Monday, December 19, 2011

सरासरी अंधश्रद्धा

सरासरी अंधश्रद्धेबद्दल लिहीण्याआधी एक गोष्ट सुचली ती सांगतो. फार पुर्वीची नाही, नेहमीचीच गोष्ट आहे. एकदा एक राजा होता. प्रजेच्या कल्याणासाठी दक्ष वगैरे. वर्षाअखेरीस त्याची प्रधान मंत्र्याशी खास चर्चा असायची. वर्षभराच्या कामगिरीच्या मूल्यमापनाची. तशी ती यावर्षीही ठरली. एकेका खात्याच्या कामगिरीचा सारांश महामंत्री सांगणार आणि राजा त्यावर विचार, टिप्पणी करून त्या खात्याच्या मंत्र्याला बक्षिस किंवा सूचना काय द्यायच्या ते सांगणार अशी पद्धत. समोरासमोर ठेवलेल्या मंचकांवर राजा आणि महामंत्री बसलेले आणि मध्ये ठेवलेल्या मेजावर गेल्या आणि यावर्षीच्या माहितीपत्रांची भेंडोळी. राजाच्या दरबारात नवीनच लागलेला विदूषक एका कोपर्‍यातल्या आसनावर उत्सुकतेपोटी बसलेला . तसं इथे त्याचं काही काम नाही. इथे सगळं कसं गंभीर. कृषीमंत्र्यांच्या माहितीने कामकाजाची सुरुवात झाली. कृषी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं खातं ना! बाकी कोणी कितीही टिमक्या वाजवल्यातरी शेवटी पोटाची खळगी भरण्याच्या या उद्योगातूनच बाकी सगळा डोलारा उभा राहिला आहे हे सगळ्यांनाच माहित असतं. तर, महामंत्री सांगू लागले आणि राजा ऐकू लागला.

"महाराज, यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला.", महाराजांच्या चेहर्‍यावर काळजीच्या रेषा. "तरीही गेल्यावर्षीपेक्षा दहा टक्के जास्त धान्योत्पादन झाले. आकडेवारीनुसार सडून वाया गेलेलं धान्य सोडूनही दरडोई सरासरी शंभर शेर धान्य निर्माण झाले. म्हणजे दरडोई दरमहा आठ शेर."

राजा प्रसन्न. कृषीमंत्र्यांना आठ गावं बक्षिस. पुढे अर्थमंत्री. "महाराज, यावर्षी आपल्या राज्याचं एकूण उत्पन्न आठ टक्क्यांनी वाढलं आणि वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊनही दरडोई उत्पन्न पन्नासहजारांवरून साठहजारांवर गेलं."

राजा खूश. अर्थमंत्र्यांना दहा गावं बक्षिस. अशी एकेक माहिती प्रधानमंत्री सांगत गेले. बैठक संपली तेव्हा राजा प्रसन्न होता. राज्यातल्या लोकांना जास्तीचं अन्नधान्य मिळतंय, जास्तीचं उत्पन्न मिळतंय, लोक जास्ती जगताहेत वगैरे गोष्टी ऐकून कोणता राजा प्रसन्न होणार नाही?

महामंत्र्यांना निरोप देऊन त्याने पेंगणार्‍या विदूषकाकडे मोर्चा वळवला.

"उठ झोपाळा, गोष्ट सांगिशी मला", राजा हसून म्हणाला.

"क्षमा महाराज, तुमच्या राज्यात हे जास्तीचं अन्न खाऊन अशी जास्तीची झोप येते बघा", विदूषक म्हणाला," आणि गोष्ट तुम्हाला तुमचीच सांगतो. फार जुनी नाही, पुढच्या महिन्यातल्या पंधरा तारखेला घडलेली. सांगून झाल्यावर तुम्हाला नक्की आठवेल अशी.

तर, झालं काय महाराज, की जास्तीच्या उत्पन्नाचे आभार म्हणून मी तुम्हाला माझ्या घरी जेवायला बोलावलं. मी स्वतः पाटावर बसलो आणि चौरंगावर तुम्हाला बसवलं. तितक्यात दारी एक गरीब ब्राह्मण अतिथी आला. त्यालाही आत घेतलं आपल्या बाजूला जमिनीवर बसवलं. तुमच्या आवडीच्या जिलब्यांचा बेत केला होता. एकावन्न जिलब्या केल्या होत्या, पण तुम्ही पहिला भात संपवता संपवता त्या बुभुक्षित ब्राह्मणाने पन्नास जिलब्या खाल्ल्या आणि मी एक जिलबी खाल्ली. नाईलाजाने तुम्ही बाकीचं जेवण जेवलात आणि हात धुतलेत. मुखशुद्धी करून थोडा आराम करून तुम्ही जायला निघालात तेव्हा मी नम्रपणे विचारलं 'महाराज, जिलब्या छान झाल्या होत्या नाही?' ते ऐकून तुम्ही रागाने लालबुंद झालात आणि काहीही न बोलता ताडताड निघून गेलात. मला दु:ख तर खूपच वाटले महाराज पण आश्चर्य या गोष्टीचे अधिक वाटले की आपण प्रत्येकी सरासरी सतरा जिलब्या खाऊनही तुम्ही असं का वागलात?"आता ही गोष्ट ऐकून संख्याशास्त्रज्ञ आणि संख्याशास्त्रांध असे दोन्ही लोक त्यात चुका काढतील किंवा संख्याशास्त्र हे फक्त एक निदर्शक म्हणून वापरले पाहिजे आणि सरासरी शिवाय इतरही मोजमापे (median, mode) आहेत वगैरे सांगतीलच आणि त्यांचं बरोबर आहे यात शंका नाही. पण तरीही याच सरासरीचा आधार घेऊन बरेच मुद्दे सिद्ध केले जातात आणि तेव्हा हा मुद्दा प्रकर्षाने मांडला जात नाही. वरच्या गोष्टीत घेतलेले मुद्देच पाहा ना! गेल्या पन्नास-साठ वर्षात आपण प्रचंड प्रगती केली असे म्हणतो. या प्रगतीचे मापन करणारे निर्देशक बहुतांश संख्यात्मक आहेत आणि त्यातले बरेचसे सरासरीवर आधारित आहेत. शिवाय या निर्देशकांना आधारभूत अशी काही गृहीतके आहेत आणि ती गृहीतके बरोबर धरली तरच त्या निर्देशकांना हवा तो अर्थ प्राप्त होतो.

