Tuesday, December 20, 2011

भविष्याला आपली गरज आहे का?

'पृथ्वी वाचवा' ही घोषणा बर्‍याच लोकांना विनोदी वाटते. मलाही वाटते. शिवाय 'पृथ्वी' वाचवण्यासाठी लोकांना सुचवले जाणारे उपायही बरेच गमतीदार आहेत. उदाहरणार्थ, प्लॅस्टिकच्या पिशव्या न वापरणे, घरातले दिवे विनाकारण लावून न ठेवणे किंवा घरात पाणी जपून वापरणे वगैरे. काहीतरी बिघडलंय आणि हे असे उपाय केल्याने बराच फरक पडेल अशी समजूत असलेले भाबडे लोक ते उपाय प्रामाणिकपणे करतही असतील. या 'पृथ्वी वाचवा' वरून एक व्हिडिओ पाहिल्याचे आठवले, तो इथे डकवण्याचा मोह आवरत नाही.






पृथ्वी वाचवायची गरज असो वा नसो, मानवाने स्वतःला वाचवण्याची गरज आहे यावर बर्‍याच लोकांचे आजकाल एकमत झालेले दिसते. मानवजात नष्ट व्हायचा धोका आहे वगैरे बरेच शास्त्रज्ञही मासिकांमध्ये खळबळजनक विधाने करत असतात (खळबळ होत नाही ही गोष्ट वेगळी). पर्यावरणवाद्यांचा आणि तंत्रभीतांचा (Luddites) तर हा एक आवडीचा विषय आहे. गेल्या दोन-अडीचशे वर्षांत औद्योगिकीकरणामुळे झालेला पर्यावरणाचा र्‍हास, तपमानवाढ, लोकसंख्येचा विस्फोट, अन्न-पाण्याचे दुर्भिक्ष्य, आण्विक युद्धे आणि अगदी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात बदल, सौर वादळे इत्यादीपर्यंत अनेक कारणे दिली जातात. यातली सौर वादळे, उल्कापात वगैरे नैसर्गिक कारणे सोडली तर बाकीची सगळी मानवनिर्मित आहेत असे म्हटले जाते आणि हा तंत्रज्ञानाने साधलेल्या प्रगतीवर मोठा आरोप आहे. एकीकडे तंत्रज्ञानातील नवनवीन शोधांमुळे मानवी आयुष्य खूपच सुखकर झाले आहे, प्रदीर्घ झाले आहे असे विविध आकडेवारीने सांगितले जात असताना दुसरीकडे अमुक एक टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, अमुक इतके लोक उपाशी आहेत, अमुक अब्ज लोकांना स्वच्छ पाणी मिळत नाही अशीही आकडेवारी कानावर येत असते. एकीकडे सगळ्यांना शिक्षण, कामधंदा वगैरे देऊन सगळ्या जगातल्या लोकांचे जीवनमान सारखे करण्याची धडपड आणि दुसरीकडे मानवाच्या स्वच्छंद नैसर्गिक जीवनावर घाला येत असल्याची बोंब. एकीकडे लोकसंख्या भयानक वाढतेय आणि लोकांना उपाशी मरावं लागेल असा आकांत तर दुसरीकडे लोकसंख्येच्या वाढीचे आलेख काढून ती कशी स्थिर होईल हे सिद्ध करण्याची धडपड. हे सगळं पाहून नक्की काय चाललंय हे कळेनासं होतं.

माझा स्वतःचा स्वभाव अत्यंत आळशी असल्याने तंत्रज्ञानामुळे आयुष्य सुकर झाले आणि प्रचंड प्रमाणावर श्रमबचत झाली वगैरे गप्पांवर विश्वास नाही. उलट जितकी तंत्रज्ञानात प्रगती होईल तितकी भोगस्पर्धा आणि त्यामुळे कामाचे तास वाढलेलेच दिसतात. तरीही होताहोईतो तटस्थ राहून मी उत्तरे शोधण्याचा माझ्या परीने प्रयत्न केला.

