Friday, July 30, 2010

निसर्गदूत

सिंगापुरात पहिल्यांदा पाय ठेवला तेव्हा फार प्रभावित झालो होतो. म्हणजे एअरपोर्ट वगैरे पाहून सगळे होतात तसा तर झालोच होतो, पण बाहेर पडल्यावर टॅक्सीतून बाहेर दिसणारी हिरवाई पाहून जास्त प्रभावित झालो होतो. एअरपोर्टच्या समोर आणि एअरपोर्टला शहराशी जोडणार्‍या रस्त्यावर भरपूर झाडं दिसत होती. विशेष म्हणजे ती मुद्दाम तिथे लावलेली आहेत हे उघड असलं तरी त्या झाडांतलं वैविध्य लक्षणीय होतं, उगीच सरकारी काम म्हणून इथून तिथून सुबाभळीची झाडं नव्हती लावून दिलेली. त्या पहिल्या १०-१५ मिनिटांत या देशाबद्दल माझं मत एकदम चांगलं झालं. विकासाबरोबरच या लोकांनी निसर्गही छान जपलेला दिसतोय असं मला वाटलं. टॅक्सी जशी जशी पुढे शहरात जाऊ लागली तसा तसा मला या शहराचा आखीव-रेखीवपणा दिसू लागला आणि मग लक्षात आलं की जागोजागी दिसणारी हिरवाई, झाडं वगैरे सगळा या आखीव-रेखीवपणाचाच भाग आहे. एअरपोर्टवर जशी मुद्दाम तयार केलेली वृक्षराजी आहे जवळजवळ तशीच सगळीकडेच आहे. नैसर्गिकपणे वाढलेली झाडं-जंगलं आता शिल्लकच नसावीत. सगळीकडे HDB च्या आणि खाजगी टोलेजंग इमारती आणि त्याच्या बाजूने लावलेली झाडं. मोकळ्या जागांमध्येसुद्धा खास निगा राखलेली हिरवळ दिसत होती.पुढे इथं राहायला लागल्यावर किती मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालं आहे आणि जवळजवळ सगळंच कसं कृत्रिम आहे ते कळत गेलं. मी ही हळूहळू त्याला सरावलो. कृत्रिमपणे का ठेवलेलं असेना, सिंगापूर नक्कीच पुण्यापेक्षा जास्त हिरवं आहे एवढं मात्र नक्की होतं. या आखीव-रेखीव जगात जगताना एक एक करत ३ वर्षं उलटून गेली. नाही म्हटलं तरी रोजचा तो बंदिस्त ट्रेनचा प्रवास, तेच थंड काचेरी ऑफिस, तेच ते झगमगणारे मॉल्स आणि तीच ती शहरी आयुष्याची यातायात याचा थोडाफार परिणाम होतोच. अधून मधून सुट्टीला भारत, फुकेत, बाली वगैरे ठिकाणी गेल्यावरच काय तो खुला निसर्ग अनुभवायला मिळणार. इतरवेळी एका कृत्रिम बेटावर राहिल्यासारखं राहायचं. असंच यंत्रवत वर्षानुवर्षे चालंलं होतं पण त्या दिवशी मला तो दिसला आणि मला अतिशय आनंद झाला. त्या दिवशी म्हणजे एका शनिवारी संध्याकाळी घरामागच्या नदीकाठच्या रस्त्याच्या कडेने जॉगिंग करायला गेलो होतो. नदीत आता वॉटरपार्क करणारेत म्हणून रस्त्याच्या कडेने सगळं पत्रे लावून झाकून टाकलेलं. पण थोडं पुढे गेल्यावर पत्रे संपतात आणि गच्च झाडांची गर्दी लागते. मी नेहमीप्रमाणे तो तुकडा डोळ्यांत साठवून घेत हळूहळू पुढे चाललो होतो तेव्हाच रस्त्याच्या कडेला मला तो दिसला. तांबूस तपकिरी रंगाचे केस असलेला एक ससा तिथे लुटुलुटु ओठ हलवत गवत खात होता. मी थबकलो आणि त्याच्याकडे पाहत राहिलो. एका बाजूला थोड्या अंतरावर असणारं ते चौकोनी शहर आणि दुसर्‍या बाजूला तो इवलासा ससा. जणू निसर्गाने त्याचा प्रतिनिधी पाठवला होता, हेच सांगायला की मी आहे... इथेच आहे.

1 comment:

  1. आपणही याच निसर्गाचे प्रतिनिधी आहात.

    ReplyDelete