उदा. दोनशे वर्षांपूर्वी असलेली सरासरी जन्मतः जीवनशक्यता ३१ वर्षां वरून आता ६७ वर्षांवर गेली आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रत्यक्षात अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि हाताच्या बोटावर मोजता येण्यासारख्या देशांमध्ये ती ७५-८० वर्षांच्या पुढे असते, विकसनशील देशांमध्ये ६०च्या आसपास असते आणि मागासलेल्या देशांमध्ये ४०च्या खाली असते (संदर्भ) शिवाय या निर्देशकासाठी गृहीतक असे आहे की जन्माला आलेला जीव दुबळा असो वा सशक्त, तो जगला पाहिजे आणि अनेक अपत्यांपैकी सशक्त ती जगतील आणि दुबळी मरतील हा निसर्गातल्या सामान्य नियम चुकीचा आहे. वस्तुतः अगदी ७५-८० जीवनशक्यता असलेल्या भागातही प्रत्येक माणूस ७५-८० वर्ष जगतो असे नाही. याचाच अर्थ आपण फक्त दुबळेपणा आणि सशक्तपणा यांच्या नैसर्गिक व्याख्या बदलून त्या कमी तीव्र केल्या आहेत आणि याचा परिणाम म्हणजे गेल्या पन्नास-साठ वर्षांत तिप्पट झालेली लोकसंख्या.

तर, ही सरासरी अंधश्रद्धा म्हणजे संख्याशास्त्रीय निर्देशक वापरून, एखाद्या गोष्टीचे फक्त संख्यात्मक मूल्यमापन करून आणि गुणात्मक बाबींकडे पूर्णत: दुर्लक्ष करून त्या गोष्टीबद्दल छातीठोकपणे बोलणे.

बहुधा तंत्रज्ञानातली प्रगती, त्याचा पर्यावरण आणि मानवी जीवनावरचा परिणाम यावर चर्चा होत असताना तंत्रज्ञानाची बाजू घेणार्‍यांना हे निर्देशक फार उपयोगी पडतात. धडाधड प्रतिपक्षावर संख्या आणि आलेख यांचा मारा केला जातो आणि तंत्रज्ञानामुळे गेल्या पन्नास वर्षांत माणसाचे आयुष्य किती सोपे-सुकर झाले आहे हे पटवून दिले जाते. तेव्हा या निर्देशकांचा वापर करताना असा अविर्भाव आणला जातो की बहुसंख्यांचे कल्याण झालेच आहे आणि थोडेफार उरले आहेत त्यांचे लवकरच होईल. वस्तुस्थिती मात्र त्याच्या उलट आहे.

तंत्रज्ञानाच्या विकासामुळे काही लोकांचे आयुष्य सोपे झाले असले तरी बहुसंख्यांचे आयुष्य कठीणच आहे. बहुतेकांवर आयुष्य लादले गेले आहे आणि बहुतेकांवर ते कसे जगायचे याची पद्धतही लादली गेली आहे. एक हरितक्रांती होऊनही अजूनही एक तृतीयांश लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही. गमतीचा भाग म्हणजे अश्मयुगात माणसाला पुरेसे अन्न मिळत नसे असे (चुकीने) समजले जाते पण सध्याच्या उपाशी लोकांची संख्या अश्मयुगातल्या एकूण लोकसंख्येपेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे (म्हणजे जन्मतःच किंवा बालपणी लवकर मरणारे जास्त दु:खी की उपाशी अवस्थेत खुरडत खुरडत जगून मरणारे जास्त दु:खी हा गुणात्मक वाद आला).

आणखी एक गोष्ट अशी की हे निर्देशक वापरून त्यात होणारी सुधारणा म्हणजे मानवी जीवनाच्या दर्जातल्या सुधारणेची निदर्शक आहे असे सध्या आपण म्हणू शकतो. परंतु जसजशी लोकसंख्या वाढेल तसतसे या निर्देशकांमधली सुधारणा खरोखर मानवी आयुष्याच्या दर्जातली सुधारणा असेलच असे नाही. (वर दिलेल्या दुव्यात विवेचन केलेला आत्महत्यांचा प्रश्न बहुतेकांना रोचक वाटेल. )

ज्याप्रमाणे बहुतेकवेळा शेअरमार्केटच्या निर्देशांकाचा अर्थव्यवस्थेच्या स्थितीशी संबंध असेलच असे नाही त्याचप्रमाणे हे संख्याशास्त्रीय निर्देशांक वस्तुस्थितीचे यथार्थ प्रकटन करतीलच असे नाही. म्हणूनच तंत्रज्ञानातली घोडदौड आणि तिचा पर्यावरण व मानवी जीवनावर होणारा परिणाम यांचा उहापोह करण्याआधी या निर्देशकांचा समाचार घेणे आवश्यक आहे असे मला वाटते.

1 comment:

  1. सरासरी अंधश्रद्धा...
    मला वाटलं अंधश्रद्धांवर लिहीलं आहे आपण पण तुम्ही तर सरासरीवर लिहीलंत!
    असो. मतं पटली.

    ReplyDelete