वर्तमानात खरोखर आपण म्हणतो तसा नैसर्गिक साधनसंपत्तीचा भरमसाठ वापर होतोय की नाही आणि खरंच नैसर्गिक स्त्रोत संपत आले आहेत का हे शोधताना मला Global Footprint Network बद्दल माहिती मिळाली. ही संघटना पर्यावरणाचं अकाऊंटिंग करून मानवी उपभोगाचा नैसर्गिक स्त्रोतांवर कितपत परिणाम होतो याची आकडेवारी काढते. सप्टेंबर २०११ मध्ये त्यांनी "Earth Overshoot Day" 'साजरा' केला. म्हणजे २०११ या एका वर्षात जितकी साधनसंपत्ती तयार झाली असती ती सप्टेंबर महिन्यातच वापरली गेली हे जाहीर केलं. त्यांच्या ब्लॉगवर तो लेख वाचता येईल.आता हे पाहून कोणालाही अशी शंका येईल की माणसाच्या उद्योगांचा निसर्गावर परिणाम होतोय हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले की काय? तशी ती मलाही आली आहे, पण अजून तसे म्हणण्यासाठी कोणाकडून मान्यता मिळायला पाहिजे ते मला महित नाही. त्यांच्या संस्थळावर त्यांनी लोकसंख्येचे अंदाज दिले आहेत. विशेष काहीही घडले नाही आणि जसे चालले आहे तसेच चालत राहिले तर २०५० साली लोकसंख्या ९ अब्ज असेल असा अंदाज त्यांनी बांधला आहे.

त्याचदरम्यान UNO च्या Food and Agriculture Organization (FAO) चा एक अहवाल प्रसिद्ध झाला. त्यातही २०५० साली ९ अब्ज लोकसंख्या असेल असा अंदाज केला गेला आहे. या ९ अब्ज लोकसंख्येसाठी सध्याच्या अन्नधान्य उत्पादनात ७०% वाढ झाली पाहिजे, त्यातच उपलब्ध शेतजमिनीपैकी २५% जमीन निकामी झाली आहे, ८% अर्धवट निकामी आणि १०% सुधारत आहे असे आव्हानात्मक प्रश्न उभे केले आहेत. अर्थातच नव्या तंत्रज्ञानामुळे आणि सुधारित पद्धतींमुळे आपण हे आव्हान पेलू शकू असा विश्वासही व्यक्त केलाच आहे.

मग हे नवे तंत्रज्ञान म्हणजे काय ते शोधणे आले. उत्तर थोडेसे माहितीतलेच होते. पाण्याचा अतिकिफायतशीर वापर आणि जेनेटिक्स. जेनेटिक्समधील वाईड क्रॉसिंग, सेल/टिश्यू/प्रोटोप्लास्ट कल्चर आणि सोमॅटिक सेल हायब्रिडायझेशन अशा तंत्रांची भारदस्त नावं वाचता वाचता जेनेटिक्स, नॅनोटेक्नॉलॉजी आणि रोबोटिक्स या तीन क्षेत्रात प्रचंड वेगाने होत असलेल्या प्रगतीबद्दल कुणकुण लागली. (http://www.blogger.com/=http://www.foresight.org/). Molecular Manufacturing आणि cell computing वगैरे भन्नाट विषय पाहून हतबुद्ध झालो आणि तशाच अवस्थेत Singularity या नवीनच संकल्पनेशी ओळख झाली. सिंग्युलॅरिटी समिटच्या संस्थळावर महिती तंत्रज्ञानातल्या चढत्या भाजणीत होणार्‍या वाढीबद्दल माहिती देणारी रे कर्झ्विल यांची एक चित्रफीत पाहण्यात आली. रे कर्झ्विल यांच्या मते या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ही सिंग्युलॅरिटी २०२९ सालापर्यंत गाठता येईल. त्यानंतर काय होईल हे सांगणे अवघड असले तरी माणसाने आपल्यापेक्षा कित्येकपटींनी बुद्धिमान असे यंत्र तयार केले असेल एवढे नक्की. असे हे यंत्र स्वतःपेक्षाही जास्त बुद्धिमान यंत्रं तयार करू शकेल आणि 'बुद्धिमत्तेचा स्फोट' होईल. या बुद्धिमत्तेच्या स्फोटापुढे माणसाचे सध्याचे प्रश्न अगदीच किरकोळ असतीलच शिवाय खुद्द माणसाची बुद्धिमत्ताही खूपच किरकोळ असेल. आता यावरही दुसर्‍याच दिशेने विचार करणारे महाभाग आहेतच. सन मायक्रोसिस्टीम्सचे संस्थापक आणि प्रमुख संशोधक, जावा या प्रोग्रॅमिंग लँग्वेजच्या रचनेचे तपशील लिहीणारे श्री. बिल जॉय यांनी लिहीलेला एक लेख (Why The Future Does Not Need Us) या बाबतीत अतिशय उद्बोधक ठरावा.

