Monday, February 6, 2012

जन्मठेप

फिनाईलच्या त्या अभद्र वासातून बाहेर पडून तो त्या हॉस्पिटलच्या सदैव आ वासलेल्या पोर्चमध्ये आला तेव्हा शहराच्या चिरपरिचित दुर्गंधीने त्याला पुन्हा वेटोळे घातले. आतून काचेच्या खिडकीतून दिसणारी झळाळती कलती दुपार बाहेर आल्यावर त्याला नासलेल्या आंब्यासारखी वाटू लागली. एका झुळझुळणार्‍या संध्याकाळी गाव सोडून साचलेल्या गाळासारख्या दमट सकाळी त्याने या शहरात पाय ठेवला तेव्हाही त्याला त्या दुर्गंधीने असेच मख्खपणे वेटोळे घातले होते. ते लाजिरवाणे दिवस आठवले की त्याला अगदी कसेनुसे होई आणि मानेला झटका देऊन तो तोंडाने काहीतरी असम्बद्ध बोले.
कधीकाळी रूपवान असलेल्या जख्ख वेश्येसारखे त्याचे गाव होते. तालुक्याचे गाव. पूर्वी कोणातरी सम्राटाने वसवलेले व्यापाराचे केंद्र. पावसाळ्यात डोक्यावर ढग बांधणार्‍या हिरव्यागार डोंगरांनी वेढलेले. पाचूच्या दागिन्यातून दिसणार्‍या फोडासारखे गाव. काप जाऊन उरलेल्या भोकांमध्ये राहणार्‍या दलालांचे गाव. त्या गावातल्या रस्त्यांवर सुखवस्तुंच्या घरातल्या सांडपाण्याच्या नद्या वाहत असत आणि त्यातून श्रीमंतांच्या गाड्या गेल्या की गाळाचे शिंतोडे पायी चालणार्‍या गरीबांवर उडत. अशा रस्त्यावर वाहणार्‍या अनेक ओघळांपैकी कोणत्यातरी एका ओघळाच्या उगमापाशी त्याची आई धुणं-भांडी करत बसलेली असायची आणि एखादा ओघळ मोठ्या गटारीला जिथे मिळतो तिथे त्याचा बाप दारू पिऊन पडलेला आढळायचा.
या सगळ्यांपासून दूर डोंगरउतारावर बोरे,चिंचा,पेरू,करवंदे खात आणि सशांच्या मागे हुंदडत सळसळणारे त्याचे बालपण एकदिवस त्याच्या आईने महात्मा विद्यालयाच्या दावणीला बांधले. डोक्याला रोज तेल लावून येणारी गोरीगोबरी मुले, सकाळीसकाळी केलेल्या पुजेत लावलेल्या अगरबत्तीचा गंध वागवणारे मास्तर, मागच्या बाकड्यांवर जमा झालेली त्याच्यासारखीच काही चुकार मेंढरे आणि इतिहास-भूगोलाची सरकारी छापील पुस्तके यांच्या संगतीत त्याचे दिवस रसहीन होऊ लागले. ज्यांच्या घरी त्याची आई काम करायची अशा मुलांच्या नजरा चुकवत, आया-मावश्यांनी लिहून दिलेल्या त्यांच्या निबंधांचे मास्तरांनी केलेले कौतुक ऐकत आणि कोपर्‍यातल्या जागेत बसून दूर दिसणारे डोंगर बघत त्याने शाळेची आणि कॉलेजची शिक्षा संपवली. डोंगरउतारावरच्या सुखाचा त्याग करून कॉलेज कँटीनमधल्या टवाळक्यांचा आनंद मिळवला. कबर्‍या रंगाचे गोबरे ससे सोडून डिग्रीचा कांचनमृग मिळवला. त्याची अडाणी आई धन्य-धन्य झाली. भिजल्या डोळ्यांनी कामाच्या ठिकाणी मूठमूठ पेढे वाटून आली. त्याला कुठंतरी चिकटवण्यासाठी साहेब लोकांना गळ घालून आली. तोही पेपरातल्या जाहिराती वाचून कामधंदा शोधायला भटकू लागला. सरकारी नोकरीच्या लोभस ढेपेला परंपरागत चिकटलेल्या आणि आरक्षणातून चिकटलेल्या मुंगळ्यांपैकी एक होण्याचाही त्याने प्रयत्न केला. सरकारी खात्यांच्या आणि बँकांच्या कसल्या कसल्या परीक्षा देऊ लागला. शिक्षा संपली तरी त्याची परीक्षा संपली नाही. वस्तीतल्या चौकात टवाळक्या करणार्‍या घोळक्यातल्या निरर्थकपणे उगवणार्‍या दिवसांच्या सिगारेटी वळून कोडगेपणाचा धूर सोडणार्‍या लोकांचा त्याला हळूहळू हेवा वाटू लागला. त्याचा बाप अधिकृतपणे मेला आणि आई आपला उद्धार होत नाही हे पाहून खचली. त्याला शिव्या-शाप देऊ लागली. शेवटी जसे सांडपाण्याचे सगळे ओघळ मोठ्या गटारीला जाऊन मिळावे तसे सगळ्या लाचार अस्तित्वांचे लोंढे जाऊन मिळणार्‍या या शहरात तो आला.
