डोक्यावरून ओढून घेतली आणि तिच्या ओशट वासात आपल्यापुरता उबदार अंधार निर्माण करायचा प्रयत्न केला. मिठाया झाकून ठेवलेल्या 'डिस्प्ले'च्या काचेच्या कपाटावर कुलूप ठेवत शंभू आत आला. खालच्या बाजूला असलेल्या हनुमान नगर झोपडपट्टीत त्याची खोली होती आणि रोज सकाळी यावेळी येऊन हॉटेल उघडायचा त्याचा शिरस्ता होता.


"उठे...", तोंडातल्या काळ्या दंतमंजनाची खारटतुरट लाळ खालच्या ओठाने सावरत मागच्या मोरीकडे जाताना तो गुरगुरला. पिंट्याने हालचाल केली नाही.

मोरीत जाऊन नळाखाली खळखळून चुळा भरून अंगातल्या हिरव्या बनियनला तोंड पुसत शंभू परत आला आणि पिंट्याच्या जवळ येऊन त्याने दोन्ही हात वर ताणून एकदा जोरदार आळस दिला.

मग पायाने त्याने पिंट्याच्या मुटकुळ्याला ढोसलं,"उठे पिंट्या भाड्या, आत्ता गिर्‍हाईक यायला लागंल बघ. उठ नायतर पानी वतीन."

बोलल्याप्रमाणे करायला तो कमी करत नाही हे अनुभवाने माहित असल्याने पिंट्याने एकदा जोरदार चुळबूळ केली आणि मग उठून झोपाळलेल्या डोळ्यांनी कुबड काढून बसून राहिला.

शंभूने दोनपैकी एक गॅसस्टो पेटवला आणि त्यावर मोठं पातेलं ठेवून चहाच्या तयारीला लागला. स्टो पेटलेला पाहून नाईलाजाने पिंट्याने आपल्या लुकड्या पायांवरची चादर बाजूला केली आणि उठून उभा राहिला. शंभूसारखाच हात वर नेऊन आळस देत तो मोरीकडे गेला आणि दोन मिनीटातच तोंड धुवून शर्टाच्या बाहीला पुसत पुसत बाहेर आला. पेटत्या स्टोच्या नुसत्या आवाजानेच त्याच्या पोटात भूक उसळायला लागली होती. पटापट त्याने चादरीची घडी घातली, गोणपाट उचलून ठेवले, दाराच्या बाजूला एका कोपर्‍यात ठेवलेला खराटा घेऊन तो बाहेर आला. खराखरा अंगण झाडून घेतल्यावर मोरीतून एक बादलीभर पाणी बाहेर नेलं आणि मगाने अंगणात सगळीकडे सारखं शिंपडलं. मग परत आत येऊन आत रचून ठेवलेली प्लॅस्टिकची टेबलं आणि खुर्च्या एकेक करून बाहेर नेऊन मांडून ठेवली आणि कपाटापाशी पडलेल्या कळकट फडक्याने एकदा खसाखसा पुसून काढली. एवढं होईपर्यंत चहाचा सुगंध आसमंतात दरवळायला लागला आणि पोटातली भूक पुन्हा उसळायला लागली. पण पिंट्या आत आला नाही. एक डोळा शंभूकडे ठेवून त्याचं काम चालूच होतं. कपाटातल्या मिठायांची ताटं झाकणारे वर्तमानपत्रांचे कागद त्याने अलगद काढले आणि घडी घालून कपाट आणि भिंतीच्या मधल्या सापटीत सारले. हातातल्या फडक्याने तो ते कपाट हळूहळू पुसू लागला तेव्हा शंभू हातात एक चहाचा ग्लास घेऊन बाहेर आला. रस्त्याच्या कडेला उभा राहून त्याने उगवत्या सूर्याच्या दिशेने एकदा ग्लासासकट हात जोडल्यासारखं केलं, उजव्या हाताने अलगद गालांवर एकेक चापटी मारून घेतली आणि मग तो ग्लासभर चहा जमिनीवर ओतून दिला.

"चल रे, च्या घे", आत जाताजाता तो पिंट्याला म्हणाला आणि पिंट्याने हातातलं फडकं जागीच खाली टाकलं.