हे सगळं पाहून डोकं गरगरायला लागलं आणि "Man moves in mysterious ways his problems to resolve." यातल्या पहिल्या भागाबद्दल खात्री पटली.

पण दुसर्‍या भागाचं काय? तुम्हाला काय वाटतं? माणसाचे प्रश्न सुटतील? की आणखी वाढतील? वाढणार असतील तर उपाय काय?

Monday, December 19, 2011

सरासरी अंधश्रद्धा

सरासरी अंधश्रद्धेबद्दल लिहीण्याआधी एक गोष्ट सुचली ती सांगतो. फार पुर्वीची नाही, नेहमीचीच गोष्ट आहे. एकदा एक राजा होता. प्रजेच्या कल्याणासाठी दक्ष वगैरे. वर्षाअखेरीस त्याची प्रधान मंत्र्याशी खास चर्चा असायची. वर्षभराच्या कामगिरीच्या मूल्यमापनाची. तशी ती यावर्षीही ठरली. एकेका खात्याच्या कामगिरीचा सारांश महामंत्री सांगणार आणि राजा त्यावर विचार, टिप्पणी करून त्या खात्याच्या मंत्र्याला बक्षिस किंवा सूचना काय द्यायच्या ते सांगणार अशी पद्धत. समोरासमोर ठेवलेल्या मंचकांवर राजा आणि महामंत्री बसलेले आणि मध्ये ठेवलेल्या मेजावर गेल्या आणि यावर्षीच्या माहितीपत्रांची भेंडोळी. राजाच्या दरबारात नवीनच लागलेला विदूषक एका कोपर्‍यातल्या आसनावर उत्सुकतेपोटी बसलेला . तसं इथे त्याचं काही काम नाही. इथे सगळं कसं गंभीर. कृषीमंत्र्यांच्या माहितीने कामकाजाची सुरुवात झाली. कृषी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं खातं ना! बाकी कोणी कितीही टिमक्या वाजवल्यातरी शेवटी पोटाची खळगी भरण्याच्या या उद्योगातूनच बाकी सगळा डोलारा उभा राहिला आहे हे सगळ्यांनाच माहित असतं. तर, महामंत्री सांगू लागले आणि राजा ऐकू लागला.

"महाराज, यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला.", महाराजांच्या चेहर्‍यावर काळजीच्या रेषा. "तरीही गेल्यावर्षीपेक्षा दहा टक्के जास्त धान्योत्पादन झाले. आकडेवारीनुसार सडून वाया गेलेलं धान्य सोडूनही दरडोई सरासरी शंभर शेर धान्य निर्माण झाले. म्हणजे दरडोई दरमहा आठ शेर."

राजा प्रसन्न. कृषीमंत्र्यांना आठ गावं बक्षिस. पुढे अर्थमंत्री. "महाराज, यावर्षी आपल्या राज्याचं एकूण उत्पन्न आठ टक्क्यांनी वाढलं आणि वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊनही दरडोई उत्पन्न पन्नासहजारांवरून साठहजारांवर गेलं."