ते आठवून तोंडात जमा झालेला कडवटपणा त्याने थुंकून टाकला आणि सिगारेट काढायला खिसे चाचपू लागला. पँटच्या उजव्या रिकाम्या खिशावर हात ठेवताच त्याच्या पोटात एकदम धस्स झालं, पण पुढच्याच क्षणाला त्या खिशातली जपून आणलेल्या नोटांची गड्डी आत हॉस्पिटलच्या कॅशियरकडे देऊन आलो आहोत हे त्याला आठवले. त्याचा धसका नाहीसा झाला पण कपाळावरच्या आठ्यांमध्ये आणखी एकीची भर पडली. चार दिवसांपुर्वीच झालेला पगार जवळजवळ संपला होता आणि अजून आख्खा महिना आ वासून पुढे उभा होता. जिकडून मिळेल तिकडून उधार-उसनवारी करून, कर्जे काढून झाले होते आणि पुढची वीस वर्षे ही कर्जे फेडण्यात जाणार हे त्याला कळून चुकले होते. आणखी पैसे मिळण्याचे मार्ग संपले होते आणि पैशाअभावी आता हे उपचारांचे नाटक थांबवावेच लागणार होते.
चुपचाप त्याने खिशातून सिगारेट काढून पेटवली आणि एक झुरका घेऊन खाली मान घालून जमिनीकडे धूर सोडू लागला.
शहरात आला तेव्हा पांडुरंग राशिनकराच्या खोलीवर उतरला होता. उतरला त्याच दिवशी पांडुने त्याला तो काम करत असलेल्या छोट्याशा कारखान्यात नेले. जाताना स्टेशनवर रूळ ओलांडताना अचानक वाजलेल्या लोकलच्या भोंग्याने तो कितीतरी दचकला आणि पांडू आपले गुटखा खाऊन लाल झालेले दात दाखवत खदखदून हसला होता.
"हे तुझं दुसरं घर", लोकलकडे बोट दाखवून पांडू म्हणाला,"दिवसातले चार-पाच तास तुला यातच काढायचेत."
तेव्हा समोरून लोकलकडे पाहताना मोठ्ठं ठसठशीत गोल कुंकु लावणार्‍या त्याच्या आईसारखीच वाटली होती ती त्याला. जिना चढून, तिकीट काढून प्लॅटफॉर्मवर उतरला तेव्हा कुठे त्याला त्या चेहर्‍याच्यामागे लपवलेले लांबचलांब पिंजरे दिसले. तरीही त्याला ती आईसारखीच वाटली, काहीतरी करायला भाग पाडणारी.
त्या दिवशी पांडुच्या मार्गदर्शनाखाली धक्काबुक्की करत तो गर्दीत शिरला आणि मग आत जाऊन दोघे एकमेकाला जवळजवळ चिकटून उभे राहिले. त्या गर्दीतच पांडुने त्याला त्या शहराबद्दल, तिथल्या श्रीमंतीबद्दल, समुद्रकिनार्‍यांबद्दल, तिथे चालणार्‍या धंद्यांबद्दल, शहरावरची सत्ता वाटून घेणार्‍या राजकारण्यांबद्दल, गुन्हेगारांबद्दल आणि कचकड्याच्या दुनियेतल्या सिनेकलाकारांबद्दल सुरस कथा सांगितल्या तेव्हा तो थरारून गेला होता. अगणित शक्यता असलेल्या या शहरात कदाचित काहीतरी चमत्कार घडेल असे त्याला वाटले. काहीतरी घडून आपले आयुष्य बदलेल असे त्याला वाटले. काहीतरी म्हणजे काय हे मात्र त्याला ठरवता आले नव्हते.