त्यांचा चहापाव खाऊन होईपर्यंत कोवळी उन्हं हॉटेलच्या दारात आली होती आणि रस्ता जागा झाला होता. हॉटेलसमोरच्या शाळेचं भलंमोठं लोखंडी गेट उघडलं होतं आणि पांढरे-निळे कपडे घातलेला मुलगा मागच्या सीटवर घेऊन एक स्कूटर फर्र्कन गेटमधून आत गेली. पिंट्याचा दिवस चालू झाला.

लवकरच रस्ता स्कूटर आणि मोटारींनी भरून गेला. त्या गाड्यांच्या भोंग्यांचा आवाज, मुलांचा आरडाओरडा, आईच्या किंवा बाबाच्या सूचना, टाटा-बायबाय या सगळ्या आवाजांनी रस्ता दुमदुमून गेला. पण पिंट्याला तिकडे लक्ष द्यायला आता वेळ नव्हता. शंभूने बटाटेवड्यांचा पहिला घाणा तेलात सोडला. आजूबाजूची दुकानं उघडू लागली. हनुमान नगरातले लोक कामावर निघाले. उघडलेल्या दुकानांमधून सटासट चहाच्या ऑर्डरी येऊ लागल्या. कामावर जाणारे लोक जाण्यापूर्वी चायखारी किंवा वडापाव खायला येऊन थांबू लागले. वायरीच्या बास्केटमध्ये चहाचे ग्लास घेऊन पिंट्या इकडून तिकडे पळू लागला. टेबलाशी बसलेल्या लोकांच्या प्लेटा नेऊन देऊ लागला, रिकाम्या प्लेटा आणि ग्लासेस आत नेऊन मोरीतल्या बादलीत टाकू लागला, संपले की विसळून आणू लागला, गिर्‍हाईक उठून गेलं की लगेच फडकं मारू लागला. गरम वड्यांचा वास त्याच्या नाकापर्यंत गेला तरी त्याच्या मेंदूला त्याची दखल घ्यायची फुरसत नव्हती. शाळेत आता "याकुन देन्दु" का कायशीशी प्रार्थना सुरु झाली होती; ते शब्द त्याच्या कानावर पडत होते पण ते नक्की काय म्हणतात ते ऐकायला तो थांबू शकत नव्हता.

तीन चार तास असेच उडून गेले. सकाळचा चहा घेणारे येऊन गेले, नाष्ट्याला वडापाव खाणारे येऊन गेले, मध्येच उगीचच मिसळपाव खाणारे येऊन गेले, सकाळची शाळाही सुटली, सकाळची जाणारी लहान पोरं आणि दुपारची येणारी मोठी पोरं असा दुप्पट कोलाहल करून रस्ता आता थोडा निपचित झाला, काचेच्या कपाटावर ताटात ठेवलेले वडे गारढोण झाले. पिंट्याला आता भुकेची जाणीव झाली पण तो हॉटेलच्या उंबर्‍यावर, शाळेच्या खिडक्यांतून दिसणारी पोरं पाहात , गुपचूप बसून राहिला. पाच-दहा मिनीटांतच शंभूने दोन्ही स्टो बंद केले आणि पिंट्याचा चेहरा उजळला.