राजा खूश. अर्थमंत्र्यांना दहा गावं बक्षिस. अशी एकेक माहिती प्रधानमंत्री सांगत गेले. बैठक संपली तेव्हा राजा प्रसन्न होता. राज्यातल्या लोकांना जास्तीचं अन्नधान्य मिळतंय, जास्तीचं उत्पन्न मिळतंय, लोक जास्ती जगताहेत वगैरे गोष्टी ऐकून कोणता राजा प्रसन्न होणार नाही?

महामंत्र्यांना निरोप देऊन त्याने पेंगणार्‍या विदूषकाकडे मोर्चा वळवला.

"उठ झोपाळा, गोष्ट सांगिशी मला", राजा हसून म्हणाला.

"क्षमा महाराज, तुमच्या राज्यात हे जास्तीचं अन्न खाऊन अशी जास्तीची झोप येते बघा", विदूषक म्हणाला," आणि गोष्ट तुम्हाला तुमचीच सांगतो. फार जुनी नाही, पुढच्या महिन्यातल्या पंधरा तारखेला घडलेली. सांगून झाल्यावर तुम्हाला नक्की आठवेल अशी.

तर, झालं काय महाराज, की जास्तीच्या उत्पन्नाचे आभार म्हणून मी तुम्हाला माझ्या घरी जेवायला बोलावलं. मी स्वतः पाटावर बसलो आणि चौरंगावर तुम्हाला बसवलं. तितक्यात दारी एक गरीब ब्राह्मण अतिथी आला. त्यालाही आत घेतलं आपल्या बाजूला जमिनीवर बसवलं. तुमच्या आवडीच्या जिलब्यांचा बेत केला होता. एकावन्न जिलब्या केल्या होत्या, पण तुम्ही पहिला भात संपवता संपवता त्या बुभुक्षित ब्राह्मणाने पन्नास जिलब्या खाल्ल्या आणि मी एक जिलबी खाल्ली. नाईलाजाने तुम्ही बाकीचं जेवण जेवलात आणि हात धुतलेत. मुखशुद्धी करून थोडा आराम करून तुम्ही जायला निघालात तेव्हा मी नम्रपणे विचारलं 'महाराज, जिलब्या छान झाल्या होत्या नाही?' ते ऐकून तुम्ही रागाने लालबुंद झालात आणि काहीही न बोलता ताडताड निघून गेलात. मला दु:ख तर खूपच वाटले महाराज पण आश्चर्य या गोष्टीचे अधिक वाटले की आपण प्रत्येकी सरासरी सतरा जिलब्या खाऊनही तुम्ही असं का वागलात?"



आता ही गोष्ट ऐकून संख्याशास्त्रज्ञ आणि संख्याशास्त्रांध असे दोन्ही लोक त्यात चुका काढतील किंवा संख्याशास्त्र हे फक्त एक निदर्शक म्हणून वापरले पाहिजे आणि सरासरी शिवाय इतरही मोजमापे (median, mode) आहेत वगैरे सांगतीलच आणि त्यांचं बरोबर आहे यात शंका नाही. पण तरीही याच सरासरीचा आधार घेऊन बरेच मुद्दे सिद्ध केले जातात आणि तेव्हा हा मुद्दा प्रकर्षाने मांडला जात नाही. वरच्या गोष्टीत घेतलेले मुद्देच पाहा ना! गेल्या पन्नास-साठ वर्षात आपण प्रचंड प्रगती केली असे म्हणतो. या प्रगतीचे मापन करणारे निर्देशक बहुतांश संख्यात्मक आहेत आणि त्यातले बरेचसे सरासरीवर आधारित आहेत. शिवाय या निर्देशकांना आधारभूत अशी काही गृहीतके आहेत आणि ती गृहीतके बरोबर धरली तरच त्या निर्देशकांना हवा तो अर्थ प्राप्त होतो.