पांडुच्या मुकादमाने त्याला लगेच कामावर ठेवायची तयारी दाखवली आणि ज्यावर चर्चा करणे शक्य नाही अशा आवाजात पगाराचा आकडा आणि सुट्टीचे दिवस वगैरे ऐकवले. पांडुच्याच हाताखाली त्याला सोपवून मुकादम निघून गेला आणि पांडुने त्याची एका यंत्राशी गाठ घालून दिली. त्यादिवसानंतर आठवड्यातले सहा दिवस आठ तास त्या यंत्राशी कसे वागायचे ते पांडुने त्याला समजावून सांगितले आणि त्याची नोकरी सुरु झाली.
काही दिवस मजेत गेले. तो आणि पांडू बरोबरच कामावर जायचे आणि काम संपल्यावर एकत्रच फिरायचे. पांडू त्याला श्रीमंत वस्त्यांमधून घेऊन जायचा आणि काहीतरी सुरस ऐकीव गोष्टी सांगत तिथल्या टोलेजंग इमारतींकडे, बंगल्यांकडे, रस्त्यावरून जाणार्‍या गाड्यांकडे आणि गाड्यांमधल्या बायांकडे आशाळभूतपणे पाहायचा. किंवा समुद्रकिनारी जाऊन ते वेळ काढायचे आणि पांडू तिथे आलेल्या जोडप्यांचे प्रणयचाळे पाहून चेकाळायचा, अचकटविचकट बोलून हसायचा, करमणूक करून घ्यायचा. किंवा दोघे चित्रपट पाहायला जायचे आणि संपल्यावर पांडू त्या नटीबद्दल, चित्रपटातल्या प्रसंगांबद्दल भरभरून काहीतरी बोलत राहायचा. किंवा मग त्याला खोलीवर पाठवून स्वत: हिडीस रंगरंगोटीखाली त्याहूनही हिडीस असे दु:ख लपवणार्‍या कुठल्याशा गल्लीत अदृष्य व्हायचा. त्याला हे सगळं नवं होतं आणि तो उत्सुकतेने सगळं पाहात होता. पगारातला काही भाग तो घरी पाठवत असल्याने आईही खूश असायची.
पण हळूहळू सगळं त्याच्या मनात साचत जाऊ लागलं. रोज सकाळी तीच वस्ती, तीच दमट साचलेली हवा. स्टेशनवरची तीच गर्दी आणि पिंजरा घेऊन येणारी आणि कधीकधी भोंगा वाजवून खिजवणारी तीच लोकल. पांडुची तीच वाह्यात बडबड आणि तेच फालतू विनोद. त्या शहराचा वखवखलेपणा आणि तुस्तपणा पाहून तो उबगून गेला.
काही दिवसांनी पांडूचं लग्न झालं आणि त्याने वेगळी खोली घेतली. त्यांचं बरोबर जाणं बंद झालं आणि तो एकटा जाऊ लागला. पांडुची उबग आणणारी बडबड बंद झाली या आनंदात काही दिवस गेले. तो आता गर्दीत धक्के खात खात पुस्तके वाचू लागला. लोकांच्या सुखदु:खाच्या गोष्टी, कोणा महान नेत्याचे चरित्र आणि कोणा नाटककाराची कुरुपता उघडी पाडणारी नाटकं असं रस्त्याच्या कडेला मिळेल ते वाचू लागला. दोन स्टेशनांच्या मध्ये आकाश दिसेल असे आणि ताजी हवा वाहेल असे मोकळे मैदान असावे आणि त्यातून फारशी न खडखडता लोकल जावी तसे आयुष्य चालले होते. पण आईच्या त्या पत्रातून आलेले ते घातक वळण त्याला दिसले नाही. भूक लागलेल्या माणसाने जंगलातले लालजर्द फळ आधाशासारखे खावे तसे सगळे झाले. जगाच्या रीतिरिवाजाप्रमाणे तो मार्गाला लागला. गृहस्थ झाला. आईच्या इच्छापूर्तीची आणि स्वतःच्या वासनापूर्तीची धुंदी हळूहळू उतरली तोपर्यंत आईने डोळे मिटले. तिचे शेवटचे सगळे सोपस्कार आटपून तो आला तेव्हा त्याचे सगळे मागचे धागे तुटलेले होते. तो आता फक्त या शहराचा आणि त्याच्या बायकोचा होता.