बकाबका खाऊन झाल्यावर शंभू थोडा लवंडला आणि कोनाड्यातल्या गोट्या घेऊन पिंट्या हळूच बाहेर सटकला. त्याची ही रोजची तासभराची मधली सुट्टी घालवायला नेहमीप्रमाणे हळूच शाळेच्या गेटमधून आत गेला. शाळेच्या पोर्चच्या पायरीवर जाऊन बसायला त्याला फार आवडे. हनुमान नगरातला सदामामाच तिथे शिपाई होता, तो पिंट्याला तिथे बसू देई, खेळू देई; पण कोणी मास्तर-बाई आलंच चुकून तर तेवढ्यापुरतं हुसकल्यासारखं करी. पोर्चमध्ये या वेळेला कोणी नसे. दुपारची मोठ्या पोरांची शाळा भरलेली असे. काही वर्गातून मुलांचा गाणं म्हणतानाचा आवाज येई, काही वर्गातून पोरा-पोरींचा हसण्या-खिदळण्याचा आवाज येई किंवा कधीकधी कुठलाच मोठा आवाज नसला तरी मधमाशांच्या पोळ्यासारखी नुसतीच गुणगुण ऐकू येई. पिंट्याला ते आवडे. त्याला त्याची गावाकडची शाळा आठवत असे, त्याचे तिथले मित्र आठवत असत.नेहमीप्रमाणे दुडकत आणि खिशात गोट्या खुळखुळवत पिंट्या पोर्चच्या पायरीवर येऊन बसला पण आत पाहिले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. पोर्चमध्ये भिंतीशी ठेवलेला बाक नेहमीप्रमाणे रिकामा नसून आज त्यावर एक गोबर्‍या गालाचा मुलगा दप्तर पाठीला लावून आणि वॉटरबॅग शेजारी ठेवून पाय हलवत बसला होता. पिंट्याने त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्यानेही पिंट्याकडे पाहिले. पिंट्याने हळूच खिशातून गोट्या काढल्या आणि त्यातली एक त्या मुलाला दिसेल अशी ठेवली आणि मग थोडं मागे सरकला. दुसरी गोटी उजव्या हाताचा अंगठा टेकवून मधल्या बोटाने ताणून सोडली आणि टक् आवाज करून पहिली गोटी बरोब्बर उडवली. मग स्वत:वरच खूश होऊन हसत त्याने त्या मुलाकडे पाहिले. त्या मुलाच्या डोळ्यात उत्सुकता उमटली होती आणि तोंडावर हसू. झटकन तो मुलगा उठला आणि वॉटरबॅग घेऊन पिंट्याच्या दिशेने आला.

"हे काय आहे? मी पण खेळू?", उकीडवा बसत त्याने विचारले.

"गोट्या.", होकारार्थी मान हलवत पिंट्याने सांगितले.

मग त्या मुलानेही फतकल मारली आणि दोघं थोडावेळ खेळत राहिले.

"व्हॉट्स युवर नेम?", त्या मुलाने मध्येच विचारले

"आं?"

"तुझं नाव काय आहे?"

"पिंट्या. तुझं?"

"आर्यन. मी सेकण्डमध्ये आहे. तू?".

"मी? मी शाळेत नाय जात. म्हनजे गावाकडं जायचो, तिसरीत. पन इकडं आल्यापासून नाय जात."

"मग तुझे ममा-पपा तुला रागावत नाहीत?"

"नाय. मी शंबूकाकाच्या हाटेलात काम करतो. माझे आई-बा तिकडं गावाकडं असत्यात."

"तू कशाला इकडे आलास मग?"

पिंट्या दोन मिनीटे शांत बसला.

"ही माजी खरी आई नाय. ही दुसरी आई हाय. लई त्रास द्यायची. मारायची. म्हनून मी पळून आलो इकडं. शंबूकाका इतं भेटला मला. ते त्याचं हाटेल हाये समोर."

पिंट्याने हात लांबवून दाखवलं. आर्यनने एकदा त्या दिशेकडे पाहून मान डोलावली आणि पुन्हा खेळण्यात लक्ष घातले.

"मला देतोस दोन गोट्या?", थोड्या वेळाने आर्यनने अचानक विचारले.

"च्यक.", त्याच्याकडे न पाहताच पिंट्याने गोट्या आवरल्या आणि खिशात टाकल्या.

"तुला शाळेत नाय जायचं?", पिंट्याने उलट विचारलं.

"शाळा सुटली. मी ममाची वाट पाहतोय. आज व्हॅनवाले अंकल येणार नव्हते ना म्हणून पपाने सोडलं सकाळी.", आर्यन म्हणाला आणि आईच्या आठवणीने त्याने एकवार रस्त्याकडे पाहिले.

दोन मिनीटे शांततेत गेली. आर्यन शाळेच्या गेटमधून रस्त्याकडे पाहात राहिला आणि पिंट्या शाळेतून येणारे आवाज ऐकत राहिला. तितक्यात "ममा" असा एकच शब्द उच्चारून आर्यन लगबगीने उठला आणि वॉटरबॅग घेऊन पोर्चच्या पायर्‍या उतरू लागला. पिंट्याने पाहिलं तर शाळेच्या गेटमधून लाल मोटार आत येत होती. गेटच्या बाजूच्या भिंतीशी गाडी थांबली आणि त्यातून आर्यनची आई उतरली. आर्यन तिच्याकडे आणि ती आर्यनकडे झपाझप चालू लागले. डोळ्यावर गॉगल, मोरपंखी रंगाचा कुर्ता, निळी जिनची पँट घातलेली त्याची आई. पिंट्या पाहातच होता.