उदा. दोनशे वर्षांपूर्वी असलेली सरासरी जन्मतः जीवनशक्यता ३१ वर्षां वरून आता ६७ वर्षांवर गेली आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रत्यक्षात अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि हाताच्या बोटावर मोजता येण्यासारख्या देशांमध्ये ती ७५-८० वर्षांच्या पुढे असते, विकसनशील देशांमध्ये ६०च्या आसपास असते आणि मागासलेल्या देशांमध्ये ४०च्या खाली असते (संदर्भ) शिवाय या निर्देशकासाठी गृहीतक असे आहे की जन्माला आलेला जीव दुबळा असो वा सशक्त, तो जगला पाहिजे आणि अनेक अपत्यांपैकी सशक्त ती जगतील आणि दुबळी मरतील हा निसर्गातल्या सामान्य नियम चुकीचा आहे. वस्तुतः अगदी ७५-८० जीवनशक्यता असलेल्या भागातही प्रत्येक माणूस ७५-८० वर्ष जगतो असे नाही. याचाच अर्थ आपण फक्त दुबळेपणा आणि सशक्तपणा यांच्या नैसर्गिक व्याख्या बदलून त्या कमी तीव्र केल्या आहेत आणि याचा परिणाम म्हणजे गेल्या पन्नास-साठ वर्षांत तिप्पट झालेली लोकसंख्या.

तर, ही सरासरी अंधश्रद्धा म्हणजे संख्याशास्त्रीय निर्देशक वापरून, एखाद्या गोष्टीचे फक्त संख्यात्मक मूल्यमापन करून आणि गुणात्मक बाबींकडे पूर्णत: दुर्लक्ष करून त्या गोष्टीबद्दल छातीठोकपणे बोलणे.

बहुधा तंत्रज्ञानातली प्रगती, त्याचा पर्यावरण आणि मानवी जीवनावरचा परिणाम यावर चर्चा होत असताना तंत्रज्ञानाची बाजू घेणार्‍यांना हे निर्देशक फार उपयोगी पडतात. धडाधड प्रतिपक्षावर संख्या आणि आलेख यांचा मारा केला जातो आणि तंत्रज्ञानामुळे गेल्या पन्नास वर्षांत माणसाचे आयुष्य किती सोपे-सुकर झाले आहे हे पटवून दिले जाते. तेव्हा या निर्देशकांचा वापर करताना असा अविर्भाव आणला जातो की बहुसंख्यांचे कल्याण झालेच आहे आणि थोडेफार उरले आहेत त्यांचे लवकरच होईल. वस्तुस्थिती मात्र त्याच्या उलट आहे.

तंत्रज्ञानाच्या विकासामुळे काही लोकांचे आयुष्य सोपे झाले असले तरी बहुसंख्यांचे आयुष्य कठीणच आहे. बहुतेकांवर आयुष्य लादले गेले आहे आणि बहुतेकांवर ते कसे जगायचे याची पद्धतही लादली गेली आहे. एक हरितक्रांती होऊनही अजूनही एक तृतीयांश लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही. गमतीचा भाग म्हणजे अश्मयुगात माणसाला पुरेसे अन्न मिळत नसे असे (चुकीने) समजले जाते पण सध्याच्या उपाशी लोकांची संख्या अश्मयुगातल्या एकूण लोकसंख्येपेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे (म्हणजे जन्मतःच किंवा बालपणी लवकर मरणारे जास्त दु:खी की उपाशी अवस्थेत खुरडत खुरडत जगून मरणारे जास्त दु:खी हा गुणात्मक वाद आला).