त्याने दुसरी सिगारेट काढून पेटवली आणि अस्वस्थपणे भकाभक दोन झुरके मारले.
त्याची बायको आई होणार हे ऐकल्यावर त्याला त्याच्या मनात आहेत हेच माहित नसलेले कोणतेतरी सुखतंतू मोहरले होते. पण काही काळच. त्यानंतर लोकलच्या गर्दीत तो अवघडून उभा असताना एक दिवस अंधारात इंगळी डसावी तसा त्याला त्या वाक्याचा अर्थ कळला. त्याची बायको आई होणार होती म्हणजे त्याचे मूल तो होणार होते. त्यादिवशी त्याने डोळे उघडून दाही दिशांना पाहिले. लोकलच्या त्या घामट गर्दीत विझलेल्या डोळ्यांनी आणि बधीर झालेल्या मनांनी उभी असलेली सगळी माणसं त्यानं नीट पाहिली. खुरटलेल्या दाढीचा आणि खप्पड चेहर्‍याचा कोणी, काळाकभिन्न आणि सुरकुत्या पडलेला कोणी किंवा खिडकीशी जागा मिळाली यातच खूप खूश असलेला कोणी अशी ही सगळी माणसं कधीतरी मुठी चोखत हसणारी तान्ही बाळं असतील असे त्याला वाटले. त्या जीवांना आपल्या जाळीदार पोटात घेऊन पळणारी ती लोकल त्याला त्याक्षणी पक्ष्यांची पिले खाणार्‍या नागिणीसारखी वाटली होती. त्याचे लहान मूल या जगात येईल तेव्हा हीच नागिण त्यालाही पोटात घेणार होती. हे असे काही होऊ देणार नाही हा निश्चय त्याने तेव्हाच केला होता. रक्ताचं पाणी करून कष्ट करू पण आपल्या मुलाला चांगले आयुष्य देऊ असे त्याने तेव्हाच ठरवले. नोकरी करून साईड बिझिनेस करू, दोघेही अविश्रांत काम करू आणि या जगाच्या उतरंडीच्या वरच्या पायर्‍यांवर मुलाला घेऊन जाऊ हे त्याने ठरवून टाकले. आपल्या मुलासाठी या विक्राळ समाजव्यवस्थेने ठोठावलेली सश्रम जन्मठेप जगायला त्याने आपल्या मनाची तयारी केली.
त्याची दुसरीही सिगारेट संपली आणि त्याने ती खाली टाकून आपल्या हजारोवेळा शिवलेल्या चपलेखाली पार चप्पट होईपर्यंत चिरडली. हॉस्पिटलच्या दाराकडे त्याने वळून पाहिले. एमआरआय रूमबाहेर पोराला घेऊन बाकड्यावर वाट पाहत बसलेली बायको त्याच्या डोळ्यासमोर आली. आल्या प्रसंगाला चिवटपणे सामोरी जाणारी. आयुष्याकडून दुसरी कसली अपेक्षा करायची असते हेच माहित नसणारी. बाहेर जगात दिसणारा झगमगाट, चमचमाट आपल्यासाठी नाहीच हे सहजपणे मान्य करणारी आणि त्या जगाचे नियम पाळून दोन वेळचे जेवण मिळावे म्हणून त्या झगमगाटासाठी आपले रक्त आटवणारी.
मूल मतिमंद आहे हे सुद्धा तिने किती शांतपणे स्वीकारले! त्याला मात्र सुंदर वेष्टन असलेले भेटवस्तुचे खोके उघडावे आणि आत काळाकभिन्न जहरिला साप असावा तसा झटका बसला होता.
का? का? का? त्याने हजारवेळा स्वतःला विचारले असेल. त्याला उत्तर नाही मिळाले. बायकोच्या कुपोषित शरीराकडे तो पाहायचा तेव्हा त्याचे डोळे भरून यायचे. तिचे बालपण कसे गेले होते कोण जाणे? कोणी तिच्या वाटेचे अन्न हिरावले होते? कोणी तिला आणि अशा अनेक मुलांना अर्धपोटी जगण्याची शिक्षा फर्मावली होती? कोणी?