"किती भारी दिस्ती त्याची आई!", पिंट्याच्या मनात विचार आला, "एकदम पिच्चरमधल्या आईसारखी."

आर्यन आणि त्याची आई भेटले. आर्यनची आई खाली वाकून त्याच्याशी काहीतरी बोलू लागली, त्याचा चेहरा कुरवाळू लागली. बोलता बोलता ती खाली बसली आणि आर्यनने तिला मिठी मारली. मग ती उभी राहिली आणि आर्यन तिचा हात धरून दोघे गाडीकडे चालू लागली. पिंट्या डोळ्याची पापणी न लववता पाहात होता.

अचानक त्याला काय वाटलं कोण जाणे, त्याने आर्यनला मोठ्याने हाक मारली आणि त्यांच्या दिशेने पळत सुटला. त्याची हाक ऐकून आर्यन आणि त्याची आई थांबले आणि वळून पाहू लागले.

त्यांच्यासमोर जाऊन पिंट्या थांबला आणि त्याने खिशातून चारही गोट्या काढून आर्यन समोर धरल्या.

"धर. घे तुला.", कसल्यातरी आनंदाने तोंडभर हसत पिंट्या म्हणाला.

आर्यनने गोट्यांकडे पाहिले पण गोट्या न घेता मान वर करून आईकडे पाहिले. त्याच्या नजरेबरोबर पिंट्याचीही नजर त्याच्या आईच्या चेहर्‍यावर खिळली. गॉगलच्या काचेआडून ती आपल्याकडे बघते आहे हे पाहून पिंट्या थोडासा लाजला.

"नो बेटा. त्याच्या नको घेऊस. मी तुला नवीन आणीन, ओके?", पिंट्याकडे पाहात ती लालचुटूक ओठांतून आर्यनला म्हणाली. पिंट्याचे डोळे परत आर्यनवर खिळले. मघाशी मोगर्‍यासारखं फुललेलं पिंट्याचं हसू आता थोडंसं कागदी फुलांसारखं निर्जीव होऊ लागलं होतं. आर्यनने नको म्हणून मान हलवली आणि तो आणि त्याची आई पुन्हा गाडीकडे चालू लागले. पिंट्या हात तसाच पुढे धरून आणि चेहर्‍यावर ओशाळपणे ओसरणारं हसू घेऊन दोघांना जाताना पाहात राहिला. गाडीचं दार उघडून ती दोघे आत बसल्यावर पिंट्याची नजर खाली झुकली. हातातल्या गोट्यांकडे तो पाहू लागला. त्यांचे लाल,निळे बिलोरी रंग बघता बघता त्याला त्याची वाढलेली काळी नखं दिसू लागली, डाग पडलेला तळहात दिसू लागला, त्याच्या मागचा हडकुळा हात दिसू लागला, अंगातला मळकट शर्ट, त्याच्याखालची फाटकी विरलेली चड्डी आणि तिच्यातून बाहेर आलेले हडकुळे आणि सडा घालताना शिंतोडे उडलेले पाय दिसू लागले. त्याने पुन्हा एकदा मान वर करून पाहिलं तेव्हा ती लालचुटूक गाडी शाळेच्या गेटबाहेर पडत होती.

पिंट्याला काहीतरी समजल्यासारखं वाटलं. गोट्यांसकट हात खिशात घालून, मान खाली घालून तो शाळेकडे न बघता जड पावलांनी हॉटेलकडे चालू लागला.

3 comments:

 1. खूपच आवडली. पिंट्या बद्दल सहानुभूती वाटली पण मीही आर्यनच्या आई सारखीच वागले असते असं वाटतं.

  ReplyDelete
 2. नमस्कार, ’रेषेवरची अक्षरे’साठी (http://reshakshare.blogspot.in/) तुमच्याशी संपर्क साधायचा आहे. तुमचा ईपत्ता मिळेल काय?
  - संपादक (resh.akshare@gmail.com)

  ReplyDelete
 3. डिटेलिंग खुप छान केलेय खरच, सुंदर !

  ReplyDelete