आणखी एक गोष्ट अशी की हे निर्देशक वापरून त्यात होणारी सुधारणा म्हणजे मानवी जीवनाच्या दर्जातल्या सुधारणेची निदर्शक आहे असे सध्या आपण म्हणू शकतो. परंतु जसजशी लोकसंख्या वाढेल तसतसे या निर्देशकांमधली सुधारणा खरोखर मानवी आयुष्याच्या दर्जातली सुधारणा असेलच असे नाही. (वर दिलेल्या दुव्यात विवेचन केलेला आत्महत्यांचा प्रश्न बहुतेकांना रोचक वाटेल. )

ज्याप्रमाणे बहुतेकवेळा शेअरमार्केटच्या निर्देशांकाचा अर्थव्यवस्थेच्या स्थितीशी संबंध असेलच असे नाही त्याचप्रमाणे हे संख्याशास्त्रीय निर्देशांक वस्तुस्थितीचे यथार्थ प्रकटन करतीलच असे नाही. म्हणूनच तंत्रज्ञानातली घोडदौड आणि तिचा पर्यावरण व मानवी जीवनावर होणारा परिणाम यांचा उहापोह करण्याआधी या निर्देशकांचा समाचार घेणे आवश्यक आहे असे मला वाटते.

Sunday, December 18, 2011

आवंढा

मेच्या पहिल्या आठवड्यातला शुक्रवार. भडभुंज्यांच्या कढईत तापवल्यासारख्या गरम मातीतून सायकल मारत घरी आलो. माणसं सगळी घरांच्या सावलीत गुमान पडलेली. गल्लीतली कुत्रीसुद्धा हातपंपाच्या आजूबाजूला गारवा शोधत वीतभर जिभा काढून धपापत बसलेली. अधूनमधून छोट्याशा झुळकींचे भोवरे धुळीची चादर विस्कटत असले तरी त्यात हवेपेक्षा उन्हाच्या झळाच जाणवत होत्या. पाठीला घामाने शर्ट चिकटलेला असला आणि उन्हाने चेहरा रापला असला तरी मला आतून गार गार वाटत होतं. इंजिनिअरिंगची शेवटची परीक्षा संपली होती आणि चांगली गेली होती.