प्रगतीचा आणि कल्याणाचा डिंडिम वाजवणार्‍या या व्यवस्थेत कोण त्याच्या मतिमंद मुलाला सुखी आयुष्य देणार होते? आणि का म्हणून? कोणी सगळी सूत्रं हातात घेतली आणि ठरवले की दुर्बळांनी मरावे हे वाईट आहे आणि त्यांनी हालाखीचे आयुष्य काढावे हे चांगले आहे? कोणी?
दोन वर्षापुर्वी टिपेस गेलेली त्याची तगमग सुप्त ज्वालामुखीच्या तप्त लाव्हासारखी त्याच्या मनाच्या तळातून पुन्हा वर उसळली. कपाळावरच्या आठ्या घट्ट करत तो आत गेला तेव्हा बायको एमआरआय रूममधून बाहेर येत होती. रिपोर्ट घेऊन दोघे डॉक्टरच्या खोलीत गेले. पडद्यावर फोटो लावून डॉक्टरने पाहिले. मग वळून औषधे लिहून देऊ लागला.
"मी औषधे बदलून देतो. ही औषधे घेऊन पाहू या काही फरक पडतोय का ते.", डॉक्टर म्हणाला.
त्याने मान हलवली. दोन वर्षे दर महिन्याला अर्धा पगार आणून हॉस्पिटलच्या घशात ओतूनही हाती काहीच लागलं नव्हतं आणि डॉक्टर अजून पोकळ आशावादाच्या गोळ्या खिलवत होता. त्याच्या डोक्यातून सणक गेली. खूप ताडताड बोलावं वाटलं पण वर्षानुवर्षांच्या सवयीने शब्द गळ्यातच विरले. डॉक्टरच्या हातावरचे मोठ्ठे चकाकते घड्याळ, खिशातला लांब-रुंद मोबाईल, खिडकीच्या बाहेर उभी असलेली त्याची चकचकीत गाडी फक्त पाहात राहिला.
औषधांची यादी घेऊन निमूटपणे ते निघाले. स्टेशनवर जाताना बायकोकडून त्याने पोराला घेतले नाही. तो पुढे आणि बायको मागे चालू लागले. गर्दीतून चालताना पावला-पावलाला त्याच्या डोक्यात सणक जात होती. कचरा, धूळ आणि लोकांनी भरलेलं ते शहर त्याच्याभोवती फेर धरून नाचतंय असं त्याला वाटू लागलं.
स्टेशनावर जाऊन उभे राहतात न राहतात तोच कुठूनतरी वास लागल्या सारखी लोकल त्याच्या पुढ्यात येऊन उभी राहिली. रोजच्या आठतासांची समिधा घालून आलेल्या लोकांना गिळून ती ओसंडत होती. एखाद्या टपोर्‍या मांसल अळीने मुंगी गिळावी तसा तो त्या लोकलमध्ये ओढला गेला. त्याच्यासारख्या कित्येक लोकांनी तो क्षणार्धात वेढला गेला. आठही बाजूंनी माणसं येऊन त्याला चिकटली आणि लोकल नवीन शिकार शोधायला निघाल्यासारखी दबा धरून हळूहळू निघाली.
तो एका पायावरून दुसर्‍या पायावर वजन टाकत उभा राहिला. तोंडाच्या अगदी जवळ तोंड आणून उभे असलेल्यांच्या निर्जीव नजरा टाळून दाराच्या दिसणार्‍या कोपर्‍यातून बाहेर पाहू लागला. फोडासारख्या तरारलेल्या इमारतींच्या पार्श्वभूमीवर केसांसारखा दिसणारा विजेच्या तारांचा गुंता, त्यात अडकलेले निर्जीव झालेले निरागस दुर्दैवी समाधानाचे पतंग, वखवखलेल्या या शहराने ज्याची दृष्टी आपल्या अखंड आणि प्रचंड गोंगाटाखाली चिरडली असं एखादं जळालेलं वाघूळ, असंख्य माणसांच्या अमर्याद गरजांसाठीचे भोगसामान वाहण्यासाठी निर्माण झालेल्या प्लॅस्टीकच्या पिशव्या, आपल्या खुराड्याच्या जाळीच्या छिद्राला खिडकी समजून तिच्यात वाळत घातलेल्या आणि पिऊन ओकणार्‍या गाड्यांच्या धुराने वर ढकललेल्या केविलवाण्या हवेने उडून पडलेल्या शर्टांपासून ब्रा पर्यंत काहीही दिसेल ते.
दोन स्टेशनांच्या मध्ये त्याला वास आला घाण, कारखान्यांच्या किंवा माणसांच्या विष्ठेचा. चकाकणार्‍या मेटॅलिक कलरच्या टंच गाड्यांची किंवा स्लीवलेस ब्लाऊजवर चार बोटं रुंदीचा पदर घेऊन मिक्सरपासून दागिन्यांपर्यंत काहीही मिरवणार्‍या टंच मॉडेल गृहिणींची किंवा माजाने सुजलेल्या चेहर्‍यामुळे बारीक झालेल्या डोळ्यांतून टंच सत्तासुंदरीचा हव्यास गळणार्‍या राजकारण्यांची होर्डिंग्ज मध्येच दिसून त्याच्या डोळ्यांवर आघात करू लागली. अजस्त्र कारखान्यांच्या अनावर प्रसवशक्तीतून पैदा झालेल्या वस्तूंची तुम्हाला किती गरज आहे ते सांगणारी होर्डिंग्ज, राक्षसी भोगातच सुख आहे याची जाहिरात करणारी होर्डिंग्ज, आपल्या अमानवी प्रचारशक्तीनं माणसाचा हवा तसा चौकोनी ठोकळा बनवणारी होर्डिंग्ज, गिळगिळीत आणि गुळगुळीत जगण्याशिवाय गत्यंतर नाही हे सांगणारी होर्डिंग्ज, जगण्यापेक्षा जिवंत राहण्यालाच आयुष्य म्हणणारी होर्डिंग्ज.
प्रत्येक वळणावर विरुद्ध दिशेला घेऊन जाणार्‍या, फुटेस्तवर खाल्लेल्यांना हाताने भरवणार्‍या, जिवंतपणाचं अवास्तव स्तोम माजवून कोट्यवधी लोकांचं जगणं हराम करणार्‍या सगळ्या या नरभक्षक व्यवस्थेचा त्याला भयंकर तिटकारा आला. घशात बोटं घालून सगळे नियम, सगळे संकेत, सगळी जगरहाटी मळमळणार्‍या पोटातून तिथेच ओकून टाकावी किंवा पुलावरून लोकल जाताना कचर्‍याची भरलेली पिशवी फेकतात तसं स्वतःला खालच्या गाळात फेकून द्यावं असं त्याला वाटलं. पण आठही बाजूंनी गर्दीत दाबला गेलेला असताना बोट हलवण्याचंही स्वातंत्र्य आत्ता नाही या विचाराने, पिसाळलेल्या कुत्र्याच्या मागच्या पायांवरून गाडी जावी तशी त्याची क्षुब्धता लुळीपांगळी झाली. डोळ्यात तरळलेलं पाणी पापण्यांनीच टिपायला त्याने डोळे मिटले आणि...