सराईतपणे सर्रकन उघड्या फाटकातून सायकल आत नेली आणि तसाच मागच्या मागे उतरून अलगद भिंतीला जाऊन टेकू दिली. धडधडत व्हरांड्यात जाऊन आईला हाक मारणार तोच भानावर आलो आणि मग आवाज न करता हलक्या पायांनी घरात शिरलो. घरात शांतता होती आणि आतल्या अंधाराला डोळे सरावायला थोडा वेळ लागला. हळू हळू दबक्या पावलांनी पुढच्या खोलीतून मधल्या खोलीत गेलो. आई अपेक्षेप्रमाणे जराशी पडली होती आणि तिचा डोळा लागला होता. तिची झोपमोड न होऊ देता तिथून स्वयंपाकघरात आणि तिथून मागच्या दारात आलो. माझ्या चाहुलीने दाराशेजारच्या नळावर बसलेल्या दोन चिमण्या भुर्रकन उडाल्या आणि पारिजातकावर जाऊन बसल्या. धुण्याच्या दगडावर पोट टेकवून पहुडलेल्या मांजरीने एक डोळा उघडून पाहिलं आणि कुंपणाच्या भिंतीवर बसलेला कावळा उडून गेला. कडुनिंबाखाली टाकलेल्या झोपाळ्यावर बसलेल्या चिमी-ठमीला मात्र काहीच पत्ता लागला नाही. वेण्यांचे लांब-जाड शेपटे पाठीवरून मागे टाकून दोघी हळुवारपणे झोके घेत पुस्तकांच्या आडून खुसपुसत होत्या. काय एवढ्या गप्पा रंगल्या होत्या कोण जाणे?
पाय न वाजवता थोडासा झुकुन पुढे गेलो आणि बैलांच्या वेसणी धराव्या तशा त्यांच्या वेण्या दोन हातात दोन धरून खेचल्या.
"आऊच..आईगं",नाजूकपणे दोघी कळवळल्या आणि मी वेण्या सोडून हसत उभा राहिलो.
"दादिटल्या खादिटल्या," चिमी ओरडली आणि पुस्तक घेऊन मारायला मागं आली. झोपाळ्याभोवती दोन-तीनदा तिला हुलकावण्या दिल्यावर रागाने फुसफुसत पुन्हा झोपाळ्यावर धपकन बसली.
"जा चिमे, मला जेवायला वाढ", मी म्हणालो.
"अडलंय माझं खेटर. स्वतःच्या हाताने वाढून घेता येत नाही का?", चिमी नाक उडवत म्हणाली.
"जा नाहीतर मी आईला उठवीन हां."
दोन सेकंद माझ्याकडे मारक्या म्हशीसारखं बघून चिमी उठली. "चल गं ठमे", असं म्हणून दाणदाण पाय आपटत आत गेली. ठमी गेली नाही. खाली बघत मंद हसत हातातल्या मिटलेल्या पुस्तकावर बोट फिरवत बसली.
मी कडुनिंबाला टेकून उभा राहिलो. तिच्या सावळ्या गोल चेहर्‍याकडे, खाली झुकलेल्या लांब लांब पापण्यांकडे आणि आता खांद्यावरून पुढे घेतलेल्या वेणीकडे पाहात राहिलो.
"बन्या म्हणाला तुला बघायला येताहेत उद्या?", मी विचारलं.
तिने पापण्या उचलून वर पाहिलं. मी नजर चुकवून जांभळीच्या पानांमध्ये मोहोर शोधू लागलो.
"हो येताहेत ना. श्रीरामपूरचे लोक आहेत."
मी पुन्हा तिच्याकडे पाहिलं. ती पुन्हा खाली बघून मंद हसत पुस्तकावर बोट फिरवत होती.
"मोठी तालेवार पार्टी आहे म्हणे?", मी मिश्कीलपणे म्हणालो.
"हो, आहेच्च मुळी," तिने तिरप्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं. तिचं हसू आता रुंदावलं होतं, " ट्रान्सपोर्टचा बिझीनेस आहे. पंचवीस ट्रक आहेत म्हणे."
का कोण जाणे, पण मला कशाचातरी खूप राग आला. मी नजर पुन्हा जांभळीच्या पानांमध्ये खुपसली.
"असेना का. आम्हाला काय फरक पडतो?", तिच्याकडे न पाहताच मी म्हणालो, " आम्ही काय, तुझ्या लग्नात जेवणावर उभा-आडवा हात मारणार आणि तुझा नवरा तुला ट्रकमध्ये घालून न्यायला लागला की खाली उभं राहून तुला टाटा करणार. अर्थात तू आम्हाला लग्नाला बोलावलं तर... बोलावणार ना?"
काही उत्तर आलं नाही म्हणून मी मान वळवून तिच्याकडे पाहिलं. तिची नजर खालीच झुकलेली राहिली. चेहर्‍यावरचं हसू मात्र मावळलं होतं. मला बरं वाटलं.
पुस्तक सोडून आता ओढणीशी वेगाने चाळा करणार्‍या तिच्या नाजूक, लांब बोटांकडे पाहून मी आणखी चेव आल्यागत म्हणालो,"ठमेऽऽ, काय म्हणतोय मी? बोलावणार ना लग्नाला?"
तिने झटकन वर पाहिलं. इतकावेळ हसणार्‍या तिच्या टपोर्‍या काळ्या डोळ्यांमध्ये पाणी डबडबलं होतं आणि डोळ्यांच्या गुलाबी कडा लालसर होऊन पापण्या भिजल्या होत्या.
"ठमे...", मी चरकलो.
ती तटकन् उठून उभी राहिली आणि माझ्याकडे न पाहता, काहीही न बोलता तरातरा चालू लागली.
"ठमे....मेहरुन्निसा..", माझ्या घशातून अस्पष्ट शब्द उमटले.
मला मोठ्याने हाक मारून तिला थांबवायचं होतं, पण घशात इतका मोठा आवंढा आला की डोळ्यातून पाणीच आलं.