डोक्यावर घणाचा घाव घातल्यासारखा आवाज करत तो स्फोट झाला. त्याचे डोळे आणि तोंड खाडकन उघडले. कानाच्या पडद्यावर आदळून सर्वभक्षक त्सुनामीसारख्या त्या आवाजाच्या लाटा त्याच्या यूस्टेशियन नळ्यांतून रोरावत तोंडात आल्या आणि जीभ, घसा, टाळू, मेंदू सगळं सुन्न होऊन गेले. लोकांनी गच्च भरलेली ती लोकल झिडपिडत रुळांवरून घसरून थांबली. अंगाचा अवयवही हलवायला जागा नसलेल्या त्या एकसंध चरबीच्या गोळ्यासारख्या गर्दीत माणसं धडपडली नाहीत, फक्त एकमेकांवर रेलून दाबली गेली. डब्ब्याच्या भिंतीपाशी उभ्या काही किरकोळ जीवांनी गुदमरून जगण्याचे नाटक संपवले. बाकीचे लवकरात लवकर पायांवर सरळ उभं राहून बाहेर पडण्यासाठी वळवळू लागले. उघड्या दारातून धडाधड उड्या मारायला लागले. "बाँब बॉम्ब," असा जप केल्यासारखा आवाज चारीबाजूनी घुमला. जखमेतून रक्त वाहावं तशा बाहेर वाहणार्‍या गर्दीबरोबर तोही बाहेर वाहत आला. स्फोटाच्या आवाजाने त्याच्या कानात अजूनही चुंई वाजत होतं. बाहेर पडल्यावर त्याला दिसले माणसांचे अवयव, फाटलेली शरीरं, रक्ताची डबकी, जखमी लोकांचे चित्कार आणि बघ्यांचा कोलाहल. रक्ताच्या दर्शनाने काही भोवळ येऊन पडलेले, काही लोक त्या प्रेतांमध्ये आपणही आहोत की काय अशी शंका असल्यासारखी उभी असलेले तर काही स्वतःच्या जिवंतपणावर मनोमन खूश होत तुटक्या फाटक्या शरीरांना मरणापेक्षाही भयंकर असे जीवन द्यायच्या खटपटीला लागलेले.
एका कडेला उभा राहून तो बायकोच्या साडीचा रंग आठवायला लागला, पोराच्या झबल्याचा रंग आठवायला लागला. त्याला नक्की आठवले नाही पण दोघांचेही कपडे लालच असावेत असा विचार त्याच्या मनाला चाटून गेला. फुटलेल्या त्या दोन डब्यांच्या समोरून काही अंतरावरून त्याने सावकाश चालत फेरी मारली. दुरूनच काही दिसतंय का पाहिलं, चादरीत उचलून नेल्या जाणार्‍या जखमींकडे डोकावून पाहिलं. त्याला बायको सापडली नाही. दोन्ही डब्यांभोवती दोन-तीन फेर्‍या मारल्यावर तो कंटाळला. मावळलेल्या सूर्याच्या पश्चात साचणारा अंधार आता समोरचं उध्वस्त दृष्य गिळू पाहू लागला, पण शहरातले दिवे पेटून त्याला रोखू लागले. त्या काळवंडणार्‍या दृष्यावर आपल्या तुटपुंज्या प्रकाशाचे डाग पाडून आणखी भयाण छटा आणायचा कसोशीने प्रयत्न करू लागले.
तो रूळांच्या बाजूला असलेल्या टेकाडावर झुडपाशेजारी बसला. तिथं दिव्यांचा प्रकाश पोचत नव्हता. खिशातून सिगारेट काढून शिलगावली. त्या शहराच्या अविनाशी दुर्गंधीपुढे त्या धुराचा वास त्याला हवाहवासा वाटला. रिकाम्यापोटी दोन कडक झुरके मारल्यावर त्याला गरगरलं आणि चहूबाजूंनी दाटलेल्या अंधारात गजबजलेल्या जगात आता आपण अगदी एकटे आहोत अशी भावना त्याच्या आवळलेल्या पोटातून कारंज्यासारखी थुईथुई उडू लागली. एकटा. स्वतंत्र. आतापर्यंत खुरडत खुरडत इथवर ओढत आणलेलं हे आयुष्याचं ओझं फेकून द्यायला किंवा दूर डोंगराच्या कुशीत किंवा समुद्राच्या कडेवर निरीच्छ जगायला किंवा ज्या व्यवस्थेने जगणे अवघड करून ठेवले तिच्यातल्या पळवाटा शोधायला, उन्मुक्तपणे शरीराचे चोचले पुरवायला, मनाच्या इच्छा ओरबाडून का होईना पूर्ण करायला. तो स्वतंत्र झालेला होता. त्याला आनंद वाटला नाही पण मोकळं वाटलं. कॉलेजच्या दिवसात असायचा तसा बिनधास्तपणा त्याच्या झुरक्यात आला. वर बघून आकाशाच्या तोंडावर धूर सोडताना त्याला शांत शांत वाटलं. तो आता कोणालाही काहीही देणं लागत नव्हता. ज्यांनी हा निरर्थक जन्म दिला ते, ज्यांच्याशी इच्छा नसताना आणि प्रयत्न करूनही तुटत नाहीत असे मनाचे नाजूक तंतू जोडले गेले ते सगळे नाहीसे झालेले होते. आता फक्त तो आहे आणि ही समोरची गर्दी. त्या गर्दीतल्या जंतूंशी मनसोक्त खेळ करायला, वापरून घ्यायला, सूड घ्यायला आणि नंतर मन भरलं की त्या बजबजपुरीतून निघून जायला तो मोकळा होता.
त्याने सिगारेट विझवली आणि उभा राहून खिशात हात घालून चालू लागला. गर्दी अजून वाढत चाललेली. आता पोलीस आणि फायरब्रिगेडच्या गाड्या आलेल्या त्याला दिसल्या. जखमींना आणि मेलेल्यांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये नेलं जातंय ते ओरडून सांगितलं जात होतं. बायकोला आणि पोराला हॉस्पिटलात नेलं असेल असं त्याला वाटलं. त्याने खिशातून हात काढले. शांत वाटणारा त्याचा चेहरा सुकलेल्या चिकूसारखा आक्रसला, सैलावलेल्या खांद्यांनी हळूहळू नकळत गोलाई धारण केली आणि त्याचं शरीर पुन्हा खांद्याला पट्टा लावून मागे काहीतरी जड ओढत चालल्यासारखं दिसू लागलं.
तो हॉस्पिटलमध्ये आला. बाहेर पोर्चमध्ये अ‍ॅम्बुलन्स ठणाणा करत येजा करत होत्या, माणसं आकांत करत किंवा मेल्या डोळ्यांनी बघत उभी राहिलेली. तो आत गेला. रांगेने ठेवलेल्या मृतदेहांसमोरून चालत गेला. करपलेले, तुटलेले ते मृतदेह पाहून त्याला किळस आली नाही. वाईटही वाटले नाही. तिथेही त्याला बायकोपोरासदृष काही दिसलं नाही. आजूबाजूला रडणार्‍या, भांबावलेल्या लोकांमधून वाट काढत त्याने आणखी आत जाऊ पाहिले. पण एका पोलीस हवालदाराने त्याला अडवले, पण तितक्यात दुसर्‍या घुसणार्‍या माणसाला अडवायला हवालदाराला दुसरीकडे पाहावे लागले. तो अलगद आत गेला. जिवंतपणाचे रक्षक डॉक्टर आणि नर्स पांढर्‍या कपड्यांमध्ये धावपळ करताना त्याला दिसले. जखमी लोकांना तातडीने मलमपट्टी केली जात होती. इथेही जखमी लोकांना रांगेत ठेवलेलं होतं. सगळे एकजात सारखे दिसत होते, बाहेरच्या रांगेतल्या सारखेच. नाकातून आत-बाहेर करणारी हवा एवढाच काय तो फरक. त्याने वॉर्डभर संथपणे नजर फिरवली. एका कोपर्‍यातून पुढे जाऊन त्याची नजर थांबली आणि पुन्हा वळली. एका स्ट्रेचरवर एक बाई पडलेली त्याला दिसली. उजवा पाय तुटलेली. तिच्या पलीकडे तिच्या पोटातून वर आल्यासारखं दिसणारं एक छोटंसं डोकं. त्याच्या हृदयाने एक ठोका आवळून धरला. घसा कोरडा होऊन आत ओढला गेला. नकळत त्याने स्वतःला तिकडे ढकलले. पाय घासत जवळ पोचतानाच त्याला पोराचे मंगोल डोळे दिसले. फतकल मारून ते मंदपणे स्वतःच्याच हाताशी खेळत होतं. त्याला काहीही जखम झालेली त्याला दिसली नाही. जणू त्याचा मतिमंदपणा त्याचं आयुष्य मरणप्राय करण्यासाठी नियतीला पुरेसा वाटला होता. त्याची नजर बायकोच्या भाजलेल्या हातांवरून फिरली. जखमांनी आणखी विद्रूप झालेल्या चेहर्‍यावरून गेली आणि छातीवर स्थिरावली. तिची छाती वरखाली होतेय की नाही ते त्याला ठरवता आलं नाही. एकटक निरखून पाहताना मात्र त्याला काहीतरी कळत गेलं आणि त्याची नजर पाण्यात विरघळू लागली. त्याच्या पायातली शक्ती निघून गेल्यासारखा तो मटकन खाली बसला आणि स्वतःचे केस मुठीत गच्च धरून ओठ आवळत गदगदून रडू लागला.